mayajaal - 14 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल - १४

मायाजाल - १४
इंद्रजीत अचानक् येतो काय--- कायमचा लंडनला जाणार असल्याचं सांगतो काय---- आणि ठरलेलं लग्न मोडल्याचं सांगून तिचा एक शबदही ऐकून न घेता निघून जातो काय--- जे घडलं, ते स्वप्न की सत्य; हेच प्रज्ञाला कळत नव्हतं. काही क्षणांत तिचं जग बदलून गेलं होतं. प्रज्ञाकडे इंद्रजीतने कोणताच खुलासा केला नव्हता; किंवा तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा एवढा मोठा निर्णय घेताना तिला काही विचारण्याची किंवा बोलण्याची संधीही दिली नव्हती. ती भानावर येऊन काही बोलण्यापूर्वीच वा-यासारखा निघून गेला होता!
बराच वेळ इंद्रजीत ज्या दिशेने गेला तिकडे थिजलेल्या नजरेने पाहत ती हताशपणे बसली होती. ती एकच प्रश्न स्वतःला विचारत होती; की "माझ्याकडून अशी काय चूक झाली; की एवढी मोठी शिक्षा जीतने मला दिलीय? " दिवस मावळला ; रात्र झाली तरीही ती गुंगीत असल्याप्रमाणे एकाच जागी बसून होती; घरात दिवा लावायचं भानही तिला राहिलं नव्हतं.
नीनाताई आणि निमेश खरेदीसाठी गेले होते. यायला त्यांना थोडा उशीरच झाला. परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं की घरात अंधार होता आणि दरवाजा उघडा होता.
" प्रज्ञाचा अभ्यास करता करता डोळा लागला वाटतं! अशी कशी ही वेंधळी? दिवेलागणीची वेळ आहे याचंही भान नाही; दिवा लावला नाही! दरवाजासुद्धा उघडा आहे; कोणी घरात घुसलं असतं तर?" नीनाताई बडबड करतच घरात आल्या.
त्यांनी आत जाऊन लाईट लावला; आणि प्रज्ञाची अवस्था बघून त्या घाबरूनच गेल्या! प्रज्ञा सोफ्यावर बसली होती. तिचे डोळे उघडे होते पण निर्जीव वाटत होते. आई आणि निमेश घरात आलेयत याचाही तिला पत्ता नव्हता. चेहरा पांढराफटक पडला होता. तिला कसलंच भान नव्हतं.---- डोळे रडून लाल झाले होते. चेह-याची रया बदलून गेली होती.
नीनाताईंनी तिला हलवलं आणि विचारलं,
" अगं प्रज्ञा काय झालं? तू अशी का बसलीयस? तुझी तब्येत बरी आहे ना?" निमेशकडे वळून त्या म्हणाल्या,
" निमेश! लवकर पाणी घेऊन ये! आत जाताना पंखा लाव! बघ किती घाम आलाय हिला! आपण निघालो तेव्हा किती आनंदात होती! "लग्नासाठी चांदीची भांडी घ्यायची आहेत! तू सुद्धा चल" म्हटलं; तर म्हणाली, "तू तुझ्या पसंतीची आण! मला वेळ नाही! परीक्षा जवळ आलीय!" माझंच चुकलं! हिला बरोबर घेऊन जायला हवं होतं!"
निमेशने आणलेलं पाणी त्यांनी तिच्या चेह-यावर शिपडलं; तेव्हा प्रज्ञा भानावर आली पण काही उत्तर न देता आईला मिठी मारून रडू लागली. आईने तिला शांत केलं. तिला थंड पाणी प्यायला दिलं. हळुवरपणे त्या तिच्या मस्तकावर हात फिरवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागल्या. नक्की काय झालंय; हे त्यांना अजूनही कळत नव्हतं.
" प्रज्ञा! एवढं काय झालंय मला सांगशील का? तू सांगितल्याशिवाय मला कसं कळणार?
नीनाताईंच्या या प्रश्नावर प्रज्ञा अधिकच रडू लागली
ती हुंदके देत म्हणाली,
"आई! तू माझ्या लग्नासाठी खरेदीला गेली होतीस नं? आता त्या तयारीचा काहीच उपयोग नाही! माझं लग्न मोडलं!"
तिच्या या बोलण्यावर आश्चर्याने नीनाताई म्हणाल्या,
" लग्न मोडलं? कसं? आणि का? कोण आलं होतं? "

"आई! स्वतः जीत येऊन हा "लग्न मोडलं!" सांगून गेला! तो निघून गेलाय! खूप दूर... लंडनला! परत कधी येईल काही सांगता येत नाही! बहुतेक येणारच नाही; असं म्हणालाय! आई! मी फसवले गेले ग! काय करू मी आता?"
"त्याला लग्न म्हणजे खेळ वाटला का? की मनात आलं की मोडलं?" नीनाताई चिडून म्हणाल्या. पण खरोखर काय घडलंय; याचा त्यांना काहीच उलगडा होत नव्हता.
पण त्यांनी जास्त काही विचारलं नाही. आता प्रज्ञाला शांत राहू देणं आवश्यक होतं. प्रज्ञाला थोपटताना त्या मनाशी म्हणत होत्या,
" स्नेहलताईंना नक्की काय झालं; विचारलं पाहिजे. तो उद्या रात्री जाणार आहे; त्यापूर्वी सकाळीच त्यांच्यासमोर इंद्रजीतला गाठून जाब विचारावा लागेल! रात्र झाली आहे!! नाहीतर मी आताच त्यांना जाऊन भेटलेअसते!"
" त्याच्या बोलण्यावरून त्याच्या आई-वडील बाबांनाही त्याने विश्वासात घेतलं असेल असं वाटत नव्हतं! तू त्यांना काही वेडंवाकडं बोलू नकोस! माझ्यापेक्षाही जास्त धक्का कदाचित् त्यांना बसला असेल! दोघांनाही हाय ब्लडप्रेशर आहे! त्यांची तब्येत बिघडायला नको!"
"पण त्यांना फोन करावाच लागेल! अविनाश आणि स्नेहलताईंना यातलं काहीही माहीत नसेल; याची खात्री मला आहे. मी त्यांना काही वावगं बोलणार नाही!" नीनाताईंनी आश्वासन दिलं.
त्यांना आश्चर्य वाटत होतं; की स्वतः एवढ्या दुखाःत असतानाही इंद्रजीतच्या आई-वडिलांची काळजी प्रज्ञाला वाटत होती! त्या मनाशी विचार करत होत्या ;
"इतका जीव लावणा-या मुलीला लाथाडणारा तो इंद्रजीत किती दुर्दैवी आहे!"
नीनाताईंनी जीतच्या घरी फोन केला. स्नेहलताई फोनवर होत्या. नीनाताईंनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली,
" तुम्ही लवकर मुहूर्त काढा म्हणालात; मी आजच गुरुजींना भेटून आले! थोडी लग्नासाठी खरेदीही केली! इंद्रजीतचं लंडनला जायचं एवढं अचानक् कसं ठरलं? तो मुहूर्ताला परत येऊ शकेल नं?
यावर स्नेहलताई रडवेल्या आवाजात म्हणाल्या,
” आपण ठरवलेल्या सगळ्या बेतांवर पाणी पडलं; नीनाताई! खरं म्हणजे त्याचा कोर्स पुढच्या महिन्यापासून चालू होणार आहे. पण तो एवढ्या लवकर घाई का करतोय हे मलाही कळत नाहीये! बरं-- लग्नासाठी परत कधी येणार विचारलं--तर उत्तर देत नाही! प्रज्ञाला तरी त्यांने काही सांगितलं का? दोघांचं काही भांडण तर झालं नाही? मी विचारलं तर त्यानं उडवाउडवीची उत्तरे दिली. या मुलाच्या मनात काय चाललंय काही कळत नाही... खरं म्हणजे मीच तुमच्याकडे चौकशी करणार होते. त्याचे वडील बाहेरगावी गेलेयत! त्यांनाही न भेटता जाणार म्हणतोय! ते परत आले, की त्यांना किती वाईट वाटेल? तो कोणाचाच विचार करत नाही! मला तर काही सुचेनासं झालंय"
इंद्रजीतच्या आईच्या मनातली उलघाल तिच्या आवाजात स्पष्ट दिसत होती. मुलाचं लग्नाची स्वप्न बघणा-या त्या माऊलीच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला होता. तिला दोष देऊन काय उपयोग होता?
"इंद्रजीतची उद्या भेटला; की त्याची चांगली कानउघाडणी करायला हवी!" नीनाताई मनाशी म्हणाल्या
अनिरूद्ध आणि नीनाताई शेवटचा प्रयत्न म्हणून दुस-या दिवशी इंद्रजीतच्या घरी गेले; पण त्यावेळी तो खरेदीसाठी बाहेर गेला होता. दोघांना बघून त्याच्या आईचा चेहरा रडवेला झाला. डोळ्यात पाणी आलं! तिला समजावायला दोघांकडे शब्द कुठे होते?
"त्याचे वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत! ते इथे असते; तर त्याला अशी मनमानी करता आली नसती! हा जाणार आहे; याची त्यांना पुसटशीही कल्पना नाही! आता ते घरी आले की घर डोक्यावर घेतील! तब्येत बिघडली तर आता माझ्याबरोबर मदतीलाही कोणी नाही! मला आतापासूनच एकाकी वाटायला लागलंय! आणि ती निरागस मुलगी-- प्रज्ञा-- तिचा तरी थोडा विचार करायला हवा होता की नाही?" ती डोळ्यात पाणी आणून बोलत होती!
तिला ती दोघं काय समजावणार होती? त्यांनी स्वतःचा राग कसाबसा काबूत ठेवला होता. कदाचित् इंद्रजीत भेटला असता; तर त्यांनी जाब विचारला असता, त्याला समजावून सांगून, त्याचं जाणं रद्द करायला भाग पाडलं असतं, किंवा लग्नासाठी परत यायचं त्याच्याकडून कबूल करून घेतलं असतं! पण तो भेटला नव्हता आणि त्याच्या आईशी बोलून काही उपयोग होईल; असं दिसत नव्हतं.
"आम्ही संध्याकाळी परत येतो!" म्हणून दोघं निघाली.
संध्याकाळी ती दोघं घरी जाण्यापूर्वीच इंद्रजीत एअरपोर्टवर निघून गेला होता. त्यांना फोन करण्याचं, किंवा भेटण्याचं धाडस त्याच्यात नव्हतं. त्याला समजावणं आता अशक्य होतं!
इंद्रजीत निसटून जाण्यात यशस्वी झाला होता!
********
इंद्रजीत ठरवल्याप्रमाणे लंडनला निघून गेला. लंडनला स्वतःचं घर असल्यामुळे सुट्टीत तो अनेक वेळा जात असे; त्यामुळे तिकडे त्याच्यासाठी नवीन काही नव्हतं. काॅलेज सुरू व्हायला अजून महिना होता; पण भरपूर वेळ असूनही तिकडे गेल्यावर त्याने प्रज्ञाला फोन केला नव्हता. जणू काही तो मनानेही तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होता---- मोहपाश तोडून टाकण्याचा प्रयत्न करत होता.
प्रज्ञा धक्कयातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करू लागली होती. ती फक्त स्वतःच्याच नाही; तर इंद्रजीतच्या दृष्टीकोनातून विचार करत होती. " इंद्रजीतचं प्रेम इतकं तकलादू नव्हतं! असं काय घडलं की तो माझं प्रेम लाथाडून-- ठरलेलं लग्न मोडून निघून गेला! फक्त विचार करून काही उपयोग नाही; त्याच्याशी बोलून विचारून घेतलं पाहिजे!" आणि तिने मनाशी ठरवून टाकलं; "मान अपमानाचा विचार करायचा नाही! इंद्रजीतशी संवाद साधायचा! नक्की काय झालंय; विचारून घ्यायचं."
********** Contd. -- part 15

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED