Paravad - 6 books and stories free download online pdf in Marathi

परवड भाग ६.

भाग ६.

वधूवर मंडळाकडून गुणवंताची माहिती व फोटो मिळाल्यावर शालूचे बाबा-संपतराव चांगलेच खूश झाले होते.अगदी त्यांच्या मनासारख हे स्थळ चालून आलं होत. महत्वाचं म्हणजे हे स्थळ बऱ्यापैकी लांब गावातलं होत, त्यामुळे शालूच्या पूर्वायुष्याबद्दल तिकड कुणाला काही माहिती असायची मुळीच शक्यता नव्हती. आधी तमासगीर असलेल्या आईचा चवचालपणा हिच्यात पुरेपूर उतरला होता.आपल्या पदरात ही सहा वर्षाची पोरगी टाकून तिने हे जग सोडले आणि हा फास कायमचा आपल्या गळ्यात अडकला होता.ही कारटी वयात आली आणि आपल्या बापाला लक्ष द्यायला वेळ नाही याचा तिने चांगलाच फायदा घेतला.तारुण्याचा कैफात तिने काय काय उद्योग केले ते समजले की याचा तिळपापड व्हायचा पण काय करणार? “ गरीबाला का कुठे इज्जत असते?” असा तो विचार करत जगायचा.आपली ही पोरगी काय लायकीची आहे ते त्यांना चांगलेच माहीत होते. शालूने त्या त्या उनाड देवानंदबरोबर सुत जमवल्याच त्याला माहीत होत. परस्पर त्यांनी लग्न केलं तर चांगलंच की असा विचार करून संपतरावाने तिकडे कानाडोळा केला होता; पण त्या दोघांनी उधळलेल्या गुणांमुळे ते चांगलच अंगलट आलं होत.संपतारावाची चांगलीच बदनामी झाली होती.
सगळ करून सवरून वेळ आल्यावर त्या देवानंदने हात वर केले होते.
शालूची कितीतरी पोरांबरोबर लफडी होती; त्यामुळे शालूला माझ्याकडूनच दिवस राहिले कशावरून?” असा निर्लज्जपणाचा सवाल करून त्याने शालूबरोबर लग्नाला साफ नकार दिला होता.आईविना असलेल्या कारटीने संपतरावाचे तोंड चांगलेच काळे केले होते. एका डॉक्टरच्या हातापाया पडून संपतरावानी गुपचीप शालूचा गर्भपात करून घेतला आणि आता तिथून थोड्या लांब उपनगरात तिला घेवून रहात होता.
कसंही करून आता हिला उजवायलाच पाहिजे नाही तर ही पोरगी काय आपल्याला नीट जगू देणार नाही!हा विचार करून शालूच नाव त्यांनी तालुक्याच्या गावी नव्यानेच सुरू झालेल्या वधूवरसूचक मंडळात नोंदवलं. दोन तीन पोरांची स्थळे लगेच आली;पण शालूने त्यांचे फोटो बघूनच ती नाकारली होती.
मंडळातला गुणवंताचा फोटो आणि माहिती बघितल्यावर मात्र तो खुश झाला होता,कारण पोरग दिसायला तर चांगलं होतंच;शिवाय त्याचा बाप सरकारी नोकरीत होता.गुणवंताही नावाजलेल्या पेढीवर काम करत होता.अडचण फक्त त्याच्या आंधळ्या भावाच्या जबाबदारीचीच होती. त्याने मंडळाला गुणवंताच्या वडीलांना भेटायचं असल्याच कळवलं.दोन्हीकडील लोकांच्या सहमतीने मंडळानेच बघायचा कार्यक्रम आयोजित केला.गुणवंताने शालूला बघताक्षणीच पसंत केली;तिलाही गुणवंता आवडला पण; वसंताची जबाबदारी घ्यायला मात्र तिने नाकारले.
विचार करून सांगतोम्हणून संपतरावाने निर्णयासाठी दोन दिवसाची मुदत मागून घेतली.गुणवंताच स्थळ त्याला शालूसाठी अगदी योग्य वाटत होत. घरी आल्यावर त्याने शालूला तडजोड करणे किती आणि कसं आवश्यक आहे हे व्यवस्थित समजावून सांगितले.तिच्या चारित्र्यावर असलेल्या धब्ब्याची परत परत तिला आठवण करून दिली.
ही संधी सोडलीस तर कायमची पस्तावशील!शेवटी शालूला त्याने चांगलेच खडसावले!
शालूने शेवटी गुणवंताला होकार कळवायला तयारी दाखवली. मुळचा बेरकी असलेला संपतराव हळूच आपल्या लेकीला म्हणाला...
अग, त्या वसंताला मी छान सांभाळेल, त्याची काळजी घेईल असं लग्न होईपर्यंत म्हणायला काय हरकत आहे? काय करायचं आणि काय नाही ते पुढंच पुढ!

एकमेकांना सगळ व्यवस्थित समजल्यासारखे बाप आणि लेक दोघेही मनापासून हसले!
वधूवर मंडळातर्फे पुन्हा मिटिंग झाली आणि शालू आणि गुणवंताच लग्न ठरलं.
आता वसंताची जबाबदारी घ्यायला त्याची वाहिनी येणार आणि आपल्यावरचे त्याचे ओझे कमी होणार म्हणून अरविंदा खूपच खुश होता. आपल्याला आवडलेल्या सुंदर मुलीशी-शालूशी आता आपलं लग्न होणार आणि आपण बायकोसाठी बघितलेली सगळी सुंदर स्वप्ने खरी होणार म्हणून गुणवंता खुश होता, तर आपल्या जीवाला घोर असलेल्या आपल्या या लफडेबाज लेकीची ब्याद एकदाची खपणार म्हणून संपतराव खुश होता. वसंता मात्र आपल्या डोळ्यासमोर असलेल्या अंधारात चाचपडत होता!

दोन्ही पालकांनी ते दोघांनाही सोयीचं असल्याने जास्त गाजावाजा न करता हे लग्न उरकायचं ठरवलं. जवळच्या मंदिरात देवाच्या आणि वडीलधाऱ्यांच्या साक्षीने एकदाचं शालू आणि गुणवंताचं लग्न लागलं.शालू आता आपला सगळा पूर्वेतिहास विसरून सौभाग्यवती गुणवंता म्हणून आपल्या सासरी आली....
अरविंदाने आपल्या दोन्ही मुलांच्या कल्याणासाठी एक स्वप्न पाहिलं होत आणि ते आता साकार झालं होत. सीतेच्या घरातल्या फोटोसमोर नवविवाहित जोडी उभी राहिली तिचा आशीर्वाद दोघांनी घेतला.
सीते बघ ग,ही तुझी सून-शालू! लक्ष्मीच्या पावलाने आता ती आपल्या घरात आली आहे.आता ती या घराला घरपण देईल.वसंताला वाहिनीची माया मिळेल आणि या घराचा आता स्वर्ग होईल बघ!
गुणवंताकडे पाहून तो म्हणाला...
बाळा आता या घराची जबाबदारी तुम्हा दोघांवर आहे. आनंदाने संसार करा.काय अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी आहे.
गुणवंता आणि शालू अरविंदाच्या पायाशी वाकले.त्याने दोघांच्या डोक्याला स्पर्श करून भरभरून आशीर्वाद दिला....

( क्रमश:)

©प्रल्हाद दुधाळ पुणे 9423012020

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED