Devil books and stories free download online pdf in Marathi

खविस


दिवाळीचा महिना. वाडा मावळात म्हणजे जाग्याला पोचलेला. कुळा नुसार गावच्या वाटण्या पडलेल्या, म्हंजी जागा. जसं, लव्ही मेरावने, वाजे घर पिप्री तोंड वरती कर. पिप्री गावच्या घराची तोंडं सुर्याच्या मावळत्या दिशेला होती म्हणून आम्हाला आमचे आजी आजोबा म्हणायला लावायचे, 'लव्ही मेरावण्यापासूनचा सगळा भूभाग हा आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी दिला आहे'. त्या जाग्यापासून ते पूर्वेला आस्कवडी गावापतोर मेंढ्यांना चारायला दिलेला पट्टा. धनगर गावोगाव आठ म्हयनं मेंढ्या चारत. शेवटाला, म्हंजे पावसाळा आला की हळूहळू आपापल्या गावाकडं चालतं व्हायचं. हे समद्या धनगरांचं दरसालचं ऋतु चक्रच.
डोंगर दऱ्यातून वाहणारी छोटीशी नदी, नदीच्या काठावर एक छोटी वाडी, राजगडाच्या पायथ्याला वसलेली. गच्च झाडं झुडपांनी भरलेली वाडी, जणू पोटातूनच नदी वाहतेय. तसं ते निसर्गरम्य ठिकाण म्हणजे आजची आस्कवडी. त्या नदीच्या काठावर एकेरी वसलेली वाडी, त्याच वाडीच्या अवती भवती बाबु धनगराच्या मिंढ्या जातीने मनमेळावु असणाऱ्या मराठ्यांच्या सहवासात गिरक्या घेत असत. कधीही दिवाळीतून वाडा निघाला, की तिथल्या लोकांना जणू सपनं पडायची. बाबु धनगराच्या मेंढ्या आल्या, रानं नांगरून मोकळी करायची आणि खतासाठी बसवून पोटाला चार पायल्या घालायची.
दिवाळीचा मयन्यात बाबु धनगर ठरल्यापरमानी मेंढ्या घेवून आस्कवडीच्या रानात बसायला गेला. नदीच्या आल्याड गाव आन् पल्याड मिंढ्या कोस दोन कोसावर आंदबाबाच्या माळावर बसायला व्हत्या. त्या दिसची रात्र सांगताना आजोबा सांगतात.
'भात्यानाचं रान, आनं त्या रानात माझ्या मिंढ्या बसायला हुत्या. चांगलं टिपूर चांदणं पडल्यालं. एकटाच वाडा घेवून बसणारा मी, मला कुणाचचं भ्या नव्हतं. पण त्या राती काय हुतं कुणास ठाऊक.
मी रोजच्यावानी पाजनी पाजली. कटाळेलो व्हतो, आलगला पडलो. आताशा पार आर्धी रात झालती. माझा डोळा लागायचा, त्या सुमाराला भयाण आक्रीत घडलं. हातात घुंगराची काठी आनं दुसऱ्या हातात कुऱ्हाड. ह्ये काळा गडी, दाडी-डोक्यानिशी क्यास माजलेलं. जनावरावानी माणूस मी माझ्या उघड्या डोळ्यानी बघतुय ना ! तोंडावर रघात फुटल्यालं, त्याला बघून मला धापच लागली. सपनं नव्हतं, पुरता जागा हुतो मी. हळूच हाक मारली -
"चिमेय, ये चिमेय."
"काय हो काय झालं ?" (माझी बायकु म्हणली)
"ये अगं, ईकडं बघ की !" मी ईवाळलुच
"आता रं देवा", चिमिनी बघितलं तसं तिच्या बी डोसक्यात मुंग्या गेल्या, बाई माणूसच ती.
तशीच घुंगराची काठी दणकुनी खाली आपाटली आनं गुंगराचा आवाज आला. आता मात्र आजूक भेदरलो.
द्यावाचा धाव करीत चिमी माझ्या गळ्यात पडली. कुणाला हाक मारावा, तं नदीच्या आड्याल कोण कसं येणार ? मोठ्यानी हाक मारली कुणी हाये का ? भेदरलेल्या घशातून आवाज बी निघंना.
गुंगराची काठी आपटीत पाच पावलं त्यो महाकाय माणूस पुढं आला. माणूस कसला ? जनवारच त्ये.
"आत्ता रं देवा !" चिमाबाई नी देवाचा धावा लंय सोडला नाय.
त्यो परत दन्कुनी गुंगराची काठी आपटून पाच पावलं माघं सरला.
"कोण रं गडी ?" म्हणून म्या जीव एकवटून हाक मारली
तसा त्यो तिकडून गुरगुर करीत काठी आपटाया लागला.
"काय मान पान आसंल, तं घे रे बाबा. पण आसलं चिन्न दाव नकुस बाबा."
त्योच दुसऱ्या हातातली कुऱ्हाड फिरवायला लागला.
आमच्या आंगाचा पार लटाट झालेला.
"चिमे काय गं करायचं ?" मी चिमीचा ठाव घेतला.
"देवा ! कसं रं आज आसलं पुढं उभं केलसं ?"
"चिमे, मिंढ्या राऊंदे बगलंनी. निघून जाऊ पड्याल."
"नकु वं मिंढ्याला मारल्याव आपलंच काय बी बऱ्हाण व्हायाचंय ? आपुन बी ह्यांच्यासंग मरायचं. काय नशिबात आसल तसं."
"आगं आज नाय उंद्या कमायला ईल."
"काय बी व्होऊंद्या, म्या हालणार न्हाय म्हंजी न्हाय"
"आगं आईक माझं एकदासं" आसं म्हणून मी ठाणाठाणा तोंडावर हाणून बोंब मारली आणं "ये देवाव काय रं करू आता !"
आसं म्हणून उभा रायाला लागलो. हाता पायाचा पार घळाटा झाला. डोक्याच्या आत मुंग्या वळावळा करू लागल्या.
त्योच त्यो काठी, आण कुऱ्हाड फिरु लागला. आन् पुढं बी सरकाया लागला.
ठासून उभा रायलेली माली कुत्री आण बाज्या कुत्रु आंगाव झेपा टाखायला लागले.
कुऱ्हाडीच्या तुंब्याचा जोरात फटका बाज्याच्या केपटात बसला तसाच बाजाच्या इव्हळत दोन कोलांट उड्या झाल्या.
त्ये पार वाघरं पशी आलं, आण पटकन याक कोकरं उचाललं आन् नरडीचा घोट घेतला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, तसाच मालीनी आंगाव झाप मारली. बाज्या गणिक मालीला बी जिव्हारी फटका बसला तसा तिचा जीव निघून गेला. चिमी तं पार धरणीला डोळं झाकून पडली, आन् पाणी-पाणी करू लागली. मी रांगत रांगत हांड्यापशी गेलू, आन् हाड्यातलं पाणी घेऊन माघं फिरलू. तसाच माझ्या मागं कोकऱ्याचं म्हडं !
आता सगळंच संपलं म्हणून मी परत खाली बसलू.
"चिमे घाबरू नकुस. काय हुईल ते हुईल", मी दाटूनच धीर एकवटीत चिमीला म्हणलो. पटकून हाऱ्याच्या बाजूला झ्याप मारली आन् हाऱ्यातला गुलाल बाहेर काढला. गुलाल हाताव घेतला आन् देवाचं नाव घेऊन फुकार मारली. गुलाल उधळला तसा, चिर्रर्र करीत त्यो सैतान जळून गेला. आन् म्या माझ्या जित्या डोळ्यानी त्याला जळताना बघीतला !'
हे सांगतांना बाबाच्या चेऱ्यावरचा भाव मला स्पष्ट दिसत होतं. बाबा सांगतच रायले -
जीवात जीव आल्यावणी मी हळूच म्हणलो, "ये चिमेय, गेलं चिन्न गेलं !"
तटकूनी थरथरच चिमी उभी रायली आन् कपाळाला गुलाल फासला. देवाचं गाऱ्हाणं गाऊ लागली. चिन्न गेलं तरी रातभर त्यो सैतान डोळ्यासमोर व्हता.

रात डोळ्यानी उजाडली तशी सकाळी मी गावात गेलु आन् घडलं समदं लोकास्नी सांगितलं.
"बाबु नाना, आरं रांडच्या तु वाचलास ! सक्याच्या नाम्याचा नरडीचा घोट घेतला हुता त्यानी."
"आयला बाबु नाना, तुया संगतीला लगा देव हाय म्हणून वाचलास !"
"तरी मी काल म्हणायचु होतो, बाबु नाना नदीच्या पड्याल गेला वाटतं, पण आता तुझं रोजचचं राहणं वागणं. आमच्या नाय लगा पोटात आलं. खविसाचा येढा येतो बाबा कव्हा तरी." त्या सैतानाला गावचे लोक खविस म्हणत व्हते.
"चिमी कशी हाये ?" चल चल म्हणून गावातली तिशाक माणसं वाड्यात आली. चुलीपशी टाकलेलं कोकऱ्याच म्हढं उचलून बाजूला ठेवलं.
मालीचा (कुत्रीचा) डोळा आभाळाला भिडसावत हुता.
म्हडं बघून गावकरी चित पडले. लोकांनी तिथला वाडा उठवला आन् आस्कवडीच्या माघं निऊन टेकावला.'
"मग तुम्ही देव कधी पाहीलाय का ?"
मग म्हातारं सांगू लागलं, "व्हय ! गुलाला मंदी देव दिसला. आन् साक्षात भूत बी दिसलं. मी बाबा दोघंही बघितली" म्हणून म्हातारं जरासं हासलं. "हीच माझी मोठी परवड होती, तवापासन मला आसलं काय नाय दिसलं."
हे सगळं सांगताना म्हाताऱ्याच्या आंगावर तटातटा काटा उमटत होता. डोळ्यात पाणी बी व्हतं. आजच्या विज्ञान युगात अशा गोष्टीचं आपल्याला नक्कीच खरं वाटणार नाही परंतु अशा काही गोष्टी पन्नास वर्षाच्या मागे घडल्या आहेत, त्याचा पाठपुरावा नव्याने मुळीच करता येणार नाही. गावकऱ्यांच्या साक्षीस या सगळ्या गोष्टी टेकल्या होत्या, तरीही विज्ञानच चंद्रावर असं म्हणून आपण पावले उचलत असतो. अर्थात, हे मला विज्ञानाच्या दृष्टीने थोतांड जरी वाटत असलं तरी त्यांच्या नजरेतून मला खरंच दिसत होतं. गावोगाव, रानोमाळ शेकडो मेंढ्यांचे वाडे टाकत धनगरांना मुक्काम ठोकावा लागतो. रात्रीच्या अंधारात रानातले हिंस्त्र प्राणी बाहेर पडतात. एवढ्या मेंढ्यांसह स्वतःच्या आणि सोबत पोरंबाळं असतील तर त्यांचाही जीव मुठीत ठेवून धनगरांचा हा मुक्काम, वर्षानुवर्षांचा. या भयाण एकांत रात्रीत या धनगरांच्या वाड्याचा वाली देवच ! तोच त्यांचा आधार होता आणि आहे. देवाच्या नावाने, देवाच्या गुलालाले धनगरांना धीर येतो. आणि अशा ज्वलंत घटना ऐकलं की भुताखेतांच्या, देवाच्या, थोतांड गोष्टींवर विश्वास न ठेवणारे आपण विज्ञानवादी फक्त देव नावाच्या अदृश्य गोष्टीवर विश्वास ठेवावा की नाही ? या प्रश्नाचं उत्तर शोधत राहतो. कदाचित विज्ञान सुद्धा हारत असेल ! अशा वेळी अस्तित्वाचा प्रश्न म्हणून या देव लांबच्या अज्ञात शक्तीवर विश्वास ठेवायला भाग पडतं.

काशिनाथ तांबे
स.प. महाविद्यालय पुणे

इतर रसदार पर्याय