नवनाथ महात्म्य भाग १५ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवनाथ महात्म्य भाग १५

नवनाथ महात्म्य भाग १५

म्हणजे हा रेवणनाथ आपला गुरुबंधु होतो आहे असे जाणुन त्यास साह्य करावे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले त्याने लगेच तेथून निघुन गिरीनार पर्वती येऊन श्रीदत्तत्रेयाची भेट घेतली व रेवणसिद्धची सर्व माहिती कळवली आणि त्याच्या हितासाठीं पुष्कळ रदबदली केली.

मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज ! रेवणसिद्ध हा प्रत्यक्ष चमसनारायणाचा अवतार होय.

तो तुमच्यासाठीं दुःसह क्लेश भोगीत आहे.

तर आपण आतां त्यावर कृपा करावी.

ज्या ठिकाणीं तुमची भेट झाली त्याच ठिकाणी तो तुमच्या दर्शनाची इच्छा धरून बसला आहे.

ते ऐकून मच्छिंद्रनाथास सोबत घेऊन दत्तात्रेय यानास्त्राच्या साह्याने रेवणनाथापाशी आले.

तेथे तो काष्ठाप्रमाणे कृश झालेला दिसल्यावर दत्तात्रेयास कळवळा आला व त्यांनी त्यास पोटाशी धरलें .

रेवणनाथाने दत्तात्रेयास पायावर मस्तक ठेविले.

तेव्हा दत्ताने त्याच्या कानात मंत्रोपदेश केला.
तेणेकरून त्याच्यामधील अज्ञान व द्वैत यांचा नाश झाला.
मग वज्रशक्ति प्रयोग करून दत्ताने रेवणनाथाच्या कपाळी भस्म लाविले.
त्यामुळे तो शक्तिवान् झाला.
नंतर त्यास बरोबर घेऊन दत्तात्रेय व मच्छिंद्रनाथ गिरीनारपर्वती गेले.
तेथे त्यास पुष्कळ दिवस ठेवुन घेऊन शास्त्रास्त्रविद्येसहीत सर्व विद्यात निपुण केले.
तेव्हा आता आपण एकरूप झालो असे रेवणनथास भासू लागले.
त्याचा द्वैतभाव नाहीसा होताच सर्व पशुपक्षी निर्भय होऊन रेवणनाथाजवळ आले व त्याच्या पायां पडले.
दत्ताने रेवणनाथास नाथपंथाची दीक्षा देऊन मच्छिंद्रनाथाप्रमाणेंच शस्त्रास्त्रआदि सर्व विद्यात निपुण करून त्यास त्याच्या स्वाधीन केले.
मग ते उभयता मार्तंडपर्वती गेले.
तेथे त्यांनी नागेश्र्वर स्थान पाहून देवदर्शन घेतले व वर मिळवून साबरीमंत्र सिद्ध केले.
सर्व विद्येत परिपूर्ण झाल्यानंतर गिरीनारपर्वती येऊन तेथे मावंदे घालण्याचा रेवणनाथाने बेत केला.
त्या समारंभास विष्णु, शंकर आदिकरून सर्व देवगण येऊन पोचले.
चार दिवस समारंभ उत्तम झाला.
मग सर्व देव रेवणनाथास वर देऊन आपापल्या स्थानीं गेले.
रेवणनाथहि दत्तात्रेयाच्या आज्ञेने तीर्थयात्रा करावयास निघाला.

त्या काळी माणदेशात विटे तीर्थयात्रा गावात सरस्वती या नावाचा एक ब्राह्मण राहात असे.
त्याच्या पत्नीचे नांव जान्हवी होते .
त्यांची एकमेकावर अत्यंत प्रीति होती .
त्यांना मुले होत असत , पण ती आठ दहा दिवसातच ती मुले मरत.
ह्याप्रमाणे त्याचे सहा पुत्र मरण पावले होते .
सातवा पुत्र मात्र दहा वर्षेपर्यंत जिवंत होता व आता यास भय नाही असे वाटून सरस्वती ब्राह्मणाने अतिहर्षाने ब्राह्मणभोजन घातले.
त्यासमयी पंचपक्कान्ने केली होती व प्रयोजनाचा बेत उत्तम ठेविला होता.
त्याच दिवशी त्या गांवात रेवणनाथ आला.
तो भिक्षा मागवयास फिरत असता त्या ब्राह्मणाकडे गेला.
त्यास पाहतांच हा कोणी सत्पुरुष आहे अशी ब्राह्मणाची समजुत झाली.
तेव्हा ब्राह्मणाने त्यास जेवून जाण्याचा आग्रह केला व त्याच्या पाया पडून माझी इच्छा मोडू नये असे सांगितले.
त्यास रेवणनाथाने सांगितले की आम्ही कनिष्ठ वर्णाचे व तू ब्राह्मण आहेस, म्हणुन आमच्या पाया पडणे बरोबर नाही.

हे ऐकून तो म्हणाला, ह्या कामी जातीचा विचार करणे योग्य नाही.
मग त्याचा शुद्ध भाव पाहून रेवणनाथाने त्याचे म्हणणे मान्य केले.
मग रेवणनाथ त्याच्याबरोबर घरांत गेल्यावर सरस्वती ब्राह्मणाने त्यास पानावर बसविले व त्याचे भोजन होईपर्यंत आपण जवळच बसून राहिला.
जेवताना त्याने स्वतः त्यास भोजन वाढले व नाथाची प्रार्थना केली की, महाराज आजचा दिवस येथे राहून उद्या जावे.
त्याची श्रद्धा पाहून रेवणनाथाने त्याच्या म्हणण्यास रुकार दिला व तो दिवस त्याने तेथे काढला.
रात्रीस पुनः भोजनासाठी सरस्वती ब्राह्मणाने नाथास आग्रह केला, परंतु दोनप्रहरी भोजन यथेच्छ झाल्याने रात्री क्षुधा लागली नव्हती.
त्यामुळे नित्यनेम उरकल्यानंतर नाथाने तसेच शयन केले.
त्या वेळी तो ब्राह्मण नाथाचे पाय चेपीत बसला.
मध्यरात्र झाली असता अशी गोष्ट घडली की, आईजवळ झोपलेल्या त्याच्या मुलाचे प्राण सटवीने झडप घालून कासावीस केले.
त्या वेळेस मोठा आकांत झाला.
बायको नवर्‍यास हाका मारू लागली, तेव्हा तो तिला म्हणाला, आपण पूर्वजन्मी केलेल्या पापाचे फळ भोगीत आहोत , त्यामुळे आपणास कोठून सुख लाभणार ?
आता जसे होईल तसे होवो.
तू स्वस्थ राहा,मी उठून आलो तर नाथाची झोप मोडेल, त्यामुळे मी येऊ शकत नाही.
जर त्यांची झोप मोडली तर गोष्ट बरी होणार नाही.
इतके ब्राह्मण बोलत होता तोच यमाच्या दूतांनी पाश टाकून मुलाच्या प्राणहरण केले व मुलाचे शरीर तसेच तेथे पडून राहिले.
मुलगा मरण पावला हे पाहून जान्हवी ओक्साबोक्शी रडू लागली.
तिने ती रात्र रडून काढली.
प्रातःकाळ झाला तेव्हा नाथास रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
तो ऐकून त्याने कोण रडते आहे असे सरस्वती ब्राह्मणास विचारले.
त्याने उत्तर दिले की, मुलाचे प्राण कासावीस होत आहेत म्हणुन घरात माझी बायको अज्ञपणाने रडत आहे.
ते ऐकुन तु तुझ्या मुलास घेऊन ये, अस नाथाने त्यास सांगितले.
तो पत्नी जवळ जाऊन पाहतो तो पुत्राचे प्रेत दृष्टीस पडले.
मग त्याने नाथास घडलेले वर्तमान निवेदन केले.
ही दुःखदायक वार्ता ऐकून नाथास यमाचा राग आला.
तो म्हणाला, मी या स्थळी असता यमानें हा डाव साधून कसा घेतला ?
आता यमाचा समाचार घेऊन त्यास जमीनदोस्त करून टाकितो
असे बोलून मुलास घेऊन येण्यास सांगितले.
मग सरस्वती ब्राह्मणाने तो मुलगा नाथापुढे ठेविला.
त्या प्रेताकडे पाहून नाथास परम खेद झाला.
मग तुला एवढाच मुलगा की काय?
असे नाथाने त्यास विचारल्यावर, हे सातवे बालक म्हणुन ब्राह्मणाने सांगितले व म्हटले, माझी मागची सर्व मुले जन्मल्यानंतर पांचसात दिवसातच मेली आहेत >
हाच फक्त वाचला होता व दहा वर्षे जिवंत होता .
आम्ही प्रारब्धहीन आहोत .
त्यामुळे आमचा संसार सुफळ कोठून होणार ?
जे नशिबी होते ते घडले.
याप्रमाणें ऐकून रेवणनाथाने सरस्वतीस सांगितले की तू तीन दिवस या प्रेताचे नीट जतन करून ठेव.
हे असेच्या असेच राहील, नासणार नाही.
आता मी स्वतः यमपुरीस जाऊन तुझी सातहि बाळे घेऊन येतो.
असे सांगुन नाथाने अमरमंत्राने भस्म मंत्रुन मुलाच्या अंगास लावले व तो ताबडतोब यमपुरीस गेला.
रेवणनाथास पाहताच यमधर्म सिंहासनावरून उतरला व त्यास आपल्या आसनावर बसवून त्याने त्याची षोडशोपचारांनीं पूजा केली आणि अति नम्रपणाने येण्याचे कारण विचारले.

तेव्हा रेवणनाथाने म्हटले, यमधर्मा मी सरस्वती ब्राह्मणाच्या घरी असता तू तेथे येऊन त्याच्या मुलास कसा घेऊन आलास ?
आता न घडावी ती गोष्ट घडली तरी चिंता नाही.
परंतु तू त्याचा पुत्र परत दे आणि त्याचे सहा पुत्र कोठे ठेविले आहेस,तेही माझ्याकडे आणुन दे.
जर तु हे न करशील तर माझा राग मोठा कठीण आहे.
तेव्हा यमधर्माने विचार केला की, ही जोखीम आपण आपल्या अंगावर घेऊ नये.
शंकराकडे मुखत्यार आहे असे सांगून त्यास कैलासास धाडावे.
तो म्हणाला, महाराज माझे म्हणणे नीट लक्ष देऊन ऐकून घ्यावे.
विष्णु, शंकर व ब्रह्मदेव हे तिघे या गोष्टीचे अधिकारी आहेत.
आणी हा सर्व कारभार त्यांच्याच आज्ञेने चालतो.
या कामाचा मुख्य शंकर असून आम्ही सारे त्याचे सेवक आहोत .
सबब आपण कैलासास जावे व शंकरापासून ब्राह्मणाचे सात पुत्र मागुन घ्यावेत .
ते तेथेच त्यांच्याजवळ आहेत.
ते ऐकुन रेवणनाथ तेथून उठून कैलासास शंकराकडे जावयास निघाला.
कैलासास गेल्यावर शिवगणांनी त्याला विचारले आपण कोण कोठून आला असे त्या वेळेस त्याने सांगितलें कीं, मला रेवणनाथ म्हणतात.
मी शंकराची भेट घ्यावयास आलो आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा आणला आहे त्या मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे.
शिवगण त्याला आत जाऊ देईनात मग त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले.
त्यामुळे द्वारपाल व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीस खिळून बसले.
याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहुन तेथले सर्व लोक भयभीत झाले.
ते शिवापुढे जाउन हात जोडून उभे राहिले व म्हणाले दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वाररक्षकगणांस जमिनीस खिळून ठेवले आहे .
हे ऐकून शिवाने त्याला शिक्षा करायला आठही काळभैरवास आज्ञा केली.
त्याप्रमाणे ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले.
तेव्हा नाथाने पर्वतास्त्र, पर्जनास्त्र याप्रमाणे योजना केली.
ह्या अस्त्रांनी भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला.
नंतर ती अस्त्रे भैरवांवर पडली व ते जर्जर झाले.
हे ऐकुन शंकर रागानें तो नंदीवर बसुन युद्धस्थानी आला
तेव्हा रेवणनाथानें विचार केला कीं शंकराचा एकाच अस्त्रानें बंदोबस्त करावा.
मग वाताकर्षकास्त्र मंत्रानें भस्म मंत्रून ते शंकरावर फेकले.
त्यामुळें शंकराचा श्वासोच्छवास बंद झाला व तो नंदीवरुन खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले.
शंकराची व गणांची प्राणांत अवस्था केल्याचे वृत्त विष्णुस कळताच तो लागलीच तेथे धावून आला.
त्याने नाथास आलिंगन देऊन पोटाशी धरले आणि विचारले की, कोणत्या कारणामुळे रागावून तु हा एवढा अनर्थ केलास ?
तेव्हां रेवणनाथानें विष्णुस सर्व कथा सांगितली .
तो म्हणाला तुम्ही ब्राह्मणाची सातही बाळे आणुन द्या म्हणजे मी शंकराच्या प्राणाचे रक्षण करतो.
ते ऐकून विष्णुने सांगितले की, ती सर्व बाळे माझ्याजवळ आहेत, मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो, पण त्यांचे देह मात्र तू निर्माण कर.
हे विष्णुचे बोलणे रेवणनाथाने कबूल केले.
मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरास सावध केले व मग विभक्त अस्ताचा जप करून सर्व गण मुक्त केले व स्थितिमंत्र म्हणुन अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अस्त्रापासुन मोकळे केले.
मग सर्वांनी नाथास नमन केले.
तेव्हा विष्णुने सातही प्राण नाथाच्या स्वाधीन केले.
मग रेवणनाथ महीवर उतरून ब्राह्मणाकडे आला,व त्यास मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणायला सांगितले, त्याप्रमाणे प्रेत कुटुन आणल्यानंतर त्याचे सात भाग करुन, सात पुतळे तयार केले.
नंतर संजीवनी प्रयोग करून सातही बालके जिवंत केली व ती सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या पत्नीच्या स्वाधीन केली .
सारंगीनाथ, जागीनाथ, निरंजननाथ, जागीनाथ, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निंरजनाथ , गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेवली.
हे सातही पुरुष पुढे जगविख्यात झाले.

रेवणनाथाने त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्यात पारंगत केले.
रेवणनाथ हा त्यात प्रांतात राहिला.
रेवणनाथांचे जन्मस्थान रेवानदी, तर संजीवन समाधी रेणावी (वीटा, ता. खानापूर, जि. सांगली) येथे आहे.
येथे जाण्यासाठी विटे गावातून 10 कि.मी. अंतरावर रेणावी हे गाव आहे.
तेथेच हे देवस्थान आहे.

क्रमशः