परवड भाग ७. Pralhad K Dudhal द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

परवड भाग ७.

भाग ७.
गुणवंता आणि शालूची जोडी छानच दिसत होती.अगदी एकमेकांसाठीच ते दोघे बनले आहेत असचं सगळेजण बोलायचे.या दोघांचा नवा संसार आता सुरू झाला होता.
आपल्या बायकोसाठी काय करू आणि काय नको असं गुणवंताला झालं होत.त्यांनी एकमेकांशी छान जुळवून घेतल्याचं बघून अरविंदालाही खूप समाधान वाटत होत.सीतेच्या जाण्यानंतर या घरात कोणा बाईमाणसाचा वावर नव्हता.शालूच्या रूपाने या घराला खूप दिवसांनी हक्काची गृहिणी लाभली होती.

लग्न पार पडल्यानंतर गुणवंताच्या शेठने या दोघांच्या हातावर महाबळेश्वरची तिकिटे ठेवली आणि शालू आणि गुणवंता महाबळेश्वरला हनिमूनला गेले.चांगले चार दिवस गुणवंता शालूला घेवून महाबळेश्वरात उत्तम हॉटेलात राहिला. दोघांनी मस्त एन्जॉय केलं.....
ते आता परत घरी आले आणि आपल्या नव्या नव्या संसाराची धुरा त्यांनी स्वत:कडे घेतली. नव्या नवलाईचे दिवस संपले आणि घरातले दैनंदिन व्यवहार सुरू झाले. घराची सगळी जबाबदारी आता नव्या सुनेवर आलेली होती.

अरविंदा आजकाला खूप आनंदात होता.आता घरात दोन्ही वेळा व्यवस्थितपणे स्वयंपाक शिजणार होता. खाण्यापिण्याचे हाल संपणार होते.घरातल्या प्रत्येक वस्तूवर घरच्या बाईमाणसाचा मायेचा हात फिरणार होता.
आता त्याला वसंताची तर मुळीच काळजी नव्हती.
आपल्या आंधळ्या दिराच सगळ नीट करेन, त्याची काळजी घेईल.असा शब्द शालूने अरविंदाला लग्नाआधीच दिलेला होता!
त्या शब्दाला जागून वसंताची वाहिनी आता त्याची काळजी घेणार होती. खूप दिवसांनी अरविंदाला मोकळ मोकळ वाटत होत!

काही दिवसातच शालूने घरातलं दैनंदिन काम समजून घेतलं.घरातल्या आवश्यक त्या नव्या वस्तूंची खरेदी झाली.घरात आता वेळच्या वेळी भाजीभाकरी शिजू लागली.
पूर्वी गुणवंता लवकर घरी यायचा नाही
;पण आता मात्र नवविवाहित गुणवंता आपल्या बायकोच्या ओढीने दुकानातून तडक घरी यायला लागला होता . घरी आला की तो सतत आपल्या लाडक्या बायकोच्या आजूबाजूला रूंजी घालत असायचा.. तिला तो घरकामातही मदत करू लागला होता. अरविंदाच्या घरी परत ते सुवर्णसुखाचे दिवस आले होते.
अंध वसंता घरात असून नसल्यासारखाच होता.त्याला काहीच दिसत नसल्यामुळे गुणवंता व शालूच्या शृंगाराला दिवसा उजेडीही चांगलाच बहर येत होता.आता तर गुणवंता दुकान सोडून वारंवार दुपारीही घरी यायचा. शालूच्या मुसमुसत्या तारुण्याने त्याला चांगलीच भुरळ घातली होती.शालूने आपल्या जवानीच्या जोरावर गुणवंताला चांगलाच आपल्या कह्यात घेतला होता.
ती सांगेल तसा तो वागायचा तिचा एकही शब्द तो खाली पडू देत नव्हता! अर्थात अरविंदाला याचं काही विशेष वाटायचा प्रश्नच नव्हता.त्याला फक्त आपल्या वसंताची काळजी व्यवस्थित घेतली जातेय यातच खूप मोठ समाधान वाटत होत. या दोघांचा संसार मार्गी लागलाय
, घर रूळावर येतंय यातच त्याला आनंद होता!
आपल्या घरातल्या उपस्थितीमुळे या दोघांच्या संसारात अडचण निर्माण व्हायला नको,त्यांना पुरेसा अवकाश मिळावा म्हणून आजकाल अरविंदा ऑफिसातून सुटल्यावर मित्रांमध्ये जास्तच रेंगाळत होता.जेवढ उशीरा घरी जाउ तेव्हढी या दोघांची मन जुळायला मदत होईल असा अगदी सरळ साधा विचार त्यामागे होता.
साताठ महीने असेच सुरेख सुखात गेले....
निदान अरविंदाच्या दृष्टीत तरी सगळ सुरळीत चालू होत. तो सतत बाहेरच असल्याने आपल्या घरात काही वेगळ घडत असल्याचा त्याला अंदाज आलाच नाही!
एक दिवस संध्याकाळी अरविंदा घरी आला तर शालू ढसाढसा रडत असलेली पाहून अरविंदाला चांगलाच धक्का बसला....
.”
नक्की हिला झालं तरी काय...?”
गुणवंताच आणि हीच भांडण तर झालं नाही ना?”
असंख्य विचार अरविंदाच्या डोक्यात पिंगा घालत होते.
शालू रडत होती आणि गुणवंता हळू आवाजात तिची काहीतरी समजूत घालत होता. अरविंदा आल्याचे पाहून तिने रडणे आटोपत घेतलं आणि ती आत गेली मागोमाग गुणवंताही अरविंदाची दखल न घेताच आत गेला. घरात आज नक्की काय झालंय ते त्याला समजायला हवं होत;पण त्याने शांत बसणे पसंत केले.
झाली असेल काहीतरी दोघांत कुरबूर, नवरा बायकोत थोडंफार असं व्हायचंच!
मनाशी असा विचार करून अरविंदा अलिप्त राहिला.
अर्ध्या तासात सर्व सुरळीत झालं.जेवण करून सगळेजण झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी कालच्या गोष्टीचा मागमूसही नव्हता!
दररोजच्या रुटीनप्रमाणेच सकाळी सगळेजण आपापल्या कामाला गेले.शालू जरी वरून शांत दिसत होती तरी नेहमीसारखा मोकळेपणा तिच्या वागण्यात नाहीये,तिचं काहीतरी नक्कीचं बिनसलेलं आहे हे मात्र अरविंदाच्या नजरेतून सुटलं नव्हतं.
विचारांच्या तंद्रीतच तो ऑफिसला निघाला होता....
त्या दिवशीही तो ऑफिसातून आला तर समोर कालच्यासारखच दृश्य! सुनबाई मुसमुसते आहे आणि गुणवंता तिला हळूहळू समजावतो आहे....
नक्कीच काहीतरी घडल असावं; पण याने काही विचारण्यापूर्वीच ते दोघे कालच्यासारखेच पुन्हा आत गेले.....
आजही अरविंदा गप्पच राहिला....
( क्रमश:)
©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020.