A pot of ignorant people books and stories free download online pdf in Marathi

गच्च अज्ञानाचा घडा

प्राथमिक शिक्षण वस्तीवर झाले परंतु माध्यमिक शिक्षणाची सोय वस्तीवर नसल्याने प्रत्येक मुलाला वस्तीबाहेर पडावं लागतं. जो वस्तीबाहेर पडला तोच शिकला अशाच परिस्थितीने माझं शिक्षण पुर्ण झालं. असं शिक्षण पूर्ण करणारा दोनशेहून अधिक मुलांमधून मी एकटाच आहे. याचा मला अभिमान वाटत असला तरी वस्तीवरील परीस्थितीची खुप खंत वाटते. खंत याचीच वाटते की विसाव्या शतकातील भारतात अजून कोणती वाडी वस्ती अशी आहे की त्या वस्तीवर शिक्षणाचे प्रमाण दोनशे मध्ये एक आहे.
महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात दौंड एक तालुका त्या तालुक्यात पाटस हे गाव. गावापासून तीन किलो मीटर अंतरावर एक डोंगराच्या कडेला असलेली एक छोटीशी वस्ती म्हणजे मोटेवाडी. शंभर सव्वाशे उंबरटा असलेली ही वस्ती खुप जुन्या परंपरेने चालत आलेली माणसं अजूनही संस्कृती जपूनच आहेत. आता उंबरटा म्हणण्याइतक पुरेस नव्हेच कारण येथील जीवन हे अत्यंत साधे भोळे व सरळ मार्गी. आता हे कसं तर डोक्यावर पटका, खांद्यावर गोंघडी, हातात काठी पायात कोल्हापूरी काताड्याचं पायतान आणि कपाळाला गुलाल असलेली सर्व लोक मोटेवाड्याच्या ऐवजी धनगरवाडाच म्हणून प्रसिद्ध. अत्यंत अंधश्रद्धेत बुडून बसलेला धनगर वाडा ही परिस्थिती पाहील्यावर यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
एम.एस्सी भौतिकशास्त्र हा विषय घेवून माझं शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचलेलं म्हणजेच शेवटंच काही दिवस उरलेलं. काही अंश चाचणी परीक्षा पूर्ण झाल्याने थोडे दिवस आरामात महाविद्यालयात जात होतो मित्रांबरोबर वेळ काढून पुण्यातील काही ठिकाणी फिरत होतो. कधी कधी आमच्यात चर्चा ही होत असे, अरे आत्ता किती दिवस राहिल्यात संपलं आपलं शिक्षण. कोण कुठे जाईल कोणाला ठावूक नाही दिवस तर दोन महिण्यावर येऊन टेकल्यात. आमचे गरजे सर सारखे म्हणायचे मित्रांनो शेवटच्या दिवसाची कोण वाट पाहत असाल ना तर ती योग्य मुळीच नव्हे कारण तुम्हाला परत महाविद्यालय नाहीच, मी काय सांगतोय पहा शेवटच्या दिवशी तुम्ही गळ्यात गळा घालून रडणार हे मात्र नक्की. आणि मी तुम्हाला शेवटच्या दिवशी एक गोष्ट सांगणार आहे बर का? खरचं त्यांना आमची बॅच लाडकिच वाटत असावी म्हणून की काय असे म्हणाले की कदापि त्यांना काहीतरी द्यायचं होत म्हणून म्हणाले त्यांच त्यांनाच ठावूक असावं.
मार्च महिण्याची बारा तारीख गुरूवार असल्याने महाविद्यालयात जावून आलेलो आणि खोलीवर आडवा पडलेलो जरा कंटाळवाणे वाटल्याने सायंकाळी सातच्या सुमारात आईचा फोन आला. आईने बरे वाईट विचारले आणि म्हणू लागली
“चीन वरणं रोग आलेला पुण्यात बी आलाय ना?”
मी म्हणालो आलाय वाटत पण त्याच काय जास्त काहीही होणार नाही आई.
“बाबा चांगलाच हायेस तु मी बातन्या ला बघतिया तर लय मानसं मरण्याच आसं सांगतया ते!”
बातम्याला बातन्या म्हणून गांभिर्याने बोलतं होती ती माझी आई.
मग आत्ता काय करायचं आई? मी म्हणालो
“काय नकु आपला घरी ये तिकडं राहू नकुस बाबा पेटू दे साळा राहिल येव्हडं वरीस तरी राहू दे मोऱ्हच्या वरसाला शिकाय ईलं”. आई खुप गंभीररित्या बोलत होती.
मी म्हणालो बघतो उद्या आणि सांगतो तुला मग आम्ही आमचा फोन ठेवून दिला.
नेहमी प्रमाने सकाळी बातम्या बघत असलेली आई परत शुक्रवारी मला फोन करते आणि हेच बोलते, तिचं तेच तेच शब्द ऐकून मी मुद्द्यामुन म्हणून जातो की काय होतय त्याला बघेल दोन तीन दिवसांनी येईल. तसाच मी बोलत असताना आई फोन बाबा कडे देते आणि त्यांना सांगा म्हणायला लावते.
बाबा रागावून “बटकीच्या येतोस का लवकर घरी”.
अरर्र आता तर काहीच खरे नाही. मग त्यांना उद्या येतो म्हणून सांगितलं आणि सकाळी येतानाचे आईचे दोन चार नियम ऐकून मलाच भरून आलं. आई म्हणाली तोंड रूमानी जाम बांध, बस ने येऊ नकोस, कोणत्याही गाडीच्या लोखंडाला हात लावू नकोस रोग असतो त्याला, लवकर येऊन कपडे धुवायला ठेव आणि मगच घरात जा. ठरल्या प्रमाने मी पुण्याहून वस्तीवर लवकरच पोहचलो. गावाकडे येव्हडी रोगाची चाहूल नसल्याने इकडे फार काही सुरळीत चाललं होतं. घरी आल्याने काही दोन चार दिवसात परत जाणार म्हणून कपडे थोडेफार आणि काहीशा वस्तु आणलेल्या. वह्या, पुस्तकेतर पुण्यात तशीच राहिलेली. पुण्यातील सवय असल्याने घरी काही करमतच नव्हते. रानात जावून असेच दिवस ढकलत होतो.
दहा पंधरा दिवस गेल्यावर रोगाने मात्र येढाच घातला जिकडं-तिकडं बंदचं. सारा देश बंदच इंथ आलं तिथं आलं या अफवेने तर काळीज फुटायची वेळ झाली.
बावीस तारखेची सायंकाळची वेळ काही लोकांच्या मोबाईल, बातम्यांन दाखवलेलं की मोदीने सांगितलं की एक दिवस पुर्ण पणे घरात बसायचं एक विमान रोगावर औषध फवारण्यासाठी येणार आहे. तर माझ्या वस्तीवरील लोक एकवीस तारखेला स्वत:ची जनावरे घरात कोंडून धास्तीने आपला सारा परिवार घरात दडून बसलेला. आजी तर सारखी म्हणायची आपण बसलोय घरात पण मेंढ्यावाल्यांनी काय करायचं. त्यांनी कुठं दडून बसायचं. आत्ता काय जगायची सोयच राहीली नाही. औषध फवारलं तर मेंढ्या ही जगणार नाहीत आणि पोरं बाळ पण जगणार नाहीत. आजू बाजूला काय झालेलं वस्तीवर वाऱ्यासारखं पसरायचं जणू काय भिंतीला कानचं. कितीही आजीला सांगितलं तरी तिला मात्र कळतच नसायचं ती आपल्या भोळ्या शब्दात ह्याला त्याला औषध फवारणीच सांगत बसायची. तो दिवस सगळा संपून गेला कशाची फवारणी आणि कशाची काय? तो दिवस असाच निघून गेला.
धनगर समाजाचे दैवत समजणाऱ्या बाळूमामाने काही दिवसांपूर्वी बाकणूक केली होती त्यात सांगण्यात आलेल्या गोष्टी रोजच मोबाईल वर रोजच ऐकायला येत असतं. त्यात सांगितलं होत की, पृथ्वी तलावावर खुपच अन्याय वाढल्याने एक असा रोग येणार आहे की त्या रोगाने मानव जातीच खुप नुकसान होणार आहे. पोरगा बापाच्या प्रेताला शिवणार नाही येव्हडं मोठं नुकसान होणारं. चार कोसावर दिवा दिसेल पण धनगाराच्या मानसाला धक्का लागून देणार नाही. हे तर ऐकून माणसं जराशी बुचकाळ्यातच पडलेली.
सत्तावीस तारीख शुक्रवार म्हणजेच शनिवारची रात्र. हवेशीर शांत आणि चांगलीच झोप लागलेली अहोरात्री दिडच्या सुमारात माझी मावशी धडपडत घरी येते आणि आईला सांगु लागते.
“बाये तुला नाय व्हयं ग माहित” अशी मावशी म्हणाली
“काय गं झालं ?” असं आई म्हणाली
“आगं वरच्या वाड्यावरून खालीपर्यंत सगळ्यांनी बिन दुधाचा चहा करून पेलाय आणि तुम्ही गं”मावशी म्हणाली
“का गं आणि कशासाठी” आई म्हणाली
“कुरूना रोग आलाय, बाळूमामानी सांगितलयं सगळ्यानी चहा करून बीन तोंड धुता पियाला मग आम्ही पण पिलो.” मावशी म्हणाली
“बया बाये मला काय माहितच नाय बरं झालं सांगाय तरी आलिस”. आई म्हणाली
रात्रीचा कोरा चहा आईने दिड वाजता चूल पेटवून केला आणि चहा कढतं असताना आईने मला उठललं आणि चहा पी म्हणाली. काय करणार पुटपुटत उठलो आणि म्हणालो मला न्हाय प्यायचा चहा आईने खडसावून बळंच चहा पिण्यासाठी दिला. येवढ्या रात्रीचा चहा पिण्यासाठी घेतलेला निम्मा चहा ओतून दिला कसे बसे दोन घोट घेतले आणि जावून झोपलो. सकाळी उठल्यावर आईला सांगितलं चहा नि काय होतं ग आई काहीही अंधश्रद्धेच्या पोटी काहीही करायला लावतील.
तीस तारखेची तर अनोखीच बातमी वस्तीवर पसरली होती. ज्या महिलेला दोन मुले त्या महिलेने दोन दिवे घराजवळील तुळशीसमोर लावायचे ज्या महिलेस चार मुले तिने चार दिवे लावायचे. ज्या महिलेस एक मुलगा तिने पाच दिवस उपवास करायचा आणि पाचव्याच दिवशी बाळूमामाला गोड जेवन करायचं आणि मगच उपवास सोडायचा. ह्या बातमीने सगळ्या वाड्यातील महिलांनी पूर्णपणे उपवास पूर्ण केले.
तीस तारखेपासून झालेलं लॉकडाऊनचे दिवस तर भयानक निदर्शनास आले त्या दिवसामुळे तर सामान्य माणसाचे वाईट दिवस सुरू झाले. हातावरचे पोट असणाऱ्या गोप गरिबांच्या बातम्या ऐकून मन मात्र भरूनच येऊ लागलं. माझा फिरता समाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असतं त्यांना तर ह्या गावातील रस्त्याहून दुसऱ्या गावांच्या रस्त्याला सुद्धा जावून देत नव्हते. एखाद्याच्या घरी पाणी पिण्यासाठी जायचं झालं तरी लोक दरवाजा लावून घेत असतं. अक्षरश: माझ्या समाजातील लोक दूध पिऊन झोपले. मिळेल त्या ठिकाणचे पाणी पिले आणि झोपले. मरणाच्या कचाट्यात सापडलेल्या इटलीच्या लोथी ऐकून तर काळजाच्या ठिकऱ्याचं.
आमच्या घराच्या शेजारी असणाऱ्या सखाराम काकांच्या भावाचं निधन झालं त्यांच वयं झालेलं. त्यांची मुलं बाळ सगळी मेंढ्यांकडे असल्याने त्याच्या मुलाबाळांचा मैतीला हात सुद्धा नाही लागला. ठराविक काही लोकांनी तो विधी उरकून आपापल्या घरी निघून गेली. पोलिसांची धास्ती वाढत असल्याने हा विधी देखिल लवकरच उरकून टाकला.
“शिक्षणाचा आयचा घो”, या वाक्याप्रमाने शिक्षणाला बांबु तर चांगलाच लागला पण अर्धवट आयुष्याची दोस्तांना देण्याची वेळ तर बकासूराने काळ अंधाऱ्यापोटीच गिळली. तमाशातल्या नार सारखं हालणारं अंग मात्र ढेकळासारखं पावसाच्या थेंबाने जसं झिजतं तसं हळू हळू चार भिंतीच्या आतचं झिजायला लागलं. दु:खाचा डोंगर असताना देव मात्र चार-चार कोटीच्या महालात मज्जा बघत राहिलं. अंगठ्याने सही ठोकणाऱ्या अंगठाबहादुंराच्या काळजाच पाणी पाणी झालं. होय सगळ झाल पण त्यात माझं काय गेलं, होय सगळं झालं पण त्यात माझं काय गेलं.
मोठा कार्यक्रम होईल गळ्यात गळा घालून रडण्याची वेळ येईल, कोणी नाचण्यांसाठी तल्लीन होऊन नवीन कपड्याची तयारी करून जशी पिशवी घराच्या खिळ्यांवर अडकवलेली तशीच वाळवीने चाटलेली असावी. यांवर नावावरच हसायला लावणारा रोग माझ्या वयाला मात्र तसाच कोपऱ्यात ढकलून नाकाबंदी करत असावा.

काशिनाथ तांबे
स.प. महाविद्यालय पुणे

इतर रसदार पर्याय