परवड भाग ५ Pralhad K Dudhal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परवड भाग ५

भाग ५ .
आपल्या लग्नानंतरच्या रम्य जीवनाची स्वप्ने गुणवंता दिवसाउजेडीही बघायला लागला.आतापर्यंत आजूबाजूला दिसणाऱ्या मुलींच्याकडे तो सहसा पहात नसायचा;पण आता समोर येणारी प्रत्येक मुलगी वा तरुण स्री दिसली की, “आपली होणारी बायको अशी असली तर....?”
नकळत त्याच्या कल्पनेतल्या बायकोच्या प्रतिमेशी तो समोरच्या मुलीची तुलना करू लागला,रात्रंदिवस आपल्या वैवाहिक जीवनाबद्दलची दिवास्वप्ने त्याला पडायला लागली. झोपेत त्याला शृंगारिक चावट स्वप्नेही पडायला लागली!
दुसऱ्या दिवशी गुणवंताचा उजळलेला चेहरा पाहून अरविंदाला बरे वाटले. त्याने खात्रीदाखल त्याला विचारले...
काय मग गुणवंता, करायची का पोरी बघायला सुरुवात?”
त्याने हळूच होकारार्थी मान हलवली. गुणवंताच्या लग्नासाठीच्या होकाराने अरविंदामधे एक वेगळाच उत्साह संचारला. आता तो आपल्या घरासाठी योग्य अशी सून शोधण्यासाठी अधीर झाला होता. आपल्या मित्रमंडळीत आणि नातेवाईकात त्याने आपल्या मुलाचे लग्न कारायच असल्याचं जाहीर करून टाकल. स्वत:ही तो गुणवंतासाठी योग्य अशी मुलगी शोधू लागला.गुणवंताच्या लग्नाने घरातल्या बऱ्याच समस्या सहजासहजी सुटणार होत्या. दोन वेळच्या स्वयंपाकाचा प्रश्न सुटणार होता. वसंताची काळजी घ्यायला त्याची हक्काची वहिनी घरी येणार होती. तिच्यावर वसंताची जबाबदारी सोपवून हे पितापुत्र बिनधास्तपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार होते.घरातल्या भांडयाकुंड्यावर बऱ्याच दिवसांनी घरच्या बाईचा मायेचा हात फिरणार होता.
गुणवंतासाठी वधूसंशोधन जोरात सुरू झालं....
सुरुवातीला त्याला हे काम सोप्प वाटत होत;पण हे किती अवघड आहे याची लवकरच अरविंदाला प्रचीती यायला लागली.त्याचे जवळचे नातेवाईक गुणवंताच्या आत्तापर्यंतच्या आयुष्याबद्दल चांगलेच परिचित होते, त्यामुळे अशा उनाड मुलाला आपली मुलगी द्यायला सहजासहजी कुणी तयार होत नव्हते. अरविंदा एक सज्जन माणूस असला तरी त्याच्या मुलाबद्दल सर्वाना माहीत होते. आता तो सुधारलाय,दुकानात काम करून चार पैसे तो कामावतो हे जरी दिसत असले तरी त्याच्या घरी त्याचा एक ठार अंध असलेला तरुण भाउ आहे आणि त्याचं सगळ आपल्या मुलीला करावं लागणार आहे हे कुठल्याही मुलीच्या बापाला आवडणे शक्य नव्हते! एरवी अरविंदाशी सहानभूतीने वागणारे नातेवाईक या बाबतीत मात्र त्याला टाळत होते.
त्याच्या एका चुलत मेहुण्याची एक मुलगी होती.दोन वर्षापूर्वी या मुलीचे वडील वारले होते. त्याने विचार केला की बापाविना असलेल्या या मुलीला आपण सून करून आपल्या घरी आणली तर तिच्या आयुष्याचे कल्याण होईल,शिवाय ती नात्यातलीच असल्याने सर्वांची काळजीही घेईल.आपल्या या विचारांवर अरविंदा खुश होवून हसला.खुप दिवसानी त्याला प्रसन्न वाटत होते! तो लगेचच त्या मुलीच्या आईकडे गुणवंताचा प्रस्ताव घेवून गेला. त्याला वाटत होत की आर्थिकदृष्ट्या अत्यंत वाईट परिस्थिती असलेल्या या मुलीचा पटकन होकार येईल.
मुलीच्या आईने गुणवंताच सगळ ऐकून घेतलं आणि त्याला एकदम फटकारलंच ....
माझी पोरगी काय रस्त्यावर पडलीय असं वाटलं काय तुम्हाला? वेळ आली तर बिनलग्नाची राहील ती;पण तुमच्या त्या उडानटप्पू पोराला आणि त्या दुसऱ्या आंधळ्याच्या सेवेला माझी पोरगी नाही देणार!
अशा लागट आणि अपमानास्पद बोलण्याची अरविंदाला मुळीच सवय नव्हती.आपण समजतो तेव्हढी दुनिया सरळ नाही, वाईट वेळ आली की,अगदी जवळचे म्हणणारे लोकही टोचून टोचून मारायला मागेपुढे पहात नाहीत याचा अगदी जवळून अनुभव त्याने घेतला.
अरविंदा पुन्हा विचारात पडला. कसंही करून गुणवंताच लग्न जुळवायलाच हवं.त्याने त्याच्या एका मित्राचा सल्ला घेतला आणि तालुक्याच्या गावी जावून वधूवर संस्थेत गुणवंताच नाव नोंदवून टाकल....
वधूवर संस्थेतून गुणवंतासाठी स्थळे सुचवली जावू लागली.अरविंदा गुणवंताला घेवून एका एका मुलीला जावून बघू लागले.अनेक मुली पसंत पडत होत्या;पण वसंताबद्दल ऐकले की सरळ सरळ मुलींचा नकार यायचा. एकंदरीत या संस्थेतही आधीसारखेच अनुभव येत होते. अरविंदाची सरकारी नोकरी, गुणवंताची कमाई या जमेच्या बाजू असल्या तरी त्याबरोबर येणारी आंधळ्या वसंताची जबाबदारी कुणालाही नको होती.मुलींच्याकडून येणारे नकार पचवणे आता गुणवंताला अपमानास्पद वाटायला लागले होते! वसंताचे आंधळेपण आपल्या लग्नाच्या बोलण्यातली मुख्य अडचण आहे असे त्याला वाटायला लागले!
या वसंतामुळे मला लग्नच करता येणार नाही की काय?”
नाही,नाही असं होता कामा नये!
मागच्या आठवड्यात पाहिलेली शालू त्याला खूप आवडली होती, बायको असावी तर शालूसारखीच असे त्याच्या मनाने घेतले होते; पण वसंतामुळे तिचा नकार आला होता. कसंही करून या शालूबरोबर आपलं जुळायला पाहिजे.काय सुन्दर होती ती!
गुणवंतावर शालूने अक्षरशः जादू केली होती......
( क्रमश:)
© प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020