मायाजाल - १५
इंद्रजीत प्रज्ञाला "मी कायमचा लंडनला रहाणार आहे!" परत कधी येईन सांगू शकत नाही" म्हणाला; तेव्हा ती दिङमूढ झाती; तिची विचारशक्ती काम करेनाशी झाली होती. अनपेक्षित संकटाने ती खचून गेली होती. एखादा आठवडा याच मनःस्थितीत निघून गेला. हळू हळू ती सावध होऊ लागली. आणि काही प्रश्न तिच्या मनात घर करू लागले.
"दोन वेळा जीतला एकटा गाठून मारझोड करण्यात आली; एकदा गाडीचे ब्रेक फेल करण्यात आले , प्रत्येक वेळी त्याला माझ्यापासून दूर रहायला सांगण्यात आलं; तरीही तो डगमगला नव्हता. माझ्यापासून दूर जाण्याचा विचारही कधी त्याच्या मनात आला नव्हता. उलट प्रत्येक वेळी त्यानेच मला धीर दिला होता. मग अचानक् त्याचं मन इतकं कसं बदललं? हर्षदने आत्महत्येचा प्रयत्न केला; आणि त्यानंतर सगळी चक्रं उलटी फिरली. कदाचित इंद्रजीत मानसिक दडपणाखाली असेल! नक्की कुठेतरी पाणी मुरतंय! पण हर्षदला विचारण्यात काही अर्थ नाही; कारण या सगळ्यामागचा सुत्रधार तोच आहे! इंद्रजीतलाच फोन करून विचारून घ्यावं लागेल!
इंद्रजीतच्या असामान्य व्यक्तिमत्त्वाचे इतके पैलू तिने पाहिले होते, की त्याच्या वागण्याने ती दुखावली होतीं; पण अजूनही तिचं मन तिला सांगत होतं, की इंद्रजीतच्या वागण्यामागे काहीतरी मोठं कारण असणार! निघताना त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू ती विसरू शकत नव्हती.
इंद्रजीतचा फोन नंबर घेण्यासाठी प्रज्ञा एक दिवस त्याच्या 'वेदांत' बंगल्यावर गेली.
प्रज्ञाकडे पाहून इंद्रजीतच्या आईलाही गलबलून आलं, एका आठवड्यात प्रज्ञाची तब्येत पूर्ण खालावली होती --- चेहरा निस्तेज दिसत होता! चेह-यावर कृत्रिम हास्य होतं,
" ही प्रज्ञा लाखात एक मुलगी आहे हिला सोडून जावं असं जीतला का वाटलं असेल? ही जर माप ओलांडून घरात आली असती तर तिच्या पावलांनी घर उजळून गेलं असतं. पण आमचं तेवढं नशीब नाही असंच म्हणावं लागेल. ही इतकी सुस्वभावी आहे; की तिचं काही चुकलं म्हणून रागाने तो निघून गेला असेल; ही गोष्ट अशक्यप्राय आहे. कोणाची तरी नजर लगली; आणि इंद्रजीतला दुर्बुद्धी सुचली."
ती मनातल्या मनात स्वतःच्या नशिबाला दोष देत होती; पण आपलं दुःख चेहऱ्यावर न दाखवता प्रज्ञाला धीर देण्याचा प्रयत्न करू लागली.
" प्रज्ञा! तुझी तब्येत इतकी का खालावलीय बाळा? इंद्रजीतचं लंडनला निघून जाणं खूप मनाला लावून घेतलंस नं? घाबरू नको! सगळं काही नीट होईल. आपल्याला सोडून जीत फार दिवस राहू शकणार नाही. नक्कीच तो लवकरच परत येईल." पण हे म्हणताना तिच्या स्वरात मात्र आत्मविश्वास दिसत नव्हता.
"तुम्हीसुद्धा स्वतःला सांभाळा! किती अशक्त दिसताय! तुम्ही स्वतःला सांभाळलं नाही; तर बाबांकडे लक्ष कोण देणार? ते त्यांचं दुःख कोणाला सांगूही शकत नाहीत!" प्रज्ञा काळजीने म्हणाली.
"मला जीतशी थोडं बोलायचं आहे. त्याचा तिकडचा फोन नंबर मला मिळेल का?" तिने स्नेहलताईंना विचारलं.
"त्याचा मोबाईल नंबर त्याने अजून सांगितला नाही! पण आमच्या घराच्या लँडलाइन नंबरवर त्याला फोन लाव! अजून काॅलेज सुरू व्हायला वेळ अाहे, तो घरी नक्कीच भेटेल! त्याला थोडं समजावून सांग! बघ तुझं तरी ऐकतोय का? मी ब-याच वेळा प्रयत्न केला; पण तो विषय बदलतो. नीट काही सांगत नाही. तिकडे घर आहे; पण एकटा कसा रहात असेल? जेवणा- खाण्याचं काय करत असेल? काहीच कळत नाही! त्याची खूप काळजी वाटते!"
स्नेहलताईची अगतिकता बघून प्रज्ञाला वाईट वाटत होते; पण ती वर-वर हसत म्हणाली,
"हो! नक्की सांगते त्याला! काळजी करू नका!"
फोन नंबर घेऊन प्रज्ञा निघाली.
"अधूनमधून येत रहा बाळ! तुला पाहिलं आणि खुप बरं वाटलं!" स्नेहलताई मनापासून म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी प्रज्ञाने जीतला फोन केला. तिच्याकडून ती त्यांचं नातं वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करत होती. त्याचा एकंदर नूर आठवला, की आपला प्रयत्न किती यशस्वी होईल, या विषयी ती मनातून साशंक होती, पण इंद्रजीतशी संवाद साधणं महत्वाचं होतं. आज तो कसा प्रतिसाद देतो; यावर सगळं भवितव्य अवलंबून होतं. आपण अगदी सहज फोन केला असं दाखवत ती म्हणाली,
" कसा आहेस तू जीत? तुझा अभ्यास कसा चाललाय? तुझं काॅलेज चालू झालं का?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर न देता तो चिडून म्हणाला,
" तुला इथला फोन नंबर कोणी दिला? "
"तुझ्या आईकडून घेतला! तू अचानक् निघून गेलास! नीटपणे काही बोलला नाहीस! तिकडे गेल्यापासून मला एकदाही फोन करायला तुला वेळ मिळाला नाही; म्हणून शेवटी मलाच फोन करावा लागला!" ती त्याचा राग कळला नाही असं भासवत होती. ती पुढे म्हणाली.
"त्यावेळी मला एवढा धक्का बसला होता, की तुला काही विचारू शकले नाही! काय झालंय ते मला जरा नीट सांगशील का? तुझी आईही खूप काळजीत आहे! लग्नाचं टेन्शन ती घेऊ नकोस! तुझा प्रॅजेक्ट पूर्ण होई पर्यंत थांबू आपण! पण माझ्याशी नीट बोल तरी! नक्की काय झालंय ते सांगितलंस तर नक्कीच उपाय शोधता येईल! " प्रज्ञा काकुळतीला येऊन बोलत होती.
" मी इथे कशासाठी आलोय; हे तुला मी तेव्हाच सांगितलंय! आणि माझे प्राॅब्लेम्स सोडवायला मी समर्थ आहे! मला इथे खूप काम असतं. उगाच फोन करून डिस्टर्ब करत जाऊ नकोस." तिला झिडकारल्याप्रमाणे जीत बोलत होता. जणू काही आपण प्रज्ञाशी जर जास्त बोललो तर परत तिच्या मोहात गुंतण्याची शक्यता आहे; असं त्याला वाटत होतं.
"आता माझ्या बोलण्याची तुला अडचण वाटू लागली? माझ्याशी बोलायला मिळावं म्हणून काहीतरी निमित्त काढून तूच घरी येत होतास नं? तिकडे जाऊन इथलं सर्व काही विसरलास? अचानक् एवढा कसा बदललास तू?" प्रज्ञा रागाने म्हणाली. तिच्या सहनशक्तीलाही मर्यादा होत्या.
" लवकरच आपलं लग्न होणार होतं; हे सुद्धा तू विसरलेला दिसतोयस!" ती पुढे म्हणाली.
"मी तुला मागेच सांगितलंय; आज परत सांगतो--- मला इथून लवकर परत येता येणार नाही. लग्नाचा विषय मी कधीच मनातून काढून टाकलाय! आपलं लग्न मोडलं असंच समज! माझी वाट पाहू नकोस! चांगला मुलगा शोध आणि सुखात रहा!" हे बोलताना हे बोलताना जीतच्या घशात आवंढा अडकत होता. शब्द बोलणं त्याला अवघड जात होतं. पण त्याने प्रज्ञाला आयुष्यातून बाजूला करण्याचा निर्णय घेतला होता. आणि हे तिला स्पष्ट शब्दात सांगणं आवश्यक होतं.त्याला आता गुंतागुंत नको होती.
" तू असं कसं बोलू शकतोस? तू मला यंत्र समजला आहेस का? प्रेमाच्या आणाभाका तू कसा विसरलास? तुला हवं होतं तेव्हा प्रेमाचं जाळं विणलंस; मला अडकवलंस आणि आता स्वतःला मुक्त करून स्वैर उडू पाहतो आहेस! खरंच ! तुला मी ओळखू शकले नाही." प्रज्ञाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. तिचं डोकं सुन्न झालं होतं.
" मला शेवटचा भेटलास त्यापूर्वी --- दोन दिवसां आधी, तू माझ्यासाठी कोणतंही संकट झेलायला तयार होतास! मधे असं काय झालं? तू एवढा कसा बदललास?" ती तिला अनेक दिवस सतावणारा प्रश्न जीतला विचारत होती.
इंद्रजीतने तिच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही,
" प्रज्ञा! तू सुंदर आहेस - हुशार आहेस तुला माझ्या पेक्षाही चांगला जोडीदार मिळेल. मी भारत सोडून आलो आहे तो परत न येण्यासाठी! माझी वाट पाहू नकोस! माझ्यामुळे तुझ्या भावना दुखावल्या गेल्या, यासाठी मला माफ कर. आणि मला परत फोन करून माझा वेळ घेऊ नकोस! " भावनाहीन स्वरात तो बोलत होता.
प्रज्ञाला काही बोलण्याची संधी देण्यापूर्वीच त्याने फोन ठेवून दिला.
तो त्याच्या निर्णयावर ठाम आहे! त्यानं नातं तोडायचा निश्चय केला आहे; हे प्रज्ञाच्या आज लक्षात आलं होतं. सत्य कितीही कडू असलं; तरी स्वीकारणं भाग होतं. इंद्रजीतला तिने कायमचं गमावलं होतं! तिने रडू कसं बसं आवरलं होतं. यापुढे त्याला फोन करून स्वतःचा अपमान करून घ्यायचा नाही; हे तिने मनाशी ठरवून टाकलं.
*********
हर्षद बरा होऊन लवकरच घरी आला. इंद्रजीत लंडनला निघून गेल्याची बातमी त्याला कळली. आता जीत त्याच्या मार्गातून दूर गेला होता. त्याचा हेतू साध्य झाला होता. मनोमन आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. त्याने आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांना यश आलं होतं. “आता प्रज्ञाला माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही!” याची त्याला खात्री होती प्रज्ञाच्या मनातून इंद्रजीतला हद्दपार करून स्वतःची जागा कशी बनवायची याच्या योजना तो आखू लागला होता..
******* contd --- part १६