Loved it books and stories free download online pdf in Marathi

स्नेहवलंय

"दादा... ए दादा! तुझी देवसेना ओरडू लागली रे, जरा बघ तिच्याकडे ! स्नेहाचा फोन आलाय वाटतं. काय बाई ह्याची रिंगटोन!"
"उचल ना मग तू. सोनूला सांग करतो 15 मिनिटात."
अंघोळ करता करता विश्वास आईला सांगत होता. देवसेना म्हणजे बाहुबली 2 मध्ये तिच्या एन्ट्री सीनला जी धून वाजते ना ती धून ह्याच्या आवडीची. फक्त जेव्हा स्नेहाचा फोन यायचा तेव्हाच ही रिंगटोन वाजायची. आईलाही स्नेहा आणि विश्वासचं प्रेम माहिती होतं. तिची पूर्ण संमती होती त्यांच्या लग्नाला.
अंघोळ करून आल्यावर त्याने सर्वांत आधी स्नेहाला फोन लावला.
"हॅलो, हा सोनू बोल! अरे अंघोळ करत होतो रे बाळा. म्हणूनच नाही उचलला फोन."
"हो रे ऐकलं.... आत्या सांगत होत्या. विशु अंघोळीला गेलाय. बरं एवढया संध्याकाळी कोण अंघोळ करतं का? पारूश्या!"
"अगं कामावरून आलं की अंघोळ करावी लागते. दिवसभर किती घाम येतो यार. त्यात हा उन्हाळा कधी संपतो काय माहीत?"
"माहिती ए रे मला. बरं मला सांग सकाळी फोन का केला होतास तू? मी कामात असल्याने जमलंच नाही रे पुन्हा फोन करायला. आता घरी आले म्हणून म्हणलं चला साहेबांचा फोन का आला होता ते बघूया?"
"अच्छा अच्छा सकाळी का ? अगं ते चुकून लागला असेल गं! मी दुसरीकडे लावत होतो चुकून तुला लागला. मग बाकी तू बोल ना काय म्हणतेस? असंही किती दिवस झाले आपण बोललो नाही ना."
थोड्याश्या रागाने धुसफूस करत ती पुढे बोलू लागली.
"हो का? चुकून लागला होता का? ठीक आहे मग ठेव फोन मला कामं आहेत महत्वाची. आणि तसंही कालच बोललो होतो आपण. मग रोज रोज काय बोलायचं नाही का? आज कुठे 'स्पेशल' दिवस आहे बोलायला? ह्म्म."
तिचं लटक्या रागात हम्म करून तोंड वाकडं करणं त्याला खूप आवडायचं. त्यासाठीच तो नेहमी तिला मुद्दाम चिडवायचा आणि ती रुसून जेव्हा वाकडं तोंड करायची, तेव्हा तिच्या चेहऱ्याला हातात घेऊन त्या लहान डोळ्यांत पाहून सॉरी म्हणायचा तेव्हा ती हलकेच हसून त्याच्या उबदार मिठीत शिरायची.
"अच्छा काल बोललो होतो आपण. म्हणजे बघ ना पूर्ण एक दिवस झाला तुझ्याशी बोलून. आणि ते 'स्पेशल' वर जास्त जोर का देत होतीस बरे बोलताना."
"तुझा जसा चुकून फोन लागू शकतो तसं माझंही बोलताना चूक होऊ शकते ना. तसंही काय 'स्पेशल' आहे आज? काहीच नाही ना मग ठेव फोन! कशाला बोलतोस? मी कुठे 'स्पेशल' आहे तुझ्यासाठी ? तुझे फोनही चुकून लागतात मला. बरोबर ना? ठेव मग आता बाय!!"
एवढं बोलून तिने रागातच फोन ठेवला. इकडे याला हसूच आवरेना. मस्तपैकी तयार होऊन बाहेर फिरायला निघाला. जाताना त्याने त्याच्या आणि स्नेहाच्या एका कॉमन फ्रेंड आणि स्वतःच्या मानलेल्या बहिणीला सुप्रियाला फोन लावला.
"हॅलो झिपरे कुठं आहेस?" "घरीच आहे रे माकडा आज कशी काय आली ताईची आठवण साहेबांना?"
"काल काहीतरी काम सांगितलं होतं तुला? आठवतंय का?"
"हो रे भाऊ झालंय काम आणि मी निघतेय आता स्नेहाकडे जायला. चल ये लवकर भेटूया आपण."
एवढं बोलून तिने स्नेहाला फोन लावला.
"हॅलो वहिनी कुठे आहेस? ऐक ना एक अर्जंट काम आहे तुझ्याकडे."
"काय गं सुपी? काय काम आहे, काही प्रॉब्लेम तर नाही ना?"
"अगं वहिनी एका मुलाने ना मला कॅफेत भेटायला बोलावलं आहे. मला त्रास देतोय तो कॉलेजमध्ये. मला म्हणला प्लिज एकदा भेट तुझ्याशी बोलायचं आहे वगैरे वगैरे! नाही गेले तर तो रोज कॉलेजमध्ये त्रास देईल गं. काय करू सांग ना?"
"एक काम कर मला घेऊन चल मी बघते त्याच्याकडे. नालायक कुठला कसा त्रास देतोय बघतेच मी. तू ये माझ्या घरी, सोबत जाऊया आपण."
थोड्याच वेळाने सुप्रिया गाडी घेउन आली आणि स्नेहाला घेऊन कॅफेकडे गेली. तिथे बाहेरूनच त्या पाठमोऱ्या बसलेल्या मुलाकडे बोट दाखवले तिने. स्नेहा तावतावातच कॅफे मध्ये शिरली आणि जाऊन डायरेक्ट त्या मुलाची कॉलर धरली.
"ए नालाय...."
"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरकार......"
अचानकपणे आपण विश्वासची कॉलर धरली हे पाहून स्नेहा बोलता बोलता थांबली आणि विश्वास उठून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागला. अचानक चारही बाजूने त्यांच्याच ओळखीचे मित्रमंडळी येऊन उभे राहिले आणि टाळ्या वाजवत हॅपी बर्थडे टू यु डिअर वहिनी असं गाऊ लागले. या अनपेक्षित धक्क्याने ती खूप भारावली. विश्वासने फोनवर स्पेशल शब्दाचा अर्थ समजून घेतला नाही म्हणून ती खूप चिडली होती. परंतु विश्वासचं हे गोड सरप्राईस तिला खूप भावलं. लाजूनच ती खाली पाहू लागली, तिची हिंमतच होईना त्याच्याकडे पाहण्याची. वाढदिवस साजरा केल्यावर दोघेही घरी जायला निघाले.
गाडीवर घरी जाताना वन साईड बसलेल्या स्नेहाने हळूच विश्वासच्या खांद्यावर डोकं ठेवलं.
"विशु.... ऐक ना! पुढे जाऊन बसूया ना निवांत कुठेतरी!"
"चल मग आपल्या नेहमीच्या स्पॉटवर जाऊया. तुकाई दर्शन हडपसर."
"पिन कोड सकट सांगायचा ना पत्ता! मला जसं माहितीच नाहीये ती जागा."
"सॉरी ना सोनू. एवढा काय चिडतो तू बाळा?"
बोलता बोलता ती दोघंही तुकाई टेकडी जवळ येऊन पोहोचली. संध्याकाळची वेळ असल्याने खूप सुंदर वाटत होतं तिथलं वातावरण.
समोर दिसणाऱ्या ग्लायडिंग सेंटरला हळूहळू गर्दी वाढत होती. कुणी व्यायाम करत होतं तर कुणी क्रिकेट, फुटबॉल वगैरे खेळत होतं. मुख्य रस्त्याजवळची चौपाटी खाद्यपदार्थांच्या विविध गाड्यांनी भरून निघत होती. ते दोघं एका कट्ट्यावर बसले. त्याची भिरभिरत राहणारी नजर आता थोडी स्थिरावत होती तिच्या डोळ्यांत. तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद तिच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज पसरवत होता. भुरभरू वाहणारा वारा जोर धरू लागला होता. अथांग पसरलेल्या निळ्या आकाशाच्या शांततेत आता काळ्या मेघांची दाटी होऊ लागली होती. एकएक थेंब टपटप पडून कधी भुईवर नृत्य सादर करता येईल याची वाट पाहू लागला होता. त्याला पाऊस आवडत नाही हे तिला चांगलंच माहिती होतं. तिच्या डोळ्यांतून निघून जेव्हा त्या हलकी हलकी गर्जना करणाऱ्या मेघमालेवर त्याची नजर रोखली गेली. तेव्हा तिला खूप भीती वाटू लागली. त्याचं आणि पावसाचं पूर्वीपासून सुरू असणारं युद्ध ती जाणून होती. ती लगबगीने आपली ओढणी सावरून बाकावरून उठायचा प्रयत्न करू लागली.
"स्नेहा.... उठू नकोस. आजपासून युद्ध संपलंय आमचं. तुझ्यासोबत आज मीसुद्धा भिजणार आहे. त्या पावसाला आज या बाहूंनी घट्ट आलिंगन देणार आहे."
"विशु......... काय सांगतोस? माझा विश्वास बसत नाहीये यावर पण माझ्या डोळ्यांत बघ ना रे एकदा! त्या समुद्रात माझ्या प्रेमाची नौका पुन्हा वल्हवू दे आणि हेही कळूदे मला की युद्ध कसं काय संपलं तुमचं?"
"सोनू... अगं लहानपणी जेव्हा पावसात घराचं छत गळायचं ना तेव्हा आम्हाला कधी कधी झोपायला जागा नसायची. आई मला आणि ताईला मांडीवर घेऊन झोपवायची. पप्पा रात्रभर गळणाऱ्या पाण्याला घराबाहेर फेकायचे. त्या दिवसापासून याचं आणि माझं युद्ध सुरू होतं. मी भिजायचो पावसात परंतु त्यात आनंद नसायचा. असायची तर फक्त एक भावना जी इर्षेची होती. लहान असतानाच मी ठरवलं होतं. बोललो होतो त्याला एकेदिवशी मी तुला नक्की हरवेल रे पावसा."
आणि त्याच्या गालावर हळूच अश्रू ओघळले. ते अश्रू पुसत ती म्हणाली
"मला काय माहिती नाही का रे? तुझ्या आयुष्यातील संघर्ष आणि हे पावसाशी असणारं वैर? शाळेत होतो तेव्हापासून पाहतेय मी तुला आणि माझे बाबाही मला नेहमी सांगायचे सोनू हा एकदिवस खूप पुढे जाईल. आईबाबांचं नाव सार्थकी लावेल. आत्या आणि मामा खुश असतील ना रे आता?"
"त्या दोघांनी जेवढं कष्ट केलंय तेवढं सगळं आमच्या शिक्षणातच खर्ची पडलं गं. आता थोडे खुश असतात ते आणि तुझ्या वडिलांनी जेव्हा आपलं लग्न ठरवलं तेव्हापासून जरा जास्तच खुश आहेत. त्यांना नेहमी वाटायचं ह्या एकलकोंडयाला कोण पोरगी देईल? याचं कसं होईल वगैरे ?"
"तुला माहीती जेव्हा मी आपल्याबद्दल घरी सांगितलं ना तेव्हा बाबांनी डोळे बंद करून होकार दिला. आलेली मोठी स्थळही नाकारली त्यांनी माझ्या हट्टापायी मुळीच नाही नाकारली तर ती फक्त तुझ्या चारित्र्याला आणि कष्टाला पाहून. मला आवडत तर तू आधीपासूनच होतास अगदी चौथीत असताना जेव्हा तू स्कॉलरशिपमध्ये पहिला आला होतास. ती आवड आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात कधी परावर्तित झाली कळलंच नाही रे."
"तूही आधीपासूनच मला आवडत होती पण मी कधी असं दिसू दिलं नाही. मला नेहमी भीती वाटायची की माझी परिस्थिती पाहून ही मला नकार तर देणार नाही ना? पण जेव्हा तुला विचारलं तेव्हा तू आनंदाने होकार दिलास आणि मला इतकं आभाळ ठेंगणं झालं होतं त्यादिवशी."
"वेड्या असं काही नव्हतं रे उलट माझे बाबा नेहमी म्हणायचे. माणसाची परिस्थिती नाही चारित्र्य पाहावं आणि त्याचा संघर्ष पाहावा. तू तर त्या दोन्ही बाबतीत अग्रेसरच आहेस. काळजी करू नको आपण दोघेही कष्ट करू, घर बांधू आणि आईबाबांना सुखी करू. पण ते वैर कसं संपलं सांगशील का?"
त्याने आपल्या खिशातून एक कागद बाहेर काढला आणि त्यात असणारा एक नकाशा दाखवला.
"आपल्या नवीन घराचा प्लॅन. कालंच लोन पास झालंय आणि परवापासून कामंही सुरू होईल. बघ ना यात काही बदल वगैरे करायचे का? आणि तुला आवडलं का? तेही सांग."
"विशु...... हे कधी ठरवलं तू? आणि मला एवढ्या उशिरा कसं कळतंय? किती सरप्राईस देशील रे एकाच दिवसात ? पण आज मिळालेलं हे सर्वांत मोठं गिफ्ट आहे. हा वाढदिवस नेहमी लक्षात राहील माझ्या. किती गोड आहे हे सरप्राईस विशु."
अचानक बोलता बोलता ती रडू लागली. त्याला ते पाहवेच ना.
"ए सोनू... रडू नकोस ना. वेडी इकडे ये अशी काय करतेस बरं. तू जेव्हा हो बोललीस ना त्यादिवसापासून मी तयारी करतोय याची आणि बघ ना आज नेमकं तुझ्या वाढदिवशीच मला हे कळतंय. आज खऱ्या अर्थाने या पावसाचं आणि माझं वैर संपलंय. पाच महिन्यात घर बांधून होईल आणि मग आपलं लग्न. तुझ्या लहान डोळ्यातला पाऊस आता थांबवशील का आतातरी?"
"थांबवते ना रे.... असा ओरडू नको आणि हा पाऊस म्हणजे आनंद आहे माझा. पण तू ह्या खऱ्या पावसात भिजू नको सर्दी होईल तुला. मग मलाच यावं लागेल माझ्या त्या सवतीला पळवायला."
"नाही गं सोनू तुझ्या प्रेमाचं वलय ह्या ओढणीच्या रुपात माझ्या डोक्यावर टाकशीलच ना तू नेहमीसारखं. ह्या वलयात किती सुरक्षितता आहे माहिती नाही तुला. ह्याच पदराखाली आता माझं घर सुरक्षित होणार आहे. हो ना?"
"काळजी करू नको विशु. मी सगळं घर एकदम व्यवस्थित सांभाळून घेईल. आत्या आणि मामांना तर कसलीच कमी पडू देणार नाही. माझं वचन आहे तुला."
एवढं बोलून तिने त्याचा हात घट्ट हातात धरला. तेव्हा त्याने तिला हातातला कागद उघडून पाहायला लावला. तिने कागद पाहिला आणि त्या कागदावर असणारं घराचं नाव वाचून डबडबल्या नेत्रांनी हळूच त्याच्या उबदार मिठीत शिरली.
घराचं नाव होतं स्नेहवलंय !!
-VIP-

इतर रसदार पर्याय