tila tinch prem disanl books and stories free download online pdf in Marathi

तिला तिचं प्रेम दिसलं...

तिच्या शब्दांत...

माझ्या खूप प्रिय मैत्रिणीच म्हणजेच प्रांजल च लग्न होत. मला पत्रिका आली तशी माझा विश्वास च बसेना. तिला फोन करून खुप ओरडले की मला सांगितलं का नाही म्हणून. पण तिला डायरेक्ट सरप्राइज द्यायचं होत मला पत्रिका देऊन. ह्याच महिन्यातला शेवटचा मुहूर्त होता. मी खूप खूष होते पण परत मला त्याच शहरात, त्याच ठिकाणी, त्याच लोकांमध्ये नव्हत जायचं होतं जखमेवरची खपली काढायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांचे प्रश्न ज्यावर मला उत्तर देता ही येत नाही आणि माझी मनापासून इच्छा सुद्धा नव्हती, फक्त प्रांजल मुळे मला जाण भाग होत.

मी माझी आधीच सगळी तयारी करून ठेवण्याच्या विचारात होती उगाच ऐन वेळी धावपळ नको म्हणून. पण दुसर मन बोलत होत की मी मुंबईला, तिथल्या माणसांना पूर्णतः माझ्या मनातून काढून टाकलय. तिथून पुण्यात आले आणि ठरवलं की मागे वळून कधीच पहायचं नाही. आठवणी न येण्यासाठी सगळ्या पुसून टाकल्या. माझा कॉन्टॅक्ट चेंज केला, माझ सोशल मीडिया अकाउंट्स सगळे डीअॅक्टिवेट करून टाकले, तिथल्या सगळ्याच लोकांसोबत मी कॉन्टॅक्ट तोडले फक्त प्रांजल सोडून आणि आता पुन्हा तिथे जाऊन त्याच गोष्टी बघू ज्याचा तिरस्कार आजही माझ्या मनात तितकाच आहे जितका तेव्हा होता पण प्रांजल ती घेईल का समजून.? हो घेईल ती समजून मला. तितक्यात तिचा फोन आला आणि तिने हट्ट च धरला की तु आधीच येऊन राह घरी का तर तिला विश्वास च नव्हता की मी येईल आणि मला वाटलं की मी सहज तिला कन्विन्स करेल आणि तीही समजून घेईल पण झालं उलट च. मी नाही आले तर ती कधीच बोलणार नाही, लग्नच करणार नाही, तू इतकं पण नाही करू शकत का अस म्हणून मला इमोशनल ब्लॅकमेल करायला लागली. होय नाही करता करता तिला ठीक आहे बोलून पुढच्याच आठवड्यात नक्की येईल असं प्रॉमिस करून मी ऑफिस मध्ये सुट्टीचा अर्ज टाकला.

प्रांजल च्या लग्नाची शॉपिंग, तिचे दागिने, मेकअप लूक वैगरे मला ती सगळं व्हॉटसअप करून दाखवत होती. माझी सुद्धा सगळी तयारी झाली होती.दिवस पटापट निघून गेले. कित्तेक रात्री माझा डोळा लागत नसे. अंथरुणावर पडले की पुन्हा सगळ आठवायच. प्रांजल च्या लग्नाचा दिवस उजाडला. १ नंतर चा मुहूर्त असल्याने मला एक दिवस आधी जाऊन राहण्याची धावपळ नव्हती करावी लागणार. पहाटेच आम्ही निघालो. गाडीत बसल्यावर झोप येईल वाटलंपण तीही नाही. माझं ह्रदय खूप जोरजोरात धडकत होत. मला सगळ्या गोष्टी जश्याच्या तश्या आठवायला लागल्या.

त्याच आणि माझं शाळेपासून च प्रेम, आमची भांडण, आमचं एकमेकांवर नवरा बायको असल्या सारखं हक्क दाखवणं, आमचे रुसवे फुगवे, तितकीच लवकर संसार थाटण्याची घाई, वचने, बंधन सगळ चित्र डोळ्यांसमोर येत होत. त्याच्या सहवासात ९ वर्षे कधी निघून गेली कळलच नाही. सगळ काही छान चाललं होत. ह्या जन्मात काहीही झालं तरी तोच माझा नवरा होणार आहे ह्या भावनेने च मी माझं आयुष्य जगत होते. दोघांच्या घरी सुद्धा माहित होत आणि त्याच्या घरी मी येऊन जाऊन होते. माझ्या वडिलांनी सांगितलं माझा ह्या नात्याला पुर्ण विरोध आहे. तरी जायचे असेल तर तू खुशाल जाऊ शकतेस फक्त यापुढे आमच्याशी संबंध नाही ठेवायचा. कितीही झालं तरी माझ्यासाठी माझे आई वडील महत्वाचे असल्याने मी काही त्यावर प्रतिक्रिया दिली नाही कारण मला ह्या गोष्टीची पुर्ण जाणीव होती की प्रेमाने पोट भरता येत नाही.

अशीच काही वर्ष निघून गेली पण त्याची लाईफ जशी होती तशीच. त्या वर्षांत मला कितीतरी स्थळ येऊन गेलीत. मला त्याची साथ द्यायची होती आणि मी देत ही होते पण एक दिवस अचानक माझ्या काका कडे मला मागणी टाकण्या करिता स्थळ आल तो मुलगा आणि त्यांचा परिवार सधन कुटुंबातील होते. माझ्या घरी मला खूप समजवल मला इमोशनल ब्लॅकमेल सुद्धा केलं पण मी बधले नाही. मला फक्त माझं प्रेम दिसत होत आणि माझा भविष्यकाळ जो मला फक्त आणि फक्त त्याच्यासोबतच जगायचा होता. बघता बघता नववं वर्ष लागलं आमच्या प्रेमाला. माझ्या बाकी मैत्रिणींची लग्न काहींना मुल बाळ सुद्धा झाली पण आमचं नात जस होत तसचं. त्यावेळी पुन्हा एकदा त्याच मुलाचं विचारणं आल.

बाबांनी काय ते सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलं आणि त्याला घरी येण्याचा निरोप माझ्याकडे निरोप दिला. त्यावेळी मी खुप खुष झाले आणि बाबांनी तुला घरी बोलावलं आहे, अर्थात लग्नासाठी. मला वाटलं तो देखील खुश होईल पण त्याच म्हणणं होतं की सेटेल्ड झाल्याशिवाय मी नाही येऊ शकणार नाही. अजुन वेळ लागेल पण ह्यावेळी बाबांनी माझं काही न ऐकता त्या स्थळाला हो सांगून टाकलं. बाबांची आणि माझी भांडण पाहून आई सारखी अस्वस्थ राहू लागली. बाबांच बीपी हाय होऊ लागलं. त्यांची हालत मला अजुन तरी पहावणार नव्हती. मी सुध्दा भरपूर लोकांची लाईफ पहिली होती जे विचार न करताच निर्णय घेऊन टाकतात मग आयुष्यभर पच्छाताप करत बसतात. मग मी बाबांना माझा होकार कळवला. घरात आनंद पुन्हा आला. तरी मी लग्नाच्या दिवसापर्यंत मी त्याची वाट पाहिली पण तो आला नाही कसा येईल यातलं त्याला काहीच माहीत नव्हतं. मी सुद्धा ह्याला फुल स्टॉप लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ना मी त्याला कधी पाहिलं ना त्याच्याशी बोलले. मग मी मुंबई सोडली ती कायमचीच. प्रांजल माझी जवळची मैत्रीण असल्याने मी त्याची सुद्धा ओळख करून दिली होती आणि ते दोघं ही खूप चांगले मित्र झाले होते. आता त्याला ही तिच्या लग्नाचं आमंत्रण गेलं असणारं ह्याची मला खात्री होती. म्हणूनच नव्हतं यायचं मला.

हॉर्न चा आवाज ऐकुन मी भानावर आले. मुंबई आली होती. ह्यानंतर परत येण्याचं काही कारण नव्हतं म्हणून मी पुन्हा सगळ खिडकीबाहेर बघून सगळ डोळ्यात साठवून घेत होते. मी प्रांजल ला कॉल केला तिने मला घरीच बोलावलं. आम्ही तिच्या घरी पोहचलो. तिने पाहताच मला कडकडून मिठी मारली. इतक्या वर्षांनी आम्ही भेटलो होतो पण गप्पा मारण्याची वेळ नव्हती. नवरीच्या वेषात प्रांजल खूप सुंदर दिसत होती. पुढच्या विधींसाठी तिला लवकर जावं लागणार होत म्हणून तिने मला घरून आवरून हॉल मध्ये यायला सांगितलं. ती गेल्यानंतर तिच्या खोलीत मी आवरून घेतले आणि हॉल ला जाण्यासाठी निघाले.

हॉल मध्ये पोहचताच मी प्रांजल कडे पाहिलं. तिने हसून मला छान दिसतेय असा इशारा केला. मी हॉल मध्ये भिरभिरती नजर टाकली कोणी ओळखीचं आहे का पाहायला. हो म्हणजे तोच कुठे दिसतोय का बघायला. पण तो नाही दिसला. सगळेजण आता नवरा नवरी सोबत फोटो काढून घेण्यासाठी रांगेत उभे होते. नंबर आला तसा आम्ही जाऊन प्रांजल ला गिफ्ट देऊन दोघांना शुभेच्छा देऊन तिचा निरोप घेतला.

मी स्टेज वरून उतरत असतानाच समोर नजर गेली. दुसऱ्याचं रांगेत तो बसला होता. हो तोच. कबीर अशी पुसटशी हाक माझ्या ओठांतून निघाली. तो मलाच टक लावून बघत होता. दिसतच होती मी तशी. आबोली रंगाची नेटची साडी. त्यावर साधासा मेकअप. मोकळे सोडलेले केस. माझ्या वडिलांनी दिलेला माझा राणी हार त्यावरचे कानातले. हातात हिरवा रंगाचा चुडा त्यासोबत माझ्या बांगड्या. कपाळावर चंद्रकोर. गळ्यात दोन वाटी मंगळसूत्र. एकूणच माझा हा सगळा पेहराव अगदी त्याला आवडायचा असाच होता.मी त्याला बघून भांबावून गेले. तितक्यात त्याच्या जवळ एक लहान मुलगी धावतच आणि पप्पा मला अजुन आईस क्रीम हवंय असा हट्ट करू लागली त्यामागे एक साधारण माझ्याच वयाची बाई आली अर्थात ती त्याची बायको होती आणि त्याच्या उतरलेल्या चेहऱ्यावरून ती बर नाहीये का विचारू लागली.

ते पाहून मला मनात खूप इर्षा वाटू लागली. मला तिच्याबद्दल असुया वाटायला लागली.आधी वाटलं होत मला पाहून तो खूप रागात खुप हर्ट असेल पण अस फक्त मला वाटतं होत. प्रत्यक्षात चित्र वेगळं होत. तो त्याच्या आयुष्यात पुढे निघून गेला याच एका मनाला समाधान होत तर दुसऱ्या स्वार्थी मनाला पटत नव्हतं. तो येऊन मला जाब विचारेल, माझ्यासाठी अजुन ही त्याच्या मनात जागा आहे सांगेल अस वाटतं होत. का कुणास ठाऊक. पण आम्ही आता खूप पुढे निघून गेलो होतो हे सत्य मी लगेच मान्य केलं. तितक्यात माझ्या नवऱ्याने पाठी येऊन माझी तंद्री भागवली. निघायचं ना की आपण सुद्धा मुंबई फिरुया दोन दिवस अस हसून विचारताच मी सुद्धा तितक्याच प्रेमात हसून त्याला नाही म्हटलं. तो गाडी पार्किंग मधून घेऊन येतो तू गेटवर ये बोलून निघून गेला.आम्ही दोघं सुद्धा एकमेकांना आम्ही खूष आहोत हे भासवत होतो मग कबीर आणि त्याची फॅमिली माझ्याच दिशेने येत होते. त्याची बोचरी नजर मला सहन होत नव्हती. त्याच्या नजरेत बरेच प्रश्न होते पण त्यांची उत्तरे माझ्याकडे नव्हती. माझ्या मनात पुन्हा धडधड सुरू झाली. पोटात गोळा येऊ लागला. मला त्याला अनोळखी नजर देणं खूप कठीण होऊ लागलं. मी तडक तिथून त्याला इग्नोर करून बाहेर निघून आले.

गाडीत येऊन बसले. मुंबई आता मागे पडत पडत होती.पण त्याचाच विचार करत होते. की मी गेल्यानंतर काय झालं असेल, कसं सगळ झालं असेल. माझं मन आता इथेच अडकून बसत होते. ते लोक किती खूष दिसत होते. राहून राहून माझ्या मनात ते बोचत होत. माझा पूर्ण मूड खराब झाला होता. का आमचं लग्न झालं नाही. का त्याने प्रयत्न केले नाही. का मी माझं मत बदलल. आज आहे मी खुश पण त्याच्यासोबत असते तर जास्त खुश असते. समाधानी असते. मनातली पोकळी अजुन ही तशीच आहे. कितीही झालं तरी माझ प्रेम होत. प्रॅक्टिकल विचार करून मी आज खूप खूष होते माझ्या नवऱ्यासोबत पण मला तो आनंद कधीच झाला नाही जो मला हवा होता कारण मानसिक दृष्ट्या खूप अट्याचमेंट झाली होती त्याच्या सोबत. कधी कधी मनात ती रुखरुख प्रकर्षाने जाणवायची. आता ह्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही मनाला समजवत होते.

कदाचित बोलून मन मोकळं केलं असतं तर बर झालं असतं.

पण समोर असूनही नसल्या सारखे...
ओळख असूनही अनोळख्या सारखे...
अनुरुप असूनही सोबत नव्हतो...
प्रेम असूनही त्याला जागलो नव्हतो...

समाप्त...

- अक्षता कुरडे.

इतर रसदार पर्याय