मायाजाल---२५
त्या दिवशी रात्रीपर्यंत हर्षद मृदुलाकडे राहिला. रमाकाकू स्वयंपाक करून गेल्या. मृदुलाने हर्षदसाठीही जेवण बनवायला सांगितलं होतं. तिचा भाऊ कुणाल ताईच्या आजारपणामुळे थोडा घाबरलेला होता, त्याचा चेहरा उतरला होता. पण हर्षदशी त्याची लगेच गट्टी जमली आणि त्याला शाळेच्या गमती जमती सांगताना त्याचा चेहरा खुलला होता. जेवताना हर्षद हसत म्हणाला, " मी मोठा जादुगार आहे; बरं का! बघ तुझ्या ताईला जादूने लगेच कसं बरं करतो ते!"
पण कुणाल त्याच्या कल्पनेपेक्षा हुशार निघाला. लगेच म्हणाला,
" ताईला तर डाॅक्टर अंकलनी बरं केलेलंच आहे! पण तुम्ही जादूने माझा होमवर्क करून द्याल का?"
हर्षदचा पडलेला चेहरा बघून मृदुला हसू लागली.
"तुम्ही खरंच ताईला झटक्यात बरं केलं! बघा! ती हसू लागली! मला सुद्धा जादू शिकवा; म्हणजे मला शाळेतून आल्यावर पटकन् होमवर्क करून लगेच खेळायला जाता येईल!" तो आता हर्षदची पाठ सोडेना!
" जादूने होमवर्क करून तुझ्या लक्षात कसा रहाणार? मी पुढच्या वेळी येईन; तेव्हा तुला लवकर होमवर्क संपवायची आयडिया सांगेन! चालेल?" हर्षद हसत म्हणाला.
आता मात्र कुणालला तो जवळचा मित्र वाटू लागला. रात्री तो निघेपर्यंत तो त्याच्या अवतीभोवती रेंगाळत होता. त्या दोघांच्या गप्पा ऐकून मृदुलला हसू येत होतं; हर्षदच्या येण्याने तिचा आजार निम्मा पळून गेला होता.
*********
दुस-या दिवशी संध्याकाळी हर्षद परत मृदुलाला भेटायला गेला. तिचे आई-वडील आज आलेले होते. कुणालने त्याच्याविषयी आईला सांगितलं होतं. हर्षदविषयी तर नेहमीच मृदुलाकडून काही ना काही ती ऐकत होती. त्याच्याविषयी बोलताना तिचे डोळे स्वप्नाळू होत होते; त्यावरून आपली मुलगी त्याच्यावर भाळली आहे; हे तिला अगोदरच कळलं होतं. पण आज तिला दोघांच्याही नजरेत एकमेकांविषयीचं प्रेम दिसत होतं. हर्षदचं आकर्षक व्यक्तिमत्ब, हसतमुख स्वभाव पाहून आपल्या मुलीने योग्य निवड केली आहे याचा तिला आनंद झाला. तिने त्याची चांगली उठबस केली. तेवढ्यात मृदुलाचे वडीलही आॅफिसमधून आले. ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे, दोघांना बोलायला विषयांची कमतरता नव्हती. गप्पा मारता मारता हर्षद किती हुषार आहे हे त्यांनी पारखून घेतलं. आजारी मुलीला तिचा बाॅस रोज भेटायला येतो -- तो का? हे ओळखायला ज्योतिषाची गरज नव्हती.
त्या दिवशी रात्री जेवताना त्यांनी मृदुलाला विचारलं,
"हर्षद चांगला मुलगा वाटतोय! तुझी खूप काळजी आहे त्याला! पण तू कधी त्याच्या घरच्या लोकांना भेटली आहेस का?"
"नाही बाबा! अजूनपर्यंत फक्त आॅफिसपुरतीच ओळख होती आमची! ते बाॅस आहेत माझे! त्यांच्या घरची चौकशी मी कशी करणार?" मृदुला म्हणाली.
" इतका शिकलेला आहे! मोठ्या पोस्टवर काम करतोय! मुलगा चांगला आहे नं? आपल्यासाठी तेच सगळ्यात महत्वाचं!" मृदुलाची आई म्हणाली.
"तुझं बरोबर आहे! पण ज्या घरात मुलगी कायमची रहायला जाणार, तिथले संस्कार -- रहाणी-- माणसांचे विचार जर ठीक नसतील, तर लग्नानंतर मुलींना खूप त्रास होतो. लग्नामध्ये फक्त मुलगा आणि मुलगीच नाही, तर दोन कुटुंबे एकत्र येतात; त्यामुळे हर्षद जरी कितीही चांगला असला, तरीही त्याच्या आई - बाबांना भेटल्याशिवाय मी पाऊल पुढे टाकणार नाही! तुला माझं म्हणणं पटतंय नं मृदुला?"
"हो बाबा! माझा विश्वास आहे तुमच्यावर! तुम्ही जो निर्णय घ्याल तो माझ्या हिताचाच असेल!" मृदुला म्हणाली. पण मनोमन तिची खात्री होती, की हर्षदच्या आई -वडिलांना भेटून बाबांची निराशा होणार नाही.
मृदुलाची तब्येत सुधारली.ती आॅफिसला जाऊ लागली. आता त्याचा दोघांमध्ये भावनिक बंध निर्माण झाल्याचं आॅफिसमधल्या लोकांच्याही लक्षात आलं.
"आता आम्हाला पार्टी कधी?" सगळे विचारू लागले.
" मोठी पार्टी लवकरच मिळेल! आज मात्र सगळ्यांसाठी समोसे आणि काॅफी मागवूया!" हर्षद हसत म्हणाला.
*********
आजकाल हर्षद पुर्वीप्रमाणे अानंदात दिसू लागला आहे; हे बघून माईंच्या मनावरचं मोठं ओझं दूर झालं होतं. हे कशामुळे झालंय हे कळलं नाही, तरी आपला मुलगा खुश आहे हे त्यांच्यासाठी पुरेसं होतं.
गेल्या वेळी तो लग्नाचा विषय काढताच किती चिडला होता हे माई विसरल्या नव्हत्या. पण आता तो चांगल्या मूड मध्ये दिसत होता ;त्यामुळे त्यांनी एक दिवस त्याच्याकडे लग्नाचा विषय काढला. यावेळी मात्र तो हसला; आणि म्हणाला,
"माई! मी अगदी तुला हवी तशी सून तुझ्यासाठी घेऊन येणार आहे! काळजी करू नकोस! लवकरच तुला भेटायला घेऊन येईन!"
एके दिवशी मृदुलाचे आई - बाबा तिला घेऊन हर्षदच्या घरी गेले. या साध्या सरळ परिवारामध्ये मुलीचं लग्न जमतंय हे पाहून त्यांच्या मनावरचं ओझं दूर झालं.
हर्षदच्या आई वडिलांनाही मृदुला पसंत पडली. आपल्या मुलाच्या मनाप्रमाणे सगळं घडतंय हीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट होती. अगदी जवळच्या मुहूर्तावर लग्न करायचं असं ठरलं.
दुस-याच दिवशी हर्षदने प्रज्ञाला भेटून ही आनंदाची बातमी सांगितली. "तू मला म्हणाली होतीस की; "तुझ्यावर मनापासून प्रेम करणारी मुलगी तुला नक्की भेटेल! होय! मला माझं प्रेम मिळालंय! आणि आम्ही महिन्याभरात लग्न करतोय! " तो उत्साहाने तिला सांगू लागला.
"मनापासून अभिनंदन! मी तुझ्या लग्नाला नक्की येईन! मलाही हे ऐकून खूप आनंद झालाय! माझ्यामुळे तुझं आयुष्य दुःखी असावं; हे मलाही बरं वाटत नव्हतं. तुझा उतरलेला चेहरा बघितला; की मला नेहमीच वाईट वाटत होतं! पण माझाही नाइलाज होता! आज तू खूप खुश दिसतोयस्! तुझी पसंती उत्तमच असणार! आणि तुझ्यासारखा जोडीदार पटकवणा-या त्या भाग्यवान मुलीला भेटायला मला नक्कीच आवडेल." प्रज्ञा म्हणाली.
"होय! मी लवकरच तुमची ओळख करून देणार आहे. फक्त तुला कधी वेळ आहे ते सांग!" हर्षद उत्साहाने म्हणाला.
" रविवारी मला सुट्टी असते. तेव्हा चालेल! पण ही मृदुला तुला भेटली कुठे? तू मला तिच्याबद्दल काहीच सांगितलं नाहीस!" प्रज्ञाचं कुतुहल आता जागं झालं होतं.
" तू मला नकार दिलास तेव्हा मी मनाने पूर्णपणे खचून गेलो होतो. आता मला कळतंय, की तू केलंस ते बरोबर होतं; प्रेम ही जबरदस्तीने मिळवण्याची गोष्ट नाही! पण त्यावेळी पटलं, तरीही पचवणं कठीण होतं! तो काळ असा होता, की मी आयुष्यातून उठलो असतो! तुझ्या नकाराने मी पूर्ण कोलमडून गेलो होतो; फक्त जबाबदा-यांची जाणीव असल्यामुळे आॅफिसला जात होतो; पण कामाकडे मात्र नीट लक्ष देऊ शकत नव्हतो! या वाईट काळात मृदुलाने मला साथ दिली. आॅफिसचं काम व्यवस्थित होईल याची काळजी घेतली. माझं मन रमावं म्हणून प्रयत्न केले. हळू हळू माझ्या मनाचा ताबा तिनं कधी घेतला हे मलाही कळलं नाही. तिनं कधी मला काही विचारलंही नाही. पण लग्न ठरवण्यापूर्वी मी मात्र तुझ्याविषयी-- जीतविषयी-- मी तुझ्याशी किती चुकीचा वागलो---- सगळं काही तिला सांगितलं!?" हर्षद मनात काही अढी न ठेवता बोलतोय हे प्रज्ञाला कळत होतं. त्याच्या शब्दांत प्रांजळपणा होता.
" तू तुझ्या पहिल्या प्रेमाविषयी तिला सागितलंस! आता तुला आयुष्यभर सतत टोमणे ऎकावे लगणार!" प्रज्ञा हसत म्हणाली.
" नाही! मृदुला तशी नाही! तू आणि जीत माझ्यामुळे दुरावलात, हे कळल्यावर तिला खूप वाईट वाटलं! काहीही करून तुम्हाला एकत्र आणलं पाहिजे असं ती म्हणाली. तिलाही तुला भेटायची इच्छा आहे!" आपल्या हातून घडलेल्या कृत्याचा पश्चात्ताप हर्षदच्या चेह-यावर दिसत होता.
"तू आता जुन्या गोष्टींचा विचार करू नकोस. ते सगळं आता भूतकाळात जमा झालंय! ते सगळं आता विसरून जा! --- तुझं लग्न ठरल्याचा खरंच खूप आनंद झालाय मला! कोणाचं आयुष्य माझ्यामुळे दुःखी व्हावं; हे मलाही पटत नव्हतं !" प्रज्ञाने त्याला समजावलं.
"पण माझ्यामुळे तुला जे सोसावं लागलं त्याचं काय? तो सल माझ्या मनातून काही केल्या जात नाही !" हर्षदच्या चेह-यावर पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता.
" हर्षद! या घडीला माझ्यासाठी माझं करिअर सध्या सगळ्यात महत्वाचं आहे! जे होतं ते सर्व चांगल्यासाठीच होतं. तू मनाला अजिबात लावून घेऊ नको! मी सध्या जशी आहे तशी अगदी मजेत आहे!" त्याला समजावत प्रज्ञा म्हणाली. हर्षदचं आयुष्य मार्गी लागलं; या गोष्टीचा तिला मनापसून आनंद झाला होता!
******** contd.--- part 26.