मायाजाल - १७ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मायाजाल - १७

मायाजाल- १७
त्या दिवशी संध्याकाळी प्रज्ञा खूप दमून घरी आली होती. दिवसभर प्रॅक्टिकलसाठी उभी राहून तिचे पाय गळून गेले होते. नीनाताईंनी तिच्या हातात वाफळणारा काॅफीचा कप दिला आणि काही खरेदीसाठी मार्केटला गेल्या. दिवसभरच्या दगदगीनंतर गरम काॅफी पीत बसणं-- बाहेरचा गुलाबी संधिप्रकाश---प्रज्ञाचं मन प्रसन्न झालं होतं. पण हृदयाची किमया अशी; की त्या कातरवेळी तिला इंद्रजीतची आठवण प्रकर्षाने होऊ लागली. तो आता इथे हवा होता; असं वाटायला लागलं.
त्याच वेळी तिला दरवाजाच्या चौकटीत एक आकृती दिसली. तिथे इंद्रजीत उभा आहे असा भास तिला झाला!
"जीत! तू खरंच आलायस? हा भास तर नाही? बघ! शेवटी तुला यावंच लागलं! प्रेमाचे धागे इतके कच्चे नसतात; की कोणत्याही लहानशा कारणाने तुटतील!" ती आवेगाने उठून उभी राहिली.
त्या व्यक्तीने लाइट लावला. लख्ख प्रकाशात प्रज्ञाने पाहिलं, की तिच्यासमोर इंद्रजीत नाही; हर्षद. उभा होता.
"मी इंद्रजीत नाही! हर्षद आहे! इंद्रजीतची तू अजून वाट बघतेयस? तो परत येण्यासाठी गेलेला नाही!" हर्षद तिच्या समोर खुर्चीत बसत म्हणाला. प्रज्ञाच्या मनातून अजून इंद्रजीतचं प्रेम कमी झालं नाही हे तिच्या बोलण्यावरून त्याच्या चागलंच लक्षात आलं होतं; त्यामुळे तो वरकरणी हसत बोलत होता पण मनातून चिडला होता.
"तो परत येणार नाही, हे तुला कसं माहीत? तो गेला, तेव्हा तर तू हाॅस्पिटलमध्ये होतास! तो जाण्यापूर्वी तुला भेटला का?" प्रज्ञाने कदाचित् तो खरं काय घडलं हे सांगेल; या अपेक्षेने विचारलं. त्याचं बोलणं ऐकून इंद्रजीतच्या लंडनला जाण्यामागे हर्षद असावा; ही तिच्या मनातली शंका दृढ झाली होती.
"मी तुला इंद्रजीत किती उछृंखल आहे; हे अनेक वेळा सांगितलं होतं. पण तू तेव्हा लक्ष दिलं नाहीस." प्रज्ञाच्या प्रश्नाला बगल देत हर्षद म्हणाला.
"त्याचा स्वभाव उथळ कधीच नव्हता! आणि तो आमच्या प्रेमाच्या बाबतीत सिरियस होता हे मला नक्की माहीत आहे. पण अचानक् त्याचं मन का पालटलं, हे तुला माहित असायला हवं! जिवाचा मित्र आहे नं तो तुझा? तुला त्यानं नक्कीच काहीतरी सांगितलं असेल!" प्रज्ञाने मनातली शंका परत विचारली.
" मला असं वाटतं; तुमचं लग्न इतकं अचानक् ठरेल याची त्याला कल्पना नसावी; आणि नंतर कायम बंधनात रहावं लागेल म्हणून घाबरला बहुतेक! काही तरी पळवाट हवी, म्हणून लंडनच्या कोर्सचं निमित्त सांगितलं त्याने!" प्रज्ञाची नजर चुकवत हर्षद म्हणाला.
तो नजर चुकवतोय, त्याअर्थी काहीतरी लपवतोय याची प्रज्ञाला खात्री पटली. पण त्याच्याकडून वदवून घेणं तितकंसं सोपं नव्हतं.
"त्याने तुला फोन तर नक्कीच केला असेल! आणि तूही काँटॅक्ट करत असशीलच! कसा आहे तो?" इतकं सगळं होऊनही प्रज्ञा इंद्रजीतची खुशाली विचारतेय; याचा हर्षदला मनातून राग आला होता पण वरकरणी तो म्हणाला,
"छे! तिकडे गेल्यापासून त्याने मला एकदाही फोन केला नाही!"
' मी इंद्रजीतला इतका मानसिक त्रास दिला, की त्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी त्याने सगळ्यांपासून दूर जायचं ठरवलं ' हे खरं कारण तो प्रज्ञाला सांगू शकत नव्हता! एकमेकांशी बोलण्यासारखं त्या दोन मित्रांमध्ये काही राहिलं नव्हतं! इंद्रजीतने मित्रासाठी त्याग केला होता; पण मैत्री मात्र संपुष्टात आली होती.
"मग कसले तुम्ही जिवलग मित्र?" त्याला थोडं चिडवल्यावर तरी तो काहीतरी बोलेल; या अपेक्षेने प्रज्ञा हसत म्हणाली.
पण तितक्यात नीनाताई आल्या आणि पुढे त्याला काही विचारणं तिला शक्य झालं नाही.
*******
फायनल एम. बी. बी. एस. ची परीक्षा प्रज्ञाने उत्तम दिली होती. आता काही दिवस तरी तिला मोकळे मिळणार होते. म्हणजेच इंद्रजीतचे विचार सतत तिला सतावणार होते! तिने ठरवलं--- स्वतःला सतत काही ना काही कामात गुंतवून घ्यायचं.
ती आता सुरेखाबरोबर --तिच्या काॅलनीतल्या मैत्रिणीबरोबर सुट्टीची मजा घेऊ लागली. दोघींचा रोज नवीन कार्यक्रम ठरत होता---नाटक - सिनेमा- फिरणं -- इतर वेळी आईला मदत करत होती. निमेशचा अभ्यास घेत होती. पण इतकं करूनही एकांतात मात्र जीतच्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. नकळत डोळे भरून येत होते. मनाला कितीही समजावलं तरीही इंद्रजीतला विसरणं सोपं नव्हतं; कारण इतकं सगळं होऊनही तिच्या मनातला त्याच्याविषयीचा आदर कमी होत नव्हता. त्याच्या वागण्याचा राग येत होता-- दुःख होत होतं; पण त्याचा तिरस्कार वाटत नव्हता. इंद्रजीत खूप चांगला माणूस आहे; त्याने लग्न मोडलं-- प्रेमाची किंमत ठेवली नाही; पण या सगळ्याच्या पाठीशी काहीतरी मोठं कारण असणार; याविषयी तिला खात्री होती.
********
एके दिवशी संध्याकाळी अनिरुद्ध घरी आले; ते खूप आनंदात होते.
" मी जे काही तुला सांगितलं त्याचा मान तू ठेवलास. छान अभ्यास करून परिक्षा दिलीस! आता रिझल्टची काळजी मला नाही! तुझ्यासाठी मी खास काही घेऊन आलोय!" त्यांनी बँगलोरची तिकिटं हसत - हसत तिच्या हातात ठेवली; आणि म्हणाले,
" आपण सगळे पुढच्या आठवड्यात बँगलोरला जातोय! मी पंधरा दिवसांची रजा काढलीय! निमेशच्या शाळेलाही आता सुट्टी पडेल. फक्त बँगलोर नाही! उटी म्हैसूर, कोडाइकनाल--- सगळीकडे फिरणार आहोत आपण! तुझ्या आईलाही तिकडची हवा मानवेल. तब्येत लवकर सुधारेल! "
प्रज्ञाचं लग्न मोडलं; ही गोष्ट नीनाताईंच्या मनाला लागली होती. प्रज्ञाने जरी दाखवलं नाही; तरी ती मनात कुढतेय; आपण तिच्यासाठी काही करू शकत नाही या जाणिवेने त्यांची प्रकृती गेले काही दिवस खालावली होती. त्या नीट जेवत नव्हत्या, त्यामुळे खूप अशक्त झाल्या होत्या.
"पण तुमची रजा पंधरा दिवस. आहे आणि ही परतीची तिकिटं महिन्यानंतरची आहेत! तुम्ही नंतर रजा वाढवणार आहात का?" प्रज्ञाने तिकिटांवरची तारीख पहात विचारलं.
" मी पंधरा दिवसांतच परत येणार आहे! येताना तुम्ही तिघं काही दिवस हुबळीला तुझ्या मीना मावशीकडे रहा. एवढ्या लांब आपलं क्वचितच जाणं होतं! आपण इतक्या जवळ जातोय, तर तुम्ही तिघं तिला भेटून या!! संजू - राजूलाही आता रजा पडली असेल! शिवाय दोघी बहिणी अनेक दिवसांनी भेटतील! एकमेकींकडे मन मोकळं करतील; आणि नीनालाही बरं वाटेल आणि तुझ्या मावशीलाही! ती सुद्धा सगळं एकटी निभावून नेतेय! परिस्थितीशी दोन हात करतेय! तिलाही तुम्ही काही दिवस तिच्याबरोबर राहिलात; तर बरं वाटेल! जर तुमच्याबरोबर यायला तयार झाले, तर रजा असेपर्यंत तिघांना इकडेच घेऊन या!" अनिरुद्ध म्हणाले.
प्रज्ञाच्या मनात विचार आला, " बाबा फक्त स्वतःच्या कुटुंबाचा नाही; मावशीचा आणि संजू- राजूचाही विचार करतायत! सगळ्यांच्या आनंदातच यांचं सुख सामावलेलं आहे; आणि आम्ही आजकालची मुलं फक्त स्वतःच्या भावना कुरवाळत बसतो! आमच्यासाठी "मला काय हवं"---हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं! इतरांचा विचार करण्याची आम्हाला गरजच वाटत नाही; पण कुटुंबासाठी जगण्यात जे कर्तव्यपूर्तीचं समाधान आहे; ते स्वतःचं सुख शोधण्यात पूर्ण आयुष्य घालवलं तरी मिळू शकेल का?"
********

हर्षद प्रज्ञाची टर्म संपण्याची वाटच बघत होता. ऑफिस मधून घरी येत असताना त्यांने पाहिलं होतं की, सुट्टी पडल्यापासून प्रज्ञा रोज संध्याकाळी मैत्रिणीबरोबर फिरायला जाते! त्याने ठरवलं होतं---" ती घराकडे परतत असताना तिला गाठून आपलं मन मोकळं करायचं--खूप वर्षे वाट पाहिली- आता तिच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करायला वेळ घालवायचा नाही, अगोदर तिचं मन जाणून घ्यायचं आणि मग घरी सांगून ; रीतसर मागणी घालायची!"
इंद्रजीतने लंडनला गेल्यापासून इथले सगळे संबंध तोडून टाकले होते! त्याच्याविषयी तिच्या मनातली प्रेमाची जागा आतापर्यंत संतापाने घेतली असावी याविषयी त्याच्या मनात शंका नव्हती. आपल्या वाक्चातुर्याने आपलं प्रेम तिला पटवून देऊ; आणि प्रेमाचा स्वीकार करायला लावू याची खात्री त्याला होती. प्रज्ञा खूप हुशार आहे; पण मनाने भाबडी आहे, तिला आपण सहज गुंडाळू शकतो असा विश्वास त्याला वाटत होता.
" असा काही डाव खेळायचा; की प्रज्ञाला माझं प्रेम स्वीकारावंच लागेल! गेली कित्येक वर्षे पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे!. आता फार उशीर करून चालणार नाही!" तो स्वतःला बजावत होता.
******* contd.---- part 18