स्मशान - आठवणींचा बाजार
तसा काही विशिष्ट मुहूर्त नसतो आठवणी यायचा परंतु रात्र आणि आठवण या सख्या एकमेकींच्या. आयुष्याच्या प्रवासात आठवणी किंवा भूतकाळ या गोष्टी म्हणजे एक प्रकारची शिदोरीच असं आमचा प्रेमा सांगतो. रात्र जसजशी बहरत जाते तसतसं आठवणींचं जाळं बुद्धीच्या वलयाला व्यापून टाकतं. काही आठवणी म्हणजे पौर्णिमेच्या निरभ्र आकाशात चंद्राला घेरून टाकणाऱ्या चांदण्यांचं मनमोहक चांदणं अगदी सुखावह ; तर काही आठवणी म्हणजे अमावस्येच्या निगरगट्ट काळोखात भेदरून टाकणारं वातावरण अगदीच भयावह.
अशाच रात्रीच्या वातावरणात गावच्या एका घराचा दरवाजा उघडला.
"ताई मी साग्याकडे झोपायला जातोय गं. तू दरवाजा लावून घे आतून."
"सुरज्या अरे रात्रीचे साडेबारा झालेत रे नीट जा. आणि सकाळी लवकर ये."
सुरज आणि सागर जिवलग मित्र. एकाच गावात राहणारे, एकाच वर्गात शिकलेले आणि लहानपणापासून एकत्र असणारे. शाळेनंतर आयुष्य थोडं वेगळं झालं परंतु जेव्हाही वेळ भेटायचा दोघं नेहमी एकत्रच असायचे. आयुष्य दोघांचं सर्वसाधारण परिस्थितीतूनच जात होतं. वरकरणी दिसायला मस्तीखोर, हसतमुख, धडपडे असले तरी एका ठराविक उंचीवर पोहोचलेली विचारसरणी असणाऱ्या व्यक्तिमत्वाचे धनी होते दोघं. ते म्हणतात ना खस्ता खाऊन आयुष्याला जी झळाळी गवसते ती तोळाभर सोन्याने अंग सजवूनही दिसत नाही. चमकणारे आणि चमकवून घेणारे या दोहोंत असणारा फरक चर्चेतून अलगद जाणवतो. अर्थात विचारसरणी थोडीफार वेगळी होतीच परंतु प्रत्येकाचं मत ऐकून घेणं आणि मगच उत्तर देणं हा त्यांच्या स्वभावाचा एक स्थायीभाव.
सागरच्या घराजवळ येताच सुरजला घराला कुलूप लावलेलं दिसलं. आज इतका वेळ झाला तरी सागर आला नाही या विचाराने तो चिंतेत पडला. आधीच पावसाळ्याचे दिवस आणि त्यात गेला हफ्ताभर याच्या घरचे गावाला. त्यामुळे याच्याशी गप्पा मारायला चांगला सुरजला चांगलीच संधी मिळाली होती. तसं यांना कुणी अडवणारं नव्हतंच म्हणा. काही चुका करतील किंवा भरकटली जातील यापुढे गेली होती त्यांची वयं. सागरला आज का उशीर झाला हे शोधण्यासाठी सुरजने फोन फिरवला.
"साग्या कुठं आहेस रे ? पावणे एक होत आले तरी अजून घर नाही गाठलं ? कालची चर्चा आपली अर्धवट राहिली आहे ! माहीत आहे ना तुला ?"
"अरे हो हो, जरा दम घे ! किती बोलशील ? कालचा विषय जाऊदे, आत्ता सध्या मी आज्जीला भेटायला आलोय ! तू पटकन ये आणि येताना काहीतरी खायला घेऊन ये. इकडे थोडा पाऊस सुरू झालाय बघ येताना रेनकोट घालून येशील."
"अच्छा आज काय आठवणीतले दिवस आठवण्याचा विचार आहे काय ? चालेल चालेल ! आलोच बघ 10 मिनिटात."
अवघ्या 10 मिनिटात लाल रंगाची एक पल्सर करकचून ब्रेक मारत गावच्या मसनाबाहेर थांबली. हातात एक छोटी पिशवी घेऊन सुरज आत गेला. सागर मस्त पायऱ्यांवर तंगड्या पसरून निवांत बसला होता. पाऊस हलका हलका सुरू होत होता. रात्रही चांगलीच बहरली होती. मसनाला चारही बाजूने दगडी भिंतीचं कुंपण होतं. एका ठिकाणी मोठं गेट आणि फक्त तेवढ्याच ठिकाणी फक्त एक विजेचा खांब चालू होता. त्या खांबाचा उजेड फारसा असला तरी शेजारी असणारं लिंबाचं झाड गेल्या दोन वर्षात जास्तच वाढलं होतं. त्यामुळे उजेडाला थोडासा अडथळा यायचा आणि भरीत भर म्हणून झाड जरासं हललं की बाहेरून जाणाऱ्या माणसांना उगाच नसलेल्या आत्म्यांचा आणि भुतांचा आभास व्हायचा. पण या दोघांना आवडायचं स्मशानात जाऊन बसायला. 2 वर्षांपूर्वी सागरची आज्जी वारली होती तेव्हापासून त्यांचं तिथे येणं जाणं वाढलं होतं. त्यांच्या स्वभावात आणि विचारात आजीच्या संस्कारांचा फारच पगडा होता. दोघांनाही कधीही कोणतीही अडचण असली की त्यांचं हक्काचं समुपदेशन केंद्र म्हणजे आजी. जेव्हा आजी गेली तेव्हा सगळा गाव रडला परंतु या दोघांच्या डोळ्यातून एक अश्रूही नाही आला. अर्थात यावरून त्यांना बरेच बोल ऐकवण्यात आले परंतु त्यांचं आजीशी असणारं नातं समजण्यापलीकडे होतं. ज्या चौथऱ्यावर आजीला अग्नी दिला होता तिथे आज पुन्हा एक चिता धडाडून पेटत होती. पाऊसही जोरात सुरू झाला होता पण तरीही त्या चितेचा तो चटचट होणारा आवाज हलकासा ऐकू येत होता.
"इथं का बसला आहेस रे आज ? इतकी काय आजीची आठवण आली अचानक ?"
"काही नाही रे पाऊस पडत होता आणि मी रेनकोट न्यायला विसरलो होतो. मग कुठे थांबावं आसऱ्याला यासाठी इथे आलो. बरं तुला सांगितलं होतं काहीतरी खायला आण मला भूक लागली आहे."
"आणलंय रे भावा. तेही आपल्या महाकालच्या मंदिरातून उचलून आणलंय."
"मंदिरातून काय आणलं आता तू ? घरी काय जेवण बनवलं नव्हतं का रे तुझ्या ?"
"तुझ्या आयला तुझ्या.... एकतर मी तुझ्या घरापाशी येऊन तुला फोन लावला. पुनः घरी जावं तर ताईच्या शिव्या पडल्या असत्या जेवण घेऊन कुठे चाललाय. आणि तसंही आज मस्त प्रसाद होता रे मंदिरात मग काय... आणला उचलून."
"अरे वाह म्हणजे आपण लहानपणी जसं करायचो तसंच आजही केलंस ! भारिये राव. पण आज कसं काय चांगला प्रसाद मंदिरात ? श्रावणाचा शेवटचा सोमवार तर तीन दिवस आधीच झाला ना ?"
"अरे तुला लक्षात नाहीये का ? दर महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला शिवरात्र असते ते ? आठवून बघ जरा आपण लहान असताना नेहमी शिवरात्र बघून जायचो मंदिरात आणि इथेच येऊन लपून लपून सगळा प्रसाद फस्त करायचो."
"हो रे आलं लक्षात. आठवणी अशा विसरल्या जात नाहीत त्या फक्त काळाच्या ओघात हृदयाच्या एखाद्या बंदिस्त कोपऱ्यात मुरल्या जातात. तुला आठवतं आपण स्मशानात यायचो हे कळल्यावर घरी किती फटके पडले होते. पण आपली आजी नेहमी सांगायची की दुनियेला जाणायचं असेल तर जा स्मशानात तिथे शिका दुनिया कशी असते. आठवणींचा महापूर तोही आसवांच्या रूपातील जर कुठे पाहायला मिळत असेल तर तो फक्त स्मशानात."
"हो ना स्मशानात माणसाचं काहीच पाहिलं जात नाही. जात, धर्म, वर्ण क्षणात धुळीस मिळतात. इथलं अस्तित्व संपवून नव्या प्रवासाला निघालेली व्यक्ती धुळीस मिळते आणि त्याला सोडायला येणारी जत्रा ही थोड्या काळासाठी स्वतःचा खरा चेहरा मसनाच्या गेटबाहेर सोडून येते. प्रत्येकाला आठवू लागतो त्या व्यक्तीचा सहवास. याहून दुसरं कोणतं मोठं ठिकाण असेल बरं जिथे आठवणीतले दिवस प्रत्येकाला आठवतात ?"
"अगदीच बरोबर आहे तुझं म्हणणं. इथे आल्यावर लोकांच्या डोळी आठवणीच आठवणी ओसांडू लागतात. तसं आठवणींना व्याख्या नाही अगदी 2 तासांपूर्वी घडलेली घटनाही आठवणीत मोडते. ह्या आठवणी, भूतकाळ एक प्रकारचे गुरू आहेत. आठवणीतले दिवस असं म्हणतात की काही ना काही प्रमाणात तुम्हाला फायदाच करून देत असतात."
"म्हणूनच तर आजी म्हणली होती बघ एकदा आपल्याला. जेव्हा मी जाईल तेव्हा तुम्ही रडायचं नाही फक्त मसनात गेल्यावर प्रत्येकाचं निरीक्षण करायचं. आज एकमेकांना टाळणारे माझ्या नावाने गळ्यात पडून रडतील. जुने एकत्र घालवलेले चांगले, वाईट दिवस आठवतील. प्रत्येकाचा खरा चेहरा गेटजवळ लावलेल्या लिंबाखाली जो सरकारी नळ आहे तिथे कळेल तुम्हाला."
"अरे हो आजी बोलली होती. आणि ते निरीक्षण करायच्या नादात आपण किती शिव्या खाल्ल्या होत्या. पण त्यादिवशी बाबा सोडून इतर कुणाच्याही चेहऱ्यावर मला दुःख दिसलं नाही. पण बघ ना आजीने किती छान शिकवण दिली जाता जाता. कुणी कसही असलं तरी त्यासाठी शेवटी प्रत्येक व्यक्ती चांगलेच उद्गार काढतो आणि प्रत्येक व्यक्ती ठराविक काळासाठी समदुखी भासतो. समदुखाचा जणू मुखवटाच प्रत्येक चेहऱ्यावर होता त्यादिवशी आणि जाताना शेवटी लिंबाखाली लावलेल्या नळावर प्रत्येकाने चेहरा धुतला तेव्हा कळलं की कुणाला किती दुःख झालंय ते."
"तेच तर प्रत्येकाने चेहरा धुतल्या धुतल्या सुरू केलं. 'अरे गाड्या काढा रे ऊन लागू लागलंय, सकाळपासून उपाशी आहे, संध्याकाळी वर्दी आहे, मला गावाला जायचंय, उद्या बायको घरी येईल मला आवरून ठेवावं लागेल, भावाच्या सासरच्या एकाचं लग्न आहे जायचंय उद्या.' बाप रे बाप प्रत्येकाचं तोंड पाहून मी चकित झालो. 15 मिनिटापूर्वी आठवणींच्या सागरात हेलकावे खाऊन आसवं गाळणारा प्रत्येकजण किती भावनिक होता अन मसनाबाहेर पडताच व्यवहारी चेहरा कसा झटकन बाहेर आला."
"म्हणून आजीने मला सांगितलं होतं ज्यादिवशी मला जाळतील त्यादिवशी तुम्हाला दिलेलं काम जर तुम्ही पूर्ण केलंत तर तुमच्या आयुष्यात माणसं ओळखायला तुम्ही चुकणार नाहीत. प्रत्येक व्यक्तीचा हा गैरसमज आहे की रडलो की प्रेम व्यक्त होतं पण नाही तुम्हाला त्या व्यक्तीची किती आठवण येते यावर ठरतं की तुमचं प्रेम किती आहे. जिथे नात्याची घट्ट वीण जुळलेली असते तिथे अश्रूंची गरज भासत नाही. असंही नाही की अश्रू गाळणारा प्रत्येक व्यक्ती खोटा असतो परंतु न गाळणाराही तितकाच खरा असू शकतो ना ?"
"अशा कितीतरी आठवणी आहेत रे ह्या हृदयाच्या वलयात अलगद सामावलेल्या. ह्या बेभान तिमिराची जेव्हा परिक्रमा सुरू होते तेव्हा ह्या वलयालाही अलगद जाग येते. निशब्द भावनांचा आवेग त्वेषाने बुद्धीचे कवाड ठोठावू लागतो. त्यांचा आवाज सहन होत नाही कधी कधी."
इतक्यात समोरच्या चितेची कवटी फुटल्याचा ठप्पदिशी आवाज झाला आणि या दोघांनी पुन्हा एकमेकांकडे पाहिलं.
"शाळेत ताई एका मुलाशी बोलत होती तेव्हा आठवतं का तुला ?"
"हो ना तू साल्या गैरसमज करून घेतलास आणि रागारागात ताईच्या समोर त्या पोराच्या डोक्यात डब्बा मारला होतास आणि असाच ठप्प आवाज झाला होता. नंतर ताईलाही आपण दोघ किती काही बोललो होतो."
"आठवतं रे आजही आपण किती अल्लड आणि कमी बुद्धीचे होतो तेव्हा. आपल्या अल्पबुद्धीची चिपाड झाकून फिरायचो तेव्हा आजीने एकाच वाक्यात काय झणझणीत अंजन घातलं होतं डोळ्यात आपल्या."
"तेच ना यार. आजी जेव्हा बोलली ना की *उद्या जर मी एखाद्या माणसाशी बोलताना दिसले तर तुम्ही मलाही असंच बोलाल का दोघे ?*
त्या एकाच वाक्याने माझे खाडकन डोळे उघडले आणि कळून चुकलं आपला मुलींकडे पाहण्याचा किंवा विचार करायचा दृष्टिकोन किती खालच्या पातळीचा आहे."
"तिच्या आयुष्यात तिने अनुभवांची शाळा इतकी विस्तृतपणे पाहिली होती की त्याच आठवणी आणि अनुभवांचा फायदा आज आपल्याला होतोय."
"हो रे. त्याच आठवणी आणि अनुभवाच्या बटव्यातून वैचारिक परिपक्वतेचे बरेच हिरे आपल्याला मिळाले. आजही बघ ना इथे येऊन जुन्या आठवणीत किती छान रमलो आपण. जिथं यायला दुनिया घाबरते त्या जागेला निर्भीडपणे समोर जायचं सामर्थ्य आजीनेच तर दिले ना आपल्याला."
"आणि ती बोलायची नेहमी की परिपक्वता म्हणजे आहे तरी काय ?
*परि*स्थितीच्या चुलीवर शिजणाऱ्या आयुष्यारुपी *पक्वा*न्नाला संकटांच्या, जबाबदारीच्या फोडणीने सुटणारी समजूतदारपणाची खमंग सुवासिक*ता* म्हणजे *परिपक्वता*
किती सहज आणि सोपं करून सांगायची ना रे आजी सगळंच. आजीची आठवण खरंच मोठी शाळा आहे आपल्यासाठी."
"म्हणूनच तर कधी कधी आयुष्य परीक्षा घेऊ लागलं की इथे येऊन बसतो ना आपण. ते म्हणतात ना अनुभवाची शिदोरी उलगडण्यापुरतेच असावे आठवणींचे महत्व. चल मग जाऊया आता घरी आठवणी तर आहेतच सोबत नेहमी."
"आधी महाकाल बाबाचा प्रसाद तर खाऊदे. काय म्हणतोस ?"
"थोडंच खा बाकीचं त्या म्हाताऱ्या म्हसणजोगत्याला दे तो बघ कसा दारू पिऊन रेडिओ चालू करून बसलाय."
भरपावसात रेडिओवाला आर. जे. बोंबलत होता कुमार सानू की में सुनिये ये खास गाना आपकी फर्माईश पर....
*बरसात के मौसम मे तन्हाई के आलम मे
मै घर से निकल आया बोतल भी उठा लाया
अभी ज़िंदा हूँ तो जी लेने दो जी लेने दो
भरी बरसात मे पी लेने दो
अभी ज़िंदा हूँ तो जी लेने दो जी लेने दो
भरी बरसात मे पी लेने दो*
VIP