नवनाथ महात्म्य भाग १४ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नवनाथ महात्म्य भाग १४

नवनाथ महात्म्य भाग १५

सातवा अवतार “रेवणनाथ “
================

पातला परी अकस्मात ।
येता झाला बाळ जेय ।।
सहज चाली पुढे चालत ।
बाळ दृष्टी देखिले ।

रेवणनाथ जन्मकथा

ब्रह्मादेवाच्या वीर्यापासून पुर्वी अठ्यांयशीं सहस्त्र ऋषि उत्पन्न झाले.
त्याच वेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात चमसनारायणाने संचार केला.
तेव्हा एक बाळ निर्माण झाले .
ते बाळ सुर्यासारखे दैदीप्यमान दिसत होते .
जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला.
त्याच वेळेस सहन सारुख यानावाचा एक कुणबी पाणी आणावयास नदीवर गेला होता.
त्याने ते मुल रेतीत रडत पडलेले पाहीले तेव्हा त्याचे हृदय कळवळले.
त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवातीरी वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान बायकोस सांगितले व त्यास तिच्या हवाली केले.
तिने आनंदानें त्यास स्नान घालून पाळण्यात आपल्या पोटच्या मुलाशेजारी निजविले.
तो रेवातीरी रेवेत सापडला म्हणुन त्याचे नाव 'रेवणनाथ ' असे ठेवले.
त्यास थोडे थोडे समजु लागताच तो काम करावयास बापाबरोबर शेतात जाऊ लागला.
तो बारा वर्षांच्या वयात शेतकीच्या कामात चांगलाच हुशार झाला.
एके दिवशी रेवणनाथ भल्या पहाटेच उठून आपले बैल रानात चरावयास नेत होता.
त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते.
ह्यामुळे रस्ता साफ दिसत होता.
इतक्यात दत्तात्रेयाची स्वारी त्याच्यापुढे येऊन थडकली.
दत्तात्रेयास गिरनार पर्वती जायचे होते.
त्यांच्या पायात खडावा असून त्यानी कौपीन परिधान केली होती.
जटा वाढविल्या असुन दाढी, मिशी पिंगटवर्णाची होती.
असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असता त्यांची व रेवणनाथाची भेट झाली.
त्यास पाहताच रेवणनाथास पुर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले.
मग आपण पूर्वीचे कोण होतो ,व हल्लीचे कोण व कसे वागत आहोत याची त्यास रुख रुख लागली.
तसेच मला आता कोणी ओळखत नाही, मीअज्ञानात पडलो असे त्यास वाटुन तो निराश झाला .
तू कोणआहेस?
असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिलें,
“तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत त्यात सत्त्वगुणी जो महापुरुष तो मी असुन मला येथें फारच कष्ट भोगावे लागत आहेत,तर आता कृपा करून या देहास सनाथ करावे”
इतके बोलून त्याने दत्तात्रेयाच्या पायावर मस्तक ठेवले.
त्याचा दृढनिश्चय पाहून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला.
नऊनारायणाच्या अवतारांपैकी हा चमसनारायणाचा अवतार होय हे दत्तात्रेयास ठाऊक होते.
त्यास दत्तात्रेयाने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल.
पण त्याचे कारण असे की, भक्तिमार्गाकडे प्रवृत्ति झाल्यावाचून अनुग्रह देऊनउपयोग नाही.
यास्तव भक्तीकडे मन लागले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहजसाध्य होते.
असा मनात विचार आणुन दत्तात्रेयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली.
तेव्हा रेवणनाथास परमानंद झाला.
तो त्याच्या पाया पडून आनंद पावल्यानंतर दत्तात्रेय निघून गेले.
एक सिद्धि प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाहीं.
रेवणनाथानें एका सिद्धिकलेस भूलून दत्तात्रयेयास परत पाठविल्यानंतर रेवणनाथ शेतांत गेला.
दत्तात्रेयाने त्याची त्या वेळेची योग्यता ओळखूनच एक सिद्धकलेवर त्यास समजावून वाटेस लाविले होते.
रेवणनाथ शेतात गेला व काम झाल्यावर तो मंत्रप्रयोगाचे स्तोत्र गाऊ लागला.
तेव्हा सिद्धि प्रत्यक्ष येऊन उभी राहिली व कोणत्या कार्यास्तव मला बोलाविले म्हणून विचारू लागली.
प्रथम त्याने तिला नांव विचारले तेव्हा मी सिद्धि आहे, असे तिने सांगितले.
ज्या वेळेस दत्तात्रेयाने रेवणनाथास सिद्धि दिली होती, त्या वेळेस त्याने तिच्या प्रतापाचे वर्णन करून सांगितले होते की
सिद्धि काम करावयास प्रत्यक्ष येऊन हजर राहिल व तू सांगशील ते कार्य करील.
जेवढे उपभोग घेण्याचे पदार्थ पृथ्वीवर आहेत तेवढे सर्व ती अर्ध्या क्षणात पुरवील.
म्हणजे जे जे तुझ्या मनात येईल ते ती करील.
यास्तव जे तुला कार्य करावयाचे असेल ते तू तिला सांग.
अशी तिच्या पराक्रमाची माहिती करून देऊन दत्तात्रयाने त्यास बीजमंत्र सांगितला होता.
ती सिद्धि प्राप्त झाल्याचे पाहून रेवणनाथस किंचित गर्व झाला.
परंतु स्वभावानें तो निःस्पृह होता.

एके दिवशी तो आनंदानें मंत्र म्हणत शेतात काम करीत असता महीमा नावाची सिद्धि जवळ येऊन उभी राहिल्याने त्यास परमानंद झाला.
त्याने हातातील औत व दोर टाकून तिला सांगितले की, जर तु सिद्धि आहेस तर त्या पलीकडच्या झाडाखालीं धान्याची रास पडली आहे ती सुवर्णाची करून मला चमत्कार दाखव .
म्हणजे तू सिद्धि आहेस अशी माझी खात्री होईल.
मग मला जे वाटेल ते काम मी तुला सांगेन.
त्याचें भाषण ऐकून महीमा सिद्धि म्हणाली, मी एका क्षणात धान्याच्या राशी सुवर्णाच्या करून दाखवीन.
मग तिने धान्याच्या राशी सुर्वणाच्या डोंगराप्रमाणे निर्माण करून दाखविल्या.
त्याची खात्री पटली .
मग तो तिला म्हणाला, तु आता माझ्यापाशी रहा.
तु सर्व काळ माझ्याजवळ असलीस , म्हणजे मला जे पाहीजे असेल ते मिळण्यास बरे पडेल.
त्यावर ती म्हणाली, मी आता तुझ्या सन्नीध राहीन, परंतु जगाच्या नजरेस न पडता गुप्तरूपानें वागेन.
तू माझ्या दर्शनासाठी वारंवार हेका धरुन बसु नको.
तुझें काम मी ताबडतोब करीत जाईन.
रेवणनाथाने तिच्या म्हणण्यास रुकार दिल्यावर ती सुवर्णाची रास अदृश्य करुन गुप्त झाली.

मग रेवणनाथ सांयकाळपर्यंत शेतात काम करून घरी गेला.
त्यानें गोठ्यात बैल बांधले व रात्रीस स्वस्थ निजला.
दुसरे दिवशी त्याने मनांत आणले की आता व्यर्थ कष्ट का म्हणुन करायचे ?
मग दुसरे दिवशी तो शेतात गेलाच नाहीं.
त्यामुळें सुमारे प्रहर दिवसपर्यंत वाट पाहून त्याचा बाप सहनसारुक हा त्यास म्हणाला, मुला तू आज अजूनपर्यंत शेतात का गेला नाहीस ?
हे ऐकून रेवणानाथाने उत्तर दिले की, शेतात जाऊन आणि रात्रंदिवस कष्ट करुन काय मिळवयाचे आहे ?
त्यावर बाप म्हणाला, पोटासाठी शेतात काम केले पाहिजे.
शेत पिकले की पोटाची काळजी करायला नको, नाही तर खायचे हाल होतील व उपाशी मरायची पाळी येईल.
यावर रेवणनाथ म्हणाला, आपल्या घरात काय कमी आहे म्हणुन शेतात जाऊन दिवसभर खपून धान्य पिकवावे?
आता मेहनत करण्याचे काहीं कारण राहिले नाही.
ते ऐकून बाप म्हणाला आपल्या घरात अशी काय श्रीमंती आहे ?
मी एक एक दिवस कसा रेटीत आहे हे माझे मलाच ठाऊक आहे .
ते ऐकून रेवणनाथ म्हणाला, उगीच तुम्ही खोटे बोलता .
सारे घर सोन्याचे झाले आहे व धान्याने भरलेले आहे.
मी बोलतो हे खरे की खोटे ते एकदा पाहून तरी या.
उगीच काळजी का करता ?
मग बाप पाहू लागला असता घरात सोन्याच्या व धान्याच्या राशीच्या राशी पडलेल्या दिसल्या.
त्यावेळेस त्यास मोठेच आश्चर्य वाटले.
मग त्याचा हा मुलगा कोणी तरी अवतारी पुरुष असावा, असे त्याच्या मनात ठसले व तो रेवणनाथ सांगेल तसे वागू लागला.

रेवणनाथाचा बुंधुलगाव मोठा असून रहदरीच्या रस्त्यावरच होता.
ह्यामुळें गावात नेहमी पांथस्थ येत असत.
रेवणनाथास सिद्धि प्राप्त झाल्यानतर गावात येणार्‍या पांथस्थास रेवणनाथ इच्छाभोजन घालू लागला.
ही बातमी सार्‍या गावात पसरली.
मग लोकांच्या टोळ्याच्या टोळ्या त्याच्या घरी जाऊ लागल्या.
वस्त्र, पात्र, अन्न, धन आदिकरुन जे ज्यास पाहिजे ते देऊन रेवणनाथ त्याचे मनोरथ पुरवु लागला .
रोगी मनुष्याचे रोगही नाहीसे होऊन जात असत.
मग ते त्याची कीर्ति वर्णन करुन जात.
यामुळे रेवणनाथ जिकडे तिकडे प्रसिद्ध झाला.
सर्व लोक त्यास ' रेवणसिद्ध ' असें म्हणू लागले.

इकडे मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत फिरत असतां बुंधुलगावात येऊन धर्मशाळेत उतरला.
मच्छिंद्रनाथ श्रीगुरुंचे चिंतन करीत आनंदाने बसला असता कित्येक लोक त्या धर्मशाळेत गेले.
त्यांनी त्यास भोजनासाठी रेवणनाथाचे घर दाखवून दिले व त्याने विचारल्यावरुन लोकांनी रेवणसिद्धची संपुर्णमाहिती सांगितली.
ती ऐकून रेवणनाथ चमसनारायाणाचा अवतार आहे असे मच्छिंद्र मनात समजला.
नंतर जास्त माहिती काढण्याकरीता रेवणनाथास कोण प्रसन्न झाला आहे म्हणुन मच्छिंद्रनाथाने लोकास विचारले.
परंतु लोकांना त्याच्या गुरुची माहिती नसल्यामुळें त्याचा गुरु कोण हे कोणी सांगु शकेना .

मग मच्छिंद्रनाथाने काही पशु, पक्षी, वाघ, सिंह निर्माण करुन त्यास तो आपल्या अंगाखांद्यावर खेळवून एके ठिकाणीं खावयास घालू लागला.
हा चमत्कार पाहून हा सुद्धा कोणी ईश्वरी अवतार असावा असे मच्छिंद्रनाथाविषयीं लोक बोलू लागले.
हा प्रकार लोकांनी रेवणसिद्धाच्या कानावर घातला व हा अद्‌भुत चमत्कार प्रत्यक्ष पाहावयास सांगितला.
हे वृत्त ऐकून रेवणसिद्ध तेथे स्वतः पाहावयास गेला.
सिंह, वाघ, आदिकरून हिंस्त्र जनावरे, तसेच पशुपक्षीसुद्धा मच्छिंद्रनाथाच्या अंगाखांद्यावर निर्धास्तपणे खेळत आहेत, असे पाहुन त्यास फार चमत्कार वाटला.

रेवणनाथ घरीं गेला व दत्तमंत्रप्रयोग म्हणताच प्रत्यक्ष सिद्धि येऊन प्रविष्ट झाली.
तिने कोणत्या कारणास्तव बोलावले म्हणुन विचारता तो म्हणाला, मच्छिंद्रनाथाप्रमाणें पशुपक्ष्यांनीं माझ्या अंगाख्याद्यांवर प्रेमाने खेळावे व माझ्या आज्ञेत असावे असे झाले पाहीजे.
ते ऐकून तिने सांगितले की, ही गोष्ट ब्रह्मवेत्त्यावाचुन दुसर्‍या कोणाच्याने होणार नाही.
या सर्व गोष्टी तुला पाहिजे असल्यास प्रथम तू ब्रह्मवेत्ता हो.
मग रेवणासिद्धानें तिला सांगितले की असे जर आहे तर तु मला ब्रह्मवेत्ता कर.
तेव्हा तिनें सांगितले की तुझा गुरु दत्तात्रेय सर्वसमर्थ आहे.
ह्यास्तव तू त्याची प्रार्थना कर म्हणजे तो स्वतः येऊन तुझ्या मनासारखे करील.
असे सिद्धीने सांगितल्यावर तसे करण्याचा त्याने निश्चय केला.

मग ज्या ठिकाणी पूर्वी दत्तात्रेयाची भेट झाली होती, त्याच ठिकाणी रेवणनाथ जाऊन तपश्चर्येंस बसला.
दत्तात्रेयाची केव्हा भेट होते असे त्यास झाले होते.
त्यानें अन्नपाणीसुद्धा सोडलें व झाडाची उडून आलेली पाने खाऊन तो निर्वाह करू लागला.
त्यामुळे त्याच्या हाडांचा सांगाडा दिसू लागला.

रेवणनाथाचा गुरु कोण हे मच्छिंद्रनाथाच्या लक्षात नव्हते.
त्याच्या गुरुने असा अर्धवट शिष्य का तयार केला याचे मच्छिंद्रनाथास आश्चर्य वाटत होते.
त्यानें रेवणनाथाबद्दल चौकशीं केली.
पण त्याचा गुरु कोण ही माहीती लोकास नव्हती.
ते फक्त त्याची बरीच प्रशंसा करीत.
उपकार करण्यात, अन्न्‌उदक व द्रव्य देण्यास रेवणनाथ मागेपुढे पाहत नसे.
यावरुन कोणत्या तरी गुरुच्या कृपेने, ह्यास सिद्धि प्राप्त झाली असावी, असे मनात येऊन मच्छिंद्रनाथाने तो शोध काढण्यासाठीं अणिमा, नरिमा, लघिमा, महिमा इत्यादि आठही सिद्धिस बोलाविले.
त्या येताच त्याच्या पाया पडल्या.
त्या वेळेस नाथाने त्यास विचारले कीं रेवणसिद्धाच्या सेवेस कोणत्या सिद्धिची कोणी योजना केली आहे हे मला सांगा.
त्यावर महिमासिद्धीने उत्तर दिले की, त्याच्या सेवेस राहण्यासाठी श्रीदत्तात्रेयाची मला आज्ञा झाली आहे.

क्रमशः