Punha bahar yeil books and stories free download online pdf in Marathi

पुन्हा बहार येईल

ये रातें, ये मौसम,नदी का किनारा,
ये चंचल हवा..
कहा दो दिलों ने,
कि मिलकर कभी हम ना होंगे जुदा...

आज ती एकटीच तिच्या बंगल्याच्या टेरेस वर मोबाईल मध्ये गाणं लाऊन गुणगुणत बसली होती. सोबतीला त्याला आवडते अगदी तशीच कॉफी बनवून ती त्याचा आस्वाद घेत, बाहेरील निसर्ग बघत होती. फरक फक्त इतकाच की तो सोबतीला नव्हता. पहाटे धो धो कोसळणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली होती. नुकताच पाऊस येऊन गेल्याने आजूबाजूचा परिसर थंड आणि हिरवागार झाला होता. आज त्यांचा लग्नाचा १५ वा वाढदिवस होता. पण तिला कोणाशीच बोलायची किंवा कोणाच्या शुभेच्छा घेण्याची इच्छा नव्हती. म्हणून तिने मुद्दामच फोन फ्लाईट मोड वर ठेवला होता. गेल्या पंधरा वर्षांपासून ती त्याची वाट पाहत होती. त्याच्या आठवणींना उजाळा देत ती तिच्या विश्वात रमली होती. दर लग्नाच्या वाढदिवशी तिला खूप एकटं आणि उदास वाटायचं पण आज तिला खूप खास आणि स्पेशल वाटतं होत.ती म्हणजेच अधिरा.. नावात अधीरता असली तरी ती शांत, संयमी आणि हुशार होती. उजळ कांती, बोलके डोळे आणि हसरा चेहरा अस तीच व्यक्तिमत्व असून तिला प्रत्येकाचं मन जिंकायची जणू कलाच अवगत होती. दिवाळीला फराळ देण्यासाठी आलेली अधीरा तिला कबीर पाहतच राहिला. मागून आईने येऊन तीच हसून स्वागत केलं आणि तिला किचन मध्ये घेऊन गेली तर तिने तिथे पाहिलं तर त्या फराळ बनवत होत्या आणि अजुन ही बराच बाकी होता. तिने विचारलं त्यांना,

"काकू हे काय अजूनही तुमचा फराळ बाकी आहे."

"हो अगं मला एकटीला करावं लागणार ना, कबीर ला कसं सांगणार, मला मुलगी असती तर तिने केली असती मदत."

"हे काय बोलत आहात मी नाहीये का तुमच्या मुलीसारखी"

असं म्हणत लगेच ओढणी कंबरेला बांधली आणि काकु नाही म्हणत असताना ही त्यांचं काही न ऐकता त्यांना मदत करायला घेतली. तीच आणि आई च संभाषण कबीर ने ऐकल होत. त्याला तीच साधं राहणीमान, बोलण्याची पद्धत, समोरच्याला आपलंसं करून घेण्याची कला तिच्या ह्याच स्वभावाला पाहून कबीर तिच्या प्रेमात पडला. त्याला ती खूप आवडली होती. पण त्याला त्याच्या आर्मीच्या पुढच्या ट्रेनिंग साठी निदान वर्षभर तरी जावं लागणार होत. त्यामुळे त्याने त्याच लक्ष पूर्णतः ट्रेनिंग वर ठेवलं. पुढच्याच वर्षी तो घरी आला तसाच त्याने थोडाही वेळ न घालवता त्याच्या घरच्यांना सांगून त्याने तिच्या घरी मागणं टाकायला सांगितलं.

तिच्या घरी चर्चेला उधाण आलं. अधीराचे घरचे तिला समजावू लागले, कबीर चांगला मुलगा आहे, त्याचे घरचे ही चांगले आहेत. अगदी सधन कुटुंब आणि तुला अनुरुप असच स्थळ आहे. शिवाय आपली मुलगी आपल्या डोळ्यांदेखत संसार करेल याच तिच्या घरच्यांना खूप अप्रूप होत. पण अधीराने तिला वेळ हवा सांगून, तिच्या घरच्यांना गप्प केलं. तिला सुद्धा कबीर छान वाटायचा पण एक जोडीदार म्हणून केवळ तो चांगला मुलगा आहे म्हणून लग्न सारख्या मोठ्या गोष्टीला लगेच होकार देणं तिला पटत नव्हतं.

एक दिवस अचानक कबीर ची आई धावत च कुठे तरी जात होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर त्या खूप घाबरल्या होत्या. अधीराच्या घरा समोर जात असतानाच अधीराने त्यांना थांबवलं. त्यांना खूप धाप लागली होती. तिने त्यांना लगेचच घरात घेऊन गेली आणि त्यांना शांत केलं. मग त्या सांगू लागल्या कबीर हॉस्पिटल मध्ये आहे. एका माणसाने कॉल केला होता कबीर च्या फोन ने. त्यांनी ताबडतोब बोलावलं होतं. पण कबीर च्या आई ची परिस्थिती बघता अधीराच्या बाबांनी त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगून अधीराच्या आईला त्यांची काळजी घ्यायला सांगून अधीराचे बाबा आणि तिचा भाऊ जाण्यासाठी निघाले. तितक्यात मी पण येते सांगून अधीरा पण निघाली.

हॉस्पिटल मध्ये येताच ते इमरजन्सी वॉर्ड मध्ये चौकशी करायला गेले. नर्स त्यांना घेऊन गेली. तिकडे एक माणूस आणि वृद्ध आजी काळजीत बसले होते. त्यांना पाहतच नर्स ने त्या माणसाला सांगितले हे त्या मुलाचे नातलग आहेत. हे ऐकतच तो माणूस उठून उभा राहिला आणि सगळी हकीकत सांगू लागला. रस्ता क्रॉस करत असताना माझ्या आईचा हात माझ्या हातून सुटला आणि पुढे निघून आलो. पाठी वळून पाहिलं तर माझी आई रस्त्याच्या मधोमध गोंधळून उभी होती. बाजूचे लोक सुद्धा तिला पाहून न पाहिल्या सारखं करून रस्ता क्रॉस करून आले. मी खूप पुढे निघून आलो होतो तरी मी मला जमेल तसा रस्ता क्रॉस करायला पाहत होतो पण सिग्नल सुटल्याने मला लवकर मधूनच निघणं शक्य होत नव्हत. तितक्यात आई ज्या बाजूने होती तिथून एक ट्रक समोरून येताना दिसला. तो इतक्या भरघाव वेगात आला आणि मी जोरात किंचाळून आई ला हाक मारली. क्षणात होत्याचं नव्हतं होणार होत. पण पाहिलं तर माझी आई रस्त्याच्या कडेला पडली होती. तिला तुमच्या मुलाने वाचवलं होत सांगून तो त्याच्या आईला मिठी मारून रडत होता. त्या आजीच्या डोक्याला खरचटलं होतं. हे बघून आम्ही त्यांना घरी जाण्यासाठी सांगितलं. ते कबीर चा मोबाईल आणि त्याच्या सोबत च्या वस्तू देऊन निघाले. जाताना ते कबीरचा हाथ हातात घेऊन त्याचे उपकार मानून गेले. कबीर च्या डोक्याला तेरा टाके पडले होते. हाताला फ्रॅक्चर आणि पायाला खांद्याला जागोजागी खरचटलं होतं. त्याची मध्ये मध्ये शुद्ध हरपत होती. घरी मी फोन करून आईला काळजी करू नकोस आम्ही आहोत इथेच सांगून संध्याकाळी कबीर च्या आईला घेऊन यायला सांगितलं.

तीन दिवसांनी कबीर ला घरी आणलं. त्या दिवसापासून ते पंधरा दिवसांपर्यंत कबीर ची हवी नको ती सगळी काळजी अधीराने घेतली. ह्या दिवसांत ती पूर्णपणे त्याच्या परिवारात गुंतून गेली. एक दिवस ती कबीरला गोळ्या देत असताना कबीर तिच्या डोळ्यात बघत तिला लग्न करशील माझ्याशी, असा प्रश्न केला. ह्या प्रश्नावर ती गोंधळून गेली. आणि उठून निघणार तितक्यात त्याने तिचा हाथ धरला आणि म्हणाला,

"अधीरा, तुला हवा तितका वेळ घे मी नेहमी तुझ्याचसाठी वाट बघेन. जो पर्यंत आपल्या नात्याला बहार येत नाही..."

हे ऐकुन अधीरा लाजून तिथून पळून गेली.सहा महिन्यांनंतर त्यांचं लग्न धुमधडक्यात पार पडलं. कबीर कडचा परिवार खूप मोठा असल्याने लग्नात अधीरा ला त्यांनी खूप जपलं, तिचे लाड केले. त्यांची पूर्ण सोसायटी तील लोकांनी तर तिच्या गृहप्रवेशाच्या वेळी गुलाबांच्या पाकळ्यांनी उधळण करून तीच स्वागत नवी नवरी सारखं केलं. फुलांच्या पाकळ्या वरून तिला चालत आणलं. लग्नानंतर च्या खेळांत मजा च केली होती सगळ्यांनी. तिला टॉप ऑफ द वर्ल्ड फील होत होतं. पण हा आनंद फार काळ टिकला नाही.

सत्यनारायणाची पूजा चालू असताना, कबीर च्या आर्मी मधला एक माणूस घरी आला आणि त्याला एक हातात लेटर देऊन तो घराबाहेर जाऊन उभा राहिला. पूजा संपताच त्याने ते लेटर वाचलं आणि आई अधीरा कडे पाहत एक उसासा टाकत "जावं लागेल" बोलला. हे ऐकून कबीर च्या आईच्या डोळ्यांत त्याची काळजी उमटली, जी प्रत्येक आईच्या डोळ्यांत आपला मुलगा लढायला जात असताना उमटते. अधीरा हे ऐकून खोलीत निघून जाते. सगळ्यांना वाटतं की ती खूप चिडली. पण अधीराने कबीर ची बॅग भरून आणली आणि खूप अभिमानाने ती त्याच्याकडे पाहत होती. हे सगळ पाहून घरातली माणसे भावूक झाली. सगळ्यांना अधीरा सारखी समजूतदार आणि खंबीर बायको कबीर ला मिळाली याचा आनंद होता. सगळ्यांचा निरोप घेऊन कबीर जात होता. त्याने जाताजाता अधीरा कडे माफी मागितली. अधीरा बोलली,

"माफी नाही लवकर या, मी वाट पाहतेय.. आत्ता कुठे नात्याला बहार आलाय आपल्या.."

असं म्हणून लाजून तिने मान खाली घातली. हे ऐकुन कबीर ला खूप हसू आलं, लवकरच परत येईन आश्वासन देऊन निघुन गेला.

पण कायमचाच...
.
.
.
एक वर्ष झालं ना त्याचा कॉल ना मेसेज ना त्यांच्या आर्मी दला मधून काही कळलं. ते एक वर्ष कसतरी त्यांनी तळमळत काढलं. पण त्यानंतर तिथून कळाल की युद्धात गेलेल्या सर्व सैनिकांवर झालेल्या गोळीबारात कबीर सुद्धा होता आणि त्याच्या प्रमाणे अजूनही काही सैनिकांचा पत्ता कळाला नाहीये. हे ऐकून दोन्ही घरांवर दुःखाचं वातावरण पसरलं. फक्त एक अधिरा चं होती जी सर्वांना धीर देत होती. तिला अस बघून तिच्या घरच्यांचा अजूनच जीव हळहळत होता. त्यांची सकाळ आणि रात्र दोन्ही कबीर च्याच आठवणींनी जायची. त्यांच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तिला त्याची प्रकर्षाने आठवण आली. तिला लोकांचे दुसऱ्या लग्नाचे सल्ले येत होते आणि ही लोकं तिच्याच घरचे बघून तिला खूप चीड येई. तिला तिच्या घरचे घ्यायला आले होते, कबीर च्या आईने सुद्धा तिला नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी सांगितले. तिने खूप प्रेमाने त्यांना नाकारून

"आता हेच माझं घर आहे" अस सांगून टाकलं. तरीही तिच्या घरचे तिच्या पाठी लागले होते. दुसऱ्या वेळी मात्र तिने साफ सांगून टाकले,

"माझे फक्त कबीर वर प्रेम आहे त्याच्या शिवाय मी कोणाचा विचार ही करू शकत नाही, यापुढे कोणी माझ्या लग्नाचा विषय काढला तर मी खपवून घेणार नाही."

तिचा असा सुर बघता सगळे हताश झाले पण नंतर तिच्याच मागे ते तिच्या साठी दुसऱ्या लग्नाची पाहणी करू लागले.

एक दिवस ती ऑफिस मधून घरी आली तर पाहते, घरात पाहुणे आले होते. तिच्या वडिलांच्या मित्राचा परिवार तिला पाहायला आले होते. हे सगळ पाहून तिला खूप राग आला. ती बेडरूम मध्ये जाऊन दाराला लॉक करून, कानात हेडफोन्स टाकून बसली. सगळे निघून जाई पर्यंत ती बेडरूम च्या बाहेर पडली नाही. ती कानोसा घेऊन बाहेर पडली. हॉल मध्ये आई बसल्या होत्या. तिने त्यांना सांगून टाकलं, आई आपण हे घर विकून दुसरीकडे जाऊ राहायला. कबीर ची आई हे ऐकुन तिला समजावू लागली पण तिच्या वर काहीच परिणाम होत नव्हता. शेवटी हार मानून तिने त्यांचा फ्लॅट विकून, गाठीशी असलेल्या पैशात छोटंसं असं टुमदार बंगला घेतला. बंगल्याच्या बाजूला खूप हिरवळ होती. त्याने वातावरण खुप प्रसन्न वाटायचं. तिच्या ह्या निर्णयाने तिच्या घरचे मात्र नाखूष होते. कबीर च्या नातेवाईकांनी सुद्धा अधिराला खूप समजावले पण ती ऐकत नाही बघितल्यावर नंतर नंतर ते दुर्लक्ष करू लागले. परिणामी आधिरा ने सगळीकडे यायचे जायचे बंद केले. घरून पण फोन येई पण तेच तेच सततच्या ऐकण्याने ती बरेचदा फोन ना घेणं च पसंत करायची.

काही महिन्यांनी गावच्या काही कामानिमित्त कबीर ची आई त्यांच्या गावी निघून गेल्या. अधिरा रोज फोन करून त्यांची ख्यालखुशाली घेत. अधिरा ही दिवसभर ऑफिस मध्ये असायची आणि इथे राहायला आल्यापासून आधी सारखं कुठे जाताही येत नव्हत मग त्यांनाही एकटं वाटायचं. गावी सगळ्यांच्या सोबतीत असल्याने दिवस त्यांचा पटापट निघून जाई. नाहीतर बंगल्यात त्या कबीर च्या आठवणीने व्याकुळ होऊन तब्येत बिघडवून घेत. आता अधिरा एकटी राहू लागली होती. तिने तिच्या आयुष्याला कोंडून घेतलं होत. तिला कबीर चे नातेवाईक वेडी म्हणून ही तिच्याबद्दल ती कसं कोणाला जुमानत नाही अशी चर्चा करत. पण तेच लोक तिच्या दर लग्नाच्या वाढदिवशी तिला मुद्दाम फोन करून तिला कबीर लवकर परत येईल हं... असं म्हणून मागून तिची खिल्ली उडवत. तिला कशाचीच पर्वा नव्हती.

ती फक्त तिच्या कबीर च्या वाटेकडे डोळे लावून बसायची. तिचं मन म्हणायचं की तो नक्की परत येईल खात्री च होती तिची. इतक्या वर्षात ती एकदाही कबीर च्या आठवणीत रडली नव्हती उलट दुसऱ्यांना धीर देत. कबीर च्या घरच्यांनी तर तिने आता सवाशिणी सारख न राहण्याचा सल्ला दिला. ती अस काहीही करणार नाहीये अस त्यांना ठणकावून सांगितलं तसं त्यांनी कबीर च्या आई चे सुद्धा कान भरवायला सुरुवात केली. कबीर गेल्यापासून एकदाही रडली नाही. उलट तोऱ्यात मिरवत असते असे काही बाही सांगत. कबीर चा फोटो घेऊन आई रडत बसली होती अधिरा ने त्यांना रडायचं नाही तब्येतीला परिणाम होईल असं सांगत शांत करत होती. तिला अस पाहून एकदा कबीर च्या आईला फार राग आला त्यांनी विचारल देखील,

"तुला जराही काही वाटत नाही का त्याच्याबद्दल? त्याच्यासाठी खोटं तरी रडली असती तरी बर वाटलं असतं सगळयांना." ह्यावर तिने कबीर च्या आईचा हाथ हातात घेऊन त्यांना समजावलं,

"आई त्या व्यक्तींच्या आठवणीत रडतात जे पुन्हा कधी येणार च नाहीत पण आपला कबीर लवकरच परत येणार आहे त्याने तसं वचन दिलं आहे आणि कोणत्या लोकांसाठी बोलत आहात तुम्ही ज्यांना मला लवकरात लवकर विधवा बनवायचं आहे त्या लोकांना बर वाटावं म्हणून रडू मी. शक्य नाही मला माझ्या प्रेमावर आणि देवावर पूर्ण विश्वास आहे कबीर येणार आणि आमच्या संसाराला बहार येणार.."

कबीर बद्दल तिच्या डोळ्यांतील प्रेम पाहून त्या खूप खजील झाल्या आणि लगेचच तिची माफी मागितली होती.

आज लग्नाच्या वाढदिवशी सगळे प्रसंग तिच्या डोळ्यांसमोरून जात होत. ती ही आपलीच माणसं ज्यांनी एकेकाळी किती माझे लाड केले होते आणि आज तीच माणसं वेळेप्रमाणे कशी काय इतकी बदलून गेलीत ह्या विचारात होती. ह्या पंधरा वर्षांत बरेच काही घडून गेलं होत फक्त तिचा संयम सुटला नव्हता. ती आजही त्याच्या वाटेकडे तितक्याच तीव्रतेने आस लावून बसली होती. तिने तिची पुर्ण दुपार त्याच्या आठवणींना उजाळा देत घालवली.

(तिच्या शब्दांत..)

खाली येण्याचा विचार करून मी सगळा पसारा आवरला आणि खाली येऊन पाहते तर समोर कबीर होता.. नक्की तोच आहे ना अस करत थोडावेळ मी त्याला बघत च राहिले. त्याची दाढी केस वाढलेली. पूर्ण मळकटलेल्या अवस्थेत होता तो. आधी मला ओळखुच येईना. पण तो तोच होता. त्याला बघताच माझं अवसान गळून पडल. मी तिथेच खाली बसून रडू लागले. इतक्या वर्ष झालेल्या माझ्या सयंमाची माझ्या प्रेमावर संशय घेणाऱ्या लोकांचे बोलणे सगळं सगळं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर येत होत. पण आता नाही म्हणत मी जोरात पळत जाऊन त्याला मिठी मारली. त्याने सुद्धा मला मोकळं होऊ दिलं. तो बोलायला जाणार तेवढ्यात मी त्याच्या ओठांवर बोट ठेवून नाही बोलण्याचा इशारा केला. इतक्या वर्षात मी खूप काही सहन केले होत, आताही माझ्या मनात खूप प्रश्न आहेत पण मला तो क्षण, आमचा दिवस फक्त सेलिब्रेट करायचा होता जो इतक्या वर्षांनी मला मिळाला होता. ज्या दिवसाची मी चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो शेवटी आलाच. आज मला माझ्यावरच्या प्रेमाचा विश्वास अजूनच दृढ झालाय. देवाने माझी साथ दिली आणि मला माझं प्रेम जिंकून दिलं. आता मी माझ्या प्रेमाला कुठेच जाऊ देणार नाही. यापुढच्या आयुष्याची सुरुवात किती सुंदर होईल ह्याच विचारात मी त्याच्या मिठीत हरवून गेले आणि आज खऱ्या अर्थाने वाटत होते, माझ्या जीवनात पुन्हा बहार आला...

समाप्त...

(माझा सलाम त्या प्रत्येक वीर जवानांना आणि त्याच्या वर निस्सीम आणि निरपेक्ष प्रेम करणाऱ्या अर्धांगिनी ला..)

- अक्षता कुरडे.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED