अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 3 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला? - 3

(३) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?
त्यानंतरच्या आठ दहा दिवसांची गोष्ट. वामनरावांच्या घरातील वातावरण पूर्ण नाही पण काही प्रमाणात सुधारले होते. गप्पाष्टके रंगत नसली, हसणे बागडणे होत नव्हते तरीही दुःखाची छाया असूनही मोकळेपणा येत होता. यामागे होती आशा! ती दररोज मुद्दाम दोन्हीवेळा लताच्या जेवणाच्या वेळी येत होती. स्वतः दोन घास खाऊन लताला पोटभर जेऊ घालत होती. त्यादिवशी दुपारचे चार वाजत होते. विमलाबाई चहाची तयारी करीत होत्या. सुट्टी असल्यामुळे वामनराव घरीच होते. तितक्यात घरासमोर थांबलेल्या कारमधून आशासह एक तरुण आणि एक तरुणी उतरली. वामनरावांनी सर्वांचे स्वागत केले. सारे जण सोफ्यावर बसताच आशा म्हणाली,
"ओळख करून देते. हे वामनकाका, ह्या काकू आणि ही लता... आणि लता तुला त्यादिवशी सांगितले होते ते माझ्या दादाचे मित्र डॉ. संदेश आणि ही त्यांची पत्नी अनिता. दोघांनीही एड्स निर्मूलन कार्यात वाहून घेतले आहे..."
"खूप छान काम करता आहात आपण. आपण डॉक्टर आहात मग आपला दवाखाना वगैरे?"
"होता. परंतु आमचे दोघांचे लग्न झाले आणि मी दवाखाना बंद केला आणि एड्स या विषयावर संशोधन करताना जिथे कुठे या आजाराने त्रस्त व्यक्ती असतील त्यांना जाऊन आम्ही दोघेही भेटतो. चर्चा करतो. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करतो. लता एक सांग, तुला मुल वगैरे?" संदेशने विचारले.
"नाही. मुल नाही. कारण..." लता बोलताना अडखळल्याचे पाहून डॉ. संदेश म्हणाले,
"हे बघ. मी आशाच्या दादाचा मित्र म्हणजेच आशाचा भाऊच त्या नात्याने तू माझी बहीण..."
"लग्न झाल्याबरोबर मी आणि अभयने दोघांनी मिळून तीन-चार वर्षे मुल होऊ द्यायचे नाही असा निर्णय घेतला होता आणि..."
"समजले. एका अर्थाने ते चांगले झाले. प्रथम तुला एड्स झालाय हे डोक्यातून काढून टाक. मी आजारी आहे. मला अत्यंत भयानक आजार झालाय हे डोक्यात घेऊन बसले, तोच तोच विचार केला की मग..."
"पण संदेशदादा, वास्तव वेगळेच आहे ना..." लताला मध्येच थांबवून अनिता म्हणाली,
"लता, वास्तव आहे, ते बदलता येत नाही हे अगदी खरे आहे पण म्हणतात ना, 'आलीया भोगासी असावे सादर.' याप्रमाणे थोडी सकारात्मकता आणली तर विधिलिखित टाळता येत नाही पण वर्तमानातील क्षण तर आनंदाने जगायला काय हरकत आहे? जे काही पाच-दहा-पंधरा-पन्नास वर्षाचे आयुष्य आहे ते तर मनसोक्त जगायला काय हरकत आहे? तुला असेही वाटू शकते की, फुकटचे सांगायला काय जाते? बोलाचाच भात बोलाचीच कढी असाही प्रकार तुला वाटू शकतो पण तुला एक सांगते, तू जे जीवन मागील काही महिन्यांपासून जगत आहेस तेच जीवन आम्ही गेली पंधरा वर्षे जगत आहोत.."
"म्हणजे?" लतासह वामनरावांनी आश्चर्याने विचारले.
"होय! आम्हाला दोघांनाही एड्स हा आजार आहे. दोघेही निर्दोष असताना, कोणताही गुन्हा केलेला नसताना, दोघांपैकी कुणाचेही पाऊल वाकडे पडलेले नसताना आम्ही शिक्षा भोगत..." संदेश बोलत असताना त्याला थांबवत अनिता तर ताडकन म्हणाली,
"डॉक्टर महाशय, आपले काय ठरलंय शिक्षा भोगत आहोत नव्हे तर आनंद लुटत आहोत."
"बरोबर. हे फक्त बोलण्यापुरते नाही तर आम्हाला एड्स आहे हे आम्ही पूर्णपणे विसरून गेलोय. जिथे कुठे भेटायला जातो, समुपदेशन करायला जातो फक्त वातावरणात मोकळेपणा यावा. समोरच्या व्यक्तीने मोकळेपणाने बोलावे या हेतूने तिथे आम्हाला एड्स आहे एवढे सांगतो..."
"पण डॉक्टर..."
"ओळखली. काका, तुमची शंका लक्षात आली. थोडक्यात सांगतो. मी सतरा वर्षांपूर्वी डॉक्टर झालो. स्वतःचे क्लिनिक सुरु केले. काही महिन्यात माझे लग्न ठरले. का कोण जाणे पण माझ्या होणाऱ्या पत्नीने..."
"म्हणजे अनिता वहिनी?" लताने विचारले.
"नाही. अनिता नाही. दुसरीच सुकन्या होती. तर आम्ही दोघांनीही मिळून विवाहपूर्व रक्त तपासणीचा म्हणजे एड्स तपासणीचा निर्णय घेतला. दोघेही तपासणी करून ठरलेल्या वेळी तपासणी अहवाल घ्यायला गेलो आणि त्यावेळी डॉक्टरांनी एक भयानक सत्य सांगितले ते हे की, माझ्या शरीरात एड्साच्या विषाणूंचे वास्तव्य आहे..."
"याचा अर्थ ..."
"नाही. नाही. माझ्या नियोजित नवरीला एड्स नव्हता आणि लग्न ठरल्यानंतर आम्ही हिंडत, फिरत असलो तरीही त्यादृष्टीने कधीच जवळ आलो नव्हतो. पण मला एड्स आहे हे समजताच घेतलेल्या आणाभाका, शपथा, वचनं सारे विसरून, लाथाडून ती त्याच दवाखान्यात मला एकटा सोडून ताडताड पावलं टाकत निघून गेली. असो. तपासणी केली हेही चांगलेच झाले कारण ती बिचारी या त्रासातून वाचली..."
"पण मग हा आजार..."
"समजली. काका, तुमची शंका समजली. कसे आहे, आपल्याकडे हा रोग झाला म्हटलं की, ती व्यक्ती बाहेरख्याली आहे, नको त्या वस्तींमध्ये जाते, किंवा पुरुषांशी संबंध म्हणजे समलिंगी संबंध ठेवते अशी एक धारणा आहे ती बऱ्याच अंशी बरोबरही आहे पण ते एकच कारण नाही आहे..."
"तर मग अजून कोणते कारण असू शकते?"
"पूर्वी म्हणजे मला एड्स झाला त्यावेळी आता वापरतात तशा 'वापरा आणि फेकून द्या' अशा सुया नव्हत्या. डॉक्टर लोक एकच सुई उकळून वापरत असत..."
"बरोबर आहे. मला आठवते ते." वामनराव म्हणाले.
"सुई पूर्ण उकळून वापरली तर हरकत नसे पण ती सुई योग्यरितीने न उकळता किंवा उकळू न देता तशीच वापरली आणि दुर्दैवाने आधीच्या व्यक्तीला जर एड्स असेल तर मग त्या सुईच्या टोकावर विसावलेले आजाराचे जंतू दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करु शकतात. पुढील दुर्दैव असे की, ते विषाणू एड्सचे असतील तर मग दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात ते जंतू प्रवेश करतात आणि मग त्या निर्दोष माणसाला तो आजार होतो आणि मग समाजाची सहानुभूती तो गमावून बसतो. त्याचा कोणताही अपराध, गुन्हा नसताना तो दोषी समजल्या जातो, जसे आता आपल्या लताच्या बाबतीत झाले आहे. तिचा किंचितही दोष नाही पण तिलाच अपराधी समजून घराबाहेर काढण्यात आले."
"अगदी बरोबर आहे डॉक्टर. पण मग तुम्हाला..."
"सांगतो. ते अहवाल घेऊन मी घरी आलो. सुदैवाने तुमच्यासारखे सकारात्मक विचाराचे माझे आईवडील आहेत. त्यांना विश्वास होता, मी चुकीचे काही वागलो नाही हा. मी पार उद्ध्वस्त झालो होतो. उत्तम चालणारा दवाखाना बंद करायचा विचार करीत असताना बाबांनी मला खूप समजावून सांगितले. आणि दुसऱ्याच दिवशी मी दवाखान्यात गेलो. आश्चर्य म्हणजे मी दिवसभर दवाखाना आणि आजारी व्यक्ती यांच्यामध्ये एवढा मिसळून गेलो आणि मला झालेला आजार तेवढा वेळ पूर्णतः विसरून गेलो. आणि मला माझ्या जगण्याचे बहुमोल औषध सापडले. एक दिवस एक पेशंट माझ्या दवाखान्यात आला. तो तसा जुनाच पेशंट होता. दुर्दैवाने त्याला एड्सने ग्रासले होते. माझ्या एड्सचे निदान झाल्यानंतर तो प्रथमच आला होता. त्याला पाहिले आणि खाड्कन मला आठवले की, या.. या .. याच व्यक्तीमुळे माझ्या शरीरात एड्साचे विषाणू शिरले होते..."
"म्हणजे? संदेश..."
"नाही. काका नाही. तुमच्या मनात आलेली शंका निराधार आहे. ना तो समलिंगी होता किंवा त्याला कोणती आगावू सवयी होती ना मला तसे काही आहे. माझ्या दवाखान्यात तो एका दुर्घटनेमुळे आला. तो सायकलरिक्षा चालवत असे. एकेदिवशी माझ्या दवाखान्यासमोर त्याची रिक्षा एका छोट्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात लाइटच्या खांबावर जाऊन आदळली. त्याला बराच मार लागला. माझ्या दवाखान्यासमोर घटना घडली होती त्यामुळे लोकांनी ताबडतोब माझ्या दवाखान्यात त्याला आणले. मीही नवीनच दवाखाना सुरू केला होता. आणि तशी रक्तबंबाळ केस पहिल्यांदा आल्यामुळे हातात ग्लोव्हज न चढवता त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरु केले. ते करताना माझ्या हातालाही न दिसणारी, न जाणवणारी अशी एक जखम झाली आणि त्या जखमेचा त्याच्या शरीरातून वाहणाऱ्या रक्ताशी संपर्क आला. त्या संपर्कातून एड्सचे विषाणू माझ्या शरीरात शिरले आणि माझा काहीच अपराध नसताना मी त्या आजाराला बळी पडलो. म्हणजे झाले कसे...
त्याच्या रक्ताचा एकच थेंब
माझ्या शरीरात शिरला,
पाहता पाहता बघा
संरक्षक पेशींचा नायनाट झाला..."
"बाप रे! अशाही अवस्थेत तुम्हाला काव्य सुचते? बघा. बाब किती साधी पण जीवनातून उठवणारी. तुमचे आईबाबा तुमच्यासोबत नसते तर..."
"तर आज मी तुमच्या समक्ष आलो नसतो. आता राहिला प्रश्न त्या व्यक्तीला एड्स झाला कसा? बघा. हा एड्स कशी स्वतःची चैन, साखळी निर्माण करतो ते. काही माणसे जरूर तोडतो पण काही माणसे जवळही आणतो. त्यामुळे आपणही जवळ आलो ना .." डॉ. संदेश हसत म्हणाले.
"डॉ. संदेश, हॅटस् ऑफ टू यू! तुमच्या सकारात्मकतेला, खेळकरपणाला सलाम!"
"असे काही नाही. तर त्या व्यक्तीस म्हणजे रिक्षाचालकास एड्स झाला कसा? तर काही वर्षांपूर्वी त्याला रक्त घ्यावे लागले होते... तेही एका खेड्यात. अनेक वर्षांपूर्वी आजच्यासारख्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. किंवा समोरच्या पेशंटची अवस्था पाहून, तात्काळ रक्त देणे गरजेचे आहे म्हणूनही कदाचित रक्तदात्याची रक्ततपासणी न करता आमच्या या रिक्षाचालकास ... अहमदला रक्त दिले गेले असावे आणि तो रक्तदाता एड्सग्रस्त असल्यामुळे या निष्पाप, एकपत्नी असलेल्या व्यक्तीला त्या विषाणूंनी घेरले आणि त्याच्याकडून मला आपसूक पकडले."
"आता तो अहमद..."
"ऑलराइट! विशेष म्हणजे त्याच्या पत्नीलाही तो आजार आहे पण सकारात्मक वृत्ती, योग्य औषधोपचार, व्यायाम, खेळकरपणा या गुणांमुळे आजारी असूनही ते निरोगी जीवन जगतात..."
"जस्ट लाइक अस!" अनिता पटकन म्हणाली. सारेच तिच्याकडे बघत असताना ती पुढे म्हणाली,
"तुमच्या मनात काय विचार सुरू आहेत ते माझ्या लक्षात आले आहे. ज्या विषाणूंनी लता, संदेश, अहमद, त्याची पत्नी यांना त्यांचा कोणताही अपराध नसताना मगरमिठीत घेतलंय तसं माझं नाही. कारण माझे लग्न एका तरुणाशी ठरले होते. आमचे लग्न होण्यासाठी अवकाश होता त्यामुळे आम्ही भेटत होतो. हिंडत-फिरत मजा मारत होतो. तो माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करीत होता. मी नेहमी सातत्याने त्या गोष्टीसाठी टाळत होते पण एकदिवस मीही भावनेच्या भरात वाहवले..."
"भावनेच्या भरात वाहवलीस आणि माझ्या आयुष्यात आली. अनिता तुमचे दोघांचे झाले कसे माहिती आहे का? तुला ती चारोळी आठवते का..."
"कोणती? ती...
'विश्वासाने गुंफलेला धागा
अविचाराने तोडायचा नसतो,
देह आपला झाला म्हणूनी
कुणाच्याही हवाली करायचा नसतो..'
"होय. हीच ती. अगोदर तुझ्या विश्वासाचा त्याने अविचाराने घात केला आणि नंतर तू तुझा देह..."
"खरे आहे, संदेश तुझे. पण त्या नालायक माणसामुळेच मला तुझ्यासारख्या निर्व्यसनी, सदाचारी माणसाची साथ मिळाली. तर त्यादिवशी मीही स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि त्या काही क्षणांच्या मजेची सजा मला आजीवन मिळाली. कारण त्याला एड्स होता. त्यानंतर मी एकदा नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेले होते तो त्याच्या आईबाबांसह स्वयंपाक घरात जेवण करीत होता म्हणून मी बैठकीत बसले असताना सोफ्यावर माझ्या शेजारी एक दवाखान्याची फाइल दिसली. जवळच असल्यामुळे त्यावरील नाव मला वाचता आले.आणि मी दचकले ती फाइल माझ्या भावी नवरदेवाची होती. इतके वेळा भेटूनही आपण आजारी असल्याचे सांगितले नाही याचा मला राग आला. उत्सुकतेपोटी ती फाइल हातात घेऊन उघडली. पाहते तर काय माझे भावी पती चक्क एड्स ग्रस्त होते. मला प्रचंड धक्का बसला. मी सोफ्यावर मान टेकवून बसले न बसले तोच मला एकदम शॉक बसावा तसे झाले. काही दिवसांपूर्वी मी एड्स या विषयावरील एक लेख वाचला होता. त्या लेखातील एक वाक्य माझ्या डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागले..."
"कोणते वाक्य?" लताने हळूच विचारले.
"ते वाक्य माझ्या कानात गर्जना करुन सांगत होते की, एड्सग्रस्त व्यक्तीसोबत शारीरिक संबध ठेवणाऱ्या व्यक्तीलाही एड्स आजार होतो..."
"बाप रे! मग?"
"मग काय? मला एकाच गोष्टीचे वाइट वाटत होते, त्या मुलाचा आणि त्याच्या कुटुंबाचा संताप येत होता की, त्यांना हा आजार माहिती होता तरीही त्यांनी माझ्याशी लग्न ठरवले... आम्हाला अंधारात ठेवून... आमची फसवणूक केली आणि त्याहीपेक्षा त्याने केलेल्या चुकीचा कळस म्हणजे त्याने माझ्याशी लग्नापूर्वी नको ते संबंध जोडले. मी तशा अवस्थेत बसलेले असताना ते कुटुंब बाहेर आले. माझ्या हातात ती फाइल पाहून तो ओरडला. म्हणाला की, ही फाइल पाहण्याची हिंमतच कशी झाली?"
"चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात त्या अशा!" विमलाबाई म्हणाल्या.
" मी काहीही न बोलता तिथून निघून आले. आईबाबांना सारा प्रकार सांगितला. बाबांनी दुसऱ्याच क्षणी फोन करुन, मध्यस्थ माणसाला फोन करून लग्न करायला नकार दिला. लग्न तर मोडले पण काही महिन्यांनी मला जी भीती सतावत होती ती पुढे आली. माझ्या शरीरातही एड्सचे विषाणू मुक्तपणे संचार करीत असल्याचा अहवाल माझ्या हाती आला."
"किती दुर्दैव आहे ना..."
"नाही. काकू, नाही. दुर्दैवी आम्ही नाहीत तर आमचा संसार मांडल्या जाण्यापूर्वीच मोडणारे दुर्दैवी आहेत. आमची भेट झाली. आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचा परिचय करुन देणारी व्यक्ती कोण होती तर माझे जिच्याशी लग्न ठरले होते, लग्नापूर्वी रक्त तपासणीचा निर्णय घेऊन, मला एड्स आहे हे सांगणारा अहवाल हाती येताच मला दवाखान्यात सोडून जाणारी तीच मुलगी अनिताला माझ्या दवाखान्यात घेऊन आली. तिच्याच पुढाकारातून आम्ही आज सुखी जीवन जगत आहोत."
"पण दादा, हे सर्वांना शक्य नाही..."
"तुला असे का वाटते लता? तू सुशिक्षित आहेस. सकारात्मक विचार कर. हे बघ, एक अशिक्षित, रिक्षाचालक आणि त्याची पत्नी या वावटळीत सापडूनही अत्यंत सुखाचा, समाधानाचा संसार करीत आहेत. कुठेही नोकरी कर..." संदेश बोलत असताना त्याला थांबवत अनिता म्हणाली,
"संदेश, दुसरीकडे कशाला? आपल्या संस्थेत घेऊया की तिला. काय म्हणतेस लता?"
"लते, काहीही विचार करु नकोस. उद्यापासूनच सुरू कर." आशा म्हणाली. तसे लताने आईबाबांकडे पाहिले. बाबा म्हणाले,
"लता, जरूर जा. बाहेर पडलीस तर वेळ जाईल. समदुःखितांचे दुःख समजून घेतल्यामुळे स्वतःला अपराधी समजणार नाहीस. जा. संदेश, अनिता, तुम्हा दोघांचेही..."
"काका, आभार मानून परके मानू नका. एक मात्र करा, आशा म्हणत होती की, काकू कांद्याची थालीपीठं छान करतात. ती मेजवानी मात्र नक्कीच हवी." डॉ. संदेश म्हणाले.
"अग बाई, थांबा. लगेच करते... " असे म्हणत विमलाबाई आत गेल्या. पाठोपाठ आशाही...
०००
नागेश सू. शेवाळकर