अपराध कुणाचा शिक्षा कुणाला? - 2 Nagesh S Shewalkar द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराध कुणाचा शिक्षा कुणाला? - 2

(२) अपराध कुणाचा, शिक्षा कुणाला?
अत्यंत दुःखी अंतःकरणाने लताला घेऊन निघालेले वामनराव सहकुटुंब सायंकाळच्या सुमारास ते राहत असलेल्या गल्लीत पोहोचले. पण वातावरण कसे बदललेले, साशंक दिसत होते. नेहमीप्रमाणे कुणी त्यांचे स्वागत तर सोडा पण साधे हसून किंवा शब्दाने विचारपूसही केली नाही. कुणी नजरानजर होताच नजर वळवली. कुणी रागाने, अविश्वासाने पाहिले. कुणी नाक मुरडले. हे असे का व्हावे? हा बदल का? लता खूप दिवसांनी घरी येत असूनही आणि लता अनेक कुटुंबातील महिलांची लाडकी असूनही तिचीसुद्धा कुणी चौकशी केली नाही तर तिच्याबद्दल काही बायकांच्या डोळ्यात स्पष्टपणे घृणा दिसत होती. ही किमया होती एका फोनची. वामनराव लताला घेऊन तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडताच तिच्या सासऱ्यांनी गल्लीतल्या एक दोन घरी फोन करून लताला एड्स झालाय, तिचे चालचलन कसे वाईट आहे, ती शरीरसुखाला कित हपापली आहे, ती स्वतःच्या पित्यासमान सासऱ्याकडे कशी विषयांकित नजरेने पाहते असे बरेच काही सांगितले होते. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. गल्लीत चर्चेला पेव फुटले. त्यामुळे वामनराव आणि त्यांच्या कुटुंबाच्या आगमनाची कुणी दखल घेतली नाही उलट हलक्या आवाजात पण त्या तिघांच्या कानी पडेल अशा आवाजात त्यांची वाट पाहणाऱ्या काही बायकांनी वाग्बाण सोडले.
"पहा, यांच्याकडे पाहून वाटते तरी का की, हे कुटुंब वाईट चालीचे असेल म्हणून."
"खाण तशी माती. आईची वागणूक आणि शिकवण, बापाचा पाठिंबा असल्यावर काय पोट्टी गुण उधळणारच ना? रंग दाखवणारच की."
"तुम्ही काही म्हणा पण या काट्टीची चाल मी आधीच ओळखली होती. तिचा नट्टापट्टाच सांगत होता. सिनेमातील हिरॉईन समजून वागत होती."
"बरं झालं गं बाई, आमच्या कृष्णाच्या गळ्यात हे वाण बांधले नाही ते. खूप मागे लागले होते पण कृष्णाने स्पष्ट नकार दिला. कदाचित तिला हिचे गुण माहिती झाले असावेत. नाही तर आज माझ्या पोरालाही हिने एड्सच्या गटारात ढकलले असते."
"कुणावर विश्वास ठेवावा नि काय. काय पण लोक असतात ना, खाल मुंडी नि पाताळ धुंडी!"
किती फरक असतो ना, परिस्थिती बदलण्याचा! त्यादिवशी नाथरावांचा फोन येईपर्यंत वामनरावांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब होते. त्यांचा आदरयुक्त दबदबा होता पण काही तासातच एका फोनने सारेच बदलले. बरे, साधी कुणाला चौकशी करून, वामनराव किंवा विमलाबाईंशी चर्चा करून शहानिशा करावीशी वाटली नाही, तोंडदेखली सहानुभूती दाखवावी वाटली नाही. ती सारी चर्चा ऐकत असताना विमलाबाईंच्या रागाचा पारा चढला. एक क्षण थांबून त्या प्रत्युत्तर द्यायच्या विचारात असताना वामनरावांनी इशारा करून त्यांना थांबविले. ते कुटुंब न केलेल्या अपराधाची शिक्षा भोगताना मान खाली घालून, सर्वस्व हरवलेल्या अवस्थेत, थकल्या पावलांनी घरी पोहोचले.
घरात पोहोचताच तिघेही सोफ्यावर बसले. तिघेही त्या निरव, अस्वस्थ करणाऱ्या शांततेचा भंग करावा, एकमेकांना विशेषतः लताचे सांत्वन करावे म्हणून शब्दांची जुळवाजुळव, आराधना करीत होते. काही वेळा असेही झाले की, कुणीतरी बोलतंय पण नेमके त्याचवेळी शब्द दगा द्यायचे आणि संभाषण सुरु होण्यापूर्वीच संपून जायचे. लताला बळ देण्याचा, तिला समजावण्याची गरज आहे हे दोघांनाही समजत होते पण शब्द सुचत नव्हते, सुचलेले शब्द साथ देत नव्हते. सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले होते. दिवसभर उपाशी असूनही भूक लागल्याची साधी जाणीव कुणालाही होत नव्हती. शब्द, भावना यांनी जशी साथ सोडली होती तशीच भूकही मेली होती की काय? तशाच अवस्थेत रात्र झाली. तिघेही काहीही न खाता निद्रादेवीची प्रार्थना करीत होते पण ती पावण्याची सुतराम शक्यता नव्हती...
दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. रात्री कधीतरी उशिरा झोपलेले ते कुटुंब जागे झाले. घराबाहेर पडण्याची सोडा पण दाराबाहेर डोकावण्याचीही भीती वाटत होती. बाहेर पडावे आणि कुणी तरी विषारी बाणाने हल्ला करावा, अजून घायाळ व्हायला नको म्हणून वामनरावांनी बैठकीचा दरवाजा उघडलाच नाही. परंतु घरातील वातावरणाचे काय? लता तिच्या खोलीतून बाहेर आलीच नव्हती. छताकडे शून्य नजरेने पाहत पडून होती. विमलाबाईंनी एक दोन वेळा आत डोकावले परंतु लताची अवस्था पाहून आत जाण्याचे, तिच्याशी बोलण्याचे त्यांनी टाळले. तशाच अवस्थेत त्यांनी स्वयंपाक केला. जेवणाची तयारी करीत असताना दारावरील घंटी किणकिणली. तो आवाज ऐकून घरातील माणसेच नाही तर कदाचित घरही दचकले. प्रत्येकाच्या ह्रदयाची धडधड वाढली. 'आता नवीन काय वाढलेले ताट आलंय...' अशा स्थितीत वामनरावांनी दार उघडले. दारात लताची मैत्रीण आशा उभी असल्याची पाहून वामनराव आणि पाठोपाठ आलेल्या विमलाबाईंचा जीव भांड्यात पडला. आत आल्याबरोबर आशाने विचारले,
"काका, लता आलीय ना? कुठे आहे?"
काही न बोलता वामनरावांनी लताच्या खोलीकडे बोट दाखवले तशी आशा धावतच खोलीत गेली. तिने आत डोकावले. पलंगावर पडलेल्या लताला पाहताच तिला प्रचंड धक्का बसला.
"ल..ता.." आशाने आवाज दिला. तो ऐकताच लता आंतर्बाह्य शहारली. जणू तिच्या शरीरातील प्राणज्योतीला हवा तो प्राणवायू मिळाला. उठण्याची धडपड न करता लताने पसरलेल्या हाताच्या मिठीत आशा शिरली. तिची दशा पाहून आशाही गहिवरली. पण तिने स्वतःला सावरले. लताच्या स्पर्शातून आशाला जाणवले की, लताला आधाराची... मानसिक आधाराची गरज आहे. तिचे खचलेपण आशाला जाणवले. तिने आशाच्या पाठीवर, खांद्यावर थोपटत तिला कुरवाळले. त्यामुळे रात्रीपासून कदाचित अनेक महिन्यांपासून साचून राहिलेल्या, बाहेर पडू पाहणाऱ्या अश्रूंनाही बाहेर पडण्याची संधी मिळाली. लताच्या डोळ्यातून अश्रूधारा कोसळू लागल्या. ती ओक्साबोक्शी रडू लागली. काही तरी अकल्पित घडलंय ते आशाने ओळखले.तिने लताला थांबविले नाही. ती शांतपणे बसून राहिली. लताला थोपटत राहिली. तिच्या आगमनाने लताला मोकळं व्हायची पुरेपूर संधी दिली. परंतु तशाही अवस्थेत लताच्या मनात एक विचार विजेच्या चपळाईने शिरला. तिने तत्क्षणी आशाला स्वतःला पासून दूर केले आणि रडवेल्या स्वरात म्हणाली,
"आ...आ...आशा, द.. दद..दूर हो. नाही तर तुलाही म.. माझा रोग होईल..."
"काय बोलतेस तू हे लते? तुझ्या स्पर्शाने मला रोग होईल? मी नाही समजले."
"कसं सांगू तुला आशा, म..मला ए..एड्स झालाय..."
"काssय? तुला आणि एड्स? कसे शक्य आहे? अशक्य केवळ अशक्य."
"आशा, विश्वास ठेव माझ्यावर. मला एड्स झालाय. कृपा कर आणि दूर बस." लता रडत, तोंड वळवत म्हणाली.
"ऐ वेडाबाई? एक तर तुला एड्स झालाय यावर माझा विश्वास नाहीच. क्षणभर तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला तरीही तुझ्याजवळ बसल्याने, तुला स्पर्श केल्याने मला किंवा कुणालाही एड्स होत नाही. ते जाऊ दे. पण खरे सांग... माय गॉड! म्हणजे अभयला हा आजार..."
"हो. अभयला नको ती सवय आहे. त्या सवयीचा परिणाम म्हणजे त्यांना एड्सने गांजलंय आणि त्यांच्यापासून मलाही हा संसर्ग झालाय. पण ही गोष्ट माझे सासू-सासरे मानायला तयार नाहीत. त्यांचे असे ठाम मत आहे की, लग्नापूर्वीच मला एड्स होता आणि नंतर म्हणजे माझ्यामुळे अभय त्या आजाराला बळी पडलाय. माझ्या चारित्र्यावर सासरी संशय आहे."
"त्यांना संशय आला म्हणजे काय झाले? काय पुरावा आहे त्यांच्याकडे? तुझ्याकडे बोट दाखवताना त्यांनी हजारवेळा विचार करायला हवा होता. असा आरोप करायची त्यांची हिंमतच झाली कशी? अभय काय म्हणतो?"
"तो चुप्पी साधून आहे. काहीही बोलत नाही. एका अर्थाने त्याची मूक संमती आहे."
"थांब. आता मी उद्याच जाते त्यांच्याकडे. चांगली खरडपट्टी काढते. जाब विचारते त्या नालायक लोकांना. माझ्या निष्कलंक बहिणीवर असा घाणेरडा आरोप मी नाही सहन करणार."
"काही उपयोग नाही आशा. त्यांनी ही बातमी सर्वत्र तिखटमीठ लावून पसरवली आहे..."
"होय. मलाही येताना जाणवले की, मी दिसले की, माझी चौकशी करणारी मंडळी आज वेगळ्याच, अनोळखी नजरेने मला बघत होते. आत्ता त्यांच्या वागण्याचा अर्थ उलगडला बघ. खरेखोटे न करता ही माणसं अशी वागू शकतात."
"लता, काहीही उपयोग होणार नाही. तसाही हे शरीर आता परतीच्या प्रवासाला लागले आहे..."
"लतटले, असे बोलून तू स्वतःला तर त्रास करून घेतच आहेस पण मलाही त्रास देत आहेस. या आजारावर औषध नसेल पण मरण हाही शेवट नाही. असा धीर सोडू नकोस. आत्मविश्वासाने वाग. आनंदाने रहा. माझ्या दादाचा मित्र एड्सवर संशोधन करतोय. आपण त्याला भेटू..." आशा लताला समजावत असताना तिथे येत विमलाबाई म्हणाल्या,
"बरे झाले, आशा, तू आलीस ते. चला सारेच जेऊया. निदान तुझ्यामुळे तरी लता चार घास खाईल."
"चला तर मग. लती आलीय हे समजले आणि तुमच्या हातचे जेवण आणि हिच्यासोबत जेवावे या विचारानेच आलेय. चल ग. लता, चल. मला की नाही खूप भूक लागलीय." असे म्हणत आशाने लताच्या हाताला धरले आणि तिला बळेबळेच बाहेर घेऊन आली आणि म्हणाली,
"काकू, आज खूप दिवसांनी योग आलाय. लताला आणि मला एकाच ताटात वाढा..."
"ऐ, काही नको. माझ्या ताटात नको."
"लते, मला माहिती आहे, तू का नको म्हणतेस ते. पण मलाही या आजाराची बरीच माहिती आहे. असे एकत्र, एका ताटात जेवल्याने, तुझे ताट मी वापरल्याने हा आजार होत नाही. घे खा... तुला मला आवडलेल्या दोन ओळी ऐकवते...
'एड्स होत नसतो जवळ बसल्याने
एड्सग्रस्तांंना आधार द्यावा प्रत्येकाने...'
खा आता..." असे म्हणत आशाने लताला घास भरविला...
०००
नागेश सू. शेवाळकर