देवयानी सकाळीच उठली. दररोजच्या सवयीप्रमाणे प्रात:विधी उरकून छान कोमट पाण्याने नाहून देवासमोर बसली. डोळे बंद करून संपूर्ण रामरक्षा स्तोत्र म्हटले. देवाला नमस्कार केला आणि पदर खोचून एखाद्या रणरागिणी प्रमाणे संसाराचा रथ हाकायला सज्ज झाली. आज तिला अगदीच अस्वस्थ वाटत होतं. चहाचं आदन ठेवलं खरं गॅसवर पण नेहमीप्रमाणे इलायचीही घातली नाही त्यात. एकटक शून्यात हरवून बघत होती. तीची ऐवढी घालमेल होण्याचं कारणही तसंच गंभीर होतं. आज ब्लाऊज घालताना तिला उजव्या बाजूला एक गाठ हाताला जाणवली होती आणि तीच गाठ तीला स्वस्थ बसू देत नव्हती. अगदी सकाळचा आवडता गोड चहाही तीला आज कडवट लागत होता. पण देवयानी एक गृहिणी होती आणि प्रत्येक गृहिणी एक लढवय्या असते तशीच तीही होती. तीने शिरीषला(नवरा) उठवलं. त्याचं आवरुन झालं तसा गरम चहा आणि पोह्यांची प्लेट त्याच्या पूढ्यात मांडली. त्याचं खाऊन झाल्यावर त्याला अगदी शांतपणे सर्व सांगितलं. देवयानी म्हणजे शिरीषचा अर्धा जीव आणि उरलेला अर्धा जीव त्यांची एकूलती एक लेक दिशा.
देवयानीचं कथन ऐकताचं शिरीषच्या काळजात धस्स झालं. मनुष्य मग तो कितीही कणखर आणि झूंजार का असेना, आपल्या माणसाला साधं खरचटलं जरी तरीही मन कावरंबावरं होतं अगदी तसंच शिरीषचं झालं होतं. क्षणाचाही विलंब न करता त्याने गाडीची चावी काढली आणि देवयानीला घेऊन शहरातला सर्वात मोठा दवाखाना गाठल़ा जिथे सर्वच आजारांच्या तपासण्या व उपचार उपलब्ध होते. नोंदणी झाल्यावर त्यांना डाॅ. वैद्यांकडे पाठवण्यात आले. डाॅक्टरांना यायला काही अवधी बाकी होता. देवयानी शिरीषकडे एकटक बघत होती. तीला शिरीषची खूप काळजी वाटत होती कारण जो संशय तीला होता तो जर खरा ठरला तर...तिला आठवत होतं एकदा ती पायरीवरून उतरताना तिचा तोल गेला होता सरळ चार पाच पायऱ्या घरंगळत खाली आली. तिला साधसं खरचटलं होतं पण शिरीष अगदी काळजी पायी तिला पलंगाच्या खाली उतरू देत नव्हता. लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला अगदी न चुकता शिरीष तिच्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणून तीच्या केसात अलगद माळतो आणि मग दोघेही नाटकाला जायची. देवयानीला नाटक खूप आवडतं. मागच्यावेळी तर दिशाही गेली होती त्यांच्या बरोबर नाटक पहायला. तीच्या विचारांची मालिका मध्येच भंगली कारण डाॅक्टर आले होते आणि त्यांनी दोघांना आत बोलावलं. देवयानीचं सगळ ऐकल्यानंतर डाॅक्टरांनी आपल्या सहकारी डाॅक्टर सूषमा यांना बोलावलं आणि देवयानीची तपासणी केली. डाॅक्टरांच्या मनातही शंकेची पाल चूकचूकली तशा त्यांनी काही आवश्यक तपासण्या करायला सांगितल्या. डाॅक्टरांच्या फोनवर लगेच सूत्र हालली आणि सूरू झाला देवयानीचा संघर्षमयी प्रवास....
तपासणीचा अहवाल पाॅझिटीव्ह होता. शिरीष मटकन खाली बसला पण देवयानीच्या डोळ्यात एक वेगळाच आत्मविश्वास तरळत होता. एवढ्या बाक्या प्रसंगीही ती मर्दानी म्हणाली शिरीष मी लढेन आणि जिंकेलही. बघंच तू. माझे श्रीरामप्रभू आहेत माझ्या पाठी.
दिशाला कसं सांगायचं हे कोडं होतं कारण तीचं बारावीचं वर्ष आणि त्यात ते लेकरू अतिशय हळवं होतं. दिशाचा विचार मनात आला तसं तिला दिशा बरोबर कितीदातरी नाक्यावरची फेमस पाणीपूरी दोघींनी मिळून चोरून(शिरीषपासून कारण तो यांना पाणीपुरी कशी हायजिनीक नसते वगैरे असे उपदेश द्यायचा म्हणून) खाताना दिशाने काॅलेजातल्या सांगितलेल्या भन्नाट गोष्टी आठवत होत्या. एकदा शिरीष ने आॅफिसमधून येताना छानसं कलिंगड आणलं होतं आणि दिशा एकदम म्हणाली आई कलिंगड पाहिलं की मला ना असं वाटतं की त्यात घर करूनच रहावं किती मज्जा न ग. देवयानीला दिशाचं ते बोलणं ऐकून हेच वाक्य तिने ती लहाण असताना तिच्या आईला बोललेलं आठवलं आणि दिशांमध्ये एकदम तिला तीच प्रतिबिंब त्यावेळी दिसलं होतं.
दिशा काॅलेजातून आली. देवयानी ने तिच्या आवडीची उकडपेंडी केली होती तिला खाण्यासाठी. तीचं खाऊन झाल्यावर देवयानीने अचानक दिशाजवळ ती कलिंगडाच्या किस्स्याची आठवण काढली आणि मग तिला म्हणाली, "दिशा आपण दोघी मायलेकी कमी आणि मैत्रीणी अधिक आहोत कारण आपल्यात बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत. मग तसंच आपलं फायटिंग स्पिरीटंही की नाही"... दिशा थोडी सिरीयस झाली आणि आईकडे पाहू लागली. तसं देवयानीने आढेवेढे न घेता स्वत:च तिला रिपोर्टस बद्दल सांगितलं आणि तीचा निश्चयही बोलून दाखवला. दिशाने जरा वेळ शून्यात पाहिलं आणि आईच्या चेहऱ्यावरील अढळ आत्मविश्वास पाहून आईला धीर दिला आणि स्वत:लाही. भयासोबतची लढाई तर या मायलेकी त्याच क्षणी जिंकल्या होत्या.
देवयानीचा ब्रेस्ट कॅन्सर फेज दोन मध्ये होता. सतत उत्साही आणि आनंदी राहणाऱ्या देवयानीचा सामना आता सूई, इंजेक्शन्स, सलाइन, क्ष किरणांचा मारा या सर्वांशी होणार होता. अर्थात हे सर्व तीचे ते सेनानी होते जे तिला कॅन्सररूपी असूरापासून वाचवणार होते. तीला एकदम रामायणाची आठवण झाली आणि एक अजब आत्मविश्वास मनोमन जाणवला.
दोन दिवसांनी डाॅक्टर वैद्यांनी सुचवल्याप्रमाणे शिरीष देवयानीला घेऊन हाॅस्पिटलमध्ये गेला. आवश्यक त्या तपासण्या झाल्या आणि तीन दिवसांनी सर्जरी करण्याचे ठरले. डाॅक्टर देवयानीला आणि शिरीषला धीर देत म्हणाले काळजी करू नका आपण अगदी योग्य वेळेत सर्व हालचाली करत आहोत, सर्व काही ठीक होईल. देवयानी म्हणाली हो डाॅक्टर मी नेटाने लढणार आहे आणि जिंकेनच. डाॅक्टर देवयानीकडे अगदी कौतुकाने पहातच राहिले.
दूसऱ्या दिवशी देवयानी जरा उशिराच उठली. तीने खोलीच्या उजव्या बाजूला नजर फिरवली आणि पाहते तो काय... प्रभू रामचंद्रांचा साजिरा फोटो भिंतीला लावलेला. तीने नमस्कार केला. दूसरं सरप्राइज ती फ्रेश होऊन आली तसं लेकीनं "मातोश्री गरम इलायची टाकून केलेल्या चहाचा आस्वाद घ्या" म्हणत वाफाळत्या चहाचा कप देवयानीसमोर धरला... देवयानी चकित होऊन दिशाकडे बघत होती. देवयानीच्या डोळ्यातली आकस दिशाने ओळखली आणि शिरीषला बाबा... असा आवाज दिला. शिरीष आला तसं दिशा म्हणाली बाबा आईला वाटतयं की आता कसं होणार... माझं काॅलेज, तुमचं आॅफिस, आईची ट्रीटमेंट... हो ना आई... पण आई तूला कलिंगडाची गोष्ट आठवते ना आपल्यातली... मी तुझीच मुलगी आहे विश्वास ठेव बाबा आणि मी आहोत तूझे सेनापती... घराचं रणांगण आम्हाला सोपव आणि हाॅस्पिटलचं क्षेत्र तू फतेह कर... देवयानी म्हणाली, बाळा तूझा अभ्यास??... शिरीषचं आॅफिस??... तशा शेजारच्या वृंदाकाकू(ज्यांनी दारातूनच हे संभाषण ऐकलं होतं आणि त्यांना देवयानीच्या आजाराबद्दल माहित झालं होतं) म्हणाल्या देवयानी मी आहे दिशाला मदतीला आणि आमची कामवाली रखमा म्हणालीए ती तूमच्या इथे पण येणार आहे कामाला. दिशा म्हणाली आई माझा टाइम टेबल सेट आहे... डाॅन्ट वरी...
शिरीष सकाळी आॅफिसात आला खरा पण त्याचं लक्ष सगळं घरीच होतं... देवयानीकडे... रवीला (शिरीषचा आॅफिसातला खास मित्र) माहित होतं शिरीष का चिंतेत आहे ते. तो सरळ बॉसच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना बाहेर घेऊन आला. रवीने आधीच बॉसला देवयानीच्या आजाराची कल्पना देऊन ठेवली होती. बॉसने शिरीषच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "शिरीष तू वहिनींची काळजी घे आॅफिसचं जास्त टेंशन घेऊ नकोस. तूला वेळेच्या आणि सुट्यांच्या बाबतीत आम्ही सर्वच सहकार्य करू. काहीही मदत लागली तर हक्काने सांग वुई आॅल आर विथ यू"... शिरीषच्या डोळ्यात टचकन पाणी आलं पण त्यानं स्वतःला सावरलं आणि बॉसला व सर्वांना थँक्स म्हटलं.
ठरलेल्या वेळी देवयानी हाॅस्पिटलमध्ये दाखल झाली. सर्जरीची भिती होती तीच्या मनात..पण शामल नर्स हसत आल्या आणि म्हणाल्या काळजी नका करू डाॅक्टरांवर ईश्वराचा वरदहस्त आहे निश्चिंत रहा सगळं ठीक होईल आणि तसच झालं. सर्जरी यशस्वी झाली. शिरीष आणि दिशा पूर्णवेळ देवयानी सोबत होते सर्जरी होईपर्यंत.
एक टप्पा देवयानीने पार केला होता. आता वेळ होती ती किमोथेरपीची. देवयानीला तिचे केस फार प्रिय होते पण आता ते जाणार होते हे तीने अॅक्सेप्ट केलं होतं. इकडे दिशाला अचानक रात्रीच जाग यायची आईच्या काळजीपोटी रडू यायचं पण ती स्वतःला समजवायची आणि आईला भेटायला जाताना मात्र अगदी उत्साहाने जायची जेणेकरून देवयानीला टेंशन येऊ नये. शिरीषने घराची बरीच जबाबदारी उचलली होती आणि दिशाला अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायला सांगितलं. एकदा शिरीष लाइटचं बील भरायला विसरला आणि त्याला ड्यू डेट झाल्यानंतर काही दिवसांनी लक्षात आलं... त्यानं दिशाला सांगितलं तसं ती म्हणाली बाबा आईने मला वेळीच आठवण करून दिली होती. मी तिच्याच फोनवरून आॅनलाईन भरूनही टाकलं म्हणून तर वीजदेवी प्रसन्न आहे अजून... कधी दूध ऊतू जाई... कधी नळ चालू राही... पण बाप लेक निग्रहाने लढत होती. दिशा अभ्यासही करत होतीच.
किमोच्या असह्य वेदनांची कल्पना बाजूला सारून शिरीष आणि दिशाने खाल्ल आहे का हे आल्याबरोबर देवयानीने त्या दोघांना विचारलं तसे ते एकमेकांकडे बघू लागले. देवयानी आज किमोचा सामना करणार होती. आतमध्ये जाताना तिने शिरीषचा हात घट्ट धरून ठेवला होता.
तीच्या सर्वच किमो यशस्वी झाल्या होत्या. घर आणि हॉस्पिटल हे तीचे दोन डेस्टिनेशन होते आणि शिरीष, दिया, डाॅक्टर, शामल नर्स, वृंदाकाकू, रखमा हे सर्व तिचे या प्रवासातले सहप्रवासी होते.
असह्य वेदना, प्रिय केसांचं बलिदान, प्रियजनांचे हाल हे सर्व देवयानी अनूभवत होती पण एक अद्वितीय ओढ लढण्याची आणि जगण्याची तिला क्षणोक्षणी उमेद देत होती. कारण तिला माहित होतं...
लढेंगे तो एक दिन जितेंगे भी....
जिंदगी जितेगी और हम भी....
आणि ती जिंकली...ती जगली...तिच्या सारख्या असंख्य गृह-मर्दानींना लढण्याची आणि जगण्याची उमेद जागवून तिने ही झूंज जिंकली...
ठणठणीत बरी होऊन तिच्या महाली परतली. तीने वैयक्तिक त्या सर्व लोकांना ज्यात डाॅक्टर वैद्य, शामल नर्स, वृंदाकाकू, रखमा आणि शिरीषच्या आॅफिसचे सहकारी यांचा समावेश होता त्या सर्वांचे भेटून आभार मानले कारण या सर्वांनी तिला लढण्याची उमेद दिली... साथ दिली...
आज शिरीष आणि दिया देवयानीने बनवलेली पूरणाची पोळी आनंदाने खात होते. पूरण घालन्याचं कारण होतं दिशाचं बारावीत उत्तम मार्कांनी पास होणं.
✍ विद्या उन्हाळे