Navnath Mahatmay - 20 - last part books and stories free download online pdf in Marathi

नवनाथ महात्म्य भाग २० - अंतिम पार्ट

नवनाथ महात्म्य भाग २०

समारोप
======
महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले.
कित्येक पंथ या पवित्र भूमीत उदयाला आले.
याच संतांच्या भूमीत एक पंथ उदयाला आला आणि तो म्हणजे नाथपंथ.
नाथपंथाची स्थापना साधारणपणे आठव्या शतकात गुरु दत्तात्रेय यांच्या कृपाशीर्वादाने झाली.
असे म्हणतात कि भगवान शंकरांनी ह्या पंथाची स्थापना केली.
मच्छिंद्रनाथ हे या नाथपंथातील पहिले नाथ.
त्यानंतर गोरक्षनाथ आणि मग कानिफनाथ असा या पंथाचा उदय होत गेला आणि एकूण नऊ नाथ आता पर्यंत झालेले आहेत.
ज्यांच्या कथा आणि चमत्कार आपण वाचलेत .

नाथ संप्रदायी योग्यांचा एक विशिष्ट वेश असतो.
मलिक मुहंमद जायसी, मीरा, सूरदास, कबीर, अरब पर्यटक इब्‍न बतूता इत्यादींनी या वेशांची वर्णने केली आहेत.
मत्स्येंद्रनाथांनी शंकराला प्रसन्न करून त्याचा वेष प्राप्त केला, अशी एक आख्यायिका आहे.
वसंत पंचमीसारख्या शुभ दिवशी कान फाडून त्यांत मंत्रपूर्वक कुंडले (मुद्रा) घातली जातात.
ती कुंडले माती, हरिणाची शिंगे किंवा धातू यांपैकी कशाची तरी असतात.
संप्रदायातील विधवा व गृहस्थ योग्यांच्या स्त्रियाही कुंडले धारण करतात.
कुंडले धारण करणाऱ्या योग्यांना कानफाटे आणि इतरांना ‘औघड’ योगी म्हणतात.
किंगरी हे सारंगीसारखे एक वाद्य असून त्याच्या साथीवर नाथयोगी भर्तृहरीची गीते गात हिंडतात
मोळाच्या दोरीची वा काळ्या मेंढीच्या लोकरीची एक मेखला असते.
हालमटंगा नावाची मेखला धारण केली, की लगेच भिक्षेसाठी बाहेर पडावे लागते.
योग्यांच्या गळ्यांतील रुद्राक्षाच्या माळेत ३२, ६४, ८४ किंवा १०८ मणी असतात. १८ किंवा २८ मण्यांची स्मरणी ते मनगटावर बांधतात.
लाकडी पट्ट्या वा लोखंडी सळ्या यांचे बनवलेले धंधारी हे एक चक्र असून त्याच्या छेदातून दोरा ओवणे व तो मंत्रपूर्वक बाहेर काढणे, या क्रियेला ‘गोरखधंधा’ म्हणतात.
जाणकारालाच हे जमते.
ज्याला हे जमते, त्याच्यावर गोरक्षनाथाच्या कृपेने ईश्वर प्रसन्न होतो व त्याला भवजालातून मुक्त करतो, अशी समजूत आहे.
योगी काळ्या मेंढीच्या लोकरीचे किंवा क्वचित सुताचे बनवलेले शिंगीनाद-जानवे धारण करतात.
त्यात हरिणाच्या शिंगाची बनवलेली एक शिटी असते.
उपासनेच्या व भोजनाच्या आधी ती वाजवतात.
हे जानवे शरीरावर धारण न करता हृदयात अथवा त्वचेच्या आत धारण केले आहे, असे काही जण मानतात.
पार्वतीने आपल्या रक्तात भिजवून एक कंथा गोरक्षाला दिली होती, अशी समजूत असल्यामुळे अजूनही योगी कंथा म्हणजे भगव्या रंगाची गोधडी धारण करतात.
योगी भिक्षेसाठी फुटक्या मडक्याचा जो तुकडा वापरतात, त्याला खापरी म्हणतात.
हल्ली नारळाची करवंटी किंवा काशाची वाटी वापरतात.
योगी शरीरावर भस्म लावतात.
कपाळ, बाहुमूल व हृदयदेशावर त्रिपुंड्र लावतात.
यांखेरीज ‘कुका’ हे एकतारी वाद्य, पुंगी, दंडा, त्रिशूळ, अधारी (एक आसनपीठ) डमरू, खड्‍ग, झोळी, कुबडी, मृदंग, टाळ, चिमटा, खडावा, कौपीन, धुनी, गोपीचंदन, गुलाल, बुक्का इ. वस्तू वा चिन्हे धारण करतात.
शाबरी मंत्र..
सांब नावाच्या ऋषीने साबरी विद्या जनकल्याणासाठी निर्माण केली.
नवनाथांनी या विद्येत भर घातली.
विशेषतः गोरक्षनाथांनी ती विद्या काव्याद्वारे प्रसारीत केली.
हे मंत्र सिद्ध असल्यामुळे भूत, पिशाच्च बाधा, पीडा, संकटे यांचा नाश करणारे आहेत.
प्राणायाम, साधनेद्वारे हे मंत्र सिद्ध करता येतात.
नाथ संप्रदाय म्हटले कि प्रामुख्याने समोर येतो तो म्हणजे हठयोग आणि शाबरी विद्या.
नाथांनी मांडलेले तत्वज्ञान हे पिंड – ब्रम्हांड, नाद – बिंदू, पंच तत्वे इत्यादीशी निगडीत होते.
नाथ संप्रदाय हा अनेक उप पंथांमध्ये मांडला गेलेला आहे .
अखंड भारत तसेच कंधार अफगाणिस्तान ते नेपाळ तसेच इंडोनेशिया मलेशिया पर्यंत याची ख्याती आजहि आहे.
अनेक पश्चिमी देशांमध्ये आजही नाथपंथ आणि तत्वांना धरून त्याचे कटाक्षाने पालन करण्यात येत आहे.
भारताकडून अवघ्या जगाला मिळालेला अमौलिक असा हा “योगा “याचा उगम हा नाथ संप्रदायाचा हठयोगातून आहे.

नाथपंथाचे कित्येक प्राचीन योगी अजूनही जिवंत आहेत.
योगी अद्‍भुत चमत्कार करतात त्यांना जादूटोणा करता येतो.
त्यांना विविध सिद्धी अवगत असतात मुलांना वाईट नजरेपासून वाचविण्याची शक्ती त्यांच्याजवळ असते.
ते कोणताही रोग बरा करू शकतात.
हिंस्त्र पशू, सर्प, विंचू इत्यादींवर त्यांचे नियंत्रण असते.
ते वाघावर आरूढ होतात.
कोणताही आकार धारण करतात, स्वर्गनरकांना भेटी देतात ,मृतांना जिवंत करतात ,अन्नाविना राहतात, त्यांना दिव्यदृष्टी असते, ते मादक द्रव्यांचा व औषधांचा उपयोग करतात इ. समजुती आहेत.
त्यांच्या जादूच्या चटया व आकाशस्थ नगरे यांचाही उल्लेख आढळतो.
कबीराच्या काळात त्यांची एक सैनिक संघटना होती.
सोळाव्या शतकात त्यांचे शिखांशी युद्ध झाले होते .
सोळाव्या शतकातच त्यांनी कच्छमध्ये लोकांना जबरदस्तीने कानफाटे बनविण्याचा प्रयत्‍न केला.
परंतु नंतर ते पराभूत झाले इ. माहिती त्यांच्याविषयी मिळते.
१९२१ च्या जनगणनेनुसार भारतात नाथपंथी जोग्यांची संख्या सात लाखांहून अधिक होती.
त्यांत स्त्रियांची संख्या बरीच मोठी होती.
आणि मुसलमान जोग्यांची संख्या ३१ हजारांहून अधिक होती.
भारताबाहेर अफगाणिस्तानापर्यंत नाथजोगी आढळतात.

नाथसंप्रदाय

नाथसंप्रदाय आणि नवनाथ यांकडे आज आपण सर्वजण फक्त एक दैवी शक्ती म्हणूनच पाहत आहोत.
कानिफनाथांना प्रबुद्ध नारायणाचा अवतार मानतात या व्यतिरिक्त त्यांचा जीवनाचा त्यांचा कर्तुत्वाचा आपल्याला विसर पडले आहे.
त्यांचा इतिहास हा धूळ खात अनेक ग्रंथांमध्ये दडून बसलेला आहे.
कानिफनाथा बद्दल काही ठराविक ललित कथां व्यतिरिक्त त्यांच्याबद्दल पुरेशी माहिती नाही.
त्यांचा जन्म, त्यांचा कार्य, त्यांनी केलेले बंगाली काव्य, त्यांनी लिहिलेले ग्रंथ सामग्री, त्यांची अनेक विद्यांवरचे प्रभुत्व आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचे हठयोगाला दिलेले योगदान हे सर्व एक गुपित रहस्य बनून आपल्या सर्वापुढे उपस्थित आहे.
प्रामुख्याने कानिफनाथांविषयी अभ्यास खूप कमी झालेला आढळतो.
त्यांची कर्मभूमी हि नेपाल आणि बेंगाल प्रांत असून त्यांनी भारत भ्रमंती करून शिष्य गोतावळा जमा केलेला आढळतो.

शाबरी किंवा साबरी कवित्व .
हे म्हणजे नवनाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, भर्तरीनाथ, नागनाथ, चरपटनाथ यांनी निर्माण केलेल्या त्यांच्या ८४ सिद्धांनी रचलेली मंत्रशक्ती होय.
विश्व ज्या सुत्रांमध्ये बांधले गेलेले आहे, त्या सुत्रांशी नादब्रह्माच्या माध्यमातून केलेला संवाद अस शाबरी मंत्रांबाबत म्हणता येईल.
ह्या मंत्रांच्या लक्षावधी ओव्या नाथसिद्धांनी रचल्या आहेत.
हे कुठलेही लिखीत साहित्य नाही.
गुरूशिष्य परंपरेतून दिले जाणारे हे मंत्र स्वयंसिद्ध असून अतिशय प्रभावी आहेत.
ह्या मंत्रांचा प्रभाव तात्काळ बघता येतो.
बाजारात पुस्तकरूपी मिरवले जाणारे शाबरी मंत्र हे मुळ मंत्र नाहीत.
ते बर्भरी मंत्र आहेत.
मुळ शाबरीची बीजे मंत्रामध्ये पसरवून बर्भरी मंत्र बनवले गेलेले असावेत.
नवनाथांनी ज्या ज्या प्रदेशांत तिर्थाटन केले त्या त्या भागांमध्ये त्यांचे शिष्य तयार होत गेले.
त्यामुळे मुळ मंत्रांची रचना वेगवेगळ्या भाषेत होत गेली.
त्यामुळे विदयेचे स्वरूप, बंगाली, कोकणी, धनगरी...इ. विस्तारत गेलं.
नाथपरंपरेतील मुस्लिम साधकांनी त्यांच्या ज्या रचना केल्या त्याही मुळ शाबरी किंवा बर्भरीच आहेत.
ज्यावेळी समाजात विघातक कृत्य करणार्या अघोरी तांत्रिकांनी, समाजकंटकांनी शाबरीचा दुरूपयोग करणे चालू केले तेव्हा नाथांनी मुळ शाबरी लुप्त करून टाकली.
मुळ शाबरी आज दुर्मिळ आहे.
ती फक्त आणि फक्त गुरूशिष्य परंपरेतून दिली जाते अर्थात् देणार्याला ती 'वरून' मिळालेली असेल आणि देण्यासाठी 'आदेश' मिळाला असेल तरच!

शाबरी देताना स्पष्ट सांगितलेलं असतं, 'तिचा उपयोग फक्त जनसेवेसाठीच करायचा.
दीनदुबळ्यांच्या सेवेसाठीच करायचा.
पैसा, धनसंपत्ती गोळा करण्यासाठी, बडेजाव मिरविण्यासाठी नाही' अर्थात् हे सांगणं तुमचा गुरू सदेही असेल तर प्रत्यक्ष सांगितल जात.
गुरू विदेही असेल तर गुरू किंवा प्रत्यक्ष नाथ दृष्टांतातून सांगतात -शिकवितात.

पुर्ण शाबरी कुणालाही दिली जात नाही. गरजेपुरती दिली जाते.
तिचा दुरूपयोग केला तर भोगावं लागते .
नवनाथांचा साधनमार्ग सोपा नाहीये, त्याच्याएवढं कठीण काही नाही.
तुमची प्रत्येक पावलावर नाथांकडून परीक्षा घेतली जाऊ शकते.

अनेक नाथयोगी गृहस्थाश्रमी बनले असून हिमालयाचा काही भाग, सिमला, गढवाल, अलमोडा, बंगाल, बुंदेलखंड, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक इ. भागांतून त्यांच्या वेगवेगळ्या जाती विखुरलेल्या आहेत.
अर्थातच, या योग्यात विवाहाची प्रथा आहे.
बुंदेलखंडातील धनगरांच्या विवाहमंत्रांत गोरखनाथ व मत्स्येंद्रनाथ यांची नावे असतात.
बंगालमध्ये हे लोक स्वतःला योगी ब्राह्मण म्हणवून घेतात.
डाक्का व त्रिपुरा भागांतील योगी वस्त्रे विणण्याचा, तर रंगपूर जिल्ह्यातील योगी कपडे विणणे, ते रंगविणे, चुना बनविणे, भीक मागणे इ. व्यवसाय करतात.
पंजाबात अशा योग्यांना ‘रावळ’ म्हणतात.
भिक्षा मागणे, चमत्कार करणे, हात पाहून भविष्य सांगणे इ. मार्गांनी ते उदरनिर्वाह करतात.
महाराष्ट्रात काही मराठे गृहस्थ योगी आहेत.
साधारणतः सुताच्या धंद्याशी संबंधित अशा साळी, कोष्टी, शिंपी इ. जातींचे लोक नाथपंथी गृहस्थयोगी आहेत.
गृहस्थ योग्यांच्या बऱ्याच जाती मुसलमान झाल्या आहेत.
कबीर अशाच एका जातीत जन्मला होता, असे काही अभ्यासक मानतात.
नाथपंथी लोक आचारी, सावकार, फेरीवाले, सैनिक, शेतकरी ,बँक कर्मचारी इ. व्यवसायी बनले आहेत.
त्यांच्यात काही ठिकाणी मृतांना बसलेल्या अवस्थेत, तर काही ठिकाणी स्वतःच्या घरातच पुरण्याची प्रथा आढळते.
भिक्षेवर उदरनिर्वाह करणारे नाथपंथी भिक्षा मागताना ‘अलख निरंजन’ व ‘आदेश’ हे शब्द उच्‍चारतात.
त्यांच्यापैकी डवरी गोसावी हे डमरू वाजवून भिक्षा मागतात.

“नवनाथ महात्म्य समाप्त “
================

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED