नवनाथ महात्म्य भाग १२ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवनाथ महात्म्य भाग १२

नवनाथ महात्म्य भाग १२

सहावा अवतार भर्तृहरिनाथ
================

भर्तरी भंगताचि बाळ त्यांत ।
तेजस्वी मिरविले शकलांत ।।
क्षिकेचे मोहळ व्यक्त ।
तेही एकांग जाहले

भर्तृहरिच्या जन्माचे गुढ उकलले नाही.
मात्र ग्रंथात उल्लेखील्याप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला.
त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला.
त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील, हे ऋषींनी ओळखले.
त्यांनी हे पात्र जपून ठेवले.
ठरल्या वेळी द्रमीलनारायण त्यात प्रवेश करून प्रकट झाले.
बालकाचा जन्म झाला.
ते बालक म्हणजे भर्तृहरि नाथ.
त्याला एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले.
हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला.
एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते.
त्यांनी मुलाला आपल्या जवळ केले व सोबत घेऊन गेले .
त्याला माणसांची भाषा शिकविली.
पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली.
भर्तृहरि नाथांचे जन्मस्थान नैमिष्यारण्य आहे.
तर संजीवन समाधी हरंगुल (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथे आहे.
या बरोबरच बीड जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्‍यात असलेल्या हरंगुल येथे भर्तुहरीनाथांची भस्म समाधी आहे
या समाधीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक शुक्रवारी तेथे समाधीला गायीच्या शेणापासून तयार केलेल्या भस्माचा लेप लावला जातो.


भर्तृहरि उज्जैनीचा राजा होते .
विक्रमादित्य व चंद्रसेन त्यांचे दोन भाऊ होते.
राजा गंधर्वसेन यांनी भर्तृहरिना राजकारभार सोपविला होता .

राजा भर्तृहरिला त्याची तिसरी पत्नी पिंगळा हिची फार भुरळ पडली होती .
आणि त्याने तिच्यावर खुप विश्वास ठेवला होता .
बायकोच्या आकर्षणात राजाचे कर्तव्यही तो विसरला होता.
त्यावेळी एक तपस्वी गुरू गोरखनाथ उज्जैन येथे दाखल झाले.
गोरखनाथ राजाच्या दरबारात पोचला.
भर्तृहरि राजाने गोरखनाथांचा योग्य आदर केला.
तपस्वी गुरूंना याचा आनंद झाला.
खुष होऊन गोरखनाथ राजाला एक फळ देत म्हणाले की हे खाल्ल्याने तो नेहमीच तरूण राहील.
कधीच म्हातारा होणार नाही, व कायमच सुंदर राहील.

राजाने ते फळ घेतले आणि ते कोणासाठी आवश्यक आहे याचा विचार केला.
आपल्या पिंगला राणीबद्दल राजाला फारच आकर्षण होते म्हणून त्याने असा विचार केला की जर पिंगळाने हे फळ खाल्ले तर तो नेहमीच सुंदर दिसेल आणि तरूण राहील .
असा विचार करून राजाने पिंगळाला ते फळ दिले.

राणी पिंगळा मात्र भर्तृहरिवर नव्हे तर त्या राज्याच्या कोतवालावर मोहित झाली होती .
व त्याच्यावर प्रेम करीत होती .
हे राजाला मात्र माहित नव्हते.
जेव्हा राजाने राणीला ते चमत्कारी फळ दिले तेव्हा राणीला वाटले की जर हे फळ कोतवालाने खाल्ले तर तो तिची इच्छा पुष्कळ काळापर्यंत पूर्ण करू शकेल.
असा विचार करून राणीने कोतवालाला ते चमत्कारिक फळ दिले.

कोतवाल मात्र एका वेश्येच्या प्रेमात होता .
त्याने ते चमत्कारिक फळ तिला दिले.
जेणेकरून ती वेश्या नेहमीच तरूण आणि सुंदर राहील.
वेश्येने ते फळ घेतले .
पण तिच्या मनात विचार आला की ती तरूण आणि सुंदर राहिली तर तिला नेहमीच हे वेश्येचे घाणेरडे काम करावे लागेल.
तिला या घाणेरड्या नरकासारख्या जीवनापासून मुक्ति मिळणार नाही.

त्यापेक्षा आपल्या राजाला या फळाची सर्वाधिक गरज आहे.
जर राजा नेहमीच तरूण असेल तर तो बराच काळ लोकांना सर्व सुखसोयी देत राहील.
असा विचार करून तिने राजाला ते चमत्कारिक फळ दिले.
फळ पाहून राजाला मोठा धक्का बसला.

राजाने वेश्येला विचारले की हे फळ कोठून आणले ?
कोतवालाने तिला हे फळ दिल्याचे वेश्येने राजाला सांगितले.
भर्तृहरींनी तातडीने कोतवालाला बोलावले .
काटेकोरपणे त्या फळा विषयी विचारले असता कोतवालाने सांगितले की हे फळ त्यांना राणी पिंगळा यांनी दिले आहे.
हे ऐकल्यावर भर्तृहरींना खुप राग आला ,कारण ज्या राणीवर त्यांनी खुप प्रेम केले होते .
तिने त्यांची फसवणूक केली होती .
या गोष्टीचा त्यांना खुप मनस्ताप झाला .
पण यानंतर राणीने पश्चात्ताप करून आत्महत्या केल्याच्या घटनेने भर्तृहरि नाथांना जीवनाचे विदारक सत्य समजले .
त्यामुळे ते वैराग्य मार्गाकडे वळले .
ते सर्वसंग परित्याग करून निस्संग झाले.

भर्तृहरीची अशी अवस्था पाहून मित्रवरूणीस ( सूर्यास ) त्याची दया आली.
तो दत्तात्रेयाकडे गेला व म्हणाला, आपणास सर्व ठाऊक आहे.
मला सुचवायचे इतकेच कीं भर्तृहरीवर आपली कृपा असू द्या.
मग मित्रवरुणीस दत्तात्रेयाने धीर देऊन भर्तृहरीबद्दल काळजी न करता स्वस्थ मनाने जायला सांगितले .
मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तृहरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो अशी मित्रवरूणीची समजूत काढुन त्याची रवानगी केली.

गर्भाद्रिपर्वतावर मच्द्रिंनाथ राहिला व गोरक्षनाथ तीर्थयात्रा करीत होता.
त्याने गिरनारास जाऊन दत्तात्रेयाची भेट घेतली.
तो दत्तात्रेयाच्या पाया पडल्यावर दत्तात्रेयाने ,” मच्छिंद्रनाथ कोठें आहेत व तू इकडे कोठें आलास”म्हणुन विचारलें.
तेव्हा गर्भाद्रिपर्वतावर मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करावयास राहिले आहेत व त्यांनीच सांगितल्यावरून व मी तीर्थयात्रा करीत करीत आपल्या चरणाजवळ आलो, असे गोरक्षनाथानें सांगितलें.
नंतर दत्तात्रेयाने गोरक्षनाथास सांगितले, मला तुझ्यापासून एक कार्यभाग करून घ्यावयाचा आहे.
तो असा की भर्तुहरीवर मी अनुग्रह केला, पण तो आपल्या बायकोच्या मृत्यूमुळे स्मशानात शोक करीत राहिला आहे.
या गोष्टिस आज बारा वर्षे झाली.
तो गवत, पानें खाऊन जिवंत राहिला आहे .
तरी तूं तेथे जाऊन त्यास सावध कर.
हें सर्व जग मिथ्या, अशाश्वत आहे, असे त्याच्या अनुभवास आणून दे व त्यास नाथ पंथांत आण.
मी त्यास मागे उपदेश केला तेव्हा त्यानें 'मी नाथपंथास अनुसरीन' असे माझ्याजवळ कबूल केले होते.
असे सांगून भर्तृहरीची जन्मापासुनची संपुर्ण हकीकत सांगितली.
ती ऐकून घेतल्यानंतर गोरक्षनाथाने दत्तात्रेयास सांगितले की आपल्या कृपेने मी हे कार्य करून येतो.
मग गोरक्षनाथ अवंतीस गेला.
तेथें स्मशानामध्यें भर्तृहरी बसला होता.
शरीर अगदीं क्षीण झालें होतें व त्यास पिंगळेचा एकसारखा ध्यास लागला होता.
त्याची स्थिती पाहताच गोरक्षास अत्यंत वाईट वाटले.
त्याने असा विचार केला की या वेळेस हा पिंगळेच्या विरहाने अगदी भ्रमिष्टासारखा होऊन गेला आहे.
अशा वेळीं जर मी ह्यास उपदेश करीन, तर फायदा होण्याची आशा नाहीच, पण उलट माझें सर्व भाषण मात्र व्यर्थ जाईल.
त्यापेक्षा वेगळी काहीतरी युक्ति योजून कार्यभाग साधुन घ्यावा.

असा विचार करून गोरक्षनाथाने कुंभाराकडे जाऊन एक मडके विकत घेतले व त्यास बाटली असे नाव दिले.
नंतर त्या मडक्यास चित्रविचित्र रंग देऊन सुशोभित केल्यावर ते तो स्मशानांत घेऊन गेला.
तेथे ठेच लागली असे ढोंग करून तो जमिनीवर पडला व बेशुद्ध झाल्यासारखे केले.
त्या वेळेस बाटली ( मडके) फुटून गेली असे पाहून तो रडू लागला.
त्या खापराचे सर्व तुकडे जमा करून जवळ घेतले आणि रडत बसला.
जवळच बसलेल्या भर्तृहरीस नवल वाटले.
गोरक्षनाथ एकसारखा धायधाय रडत होता.
तो म्हणे माझे बाटलीधन कोण्या दुष्टानें हिरावून नेले!
त्याचा विलाप ऐकून भर्तृहरी पिंगळेचा नाद विसरला.
तो गोरक्षनाथास म्हणाला, मडक्याची किंमत ती काय व तेवढ्यासाठी तुझ्यासारखा माणुस रडत बसला आहे हे काय ?
तेव्हा गोरक्षनाथ विचारू लागला,” राजा तू कोणासाठी दुःख करून शोक करीत बसला आहेस बरे ? “
भर्तृहरी म्हणाला मी तुझ्यासारखा मडक्यासारख्या क्षुल्लक वस्तुकरिता शोक करीत नाही.
प्रत्यक्ष माझ्या पिंगळाराणीचा मृत्यू झाला आहे याचे मला भारी दुःख होत आहे.
ती मला आता पुन्हा प्राप्त व्हावयाची नाही, परंतु ही अशी मडकी हवी तितकी मिळतील.
तें ऐकून गोरक्षनाथानें सांगितले की, “मी तुझ्या पिंगळेसारख्या लक्षावधि पिंगळा एका क्षणात निर्माण करून देईन.”
त्याची ही वल्गना ऐकुन भर्तृहरीने म्हटले,”तु लक्षावधि पिंगळा उत्पन्न करून दाखव मी तुला संपूर्ण राज्य देईन.”
गोरक्षानें कामिनीअस्त्राचा जप करून पिंगळेच्या नावाने भस्म सोडताच लक्षावधि पिंगळा खाली उतरल्या.
ते पाहून राजास आश्चर्य वाटले.
त्या सर्व जणी भर्तृहरीजवळ बसुन संसाराच्या खाणखुणा विचारू लागल्या.
त्यांनी राजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर दिली.

क्रमशः