Vaachlas re vaachlas books and stories free download online pdf in Marathi

वाचलास रे वाचलास ( भयकथा- एका प्रवासाची )

तो जुलैचा महिना होता. नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. विश्वास कांबळे नावाचा तरुण, नुकतीच त्याची बदली कोल्हापूरला झाली होती. तो कोल्हापूर मध्ये क्लार्क या पदासाठी नोकरी करत होता. मूळचा तो राहणारा सातारचा. काही दिवस सुट्टीसाठी तिकडे गेला होता. काही कामानिमित्त त्याला कोल्हापूरला लगेचच जावे लागणार होते. त्याच्या मनात काही तरी विचित्र भावना निर्माण होत होत्या. त्याचे आई-वडील ही त्याला एवढ्या रात्री नको जाऊस अशी विनंती करत होते. पण काम खूपच महत्त्वाचे असल्या कारणाने त्याला जावे लागणार होते. तरी त्याचे मनही भयभीत झाले होते. काही तरी विचित्र घडेल अशी पुर्व सूचना त्याच्या मनात निर्माण होत होती.
रात्रीच त्याने जाण्याचा निर्णय घेतला. रात्री 10. वाजता त्याने सातारा ते कोल्हापूर अशी बस पकडली. हा 3 तासाचा प्रवास त्याला नकोसा वाटत होता. काही का असेना, आता त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. पावसानेही खूप जोरात कोसळायला सुरुवात केली होती. भर पावसात बस वेगाने हाईवेवर धावत होती. त्यात जेमतेम काहीच लोक बस मध्ये होते. त्यामुळे त्याला बसायला जागाही चांगली मिळाली. बसमध्ये अंधार एवढा होता की कोण कोठे बसले आहे. ते समजत नव्हते.
विश्वास ने कानामध्ये हेडफोन घालून मस्त गाणी ऐकत बाहेरील पाऊस पाहत होता. पावसाचे थोडे थोडे थेंब खिडकीतून येत होते. हवेचा गारवाही जास्तच वाढला होता. विश्वास चे अंग पूर्णपणे शहारून गेले त्या पावसातील गारव्याने. पाऊस खूपच कोसळत असल्याने पावसाचे पाणी खिडकीतून येत होते. म्हणून लगेच त्याने खिडकी बंद केली. त्या वेळी बसमध्ये खूपच शांतता होती. तो प्रवास त्याला खूपच कंटाळवाणा वाटत होता. त्या प्रवासात त्याला झोप कधी लागली कळालच नाही.
विश्वासला अचानक जाग आली. कोल्हापूर शहर जवळच आल होत. विश्वास ला कोल्हापूर शहरा जवळील शिरोली या स्टॉप वर उतरायचे होते. त्या स्टॉप पासून आत 30 किलोमीटर त्याचे गाव होते. विश्वास, माणगाव नावाच्या एका खेडेगावात आपल्या काकांकडे राहायचा.
रात्रीचे 1 वाजले होते. हा 3 तासचा प्रवास कसा गेला हे कळालच नाही त्याला. गाडी शिरोलीमध्ये थांबल्यावर विश्वास त्या बस मधून उतरला. तो गावाकडे जाण्यासाठी काही वाहन भेटते का बघायला थांबला. हा जाण्या येण्याचा हा त्याच्या रोजचाच प्रवास होता. पंरतु या आधी त्याने रात्रीचा कधी प्रवास केला नव्हता. त्या परिसरात खूपच शांतता होती. मोजक्याच गाड्या जाताना दिसायच्या, नशीब येवढ खराब की त्या गाड्या थांबतही नव्हत्या.
जवळच एक चहाची टपरी त्याला दिसली. तिथे चहा घेतल्यानंतर त्याला जरा बरे वाटले. तेव्हा त्याने चहावाल्याकडे गाडीची चौकशी केली असता त्याला कळाले की रुकडीला जाण्यासाठी गाडी येईल. रूकडी हे गाव माणगाव शेजारचेच गाव होते. तेथूनच त्याचे गाव 5 किलोमीटरवर अंतरावर होते. त्या ठिकाणी त्याला गाडीसाठी थोडावेळ वेळ वाट बघावी लागली. एव्हाना, पाऊसही थोडाफार कमी झाला होता. थोड्याच वेळात रूकडी ला जाण्यासाठी गाडी आली. बसमध्ये चढल्यावर त्याने रुकडीचे तिकीट काढले. कन्डक्टर आणि ड्रायव्हर शिवाय कोणीच नव्हते त्या गाडीमध्ये.
10-15 मिनिटात गाडी रूकडीमध्ये पोचली. प्रवासी कोणी नसल्याने गाडी लवकरच पोचली. तरीही त्या ठिकाणी खूपच भयाण शांतता पसरली होती. गाडी सोडा, एक माणूसही तिथे कोठे दिसत नव्हता. एखादे वाहनही कोठे दिसत नव्हते. गाव 5 किलोमीटरवरच्या अंतरावर असल्याने त्याने पायी चालत जाण्याचे ठरवले. त्यासाठी त्याला कच्च्या रस्त्याने जावे लागणार होते. विश्वास मूळातच खूप भित्र्या स्वभावाचा होता. त्यात आणखीन हा रस्ता खूपच चर्चेचा विषय ठरलेला होता. खूप काही भयानक गोष्टी विश्वासला माहिती होत्या. तसेही तो या सर्व गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता. तरीही त्याने मन घट्ट करून त्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला.
रात्रीचे 2 वाजत आले होते. विश्वास त्या रस्त्याने एकटाच चालत चाल्ला होता. त्या अमानुष शांततेत त्याच्या मनात भिती निर्माण होत होती. त्या शांततेत रात-किड्यांचे आवाज त्याच्या कानात घुमत होते. मधूनच एखादी वाऱ्याची झूळुक त्याच्या अंगातून जायची. त्यामुळे त्याच्या अंगावर काटाच यायचा. त्याच्या मनात खूप विचित्र आणि भयावह विचार येत होते. त्या रस्त्याच्या आजूबाजूला रान असल्याने वाऱ्याने रानातली पानं हालायची त्यामुळे ती खूपच भयानक वाटायची. विश्वास त्या रात्रीच्या भयंकर अंधारात पूर्णपणे गांगरून गेला होता. त्या भयाण अंधारात त्याला समोरचे काहीच दिसत नव्हते. म्हणून त्याने मोबाईलचा टोर्च लावला. तोच काय तो प्रकाश होता तिथे. त्या रानावनात एखादी हालचाल किंवा चाहूल लागल्यावर लगेच दचकायचा. कुत्र्यांच्या आवाजाने तिथला परिसर भयानक वाटत होता. काहीतरी अशुभ घडणार आहे असे त्याला सारखे जाणवत होते.
मध्यरात्र होत आली होती. आपल्याला लवकर पोहचले पहिजे म्हणून तो आपले पाय पटपट टाकत होता. गाव आता थोड्या अंतरावर आले होते. अचानक जोरदार वारा सुटायला लागला. आभाळ भरून आले होते. त्या आभाळात काळे ढग पूर्णपणे पसरले होते. मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. विश्वास भिजत होता. जवळच त्याला वडाचे एक मोठे झाडं दिसले. तो पळत पळत त्या झाडाखाली गेला. तो पूर्णपणे ओलाचिंब झाला होता. अचानक त्याला तिथे एक म्हातारा बसलेला दिसला. तो त्याच्याकडे एका खुनशी नजरेने बघत होता. मधूनच विक्षिप्तपणे हसत होता.
दिसायला वयस्करच वाटत होता तो. पण खूपच भयानक दिसत होता. त्याचा चेहरा पूर्णपणे पांढरा पडलेला. चेहऱ्यावर विक्षिप्त अशा सूरकुत्या दिसत होत्या. विश्वास ला वाटले असेल कोणी तरी गावातलाच शेतकरी. तरीही त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. अचानक तो म्हातारा त्याच्या दिशेने येवू लागला. विश्वास पुरताच घाबरला होता. तो म्हातारा विश्वास जवळ येऊन तंबाखू आहे का असे विचारू लागला. विश्वासने मी तंबाखू खात नाही असे बोलून तेथून निघण्याचा प्रयत्न करू लागला. अचानक तो म्हातारा भयंकर आवाजात मोठमोठ्याने हसू लागला. एकदमच त्याच हसण थांबल, विश्वास ने मागे बघितले तर तो म्हातारा तेथून गायब झाला होता.
विश्वास विचारात पडू लागला. त्याच्या मनाची भिती आणखीनच वाढू लागली. तो इकडे तिकडे बघू लागला. अचानक त्याची नजर वरच्या झाडावर गेली. भितीने त्याचे पाय थरथरत होते. छातीतील ह्रदयाचे ठोके धडधडत होते. तो म्हातारा त्या झाडाच्या फांदीवर उलटा होऊन त्याच्याकडे विक्षिप्त नजरेने बघत हासत होता. विश्वासला काय करावे कळत नव्हते. तो तेथून पळण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याचे पाय तेथून हलतच नव्हते. हा क्षण त्याच्या आयुष्यातला शेवटचा क्षण वाटत होता. त्याच्या तोंडातुन काही शब्दच फुटत नव्हते. त्याने पूर्णपणे जीवाच्या आकंताने तेथून पळ काढला. शरीरातील पूर्ण ताकद पणाला लावून तो धावू लागला. त्या शांततेत एक भयंकर किंकाळी त्याच्या मागून येऊ लागली. त्याने मागे वळून पाहिले, तेव्हा तो म्हातारा एका भयानक पिशाच्चासारखा त्याच्या मागे धावत होतो. तो आपल्या दोन्ही हात आणि पायावर धावत होता. हा क्षण, ही भयानक रात्र विश्वासच्या प्राणांची आहुती त्याला देत होते. धावून धावून तो खूप थकायला आला होता. लवकरच त्याला त्याचे गाव दिसत होते. गावाच्या वेशीवरच बिरोबा चे मंदिर होते. तो धावत त्या मंदिराजवळ जात होता. तेव्हा त्याला मागुन भेसूर आवाजात त्या म्हाताऱ्याचे आवाज ऐकू येत होते, "वाचलास रे वाचलास, पुन्हा कधीतरी घावशील". विश्वास त्या मंदिराजवळच येऊन बेशुद्ध पडला.
सकाळ झाली होती. विश्वास अचानक झोपेतून दचकून उठला. त्याचे अंग तापाने फणफणले होते. गावकऱ्यांनी त्याला त्याच्या घरी आणले होते. तेव्हा त्याने आपल्या सोबत घडलेली रात्रीची हकीकत सांगितली. त्याला गावकऱ्यांकडून कळाले की त्या ठिकाणी एका म्हाताऱ्याने आयुष्याला कंटाळून तिथे आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याचा आत्मा तिथे भटकत असतो. रात्रीचे कोणी फिरकतही नाही त्या ठिकाणी.
ती रात्र विश्वासच्या आयुष्यातील अंतिम रात्र ठरली असती. त्यानंतर त्याने कधीच रात्रीचा प्रवास केला नाही.समाप्त......


इतर रसदार पर्याय