Apradh kunacha, shiksha krunala ? - 1 books and stories free download online pdf in Marathi

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 1

(१) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?
वामनराव बैठकीत टीव्हीवरील बातम्या बघत बसले होते. डोळे जरी टीव्हीवर लागलेले होते तरी लक्ष कुठे अन्यत्र होते. चित्त जणू थाऱ्यावर नव्हते. एक औदासिन्य शरीरभर पसरले होते. काही तरी वेगळं घडलंय असेही नव्हते. रोजचे दिनमान नेहमीप्रमाणे सुरू होते. त्यांची आणि त्यांच्या पत्नीची तब्येत वयोमानाप्रमाणे होणारे आजार सोडले तर बाकी सारे व्यवस्थित होते. मग त्यांची मनःस्थिती तशी का झाली होती? भविष्यात काही वेगळे काही वाढून ठेवले नव्हते ना? एखाद्या संकटाची तर चाहूल लागली नव्हती ना? वामनराव आणि त्यांची पत्नी विमलाबाई दोघे त्या शहरात राहत होते. त्यांना लता नावाची एक मुलगी होती. तिचे लग्न झाले होते. ती तिच्या संसारात व्यवस्थित रमली होती. सारे काही उत्तम असताना वामनरावांच्या मनात अस्वस्थता का फेर धरून नाचत होती? तितक्यात तिथे विमलाबाईंचे आगमन झाले. टीव्हीचा कर्णकर्कश्श आवाज ऐकून त्या धावत आल्या होत्या. वाढलेल्या आवाजासाठी नवऱ्याला चांगले धारेवर धरण्याचा त्यांचा आवेश होता. त्याच अवस्थेत त्यांनी आक्रमकपणे नवऱ्याच्या हातातील रिमोट खसकन ओढून घेतला. अगोदर टीव्ही म्युट केला. नंतर त्यांनी वामनरावांकडे मोर्चा वळवला. परंतु वामनरावांची दृष्टी टीव्हीवर स्थिर होती. पत्नीने रिमोट घेतला, आवाज बंद केला हे जणू त्यांच्या गावीही नव्हते. त्यांची तशी अवस्था विमलाबाई घाबरल्या. त्यांनी वामनरावांना आवाज दिला, खांद्याला धरून हलवले. गाढ झोपेतून जागे झाल्याप्रमाणे वामनराव वास्तवात परतले. त्यांनी पत्नीकडे पाहिले. विमलाबाईंनी विचारले,
"अहो, हे काय? कुठे आहात? टीव्हीचा आवाज केवढा मोठा केला होता?"
"अग, रिमोटचे बटण दाबल्या गेले असेल. काय म्हणतेस?"
"अहो, काही नाही. सकाळपासून कसं वेगळंच वाटतंय हो. कशातच मन लागत नाही. शरीरात कशी सुस्ती भरलीय हो."
"तेच तर ना. मलाही तसंच होतंय गं. कदाचित म्हणून टीव्हीच्या आवाजाकडे लक्षच राहिले नाही."
"आपली लता तर चांगली असेल ना? तिला काही त्रास तर होत नसेल ना?"
"अग, नाही. तसे काही नाही. लताला काय त्रास असणार? मजेत असेल ती. परवाच तर फोनवर बोललोत ना आपण?"
"होय हो. बोलले खरी पण मला लताचा आवाज बदललेला दिसला. परवाच नाही तर मागील काही महिन्यांपासून ती मोकळेपणाने बोलत नाही हो. वाटतंय तिला काही तरी सांगायचे आहे पण ती बोलत नाही, तिला शब्द सुचत नाहीत, कशाच्या तरी दडपणात आहे असे वाटतेय बघा. मला काय वाटते, आपण जाऊन एकदा भेटून येऊत का? तिला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय मला चैन नाही पडणार."
"अग, जावयाकडे असे अचानक जाणे बरोबर नाही वाटत गं. अविश्वास दाखवला..."
"त्यात कसला आलाय अविश्वास? आपण आपल्या मुलीला भेटायला जातोय."
"बरोबर आहे तुझे. पण ठीक आहे. दुपारपर्यंत ठरवू या." वामनराव बोलत असताना स्वयंपाक घरातून कुकरची शिट्टी ऐकू आली आणि विमलाबाई तिकडे गेल्या. वामनराव पुन्हा विचारांच्या वावटळीत शिरत असताना बाहेरून आवाज आला,
"पोस्टमन..."
आवाज ऐकून वामनराव बाहेर आले. पोस्टमनने त्यांच्याकडे पाहून स्मित केले. हातातील पाकीट वामनरावांच्या हवाली करून तो निघून गेला. वामनराव पाकीट हातात घेत पुटपुटले,
'कुणाचे आहे?' त्यांचे लक्ष पाकिटावर एका कोपऱ्यात लिहिलेल्या पाठवणाराच्या नावावर गेले. तसे तसे ते दचकले. पत्र त्यांच्या मुलीने लताने पाठवले होते.
'लताने का पत्र पाठवले असेल? सारे ठीक तर असेल ना? लता संकटात तर नसेल ना?...' असे स्वतःशीच म्हणत त्यांनी तो लिफाफा धडधडत्या अंतःकरणाने फोडला. आत असलेल्या कागदाची घडी उकलत ते खुर्चीवर बसले. पत्रातील अक्षर पाहून ते पुन्हा दचकले कारण ते अक्षर जरी लताचे होते तरी ते तिचे आहे असे वाटत नव्हते कारण लताचे अक्षर म्हणजे कसे वळणदार, सुंदर आणि एका लयीत लिहिलेले असे होते. लताच्या मोत्यागत् अक्षरांचा वामनरावांना खूप अभिमान होता. पण पत्रातील अक्षर? काय झाले असेल? त्यांनी पत्र वाचायला सुरुवात केली...
तीर्थरूप बाबा,
शि. सा. न.
माझे पत्र पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण दूरध्वनीची व्यवस्था असूनही मी पत्राने संवाद साधत आहे पण बाबा, वेळच तशी आहे हो. काय करू आणि कसे सांगू तुम्हाला. हे पत्र तर मी लिहित आहे पण ते तुम्हाला मिळेल का नाही याची शाश्वती मला नाही, मी साशंक आहे. बाबा, आपण फसविल्या गेलोय हो. ज्या माझ्या सासरच्या माणसांना आपण देवमाणसं समजत होतो, ते साफ चुकीचे आहे. ही माणसं राक्षस आहेत, राक्षस! माझ्यासाठी माझा स्वर्ग असलेले हे घर चक्क नरक आहे. बाबा, मी नरकात राहते बाबा. बाबा, कसे सांगू तुम्हाला, माझी काय स्थिती झाली आहे ती? माझा अमानुष छळ होतोय हो. ते म्हणतात ना, ऊठता लाथ, बसता बुक्की अगदी अशीच माझी पदोपदी अवस्था झाली आहे. जिवंत राहणे मुश्कील झाले आहे. चोवीस तास माझ्यावर अत्याचार होतोय. परिचित घराणे आहे म्हणून आपण अगदी डोळे झाकून हे नाते... नाते कसले बाबा, नरक स्वीकारला आपण. बाबा, लग्नापूर्वी तुमच्या जावयाचे... नाही. नाही. त्याला तुमच्यासारख्या देवमाणसाचा जावाई म्हणायचीही मला लाज वाटते. अभयचे लग्नाच्याआधी अनेक मुलींशी संबंध होते. ज्या वस्तींचे नाव तुमच्यासमोर उच्चारू नये अशा वस्तींमध्ये जाऊन तो रात्र रात्र घराबाहेर राहायचा. लग्नानंतरही त्याचे हे चाळे सुधारले नाहीत. सुरुवातीला मी रागावले, चिडले, संतापले, आरडाओरडा केला, स्वतः दिवस दिवस उपाशी राहिले पण अभयचे वागणे सुधारले नाही. सासू- सासऱ्यांना सांगून पाहिले पण काही उपयोग झाला नाही उलट त्यांनी माझाच अनन्वित छळ सुरू झाला. शेवटी मीच एक पाऊल मागे घेतले. नशिबाचा भोग म्हणून सारे काही स्वीकारले. दुर्लक्ष करीत राहिले पण अभय सुधारला नाही. माझे दुःख, माझ्या संसाराबद्दल असलेल्या अपेक्षा, स्वप्न सारे काही ह्रदयाच्या एका कप्प्यात जणू बंद केले... कायमचे! पण बाबा, आता नवीनच भोग सुरू झालाय. गेल्या अनेक महिन्यांपासून अभय सारखा आजारी पडतोय. ताप, खोकला, अशक्तपणा, संडास यासारखे आजार कमीच होत नाहीत. बाबा, अशात मलाही सारखा ताप येतोय, खोकला सुरू झालाय. कशानेही फरक पडत नाही. कोणत्याही औषधांचा उपयोग होत नाही हे पाहून डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या आणि बाबा, त्या तपासणी अहवालातून एक भयंकर सत्य पुढे आलंय. हे मी तुम्हाला नाही सांगू शकत. तेवढी हिंमत नाही हो माझ्याजवळ. पण सांगावे तर लागेलच ना. बाबा, एड्स झालाय हो. अभयला आणि तुमच्या लाडलीला...मलाही ! बाबा, माझा कोणताही अपराध नसताना, मी कोणताही गुन्हा केलेला नसताना मला शिक्षा भोगावी लागतेय. आणि मी न केलेल्या गुन्ह्याचा दोष माझ्याच माथी मारत माझा दुप्पट छळ होतोय बाबा. हा आजार नको त्या दलदलीत फसल्यामुळे, चक्रव्यूहात अडकल्यामुळे अभयला झालाय आणि अभयच्या संपर्कात आल्यामुळे मला झालाय ही काळ्यादगडावरची रेघ आहे पण इथे ते कुणी मानायलाच तयार नाही. सरळ सरळ माझेच लग्नाच्याआधी कुणाशी तरी अनैतिक संबंध होते आणि मी एड्स हा भयानक रोग घेऊनच या घरात आलीय असा आरोप सातत्याने माझ्यावर केला जातोय. अभय काही बोलत नाही. तो माझ्यावर आरोप करीत नाही पण सत्य काय ते त्याच्या आईबाबांना सांगतही नाही हो. त्याचे मौन माझ्या पाठीशी उभे राहत नाही तर त्याच्या आईबाबांनी माझ्यावर केलेल्या आरोपाला बळ देतेय, पुष्टी देतेय. मला अनेकदा वाटलं की, अभयला विश्वासात घ्यावे, दोघांनी मन मोकळं करावं, अभयने स्वतःच्या चुकांची कबुली त्याच्या आईबाबांसमोर दिली तर मी उरलेले आयुष्य त्याच्यासोबत आनंदाने काढायला तयार आहे पण बाबा, त्याच्याजवळ जाताक्षणी एक संतापाची लाट, तुच्छतेची, तिरस्काराची भावना उचंबळून येते हो. शब्दच तोंडातून निघत नाही हो. कदाचित मी चुकतही असेल पण मी माझ्या भावना नाही थांबवू शकत हो. काय करू? बाबा, तुम्हाला माहिती आहे, लग्नापूर्वी मित्र तर सोडा पण एक आशाशिवाय मला दुसरी मैत्रीण तरी होती का हो? बाबा, माझे भविष्य मला स्पष्ट दिसतंय हो. भविष्यात काय वाढलंय तेही लख्ख दिसतंय. एड्स हा जीवघेणा आजार माझाही श्वास हिरावून घेणार हेही मला माहिती आहे. जे काही जीवनातील क्षण उरले आहेत तेही नरकमय यातनांनी तुडुंब भरलेले असणार आहे. एड्स हा आरोप माथी घेऊन मरण्याच्याआधी, मी न केलेला अपराध जगजाहीर होण्यापूर्वीच हे जग सोडून जावे अशी प्रबळ इच्छा होते आहे पण ती पूर्ण होईल असे वाटत नाही कारण घरातील वातावरण, परिस्थिती पाहता ही मंडळी माझे जीवन संपविण्याच्या तयारीत आहेत असा मला दाट संशय आहे नव्हे तसा मला विश्वास वाटतोय. बाबा, माझी एक इच्छा पूर्ण कराल, शेवटची इच्छा समजून तुमच्या लाडोला एकदा भेटायला याल का हो? आईला घेऊन या ना बाबा, एकदाच तुम्हाला तुम्हाला दोघांना डोळे भरून पाहू द्या ना....
तुमची लाडकी,
लता.
'अरे, बाप रे! हे काय होऊन बसल? सकाळपासून आलेल्या अस्वस्थतेचे हे कारण होतं तर? नाही, लताबेटी, नाही. तू मुळीच दोषी नाहीस. मला खात्री आहे, तुझे पाऊल कधीच वाकडे पडले नाही. पडणार नाही. आमचे संस्कार इतके तकलादू नाहीत बेटा. घाबरु नकोस. मी.. मी.. तुझा बाबा आहे ना! सारे ठीक होईल. त्या मुर्ख लोकांना तुझी किंमत नाही समजणार पण त्यांना त्यांच्या वाइट कामाची किंमत मात्र मोजावी लागणार. माझ्या सोन्यासारख्या गुणी मुलीचे असे हालहाल करताना त्यांना लाज वाटायला हवी. लता, बाळा, तुझ्या नशिबात हे असे काटे का म्हणून आले? लता, एक सांगतो, तुझ्यापुढे, तुझ्या सद्गुणांपुढे त्यांना हार मानावी लागेल. नाही. काहीही झाले तरी मी तुला असे नाही जाऊ देणार. मी.. मी .. तुला त्या नरकातून बाहेर काढीन. एड्स झाला म्हणून काय झाले? त्यावरही औषध असेलच की. आज वैद्यक शास्त्र एवढे पुढे गेलंय ना की...' वामनराव स्वतःशीच बडबडत असताना तिथे आलेल्या विमलाबाईंनी त्यांच्या हातातील पत्र पाहून विचारले,
"काय झाले हो? कुणाचे पत्र आहे? आणि हे काय तुमच्या डोळ्यात पाणी? सारे ठीक आहे ना? काही वेडीवाकडी बातमी तर नाही ना?"
"प..प..पत्र.. लताचे पत्र आहे गं..." वामनराव कसेबसे म्हणाले.
"लताचे पत्र? मग तुमची अशी अवस्था का झाली? माझी ल.. लता...काय झाले तिला? नक्कीच काही तरी वाइट बातमी आहे. म्हणूनच तुमचे डोळे भरुन आले आहेत. सांगा ना..."
"काय सांगू तुला? कसे सांगू तुला? आपली लता आता काही दिवसांचीच सोबती आहे..."
"काही तरी बरळू नका. नीट सांगा..."
"आपल्या लताला एड्स झालाय ..."
"काय म्हणतात तुम्ही? एड्स? आपल्या लताला?असे कसे बोलू शकता तुम्ही? नाही. नाही. खोटे बोलताय तुम्ही. माझा विश्वास नाही या गोष्टीवर. कुणीतरी मुद्दाम... पत्र कुणाचे आहे..."
"लताचेच पत्र आहे गं. तिनेच लिहिले आहे..."
"तरीही माझा विश्वास नाही. आजकाल डॉक्टरांचेही काही खरे नाही. दुसऱ्या कुण्या माणसाचा अहवाल चुकून लताच्या नावे दिला असणार. माझा माझ्या लतावर पूर्ण विश्वास आहे. ती असे कधीच वागणार नाही की, त्यामुळे आपल्या संस्कारावर प्रश्न निर्माण व्हावा..."
"अग, शांत हो. ऐक. अगोदर अभयरावांना हा आजार झालाय आणि त्यांच्यापासून आपल्या लताला या आजाराने घेरलंय..."
"आजाराने घेरलं नाही हो. तर त्या लोकांनी घेरलंय आपल्याला. विश्वासघात केलाय आपला. त्यांना लग्नाच्या अगोदरपासूनच हा आजार असला पाहिजे म्हणून तर साळसूदपणाचा, सुधारणेचा आव आणून हुंडा न घेता लग्नाला तयार झाले होते. देखणं पोरगं, घराणं चांगलं, ओळखीची माणसं म्हणून आपणही त्यांचा हा डाव ओळखू शकलो नाही. असे डोळ्यात पाणी आणून शांत बसून कसे चालेल? काही तरी करा. चांगली अद्दल घडवा त्या नालायक लोकांना. खडी फोडायला पाठवा."
"अग, पण आधी काय झाले, कसे झाले..."
"म्हणजे तुमचा आपल्या लेकीवर विश्वास नाही?"
"असे म्हणत नाही मी. तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण आधी तिला त्यांच्या तावडीतून सोडवावे लागेल आणि मग पुढील पाऊल टाकावे लागेल..." असे म्हणत वामनरावांनी लताच्या घरी फोन लावला. आणि म्हणाले,
"हॅलो, मी वामनराव बोलतोय..."
"लेकीची करतुत समजली वाटते. पत्र मिळालेले दिसतंय." लताच्या सासऱ्याचा आवाज आला.
"म्हणजे? लताने आम्हाला पत्र पाठवले हे तुम्हाला माहिती होते?"
"हो. ते पत्र टाकण्याची संधी आम्हीच तिला दिली. आमच्या करड्या नजरेतून ही गोष्ट सुटली असेल असे तुम्हाला कसे वाटले? म्हटलं पोरीचा बाहेरख्यालीपणा तिच्या आईवडिलांच्या कानावर जाऊ देत."
"याचा अर्थ तुमची तिच्यावर पाळत आहे तर. माझ्या लेकराला तुम्ही नजरकैदेत ठेवलंय? माझी लता असे स्वप्नातही वागणार नाही..."
"खरेच. मोठी गुणाची पोर आहे हो तुमची. आणि तुम्ही पाळत समजा, नजरकैद समजा, तुम्हाला हवं ते समजा आमची काही हरकत नाही."
"आमची लता तशी नाही हो. तुमचा काही तरी गैरसमज होतोय."
"आमच्या अभयच्या बाबतीतही आम्ही असेच म्हणू नकतो की, तो असा नाही म्हणून. पुढे बोला."
"अहो, ती माझी एकुलती एक मुलगी आहे हो. सुसंस्कारित आहे. तिचे पाऊल वाकडे पडणार नाही."
"चांगलेच माहिती झाले हो तुमचे सुसंस्कार आणि तिची पावलं. आम्ही काही अभयवर कुसंस्कार केले नाहीत तुमच्याप्रमाणे."
"हे बघा. अभय मुलगा आहे. मुलं मित्रांच्या संगतीने एखादेवेळी नको ते पाऊल टाकतात आणि मग त्याचे हे असे परिणाम होतात..."
"तुम्ही काय बोलत आहात ते कळतंय का तुम्हाला? अभयवर असा आरोप करण्याची तुमची हिंमत झालीच कशी?"
"म.. म.. मला लताला भेटायचे आहे."
"भेटा ना. कशीही असली तरीही ती तुमची पोटची पोर आहे. कदाचित तुमच्यासमोर ती सारे काही कबूल करेल. खरे काय आहे ते सांगेन. या. केव्हाही या." असे म्हणत लताच्या सर्व सासऱ्याने फोन ठेवला.
"काय झाले हो? काय म्हणाले ते? लताला का नाही बोलले तुम्ही? काय राक्षसी माणसं आहेत ना? स्वतःच्या पोराचं पाप ते माझ्या पोरीच्या माथी मारून मोकळे होत आहेत. देव यांना क्षमा करणार नाही. हालहाल होतील यांचे. माझी लता खरेच तशी नाही हो."
"हे बघ. तू म्हणतेस ते मला का माहिती नाही? लताच्या सासू -सासऱ्यांना माहिती नाही? त्यांना चांगलेच माहिती आहे, खरे काय आहे ते. चूक कुणाची आहे, खरा अपराधी कोण आहे पण चूक कबूल करायला काळीज मोठे लागते ते त्यांच्यापाशी नाही. मुळात ते समजून घ्यायला तयार नाहीत. झोपेचे सोंग घेतलंय त्यांनी, कोण जागे करणार? होईल काही तरी. मार्ग निघेल. देवावर विश्वास ठेव. तोच सारे नीट करेल." वामनरावांनी पत्नीची समजूत काढली पण त्यांच्या मनात चालत असलेल्या विचारांचे काय? ते कसे थांबणार? कोण थांबवणार?...
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निघून वामनराव विमलाबाईंसह लताच्या सासरी पोहोचले. बैठकीचे दार उघडे होते. सर्वत्र सामसूम दिसत होती. वेगळ्याच शंकेने वामनरावांनी आत डोकावले. सोफ्यावर बसलेले लताचे सासू-सासरे काही तरी कुजबुजत होते. अभय - लता कुठे दिसत नव्हते. वामनरावांनी दारावर टकटक केली. तसे दोघे सावरले. लताचे सासरे म्हणाले,
"या. या. लवकर आलात. चैन पडले नसेल ना..." सासरे बोलत असताना त्यांच्या समोरच्या सोफ्यावर वामनराव आणि विमलाबाई बसल्या. तितक्यात आतल्या खोलीतून लता बाहेर आली. तिला पाहताच दोघांनाही गलबलून आले. कोमेजलेली, निस्तेज झालेली, क्षीण झालेली, काळीठिक्कर पडलेली, चालताना जाणारा तोल सांभाळणारी लता पाहून विमलाबाईंचे डोळे भरुन आले. त्या उभ्या राहिल्या. जवळ आलेल्या लताला त्यांनी ह्रदयाशी कवटाळले. लता आईच्या खांद्यावर मान टाकून ओक्साबोक्शी रडू लागली. तशाच अवस्थेत ती म्हणाली,
"आ...आ..आई ग. हे काय झालं ग? काय चुकलं गं माझं? मी.. मी.. काहीही केलेले नाही. कधीही, कोणत्याही न केलेल्या पापाची शिक्षा मी भोगतेय गं. खरे सांगते, अभयच्याशिवाय कुणाशीही माझा संबंध आला नाही. आई, तुझी शपथ घेऊन सांगतेय. बाबा.. बाबा, तुम्ही तरी यांना समजावून सांगा ना हो. खरेच बाबा..."
"लता, माझं बाळं ते आम्हाला माहिती आहे, तू निर्दोष आहेस ते..."
"मग काय माझं पोरगं दोषी आहे. म्हणे बाळ... कुक्कुल बाळ... या अशा लाडाने तर ही तुमची पोट्टी वाहवली. स्वतःही नासली आणि माझ्या निष्पाप लेकराचा बळी घेतला..."
"नाही हो. माझ्यावर विश्वास ठेवा आई. मी काहीही केले नाही. का माझ्यावर राग राग करताय?"
"जैसी करनी, वैसी भरनी। म्हणे का राग राग करताय. साळसूद मेली. कसे नाटक करतेय? शेण खायची सवयच आहे हिला..."
"नाही हो. असे आरोप करू नका. धुतल्या तांदुळावाणी..."
"व्वा! काय पण धुतले तांदूळ? का हो, माझं पोरगं काय शेणाने भरलेल्या तांदळाप्रमाणे वाटलं तुम्हाला? आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती हो. ओळखीचे लोक म्हणून खोलात जाऊन चौकशी न करता सोयरीक केली आणि तुम्ही चांगले पांग फेडलेत की. कोणत्या जन्माचा बदला घेतलात हो. माझ्या एकुलत्या एक पोराचा जीव घ्यायला निघालात आणि तोंड वर करून पोरगी निर्दोष असल्याचं ढोंग करता?..."
"नाथराव, तुम्ही काहीही म्हणा, मी शपथेवर सांगतो, लता तशी मुळीच नाही..." वामनराव बोलत असताना लताची सासू कडाडून म्हणाली,
"काही सांगू नका तुमच्या पोरीचे गुण. तिने कोणते गुण उधळलेत ते पाहतोय, भोगतोय आम्ही. अहो, जी पोट्टी बापाप्रमाणे असणाऱ्या सासऱ्यावर डोळा ठेवते ती पोरगी..."
"लताच्या सासूबाई..." विमलाबाई जोराने बोलत असताना लताची सासूही ओरडली,
"ओरडू नका. आम्हालाही ओरडता येते. तुम्ही तुमची लाज विकून खाल्ली असेल पण आम्ही इज्जत कमावून आहोत. अब्रुदार म्हणून ख्याती आहे आमची. असा त्रागा करून रस्त्यावर यायचे नाही आम्हाला. झाला प्रकार..."
"मी.. मी.. लताला काही दिवसांसाठी घेऊन जातो." वामनराव वाद वाढविण्या अर्थ नाही हे ओळखून म्हणाले.
"काही दिवसांसाठी कशाला? ही घाण कायमची घेऊन गेलात तरी हरकत नाही. या आजाराच्या आधारावर आम्ही कोर्टात जाणार आहोत... घटस्फोटासाठी..." नाथराव म्हणाले.
"हे बघा. असा आततायीपणा करू नका. यातून काही तरी मार्ग काढूया..."
"आततायीपणा आम्ही नाही तर तुमच्या लाडक्या लेकीने केलाय आणि काय मार्ग काढणार आहात? तुमच्या पोरीनं माझ्या पोराच्या शरीरात घुसविलेला एड्स तुम्ही स्वतः शोषून घेणार आहात? आमची गेलेली इज्जत परत मिळवून देणार आहात? बोला."
"आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरांना दाखवू..."
"काय निष्पन्न होईल? एड्स दोघांनाही आहे. तुम्ही काय असे सिद्ध करू पाहताय की, या दोघांपैकी आधी कुणाला हा रोग झालाय? तुम्ही कुठेही तपासणी करा त्यातून हेच सिद्ध होणार आहे की, तुमच्या काट्टीपासूनच अभयला ह्या रोगाची लागण झाली म्हणून..."
"नाथराव, आपल्या लेकरांना जीवघेणा आजार झालाय. त्यामुळे एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा, भांडत बसण्यापेक्षा एकत्र बसून काही..."
"भांडणे आम्ही करतोय? भांडायला आलात तुम्ही आणि आम्हाला ज्ञान शिकवताय? उठा. उठा. चालते व्हा... " नाथराव एकदम भडकून म्हणाले.
"चल. लताबेटी, चल..." असे म्हणत वामनराव दाराकडे निघाले. पाठोपाठ लता आणि विमलाबाईही निघाल्या. त्यांना निरोप द्यायचं सोडा परंतु कुणी जागेवरून उठलेही नाही...
०००
नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED