मायाजाल-- २६ Amita a. Salvi द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मायाजाल-- २६

मायाजाल - २६
पुढच्या आठवड्यात हर्षदने मृदुलाची आणि प्रज्ञाची भेट घडवून आणली. सुंदर ,स्मार्ट आणि लाघवी मृदूलाला पाहून प्रज्ञा मनात म्हणाली, " अशा मुलीला प्रपोज करायला हर्षदला एवढे दिवस लागले हेच आश्चर्य आहे! बरं झालं---आता याचं आयुष्य मार्गाला लागेल! कधीही - काहीही प्रसंग आला,तरी मृदुला त्याला चुकीच्या वाटेने जाऊ देणार नाही. चांगली मुलगी आहे! हर्षद खरोखरच नशीबवान आहे!"
यानंतर एक महिना प्रज्ञाला हाॅस्पिटलमध्ये इतकं काम होतं ; की हर्षदची चौकशी करायला - त्याच्या लग्नाचं कुठवर आलं हे विचारायला वेळ मिळाला नाही. हर्षदचा फोन येऊन गेल्याचे ती आईकडून फक्त ऎकत असे, पण त्याला परत फोन करण्याचे तिच्या अंगात त्या वेळी त्राण नसे. शिवाय रात्रही खूप झालेली असे. त्याला झोपेतून उठवण्याएवढे महत्वाचे कारण असणार नाही हे तिला माहीत होतं.
एका रविवारी हर्षद माई आणि तात्यांना घेऊन तिच्या घरी आला. " पुढच्या आठवड्यात लग्न आहे. सगळ्यांनी नक्की यायचं आहे." तो तिच्या बाबांकडे पत्रिका देत म्हणाला."
"हर्षदचं लग्न--- आणि आम्ही येणार नाही; असं होईल का? त्या दिवशी तर येऊच, पण काही काम असेल तर हक्काने सांगा!" नीनाताई म्हणाल्या.
"मला फोन कशाला केला होतास?" प्रज्ञाने विचारलं.
"तुला लग्नाची तारीख सांगायची होती; म्हणजे आयत्यावेळी रजा मिळत नाही; हा बहाणा नको." तो हसत म्हणाला. तो पुढे म्हणाला,
"आणि प्रज्ञा! तुझी कामाची सबब मला चालणार नाही. दिवसभर लग्नाला थांबायचं आहे! आणि माझ्या लग्नात तू माझ्यासाठी प्रेझेंट आणायचं नाही; मीच तुला एक छान गिफ्ट देणार आहे." त्याच्या स्वरात मिश्किलपणा आहे असं प्रज्ञाला जाणवलं. पण तो आज आनंदात असल्यामुळे विनोद करतोय असं तिला वाटलं.
*********
हर्षदच्या लग्नाच्या दिवशी प्रज्ञाने आवर्जून रजा घेतली. सुंदर साडी नेसून --छान तयार होऊन ती निघाली. अनेक दिवसांनी ती मोठ्या समारंभाला जात होती.
"किती छान दिसतेयस तू अाज! कोणाची नजर नको लागायला! अनेक दिवस तुला नटलेली पाहिली नव्हती. इंद्रजीत लग्न मोडून निघून गेला; आणि तू सगळी हौस- मौज विसरलीस! आज तुझ्याकडे बघून किती बरं वाटतंय! असं वाटतंय की मधला काळ गेलाच नाही!" आई डोळ्यातलं पाणी रोखण्याचा प्रयत्न करत म्हणाली.पण बोलताना तिचा गळा भरून आला होता.
"खरंच ते दिवस कधी परत येतील का?---- शक्य नाही. सगळी परिमाणं आता बदलून गेली आहेत." विचार करता करता प्रज्ञाने स्वतःशी कडवट हसली.
आईच्या डोळ्यातून ही गोष्ट सुटली नाही.
"मी पण किती वेंधळी आहे. नको त्या गोष्टींची आठवण करून दिली. चल! लवकर निघू या! हर्षदने हाॅलवर लवकर बोलावलंय!" ती निघायची घाई करत म्हणाली. अनेक दिवसांनी प्रज्ञा अशा समारंभाला गेली होती. तिथल्या आनंदी वातावरणात खुलली होती. थट्टा-मस्करी- गप्पा, अनेक दिवसांनी झालेल्या भेटी -गाठी--- तिचं मन प्रफुल्लित झालं होतं. मधेच ती एका मैत्रिणीला बरोबर घेऊन मृदुलाला भेटली.
" मृदुला! किती सुंदर दिसतेयस तू! उगाच नाही हर्षद तुझ्या प्रेमात पडला!" ती मृदुलाची मनापासून स्तुती करत म्हणाली.
"तू सुद्धा जपून रहा! किती गोड दिसतेयस! आज नक्कीच कुणीतरी तुला पळवून नेईल! सांभाळून रहा! बरं का!" असं वाटत होतं, की ती काहीतरी लपवतेय!
"आणि हर्षदला भेटलीस का? तू आली आहेस, हे बघून त्याला खूप आनंद होईल! तुला येणं जमेल की नाही ; याविषयी तो साशंक होता!" ती पुढे म्हणाली.
"तुला भेटायला अगोदर आले! नवरीच्या शृंगारात तुला बघायचं होतं. आता त्याच्याकडेच चाललेय! " मृदुलाला परत एकदा शुभेच्छा देऊन प्रज्ञा निघाली.
त्या दोघी हर्षदला भेटायला चालल्या होत्या,
"माझं काही सांगता येत नाही! हाॅस्पिटलमधून जर अर्जंट काॅल आला; तर जावं लागेल. विधी चालू असताना दोघांना भेटता येणार नाही; त्यामुळे आता भेटून शुभेच्छा दिलेल्या ब-या!" प्रज्ञा सुरेखाला सांगत होती,
पण इतक्यात सुरेखाने हाॅलमध्ये येणा-या एका व्यक्तीकडे तिचं लक्ष वेधलं; आणि तिकडून हाॅलमध्ये प्रवेश करणा-या इंद्रजीतला पाहिल्यावर प्रज्ञाचे डोळे विस्फारले, श्वास थांबतोय असं तिला वाटू लागलं. हात थरथरू लागले. " बहुतेक ह्याच सरप्राइझविषयी हर्षद बोलत होता!" तिची खात्री पटली होती.
ती हर्षदला भेटण्याऐवजी हाॅलच्या एका कोप-यात मैत्रिणीच्या घोळक्यात जाऊन बसली. तिची नजर मात्र तिच्या मनाविरूद्ध इंद्रजीतकडे वळत होती. " चेह-यावर तोच आत्मविश्वास --आपल्याकडून काही चूक घडलीय असं त्याला वाटत असेल, असं वाटत नाही! गेली दोन वर्ष माझ्यासाठी खूप वाईट काळ होता; पण याच्यावर काहीही परिणाम झालेला दिसत नाही! पूर्वीपेक्षाही रुबाबदार दिसतोय! बहुतेक आता चष्मा लावायला लागल्यामुळे जास्त डॅशिंग दिसत असावा! त्याची नजर बहुतेक मलाच शोधतेय!--- देवा!! मला नाही त्याच्याशी बोलायचं! काय करू?" प्रज्ञाला आता तिथे बसावसं वाटत नव्हतं.
इंद्रजीतचे डोळे बहुधा प्रज्ञालाच शोधत होते. पण हाॅलमधल्या गर्दीत मैत्रिणींच्या कोंडाळ्यात बसलेल्या प्रज्ञापर्यंत त्याची नजर पोहोचू शकली नाही. एकीकडे तो काॅलनीतल्या त्याच्या ओळखीच्या मुलांशी गप्पा मारत बसला होता; पण त्याची नजर प्रज्ञाला पहाण्यासाठी भिरभिरत होती. काॅलनीतल्या मुलांनी विचारलं,
"तू प्रज्ञाला शोधतोयस नं? ती आलीय लग्नाला! मागे मैत्रिणींबरोबर बसलीय! चल तुला तिकडे घेऊन जातो." यावर इंद्रजीत थोडा भांबावला, आणि म्हणाला,
"नको! नको! मी भेटेन तिला नंतर!" आपल्याला बघून प्रज्ञाची आणि तिच्या घरच्या लोकांची प्रतिक्रिया काय असेल; या विषयी तो साशंक होता. सर्वांच्या समोर अपमान होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती; त्यामुळे जे मन प्रज्ञाकडे ओढ घेतहोतं; तेच मन तिच्या समोर जायला घाबरत होतं. अपराधीपणाची भावना त्याच्या मनात होती; पण आपण प्रज्ञाची समजूत नक्की काढू; हा विश्वासही होता.
अक्षता पडल्या, लग्नाचे विधी झाले; पण प्रज्ञा काही इंद्रजीतच्या दृष्टीस पडली नाही. त्याच्या समोर यायचं नाही ; असं तिनं ठरवून ठेवलं होतं. जेवण झाल्यावर तो स्टेजवर हर्षदला भेटायला गेला.
"प्रज्ञा भेटली का?" हर्षदच्या प्रश्नावर जीतने नकारार्थी मान हलवली. त्याच्या चेह-यावर नाराजी स्पष्ट दिसत होती.
हर्षदचं लग्न ठरल्यावर त्याने इंद्रजीतला फोन केला होता. आपल्या हातून घडलेल्या चुकांची त्याने मनापासून माफी मागितली होती. "माझ्यामुळे तुम्ही दोघं दुरावलात - तुम्हाला परत एकत्रही मीच आणेन! लग्नाला नक्की ये! असं जेव्हा हर्षद म्हणाला, तेव्हा इंद्रजीतच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रज्ञाचं प्रेम परत मिळवण्याचं स्वप्न बघत तो आज सकाळीच मुंबईला आला होता. पण इथे आल्यापासून प्रज्ञाचे दर्शनही झालं नव्हतं. त्याला पाहून प्रज्ञा बहुतेक घरी निघून गेली होती.
" काळजी करू नकोस! मी उद्या प्रज्ञाशी तुझी भेट घडवून देतो." हर्षद म्हणाला,
"तुझं आजच लग्न झालंय! तू मृदुलाकडे लक्ष दे! माझी काळजी करू नको! मी भेटेन तिला! तिचा राग फार काळ टिकणार नाही याची खात्री आहे मला!" इंद्रजीत. विश्वासाने म्हणाला.
तो स्टेजवरून खाली उतरला; तेव्हा प्रज्ञाची मैत्रीण निशा त्याला समोरून येताना दिसली.
"प्रज्ञा आली आहे ना? मी आल्यापासून ती कुठे दिसली नाही!" त्याने चौकशी केली.
"ती मघाशीच घरी गेली. तिचं अचानक् डोकं दुखू लागलं! " निशा त्याच्याकडे विचित्र नजरेनं पहातेय; असं त्याला वाटलं.
इंद्रजीत प्रज्ञाच्या घरी जायला निघाला. चार दिवसांत परत लंडनला जायचं होतं. त्याआधी प्रज्ञाशी बोलणं होणं आवश्यक होतं.
*********

प्रज्ञा हाॅलमध्ये बसली होती. डोळे बंद होते; पण घडलेले प्रसंग डोळ्यासमोरून सिनेमासारखे सरकत होते. जीतची त्या जलप्रलयामध्ये झालेली पहिली भेट-- त्यानंतर तिची मैत्री मिळवण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न-- लग्न ठरल्यावर तिच्या सहवासासाठी धडपडणारा जीत. अनेक वेळा जिवावर बेतलं, तरी न डगमगता तुझ्याशीच लग्न करणार असं ठासून सांगणारा जीत--- आणि अचानक एके दिवशी सर्व बंध तोडून निघून गेलेला जीत---. त्याला आज पाहिलं; आणि अनेक दिवसांनी मनाच्या जखमेवरची खपली निघाली होती. डोळ्यातल्या अश्रुंच्या रुपाने ती जखम आता भळभळा वाहू लागली होती.
होय! इतके प्रयत्न करूनही जीतला ती अजूनही विसरू शकली नव्हती.
********* contd.---Part 27.