Paravad - 4 books and stories free download online pdf in Marathi

परवड भाग 4

भाग 4....

आपली प्रिय पत्नी सीता हे जग सोडून गेल्यानंतर अरविंदावरची जबाबदारी अजुनच वाढली. आपल्या आईच्या अकाली मृत्यूनंतर वांड गुणवंताही थोडा सुधारल्यासारखा वागत होता. आजकाल स्वत:हून तो घरातली जमतील ती कामे करायला लागला होता.एकामागोमाग एक संकटे येत होती अशा परिस्थितीतही गुणवंतामधे झालेला हा सकारात्मक बदल ही अरविंदासाठी त्यातल्या त्यात समाधानाची बाजू होती. गुणवंता आता शहाण्यासारखा वागायला लागलाय या विचाराने सीतेच्या जाण्याचं दु:ख नाही म्हटलं तरी थोडंस बोथट झालं होत.

हल्ली दोघे मिळून सकाळी लवकर उठून घरातली कामे भराभर उरकत होते. वसंताचं सगळ उरकेपर्यंत कामावर जायची वेळ व्हायची.अरविंदा एकदा कामावर गेला की दिवसभर वसंताबरोबर गुणवंताच थांबायचा.त्याला हवं नको ते बघायची सगळी जबाबदारी गुणवंताकडे यायची. जमेल तेव्हा वसंताचा हात धरून त्याला बाहेर फिरायला घेवून जायचा.गुणवंताच्या स्वभावात झालेल्या या आमुलाग्र बदलाचे शेजारीपाजारी व अरविंदांच्या ऑफिसच्या लोकानाही नवल वाटायच.
असं म्हणतात की मुळात माणूस चांगला किंवा वाईट असा नसतोच.जीवनात सामोरी आलेली परिस्थितीच माणसाला खुप काही शिकवत असते! काळाबरोबर माणूस बदलतो हेच खर!
दिवस पुढे पुढे जात होते. घरातली कर्ती बाई सोडून गेलेल्या या दुर्दैवी कुटूंबाचे त्यातल्या त्यात बरे म्हणता येतील असे दिवस आता सुरू झाले होते. अरविंदा आणि गुणवंताच्या "एकमेका साह्य करू ....’’ उक्तीप्रमाणे वागण्याने घरातलं दैनंदिन जीवन रूळावर येवू पहात होत....
गुणवंता आता घरातल्या जबाबदाऱ्या तर व्यवस्थितपणे निभावत होताच; शिवाय हल्ली तो एका किराणा मालाच्या दुकानात कामालाही जायला लागला होता.अरविंदा कामावर गेल्यावर तासाभरात वसंताची सगळी कामे उरकून तो दुकानात कामाला जायला लागला.आपल्या कामातल्या अगदी थोड्या कालावधीतच गुणवंता आपल्या शेठचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी झाला होता.दुकानात तो भरपूर मेहनत करायचा.त्याची शरीरयष्टी उत्तम होती. बोलण्यात तो वाकबगार होता त्यामुळे शेठ सांगेल ती कामे गुणवंताकडून चुटकीसरशी व्हायची.
हळूहळू या दुकानाची प्रचंड भरभराट होत गेली आर्थिक उलाढाल कित्येक पटीने वाढली. गुणवंताचे कामही वाढत गेले. गुणवंताची कामावरची निष्ठा पाहून शेठ त्याच्यावर प्रचंड खूष होते. शेठ दुकानाची सर्व सूत्रे बिनधास्तपणे गुणवंताकड़े सोपवू लागले.दुकानाच्या कामाचा व्याप व जबाबदारी वाढल्याने आता त्याला वसंताकडे पुर्वीसारखे लक्ष देणे जिकिरीचे होवू लागले होते;पण याला आता इलाज नव्हता.
दोघे कामाला गेल्यावर वसंता घरी पुन्हा एकटा पडू लागला.सर्वस्वी परावलंबी असलेल्या वसंताची एकूणच सर्व बाबतीत आबाळ व्हायला लागली.त्याचे होणारे हाल पाहून अरविंदा पुन्हा एकदा वसंताच्या काळजीने चिंताग्रस्त राहू लागला. वसंताची काळजी कशी घ्यायची हे त्याला समजत नव्हते.रात्रंदिवस तो वसंताची चिंता करत बसायचा.
त्यांने अनेक मित्रांनाही याबाबतीत सल्ला विचारला पण योग्य मार्ग सापडत नव्हता.

आणि एक दिवस त्याला एक मार्ग सुचला....
एक आशेचा किरण दिसला.....
एक दिवस गुणवंता घरात निवांत बसलेला असताना अरविंदा त्याच्या बाजूला बसला.थोडी इकडची तिकडची चौकशी केल्यावर अरविंदाने मुख्य विषयाला हात घातला.
गुणवंता पोरा,तू बघतोच आहेस,की आपले काय हाल चालू आहेत.घरातली व बाहेरची कामे करून मी पूर्ण थकून जातो.वसंता घरी एकटा असतो.तू आता एकवीस वर्षाचा झाला आहेस.सीता होती तोपर्यंत मला काळजी नव्हती,घरात एखादी बाईमाणूस असलं ना की घराचं घरपण अबाधित रहाते असते! मला असं वाटतंय की यावर काही तरी मार्ग काढायला हवा.मी यावर बरेच दिवस विचार करत होतो. खूप विचारांती मी काहीतरी ठरवलंय....
तूझ या बाबतीत सहकार्य मिळालं तर आपलं घर पुन्हा सुरळीत होईल,..”
अरविंदा आशेने गुणवंताच्या तोंडाकडे बघत,त्याचा अंदाज घेत त्याच्याशी बोलत होता.
तर, मला असं वाटतंय की, आता तुझे लग्न उरकावे! घरात सुनबाई-तुझी बायको आली की आपल्या घरातल्या समस्या कमी होतील, आपली वसंताच्या बाबतीतली चिंता कमी होइल.घरात बाईमाणूस असलं ना की घर खऱ्या अर्थाने घरट होत, तुझ लग्न केलं की हे घर पुन्हा हसाखेळायला लागेल! आपण तुझ्यासाठी अशीच मुलगी बघू की ती आपल्या सर्वांची काळजी घेईल.वसंताला मायेने सांभाळेल.
आपल्या पित्याने मांडलेल्या लग्न करायच्या प्रस्तावाने गुणवंताला एकदम अंगावर मोरपीस फिरल्याचा भास झाला.आपल्याला हे आधीच कस काय सुचलं नाही असं त्याला वाटायला लागलं! क्षणभरासाठी लग्नानंतरच्या आपल्या जीवनात हरवून गेला...
आपले आता लग्न होणार,एक हवी हवीशी वाटणारी आपली हक्काची बायको आपल्या घरी येईल.संध्याकाळी दमूनभागून आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हां ती आपली वाट पहात दरवाजात उभी असेल. घरी पोहोचल्याबरोबर ती आपल्या हातात गरम गरम चहाचा कप देईल. दररोज चांगलाचुंगला स्वयंपाक करून ती आपल्याला आग्रहाने खायला घालेल. आपली काळजी घेईलच शिवाय रात्री......
त्याने अरविंदाला शब्द दिला....
मी विचार करून सांगतो...
(क्रमश:)
©प्रल्हाद दुधाळ. पुणे 9423012020

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED