नीयतीची खेळी राजश्री द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नीयतीची खेळी

आज मै उपर, आसमाॅ नीचे
आज मै आगे,जमाना है पीछे

अस्मिताने जोरजोरात गातच घरात एण्ट्री घेतली. तिच्या अनुपस्थितीत घरात एक मरगळ निर्माण झाली होती ति तिने स्वतःच्या चैतन्याने बाजूला सारली.

'अग थांब, थांब ' आईचा आवाज ऐकून ती थांबली.
'अग जरा बाथरूममध्ये जावून फ्रेश हो.देवाला नमस्कार कर. मग बस. किती वेळा सांगायचे ग तुला ? आता लहान आहे का ? चांगली काॅलेजला गेली आहे.'
अस्मिताने मनातल्या मनात म्हटलं ' चला झाले पुराण सुरू, रोजचेच.'

तिने सरळ येऊन आईला मिठी मारली. आईचा लाडेलाडे गालगुच्चे घेतला.'चावट कुठली?' आईचे बोलणं ऐकायला ती होती कुठे? मॅडम हातपाय धुऊन, देवाला नमस्कार करून आल्या.

'आई भूक लागली 'अस्मिताचा आवाज यायच्या आधीच आईने गरमागरम थालीपीठ आणि घरी लावलेले दही तिच्या पुढ्यात आणून ठेवले. अस्मिताने बळजबरीनेच आईला आपल्या पुढ्यात बसवलं. हा तिचा रोजचा दिनक्रम होता. काॅलेजातिल खडानखडा माहिती आईला सांगीतल्याशिवाय तिला चैन पडत नसे. आणि आज तर कॉलेजमध्ये पिकनिकची नोटीस लागली होती. म्हणून तर मॅडम सातव्या आसमानावर होत्या.

आईने तिचे बोलणे ऐकून घेतलं. सुधा सिंगल पॅरेंट होत्या. अस्मितांचे वडील आर्मीत होते. एका युद्धात ते शहीद झाले. तेव्हा अस्मिता चार वर्षाची होती. तेव्हापासून त्या अस्मिताला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपायच्या. सुधा एका प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. आता पण त्यांचे मन द्विधा झाले. पिकनिक कुलू मनालीला जाणार होती.इतक्या लांब अस्मिताला पाठवणे त्यांना जीवावर आले होते. पण अस्मिता काही कच्च्या गुरूची चेला नव्हती.तिला अगोदरच त्याची कल्पना होती. म्हणून तिने तिच्या बरोबर येणार असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींची यादीच आणली होती. तिच्या हट्टापुढे आईचा नाईलाज झाला.

पिकनिक एक महिन्यानंतर होती. थंडीचे दिवस असल्याने खूप शाॅपींग करावी लागणार होती. पहील्यांदाच अस्मिता मैत्रिणींबरोबर शाॅपींगला गेली.मनसोक्त खरेदी झाली. मॅकडीमध्ये बर्गर पण खावून झाला.

पिकनिकचा दिवस उजाडला. आईने केलेला फराळ आणि असंख्य सूचना घेवून अस्मिता पिकनिक ला निघाली. ट्रेनमध्ये अंताक्षरीचा खेळ खूपच रंगात आला.इतक्या लांब अस्मिता प्रथमच प्रवास करत होती. दिल्ली हून त्यांना न्यायला लक्झरी बस आली होती. बसमधून प्रवास करताना, आजूबाजूचा निसर्ग निरखताना कूलू कधी आले पत्ताच लागला नाही. मनालीला त्यांच्या रहायची सोय करण्यात आली होती. प्रवासाचा शीण आणि रात्र झाली असल्याने सर्व झोपी गेले. अस्मिताच्या रूममध्ये तिच्याबरोबर चित्रा होती. तिची जिवश्चकंठश्च मैत्रिण.

सकाळी उठून ती बाल्कनीत आली. समोर बियास नदी अल्लडपणे वहात होती. समोरच्या डोंगरमाथ्यावरील बर्फाचे कण रविराजाच्या किरणांनी झगमगत होते.जसे काही धरतीने धारण केलेल्या मुकुटावरील हिरेच. अस्मिता भान हरपून ते द्रुश्य टिपून घेत होती.

ब्रेकफास्ट केल्यानंतर सर्वजण मणिकरणला गेले. तेथील गरम पाण्याची कुंड म्हणजे ईश्वराचा चमत्कारच.तेथून त्यांनी शालफॅक्टरीला भेट दिली. अस्मिताने आईसाठी एक नाजूक, सुरेख शाल विकत घेतली. संध्याकाळी कॅम्पफायर झाले. प्रोफेसरांनी सर्वांना लवकर झोपण्यास पाठविले. कारण दुसर्या दिवशी सकाळी लवकर रोहतांगकडे कूच करायचे होते.

रोहतांगला बाराही महीने बर्फ असतो. सर्वजण तिथे जाण्यास उत्सुक होते. हिवाळ्याचे दिवस असल्याने थोडी थोडी बर्फवृष्टीही होत होती. रोहतांगला जाण्याचा मार्ग खूपच अरूंद होता.दोन्ही बाजूला खोल दरी होती. गाडीचालक गाडी बरोबर नेत होता.तो एक कुशल चालक होता.दोन दिवसांनी एक तरी फेरी त्याची रोहतांगला होत होती. पण आज अचानक काय झाले माहित नाही ? मध्येच त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या डोळ्यात झणझणीत मसाला टाकला आहे. समोरून येणार्या सुमोने ब्रेक कचकन दाबले आणि.................................

रोजच्याप्रमाणे अस्मिता नाचतबागडत घरी आली.

'अग आई , तुला माहीत आहे, आमची पिकनिक किती सुरेख झाली.आणि मी तुझ्यासाठी अंगोरा शाल आणली आहे. अगदी तशीच जशी तुला बाबांनी आणली होती. माहिती आहे तेव्हा तु किती खुश झाली होती ? बघ ना सेम तसाच कलर आहे.आणि बघ ना किती मुलायम आहे ती? तु ती शाल जपून ठेवली आहेस. पण आता ही जपून ठेवायची नाहीस हं....तुला आजकाल खूप थंडी वाजते ना ? मग आता ही शाल नेहमी वापरायची.आई काहीतरी खायला दे ना खूप भूक लागली आहे. तुझ्या हातचं खावून किती दिवस झाले आहेत? लवकर दे.

.... ....सुधाच्या हातातून फोन खाली पडला.

..........ती धावतधावत बाथरूममध्ये गेली.

...........तिथे कोणीच नव्हतं.

...........डायनिंग टेबलवर एक शाल पडली होती.


राजश्री रा. मर्गज
मिरारोड.