भाग - ७
कबिरला रुपचा त्यादिवशी सतत फोन येत होता... विचारात बुडालेल्या कबीरने वैतागतच तिचा कॉल रिसिव्ह केला...
" हां बोल, काय आहे...? " त्याचा राग त्याच्या मुखावाटे निघत होता...
रूप थोडी घाबरलीच... पहिल्यांदाच तिने कबिरला तिच्यावर इतक्या मोठ्याने खेकस्ताना ऐकलं होतं... तिला पुढे काय बोलावं ते सुचतच नव्हतं... कबिरलाही काही सेकंद गेली... तो थोडा शांत झाला आणि तिच्याशी बोलू लागला... त्याने जाणीवपूर्वक तिला सुहानीबद्दल सांगणं टाळलं... तसही तिला सांगून त्याला आणखी प्रॉब्लेम्स वाढवायचेही नव्हते... फोन वर बोलून त्यांचं संध्याकाळी भेटायचं ठरलं...
दुपारी जेवून झाल्यावर कबिरची मॉम, दादीला दोन दिवसापासून बरं नसल्याचं त्याला सांगत होत्या... हे ऐकून तो दादीच्या खोलीत धावला... दादी आराम करत असल्याने तो तिला दुरूनच पाहून तिथून निघून गेला...
संध्याकाळी रुपला भेटायला तो निघालाच होता की मध्येच त्याला सुहानीचा कॉल आला... कानाला ब्लुटूथ हेडफोन्स लावले असल्याने त्याने नंबर न पाहताच कॉल उचलला...
" हाय कबीर... " सुहानी
" हाय... " कबिरला आवाज ओळखीचा वाटत होता पण लक्षात येत नव्हतं...
" कसा आहेस तू...? " सुहानी
" मी बरा आहे..." त्याने रस्त्याच्या कडेला कार पार्क करून शेजारी ठेवलेला फोन हातात घेऊन आलेल्या फोनचा नंबर पाहिला... सुहानीचा नंबर बघून, मी का हिचा फोन उचलला असं त्याला वाटून गेलं...
" तू... तू कशी आहेस...? " इच्छा नसतानाही तो बोलू लागला...
" मी ठीक... तू आत्ता फ्री आहेस का...? " सुहानी
" का ...? काही काम होतं...? " कबीर
" हो, एक महत्वाचं काम होतं... तू ऑफिसला येऊ शकतोस का...? नाहीतर कुठे बाहेर भेटूया का...? तू सांग, तुला जे बरं पडेल तसं...! " सुहानी त्याचा विचार करतच बोलत होती...
ही माझ्यावर एवढी उदार का झालीय...? चक्क मला विचारतेय...? त्याच्याकडे तिच्या बाबतीत आता प्रश्नच प्रश्न होते...
" हॅलो हॅलो कबीर ऐकतोयस ना ...? " सुहानी
" हो हो ऐकतोय... पण आज शक्य नाहीए... मला एक काम आहे महत्वाचं... मी तुला स्वतःहून कॉल करेन... ओके...? ""
" ओके नो प्रॉब्लेम... चल बाय काळजी घे..." सुहानीने फोन ठेवला...
इथे कबीर पुन्हा विचारात पडला... काय काम असेल आता...? हिला भेटायचं म्हणजे स्वतःची काळजी घ्यायची... विचारात गर्क तो रुपला भेटायला CCD (कॅफे) मध्ये पोहचला... तो तिथे बराच वेळ उभा होता, काहीवेळाने रूप आली... दोघही आत जाऊन बसले...
रूप त्याच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होती... त्याच्या शूटबद्दल विचारत होती... कबिरही तिच्या प्रश्नांची जेमतेम उत्तरं देत होता... तो कसल्या तरी विचारात असल्याचं तिला समजायला वेळ नव्हता लागला...
" तू उटीला पंकजच्या लग्नाला गेलेलास तिथे सुहानी पण आलेली ना...? " रुपच्या अचानक आलेल्या प्रश्नाने कबीर हादरला...
हिला कसं कळलं...? ओह नो, मयंकने तर सांगितलं नसेल ना...? यार हा मयंक पण ना...!
" हो... तुला कसं माहीत...? आय मिन मयंक ..." तो काही विचारणार तोच तिने त्याला तिला कसं कळलं हे सांगून टाकलं...
" अरे, सेट वर चर्चा होते... बऱ्याच जणांना त्या काव्याने आमंत्रण दिलेलं पण शूटमुळे कोणी जाऊ शकलं नाही... आणि काव्या त्या सुहानीची खूप चांगली मैत्रीण आहे..." तिने जे सांगितलं त्यावरून कबिरला जरा हायसं वाटलं... तो श्वास घेत नाही तोवर तिने दुसरा बॉम्ब टाकला...
" मग तू घेतलास का बदला त्या सुहानीचा...? " रूप भुवया उडवत म्हणाली...
" काय...? कss कs कसला बदला...? " आतातर हे तर मयंकनेच सांगितलं असणार ह्याची त्याला पूर्ण खात्री झाली...
" अरे, असा काय...? ओह तुला काय वाटलं मला माहित नाही... मयंक ने सांगितलं सगळं..." रुपच्या बोलण्याने त्याचा जीव अचानक घाबरघुबरा होऊ लागला...
त्याने पुढे बोलणं टाळलं आणि तो वॉशरूमला जायचं खोटं कारण सांगून तिथून निसटला... रूप त्याची वाट बघत कॉफीचे घोट पित बसली...
वॉशरूमला जाताच त्याने मयंकला कॉल केला... "काय रे तू रुपला काय सांगितलंस...? मी बदला घेणार त्या सुहानीचा...? " कबीर त्याला बडबडायला लागला...
" एक मिनिट माझं ऐकून तर घे... अरे, त्या सुहानीला तू पटवलंच असतंस आणि त्यानंतर ते रूपला कुठून तरी कळलं असतं तेव्हा तर ती तुझ्या डोक्यावरच बसली असती ना... तुझ्या आजरपणाचं नाही, तर त्याच्या आधीचं सांगितलंय ट्रस्ट मी... तुझी काळजी आहे मला मित्रा... तुला सेफ ठेवण्यासाठी तिला सांगितलं... नाहीतरी तिला पण त्या सुहानीचा रागच येतो... त्यामुळे ती पण हसिखुशीत तुला support करायला तयार झाली होती... " मयंकने त्याला सगळं व्यवस्थित सांगितलं...
" ओहह... पण यापुढे एक लक्षात ठेव, मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट वगैरे होतो ह्याची कोणाकडेच चर्चा तू करायची नाहीस... बीकॉझ मी आता पुढचा प्लॅन केलाय... तू बघच तिला कसा आणतो वठणीवर... " कबीर आणि रूप काहीवेळाने त्या कॅफेमधून निघाले...
रात्रीचे आठ वाजत आले होते... सुहानिही ऑफिसची सगळी कामं आटोपून घरी जायला निघाली... तिच्या ऑफिसपासून काही अंतरावरच ते कॅफे होतं... ट्रॅफिकमुळे गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या... ड्रायव्हरला तिने एक पेन ड्राइव दिलं ज्यात तिने आजच्या दिवसभरात कबिरची गाणी भरून ठेवली होती...
🎵मेरे दिल ने जब भी दुआ माँगी है,
तुझे माँगा है तेरी वफ़ा माँगी है,
जिस मोहब्बत को देख के दुनिया को रश्क आये,
तेरे प्यार करने की वो अदा माँगी है। 🎵
त्याचा तो मधुर आवाज तिच्या कानांना तृप्त करत होता... ती कारच्या खिडकीतून बाहेरच बघत होती की तिची नजर कबिरवर पडली... तो आणि रूप त्या कॅफेतून नुकतेच बाहेर पडत होते... रुपने त्याचा हात पकडला होता... नंतर एका जागी थांबून तिने त्याला मिठीही मारली... का कोण जाणे हे पाहताच सुहानीला खूप त्रास झाला... तिच्या तळपायाची आग मस्तकात जात होती... डोळे आग ओकत होते... तिने ते गाणं ड्रायव्हरला बंद करायला सांगितलं आणि न राहवून कबीरला कॉल केला... एक रिंग नाही होत तोपर्यंत तिनेच फोन कट केला...
मी का एवढा राग करतेय...? कसला त्रास करून घेतेय...? रूप आणि तो रिलेशनशिप मध्ये आहेत हे मला माहितीय मग मला त्रास होण्यासारखं काय आहे त्यात...? मी उगाच जास्त विचार करतेय... कबीर माझा फक्त एक चांगला मित्र आहे... ती स्वतःलाच शांत करत होती... काहीवेळातच ती घरी पोहचली...
इथे कबिरचा फोन वाजल्यामुळे त्याने रुपला त्याच्यापासून थोडं दूर केलं... सुहानीचा मिस्ड कॉल...? चुकून लागला असावा... सुहानीचं नाव दिसताच त्याची मनस्थिती थोडी खराब झाली... रुपने त्याच्या मोबाईलवर सुहानीचं नाव पाहिलं होतं... आता तिला त्याचा चेहरा बघून त्याची बिघडलेली मनस्थितीही कळली होती... ती नेहमी ह्याच संधीच्या शोधात असायची... तिने त्याला पुन्हा तिच्याबद्दल भडकवायला घेतलं... सुहानीच्या बऱ्याच काही गोष्टी तिला माहिती होत्या... त्या गोष्टी ती त्याला सांगू लागली...
" कबीर, हीच संधी आहे, तू तिला सोडू नकोस... इतरवेळी सगळ्या पुरुषांचा राग करणाऱ्या तिने फक्त तुझ्याशी मैत्री केलीय... ही अशी तर हिची आईही अशीच असणार ना, म्हणूनच तर बापाने सोडलं... आता आई मरणाच्या दारावर आहे आणि ही पैसे कमावण्यात व्यस्त आहे... सगळ्यांना विकतच घेतलंय अशीच नेहमी वागवत असते रे...! आता माझंच बघना, किती मोठमोठया भूमिका ती मला देऊ शकते पण नाही, जळते ती माझ्यावर... पर्वा कानावर आलं की ती आमच्या सीरिअल मधल्या काही कॅरेक्टर्सला कमी करणार आहे... एवढी वर्ष चाललीय ना, आता जुन्या बंद करून नवीन मालिकांना ते स्लॉट द्यायचे असं म्हणतेय... माझं काय होणार, हेही काम हातून गेलं तर मी माझ्या मॉम डॅडला कसे पैसे पाठवणार...? ( रुपच्या आई वडिलांना तिच्या पैशाची कधी गरजच नव्हती, ती मॉडेलिंग मध्ये करिअर करण्यासाठी इंदोरवरून पळून आली होती पण ह्यापासून कबीर अजाण होता).... ती सुहानी स्वतःला खूप शहाणी समजते... तू खरंच तिला धडा शिकव..." रूप मगरमच्छ के आसू दाखवत त्याच्याकडे आपली दुखणी मांडत होती... त्याच्या मनात तिच्याबद्दल नको नको ते पेरून ती त्याला तो प्लॅन यशस्वी करण्यासाठी प्रोत्साहन देत होती...
तिच्या बोलण्याने तो त्याच्या निर्णयावर अधिकच ठाम झाला... " तुझी साथ आहे ना मला...? मग बघ काय करतो ते मी...! आणि तू पैशांची काळजी नको करुस, मी आहे ना...! " कबीर तिच्या जाळ्यात चांगलाच अडकला होता...
" कबीर मला आता घरी सोडशील का..?" खरंतर संधीचा फायदा कसा घेतात हे तिच्यापेक्षा जास्त कोणालाच चांगलं माहित नव्हतं...
कबीर तिला घरापर्यंत सोडायला निघाला... " ह्या महिन्याचं सामान पण घ्यायचंय, सगळी बिलं भरायचीयत... एकतर ह्या महिन्यात सहा वेळाच शूट ला बोलावलं... कसं सगळं मॅनेज करू...? मला तर टेन्शनच आलंय..." घरी पोहचेपर्यंत ती कबिरला आपलं रडगाणं ऐकवत होती...
तोच कबीरने त्याच्या खिशातून तिला पन्नास हजार रुपये काढून दिले... तिने नको नको करत आधी नाटकं केली पण नंतर ते घेतलेही... आलेल्या लक्ष्मीला असं लाथ मारून तिला थोडी चालणार होतं... सुहानीच्या नावाने तर तिची आज भरपूर कमाई झाली होती... कबीर तिला सोडून तिथून निघाला...
" वा... काय आयडिया मिळालीय...? सुहानी यू आर सच अ ग्रेट पर्सन पण तुझ्यामुळे मला जर का इतका फायदा होणार असेल तर तुझं नाव कबीरसमोर खराबच केलेलं बरं, नाही का...! " रूप पैशांचा बंडल बघून खुश झाली होती... तिनेही तिच्या मनात मस्त प्लॅन आखला होता...
ह्या सुहानीला उद्या भेटूनच घेतो... so be ready मिस सुहानी, तुझी उलटी गिनती आत्ता सुरू झालीय... कबिरने तिच्या विचारातच घर गाठलं...
इथे सुहानीही नुकतीच घरी पोहचली होती... आजी तिचीच वाट बघत डायनिंग टेबलवर बसली होती...
" आजी, अगं अजून झोपली नाहीस...? " विचारात गर्क असलेल्या आजीला तिने आवाज दिला...
" नाही गं, तुझीच वाट बघत होते... जा फ्रेश हो, मी तुझ्यासाठी जेवण लावायला सांगते... " आजी शांतपणेच बोलत होती... तिचा तो शांतपणा सुहानीला जरा विचित्रच वाटत होता...
" काय झालं आजी...? कसल्या विचारात आहेस...? " सुहानी आणि आजीची सकाळपासून आत्ता भेट होत होती... सकाळी ती जरा गडबडीतच ऑफिसला गेली होती...
" तू आधी जेवून घे, मग बोलू..."
तेवढयात राहुलसोबत रितूनेही घरात प्रवेश केला... " दी, कशी आहेस, आलीस कधी...? " त्याने आल्या आल्या सुहानीला मिठी मारली... इतक्या दिवसांनी तिला बघून त्याला खूप बरं वाटत होतं... त्याचा आधारस्तंभ होती ती, तिच्या नसण्याने गेले कित्येक दिवस तोही अस्वस्थ होता...
" मी बरी आहे रे, आज सकाळीच आले... तू कुठे होतास दिवसभर...? " तिने राहुलला सहजच विचारलं...
" दी, मी हॉस्पिटलमध्ये होतो..." राहुलचा चेहरा रडवेला झाला होता...
" हॉस्पिटलमध्ये ...? " तिने आश्चर्याने रितू आणि राहुल दोघांकडेही बघितलं...
" हो... दी तू इथे बस आधी, मी तुला सगळं काही सांगतो..." तिला तिथल्या खुर्चीवर बसवून त्याने तिचे हात आपल्या हातात घेतले... त्याच्या अशा वागण्याने आता तिची अस्वस्थता वाढू लागली...
" अरे, बोल लवकर काय झालंय...? तू सांगणार आहेस का...? " त्याचं असं थांबून थांबून बोलणं तिला त्रास देत होतं...
रितूही गप्पपणे तिच्या खांद्यावर हात ठेवून उभी होती... राहुल पुढे बोलू लागला...
" दी, आई... आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, तिला हार्ट अटॅक आला होता..." राहुल एका दमात बोलून गेला...
" काय...? हे कधी झालं आणि तू मला आत्ता सांगतोयस...? " तिने तिच्या दोन्ही हातांनी करकचून त्याची कॉलर पकडली...
" सुहानी थांब, शांत हो ... शांत हो आधी..." रितूने त्याला सोडवत मध्यस्थी केली...
" मला आताच्या आत्ता तिला भेटायचंय... चल मला घेऊन..." सुहानी आकाशपाताळ एक करू लागली... तिला ही गोष्ट सहनच होत नव्हती...
राहुलला ती खूप बडबडू लागली... तिचा राग तिला अनावर झाला होता... आजीने तिला कसंबसं शांत केलं... राहुलही तिची समजूत काढत होता...
" दी, अगं ती बरी आहे आता... तू शांत हो... हे बघ ती आय सी यू मध्ये आहे आणि भेटायची एक विशिष्ट वेळ असते... मी तुला उद्या सकाळी घेऊन जाईन मग तर झालं... पण प्लिज आतातरी तू शांत हो..." राहुलने कसंबसं तिला समजावलं... आई बरी आहे ह्या एका वाक्यावरच ती कदाचित शांत झाली...
त्यादिवशी ती जेवलीच नव्हती... आईच्या आठवणीने ती सतत रडत होती... रितू आज रात्री तिथेच थांबणार होती... रितूने तिला खूप समजावलं... पण सुहानी राहुलला शिव्या घालत होती...
" का मला सांगितलं नाही ह्याने, मी आईसाठी सगळं काही सोडून आले असते..." सुहानी रडतच होती...
" सुहानी, अगं तू त्यावेळेस ज्या परिस्थितीत होतीस त्यातून इथे कशी आली असतीस म्हणून तेव्हा मीच राहुलला तुला सांगायला मनाई केली... आईला बघायला राहुल होता, मी होते पण तिथे कबिर एकटा होता त्याला कोणी बघितलं असतं...? " कबिरचं नाव ऐकताच सुहानी आपोआप शांत झाली...
" मला उद्या काही करून आधी आईला भेटायचंय... आज सकाळी बोलला असता तर एव्हाना माझी भेट तरी झाली असती...! " सुहानीचे अश्रू ओघळतच होते... शेवटी रितूने खूप समजवल्यावर ती शांत झाली... रडता रडता केव्हाचा तरी तिचा डोळा लागला...
रितू तिचं काही महत्वाचं काम करत बसली होती तेवढयात सुहानीचा फोन वाजला... एवढ्या रात्री कोणाचा फोन असावा...? सुहानीला तर गाढ झोप लागली होती, शेजारीचं पडलेल्या तिच्या मोबाइल वर कबिरचं नाव दिसताच रितूने तो कॉल घेतला...
" हॅलो...! " समोर सुहानीचं बोलतेय असं त्याला वाटून गेलं म्हणून तो पुढे बोलू लागला...
" हाय सुहानी, मला उद्या दुपारी एका गाण्याचं रेकॉर्डिंग आहे त्याआधी आपण भेटू शकतो... what say... ?" कबीर म्हणाला...
सुहानी ह्याला उद्या भेटणार असल्याचं काही बोलली नाही... ओह.. आत्ता आठवलं सकाळीच आमचं बोलणं झालं होतं ह्याला साइन करण्याच्या संदर्भात... पण उद्या सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये जायचंय... मला नाही वाटत ती उद्या कोणाला भेटण्याच्या मनस्थितीत असेल, आईसाठी ती सगळी कामं बाजूला ठेवेल... पण ह्याच्याशी मिटींग पण करणं गरजेचं आहे... काय सांगू ह्याला...? रितू दोन मिनिटं विचारच करत बसली...
समोरून काहीच उत्तर येत नाहीए, हे बघताच तो पुन्हा म्हणाला... " हॅलोss, सुहानी मी कबीर बोलतोय...! तू भेटायचं बोलत होतीस ना...? " त्याच्या आवाजाने रितू भानावर आली... सुहानीची झोप मोड होऊ नये म्हणून ती फोनवर बोलत बाल्कनीत निघून गेली...
सकाळी सुहानी दचकूनच उठली... आईला (सविताताई) हॉस्पिटलमध्ये बघायला जायचंय म्हणून तिने पटापट आवरून घेतलं... ती, आजी आणि राहुल तिघेही हॉस्पिटलला निघून गेले आणि रितू ऑफिसला गेली...
जड पावलांनी आज पहिल्यांदाच तिने ICU ची पायरी ओलांडली होती... सविताताई जाग्याच होत्या... त्यांच्याजवळ जाऊन ती बराच वेळ बसून होती... डोळ्यातलं पाणी काही केल्या थांबत नव्हतं... ते सतत वाहतच होतं... ती एकतर्फीच त्यांच्याशी संवाद साधत होती...
" आई, कशी आहेस तू आता...? लवकर बरी हो, आपल्याला घरी जायचंय... हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा नाश्ता आणलाय, तूला मी केलेला रव्याचा उपमा आवडतो ना...? चल मग खाऊन घे आता...! " सुहानी त्यांना भरवायला गेली पण त्या खातच नव्हत्या...
तेवढयात तिथे नर्स आली आणि ती सुहानीला ओरडली... " काय करताय तुम्ही...? त्यांना हे जेवण नाही देऊ शकत तुम्ही...? जे त्यांच्या तब्येतीसाठी योग्य आहे ते हॉस्पिटलमधूनच दिलं जाणार... एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला...? " सुहानी तर पहिल्यांदाच त्या नर्सला भेटली होती... आणि उगीच तिला दोन शब्द सर्वांसमोर ऐकवत होती...
" अहो, पण आईला हे आवडतं..." सुहानी लहानमुलासारखी बोलत होती...
" त्यांना आवडत असेल पण सध्या नाही देता येणार... तसं डॉक्टरांनीच बजावलाय... तुम्हाला घरून काही आणायचं असेल तर डॉक्टरांची आधी परवानगी घ्या आणि मगच द्या... उद्या काही पेशंटला झालं तर आमच्यावर नाव यायचं..." नर्स जरा तिरसटच बोलत होती...
" ए, काय बोललीस...? माझ्या आईला काहीच होणार नाही समजलं ना...? ऐकून घेते म्हणून काहीही बोलशील काय...? समजत नाही एखाद्याशी कसं बोलायचं...? तुझी तक्रार करायला जास्त वेळ नाही लागणार मला, हिशोबात राहायचं..." सुहानी तिच्यावर बोट दाखवत म्हणाली... तिच्या डोळ्यातल्या रागानेच ती नर्स गार पडली...
" अहो मॅडम, पण मी त्यांच्या भल्यासाठीच सांगतेय..." नर्स घाबरतच म्हणाली...
" ठीक आहे... मी डॉक्टरांशी बोलून घेते... आणि नीट सांगितलेलंही कळतं... " सुहानी स्वतःचा राग आवरत नर्सला म्हणाली आणि पुन्हा आईकडे पाहू लागली...
" आई येते मी... काळजी घे..." पाठमोऱ्या सुहानीला तिथून जाताना सविताताई नुसत्याच बघत होत्या...
सुहानी आईसाठी वाट्टेल ते करायला तयार होती... ती बाहेर येताच आजी आत गेली... "आजीला बघ, मी डॉक्टरांना भेटून येतेच..." ती राहुलला सांगून डॉ.अनुराग केतकर ह्यांच्या केबिनमध्ये गेली...
डॉक्टर आणि तिची बराच वेळ चर्चा झाली... डॉक्टर तिला तिच्या आईसाठी जे योग्य आहे तेच समजावत होते...
" सुहानी, तुझी आई एका मानसिक आजारातून जातेय... त्यांचं मनोबल वाढवणं जास्त गरजेचं आहे... हा पहिला अटॅक होता, देवाच्या कृपेने त्या वाचल्या पण पुढे त्यांना असं काहीच होणार नाही, ह्याचीही शाश्वती देता येणार नाही ना...!! मला असं वाटतंय त्यांना मानोसोपचार तज्ज्ञाचीच गरज आहे आणि डॉक्टर संदीप रेगे हे अतिशय योग्य आहेत... डॉ. रेगे म्हणतायत तर तू त्यांना त्यांच्याकडेच ऍडमिट करून त्यांच्या पुढच्या ट्रीटमेंटला सुरुवात कर... " सुहानीला ते काय बोलतायत ह्याचा काहीच अंदाज लागत नव्हता...
रेगे डॉक्टरांनी ऍडमिटचं केव्हा सांगितलं...? मागच्या आठवड्यात राहुल त्यांना भेटलेला, पण तेव्हा मी विचारलं असता तो काही असं बोलला नव्हता... सुहानी विचार करत करतच बाहेर आली... त्या विचारचक्रात तिची नजर जमिनीलाच खिळली होती... ती चालता चालता एका व्यक्तीला धडकली... आपलंच लक्ष नसल्याने तिने सॉरी बोलायला वर पाहिलं तर तिला कबीर दिसला... हो, तो कबिरच होता...
क्रमशः---------◆
©दिपशीखा
For more info
https://deepshikhastories.com