तारेवरची कसरत - अंतिम भाग Swapnil Tikhe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तारेवरची कसरत - अंतिम भाग

तारेवरची कसरत -४

(वैधानिक इशारा: सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, कथेतील पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. कथा व कथेतील पात्रांचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी अथवा समूहाशी काहीही संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग मानावा)

(अधिक रंजकते साठी कथा क्रमशः वाचावी.)

"निघाला टोणगा म्हशीकडे..." - असा अस्पष्ट आवाज खोलीचं दार लावताना माझ्या कानावर पडला, सवयी प्रमाणे मी त्याकडे दुर्लक्ष केलं.

आईची भेट घेऊन मी आता आमच्या बेडरूमपाशी उभा होतो. आईशी बोलल्यामुळे, तिची बाजू ऐकल्यामुळे माझे डोळे पाणावले होते. त्यातच मी नलु मावशीच्या मुलीशी दुसरे लग्न करावे असा तिचा हट्ट होता. तिच्या या विनंतीवजा आज्ञेला कसे उत्तर दयायचे हे मला समजत नव्हतं. एक मात्र खरं होतं, तिच्या डोळ्यात पाणी बघून तिचे दुःख बघून माझ्यातील अज्ञाधारी मुलगा जागृत होत होता, आणि आता तरी आपण आईला दुखवता कामा नये असं मला वारंवार समजावत होता. पण कोणत्याही निर्णयाप्रत पोचण्यासाठी मला रोहिणीशी बोलणं गरजेचं होतं. याच विचारात मी आमच्या खोलीत गेलो. मला रोहिणीची पण अस्पष्ट आकृती दिसत होती. मी खोलीत येताच ती मला येऊन बिलगली. काही क्षण तसेच गेले. मग मी माझ्या बेडवर बसलो, रोहिणी शेजारीच येऊन बसली. बराच वेळ झाला तरी ती काहीच बोलली नाही.

"ए वेडे!! बोलायचं नाही का?" - मी तिला विचारलं.

"आधी मन भरून पाहू तर देत तुला..." - ती नेहमीच उत्तर देत म्हणाली आणि पुन्हा एकदा आम्हाला आमच्या मर्यादा आणि परिस्थिती जाणवली.

"काय माहीत परत असा वेळ कधी मिळेल?" - ती भावना आवरत म्हणाली.

"असं का बोलते? मी तुझाच आहे..आणि इथंच आहे. आता काय हवा तेवढा वेळ आहे तुझ्याकडे..." - मी तिची समजूत काढत म्हणालो.

"अजूनही तुला खोटं बोलता येत नाही तर." - रोहिणी म्हणाली.

"म्हणजे? काय म्हणायचं आहे तुला?" - तिला आईच्या मागणीबद्दल समजलं तर नाही ना? अशी शंका मला आली म्हणून मी तिला विचारलं.

"ते महत्वाचं नाही... मला हा वेळ आपल्यासाठी हवा आहे... उगाच विषयाला विषय नाकोतच मुळी...." - रोहिणी लाडिक हट्ट करत म्हणाली.

मीसुद्धा तिला अडवलं नाही. मग काय विचारू नका, पुढचा वेळ कसा गेला समजलंच नाही. माझं मन परत एकदा तिच्यात गुंतत चाललं होतं. ती एक एक आठवणी सांगत होती आणि मी रमत होतो, मनमोकळं हसत होतो. साधारण तासाभराने मला बेडरूमचा पडदा सळसळल्या सारखा वाटला म्हणून मी तिकडं बघितलं तोच खोलीचं दार एका धक्क्याने बंद झालं.

"हा वेळ आपला आहे... यात मला कसलाच व्यत्यय नको आहे." - रोहिणी रागानं म्हणाली.

"ते ठीक आहे ग... पण आपल्या बोलण्याच्या नादात माझा मूळ प्रश्न राहूनच गेला." - मी

"कसला प्रश्न?" - रोहिणी

"तू अजून इथं कशी? तुला पुढचा प्रवास करायचा नाही का?" - मी तिला विचारलं.

"अरे, ते तर राहूनच गेलं बघ सांगायचं....." - रोहिणी उत्साहात म्हणाली, ती जेव्हा जेव्हा अशी उत्साहात येते तेव्हा मला थोडी धडकीच भरते कारण अशावेळी तिने नक्कीच काहीतरी मनाशी ठरवलं असतं असा माझा अनुभव होता. या वेळी तिनं मनाशी काय ठरवलं होतं ते ऐकण्यासाठी मी कान टवकारून बसलो.

"मला तुला काही सांगायचंय..... तू चिडणार नाही ना?" - रोहिणी.

"अगं, बोल गं....." - मी तिला प्रोत्साहन देत म्हणालो खरा पण ती जेव्हा हा प्रश्न विचारते तेव्हा पुढचं वाक्य भयंकर धक्कादायक असत हा माझा अनुभव होता.

"माझा जीव तुझ्यात अडकलाय.." - रोहिणी म्हणाली.

या वेळी मात्र तीच वाक्य तितकं धक्कादायक नव्हतं. किंबहुना मला ते माहितीच होतं.

"यात काय नवीन? माझा जीव तर तुला पाहताक्षणी तुझ्यात अडकलाय.." - मी ही उत्तर देत म्हणालो.

"राजा, तुला समजत नाहीये.." - रोहिणी

"मग समजंव ना तू मला.." - मी लाडाने म्हणालो.

"माझ्या नंतर तुझं कसं होणार? या चिंतेने माझा जीव अडकला आहे. आई असत्या तर मला काही काळजी नव्हती, पण आता तुझं कसं होणार? या काळजीनं मी पुढचा प्रवास लरू शकत नाहीये."



खरं तर आईची मागणी रोहीणी समोर मांडायची हीच योग्य संधी आहे असं माझं डोकं मला सांगत होतं. तिच्या काळजीचं उत्तर आईनं आधीच शोधलं आहे हे तिला समजलं तर तिचा त्रास कमी होईल असा त्याचा तर्क होता. पण अशा बाबतीत डोक्याचं फार ऐकायचं नाही असा माझा अनुभव होता आणि म्हणूनच मी मनाचं ऐकलं आणि तिला पुढं बोलू दिलं. इतक्यात वाऱ्याची एक झुळूक खोलीत आली आणि कपाटातील वरच्या कप्प्यातून एक फोटो खाली पडला. मी तो उचलला.



"हा माझा लहानपणीचा फोटो आहे, यात कोपऱ्यात दिसते ना ती माझी बालमैत्रीण. गेल्याच वर्षी अपघातात तिचाही नवरा गेला. मला वाटत तू तिला भेटावं आणि .."



"आणि लग्नाची मागणी घालावी, तिच्याशी लग्न करून सुखाचा संसार करावा, म्हणजे तू बीना काळजीनं पुढचा प्रवास करू शकशील, म्हणजेच तुला मुक्ती मिळेल." - अनावधानाने मी तिचं वाक्य पूर्ण केलं होतं.



"ए, कसला मनकवडा आहेस रे तू अजून...शी बाबा !! देवानं मला जरा लवकरच बोलावलं.." - ती आनंदाने म्हणाली आणि माझे हात थर थर कापू लागले.



माझ्या हातून तो फोटो खाली पडला आणि रोहिणीचा आवाज पूर्ण बदलला. मी तो फोटो उचलला आणि खोलीतून बाहेर पडलो. रोहिणी माझ्या मागे चालू लागली. बाहेरच्या खोलीत जाताना मला ढोलकीचा आवाज येऊ लागला होता. समोर अरुंद तार दिसत होती, मी पायाच्या अंगठ्याने घट्ट धरून सावधपणे पुढं चाललो होतो.



"एक मिनिट, हे सगळं तुला सुचणं शक्यच नाही.....



म्हणजे हे तुला आधी कोणीतरी सांगितलं असणार.....



आईंनीपण तुझ्यासाठी मुलगी तर नाही बघितली ना?

कोण आहे ती?

कुठं असते?

मला मुक्ती द्यायची असेल तर माझ्या मैत्रीणीशीच लग्न करावं लागेल...

थांब आधी मला आईंशी बोलून घेऊदे..." - रोहिणी माझ्या मागे चालताना बोलत होती.



तिचं शेवटचं वाक्य ऐकून आईही खोलीतून बाहेर आली, माझ्या हातातील फोटो बघून ती सुद्धा चिडली.



अजूनही मी तारेवरच चालत होतो, या वेळी मात्र माझ्या हातात एक लांबलचक काठी आली होती. त्यावर एका बाजूला आई तर एक बाजूला रोहिणी बसली होती.

आईकडे बघताच आई म्हणाली,

"शेवटी टोणगा म्हशीचंच ऐकणार म्हणायचा..."

नाराजीने आजी थोड्याफार आशेनं मी मान रोजिनीलदे वळवली, तेव्हा ती म्हणाली,

"नाही, नाही ते तर गायीचं बछडं आहे अजून.. आईच्या शब्दाबाहेर कसा जाणार आहे हे लहान बाळ?"



दोघींची ही वाक्ये ऐकून आता मात्र ही कसरत आपल्याला जमणार नाही अशी माझी खात्री झाली. तेव्हाच अचानक माझा फोन वाजू लागला, कानात हेडफोन घालून गाणी ऐकावीत असे वाटू लागले आणि माझी नजर माझा फोन शोधू लागली. फोन कुठंच दिसत नव्हता, रिंग मात्र वाढतच चालली होती आणि काठीच्या टोकावर बसून आई आणि रोहिणीची बडबड पण शिगेला पोचली होती, मला काहीच सुधारत नव्हतं, आणि तेव्हाच त्या दोघीही एकत्र म्हणाल्या -



"एक लक्षात ठेव, माझ्या आवडीच्या मुलीशी लग्न नाही केलंस तर मात्र मला कायमच भटकावे लागेल..."



त्या दोघींच ते वाक्य ऐकून मात्र मला धक्काच बसला. माझा तोल गेला आणि मी तारेवरून धप्पकन खाली पडलो....
आणि माझे डोळे उघडले, चांगलंच लागलं होतं.
बघितलं तर माझा मोबाईल शेजारच्या टेबलवर वाजत होता आणि सकाळचा गजर होत होता. रोहिणी मात्र अजूनही गाढ झोपली होती. मला चांगलाच घाम फुटला होता.
छे!! काय भयानक स्वप्न होतं ते!!
"माझी तारेवरची कसरत स्वप्नात सुद्धा कोसळू देऊ नको रे देवा!!" - मी बसल्याजागीच हात जोडून देवाकडे प्रार्थना केली.

रोहिणीला शांत झोपलेली पाहून मनाला समाधान वाटलं, शेजारच्या खोलीत डोकावलं तर आईही निवांत झोपली होती. मगाशी बघितलेलं स्वप्नच होतं याची आता मला खात्री झाली. दोघींना असं शांत आणि समाधानी पाहून मनाला एक वेगळाच आनंद मिळाला कारण आपली कसरत अजूनही सुरक्षित आहे याची ती ग्वाही होती.

आता सगळ्यात पाहिलं काम म्हणून आज आधी दोघींची मेडिकल करून घेणार आहे. मगाशी पाहिलेलं स्वप्नंच होतं हे जरी पटलं असलं तरी, माझी कसरत कोसळण्याची भीती अजून गेलेली नाही करणं आई आणि रोहिणी यांचा जसा माझ्यात जीव अडकला आहे तसा माझी जीव त्यांच्यातच गुंतला आहे. त्या दोघी सुखरूप आहेत याची खात्री केल्याशिवाय माझ्या मनाला शांती मिळणार नाही.
कसं आहे, शेवटी कितीही अवघड असली तरी माझी ही तारेवरची कसरत मला टिकवायलाच हवी ना? ......

- समाप्त

स्वप्निल तिखे

Email - Writer.sbtikhe@gmail.com

Mobile - 09922327427