नवनाथ महात्म्य भाग ८ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवनाथ महात्म्य भाग ८

नवनाथ महात्म्य भाग ८

त्याच्या अशा बोलण्याने मच्छिंद्रनाथ चकित झाले .
मग त्याने आपणास वीट मिळाल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील, ही मोठी मला धास्ती आहे, म्हणून बोलले .

ते ऐकून गोरक्ष म्हणाला, अशाश्वत वित्त आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही !
हे ऐकून काहीतरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली.
तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभयतांनी आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली.
निघण्यापूर्वी झोळी तपासताना झोळींत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षास पुष्कळ टाकून बोलले त्यांनी एकच गोंधळ केला.
दुःखाने ते गडबडा लोळू लागले व मोठमोठ्याने रडून पिशाच्चासारखे चौफेर फिरू लागले .
त्यांनी गोरक्षास नाही नाही ते बोलून शेवटी निघून जा आता मला तोंड दाखवू नकोस , इतकेसुद्धा सांगितले.
मच्छिंद्रनाथाचे ते काळजास झोंबणारे शब्द ऐकून देखील गोरक्ष शांत राहिला व त्यांचा हात धरून त्यांना पर्वतशिखरावर घेऊन गेला.
जाताना पर्वतावर गोरक्षाने सिद्धयोगमंत्र जपून लघवी केली.
त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला.
मग लागेल तितके सुवर्ण नेण्याची त्याने गुरूंना विनंति केली.
ते विस्मयकारक दृश्य पाहुन त्याने गोरक्षाची वाहवा करून त्यास शाबासकी दिली आणि त्यास आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हटले, बाळा गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू ?
अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथानी त्याची पुष्कळ स्तुती केली.
गोरक्षानें गुरूंची स्तुती ऐकुन आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेवली होती ते मला सांगावे, असा त्यानें आग्रह धरला.
तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की, माझ्या मनात अशी इच्छा होती की, आपल्या देशी गेल्यावर साधुसंतांची पूजा करून एक मोठी समाराधना करावी .
ते ऐकून तुमचा हा हेतु मी पुरवितो, म्हणून गोरक्षाने त्यास सांगितले.
मग गोरक्षाने गंधर्वास्त्रमंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली,त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला.
तेव्हा गोरक्षाने सांगितले की, आणखी काही गंधर्वांना बोलाव आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी, संन्यासी, जपी, तपी, संतसाधु, देव, गंधर्व, दानव किन्नर या सर्वांस येथे आण.
आम्हांस एक टोलेजंग जेवणावळ घालायची आहे.
मग चित्रसेनाने शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठविले.
ते गंधर्व पुष्कळांस आमंत्रण करून त्यांस घेऊन आले.
नवनाथ, शुक्राचार्य, दत्तात्रेय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मीकी, आदिकरून मुनिगण तेथे थोड्याच वेळात येऊन पोहोचले.
नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की, भोजनसमारंभास पुष्कळ मंडळी जमली आहेत.
तरी तुमची मी मागे मार्गांत टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो, ती घेऊन समारंभ साजरा करावा.
यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले की,” बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला यःकश्चित् सोन्याची वीट घेऊन काय करावयाची आहे ?”
मग गोरक्ष म्हणाला, “सर्व यथासांग होईल, पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप, मजकडे काही नाही”असे बोलून त्याने चरणांवर मस्तक ठेविले व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करतो.
आपण काही काळजी न करता स्वस्थ असावे असे सांगितले.
नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वान्ने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोवस्त नीट राहून काही एक न्यून न पडू देण्याची सक्त ताकीद दिली.
मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लाविली व उत्सवाचा बंदोवस्त उत्तम प्रकारचा ठेवला.
त्या वेळेस सर्वांना अत्यानंद झाला.
या भोजनसमारंभांत गहिनीनाथ यायला हवे होते .
गोरक्षनाथानें ही इच्छा मच्छिंद्रनाथांना सांगितली .
तेव्हा मधुब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांग, म्हणजे तो त्यास आणील, असे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षास सांगितले.
त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सर्व वृत्तान्त कळविला व त्याच्या अनुमतीने एक पत्र लिहविले.
ते त्यानें सुरोचन नामक गंधर्वाजवळ दिले.
त्याने कनकगिरीस जाऊन त्या मधुब्राह्मणास दिले व इकडील सविस्तर मजकूर सांगितला.
मग तो ब्राह्मण मोठया आनंदाने गहिनीनाथास घेऊन निघाला.
तो मजल दरमजल करीत करीत गर्भाद्रि पर्वतावर येऊन पोहोचल्यावर त्याने गहिनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायांवर घातले.
त्या वेळेस त्याचे वय सात वर्षाचे होते. मच्छिंद्रनाथ प्रेमाने मुलाचे मुके घेऊं लागला.
त्या नंतर हा गहिनीनाथ करभंजन नारायणाचा अवतार असल्याचे त्याने सर्वांस निवेदन केले.
त्या वेळीं शंकरानें मच्छिंद्रनाथास सांगितलें कीं, आम्हास पुढें अवतार घ्यावयाचा आहे.
त्या वेळीं मी निवृत्ति या नांवानें प्रसिद्धीस येईन व या गहिनीनाथाकडून अनुग्रह घेईन .
यास्तव यास आपण अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्यें प्रवीण करावें.
हें ऐकून मच्छिंद्रनाथानें गोरक्षनाथाकडून गहिनीनाथास लागलीच अनुग्रह देवविला.
तसेंच संपूर्ण देवांच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेविला हा समाराधनेचा समारंभ एक महिनाभर सलग चालला होता.
मग गोरक्षानें कुबेरास सांगितलें की, तु हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि ह्याच्या मोबदल्यात आम्हाला अमोल वस्त्रें-भूषणें दे, म्हणजे ती या सर्व मंडळीना देऊन रवाना करता येईल.
हें भाषण ऐकून कुबेरानें येथील धन येथेंच असु द्या.
आपण आज्ञा कराल त्याप्रमाणें वस्त्रालंकार मी घेऊन येतो असे सांगितले .
मग त्याने अनेक वस्त्रे व तर्‍हेतऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले.
ती वस्त्रें आभूषणें सर्वांना दिलीं.
याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठया सन्मानानें सर्वांची रवानगी करून दिली.

इकडे गर्भाद्रिपर्वतावर गहिनीनाथास अभ्यास करविण्याकरिता गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले.
उमाकांतही तेथेंच होते.
त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानीं गेला.
अदृश्यास्त्राच्या योगानें सुवर्णाचा वर्ण झांकून गेला,परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले.
ते अद्यापि तेथेंच आहेत. त्यास ’म्हातारदेव’ असें म्हणतात.
त्याच्या पश्चिमेस कानिफनाथ राहिला,त्यानें त्या गांवाचें नांव मढी असें ठेवले .
त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथानें वसतिस्थान केलें.
त्याच्या पूर्वेस जालंदरनाथ राहिला.
त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गांवीं नागनाथानें वस्ती केली.
विटे गांवांत रेवणसिद्ध राहिला.
गर्भाद्रिपर्वतावर वामतीर्थी गोरक्षनाथ राहिला.
त्यानें तेथेंच गहिनीनाथाकडून विद्याभ्यास करविला.
एका वर्षांत तो सर्व विद्येंत निपुण झाला.
नंतर त्यास परत मधुब्राह्मणांकडे पाठवून दिलें.
पुढें त्या ठिकाणीं बहुत दिवसपर्यंत राहुन शके दहाशें या वर्षीं ते समाधिस्थ झाले .

त्यांच्या समाधी कबरीच्या घाटाच्या आकाराच्या बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की, पुढें यवन राजांच्या कडून उपद्रव होऊ नये.
एकदा औरंगजेब बादशहाने ह्या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावरून लोकांनीं त्यास सांगितले कीं, तुमच्या पूर्वजांच्या आहेत.
मठात कान्होबा, पर्वती, मच्छिंद्र, त्याच्या पूर्वेस जालंदर, त्याच्या पलीकडे गहिनीनाथ असे ऐकून त्याने तीं नावे बदलुन दुसरी ठेविली, ती अशी...
जानपीर असें नांव जालंदरास दिलें.
गैरीपीर हें नांव गहिनीनाथास ठेविलें.
मच्छिंद्राचें मायाबाबलेन व कानिफाचें कान्होबा अशी नांवें ठेवून तेथें यवन पुजारी ठेवले.
कल्याण कलयुगीं बाबाचैतन्य यांची समाधि होती, पण तें नांव बदलून राववागशर असें नांव ठेविलें.
गोरक्ष आपल्या आश्रमीं सटव्यांस ठेवून तीर्थयात्रेस गेला.
नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करित होते.
शके सत्राशे दहापर्यंत ते प्रकटरूपाने फिरत होते.
त्यानंतर गुप्त झाले.
चौऱ्यांयशी सिद्धांपासून नाथपंथ भरभराटीस आला.

श्री गहिनीनाथ व निवृत्तीनाथ भेट ( ब्रम्हगिरी, ञ्यंबकेश्वर)
एकदा श्री संत निवृत्तीनाथ आपल्या भावंडासह ञ्यंबकेश्वर येथे ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा करत होते.
ब्रम्हगिरीचा पर्वत अत्यंत खडतर व दाट जंगलाने व्यापलेला होता.
ती अवघड वाट काढत सर्व भावंडाचा प्रवास सुरु होता.
तेवढ्यात त्या जंगलात त्यांना एक वाघ दिसला.
वाघाला पाहुन सर्व जण घाबरले व मागे वळून सर्वजण पळू लागले.
त्यावेळी निवृत्तीनाथांना तिथे एक गुफा दिसली.
व्याघ्र भयामुळे ते त्यागुहेत शिरले.
या गुहेत त्यांना एक तेजपुंज: योगी साधना करताना दिसले.
ते साक्षात करभंजन नारायणाचे अवतार श्री चैतन्य गहिनीनाथ होते.
त्यांना पाहिल्यावर निवृत्तीनाथांचे सर्व भय पळाले.
याच ब्रम्हगिरीच्या गुहेत श्री गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला.
त्यानंतर पुढे निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना अनुग्रह दिला.
अशा रितीने नाथसांप्रदायातुन वारकरी सांप्रदयाचा उगम झाला.
श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात या गुरुपरंपरेचे वर्णन केले आहे.

आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा |
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य॥
मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला |
गोरक्ष वोळला गहिणी प्रती ॥
गहिणी प्रसादे निवृत्ती दातार |
ज्ञानदेवा सार चोजविले ॥

ञ्यंबकेश्वर हे नाथसंप्रदयाचे आद्यपीठ मानले जाते या ठिकाणी नवनाथ व ८४ सिद्धांनी साधना केली आहे.
या ब्रम्हगिरीत आजही आपण ही गहिनीनाथ गुंफा पाहु शकता .

क्रमशः