Mayajaal - 27 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल -- २७

मायाजाल- २७
"इंद्रजीतला पाहून प्रज्ञाचा चेहरा कठोर झाला.
"मला आणखी त्रास द्यायचा बाकी राहिला आहे का? तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही! प्लीज! तू निघून जा! माझं डोकं दुखत होतं; म्हणून निघून आले मी! पण तू इथे का आलास?" प्रज्ञाने विचारलं. तिच्या स्वरातला अलिप्तपणामुळे इंद्रजीतचा अहंकार डिवचला जात होता. अनेक दिवसांनी तो भेटला होता; पण तिच्या चेह-यावर आनंद दिसत नव्हता. आपल्याला समोर पाहून प्रज्ञा पूर्वीचं सर्व काही विसरून धावत आपल्याकडे येईल- "किती वेळ लावलास यायला! किती वाट पहायला लावलीस!" असं काहीतरी म्हणेल; मिठी मारून रडेल; असं काहीसं चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं.पण प्रज्ञा एखाद्या ति-हाइत माणसाशी वागावं ; तशी त्याच्याशी वागत होती. तिच्याकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे काय बोलावं, हे त्याला सुचेनासं झालं. त्याने तिच्याशी पॅच-अप करायचं ठरवलं होतं; आणि ते आपण अगदी सहज करू शकू असा विश्वास आतापर्यंत त्याच्या मनात होता; पण ते आता कठीण वाटत होतं..
"तू माझ्याशी अशी परक्यासारखी का वागतेयस? मी तुझा जीत - तुझ्यासमोर उभा आहे! मला पाहून तुला आनंद नाही झाला? खास तुला भेटून दोघांमधले गैरसमज दूर करण्यासाठी इतक्या लांबून आलोय! " न राहवून तो म्हणाला.
"काय म्हणालास? माझा जीत? माझी काहीही चूक नसताना, माझ्याशी ठरलेलं लग्न मोडून निघून गेलास तेव्हा मी तुझी कोण होते? तेव्हा तर मी तुझी कोणीही लागत नव्हते ! जर माझा जीत असता तर माझ्या भावनांचा त्यानं नक्कीच विचार केला असता!" प्रज्ञा चिडून म्हणाली. जीतच्या ढोंगीपणाचा तिला तिटकारा आला होता.
"ती वेळ अशी होती, की माझ्याही भावनांना मी तिलांजली दिली होती. हर्षदच्या आत्महत्येचं पाप मला माझ्या माथी घ्यायचं नव्हतं." जीत त्याची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. " आपल्या लग्नाविषयी कळलं, तेव्हा त्याने विष घेतलं होतं. मला त्याच्या आत्महत्येचं पाप माझ्या डोक्यावर घ्यायचं नव्हतं; शिवाय त्याला काही झालं असतं, तर त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं असतं. हर्षद त्यांचा एकुलता एक आधार होता. हा सगळा विचार करून मी त्यावेळी बाजूला व्हायचा निर्णय घेतला होता." तो पुढे म्हणाला.
"तुझ्या निर्णयाचा सगळ्यात जास्त फटका मला बसणार होता! एवढं मोठं पाऊल उचलताना मला विश्वासात घेणं तुझं कर्तव्य नव्हतं का?आपण दोघं मिळून विचार करून यातून मार्ग काढू शकलो असतो. पण तू तर निर्णय घेताना माझं अस्तित्वच नाकारलंस! माझं काही वेगळं मत असू शकतं; असं नाही वाटलं तुला? तुला माझी काळजी नाही वाटली? माझं काय होईल, याचा विचार करावासा नाही वाटला तुला?" प्रज्ञाने त्याला मधेच थांबवत विचारलं.
"काळजी नक्कीच होती, पण तू खंबीर आहेस, धैर्याने निर्णय घेशील, हे मला माहीत होतं! सगळ्यांच्याच हितासाठी कोणीतरी त्याग करण्याची गरज होती. आणि हर्षद तुझ्या प्रेमासाठी जीव द्यायला तयार होता. तो तुला सुखात ठेवेल याची खात्री होती मला! " जीतच्या चेह-यावर एखादे महान कार्य केल्याचा अभिमान स्पष्ट दिसत होता.आपण प्रज्ञाशी चुकीचे वागलो ; याविषयी जराही खंत त्याच्या स्वरात नव्हती; हे पाहून प्रज्ञाचा राग अनावर होत होता.
"त्याच्याकडे मला ढकलून स्वतः चालता झालास! हेच का तुझं प्रेम? तुला हर्षदची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहित होती. तरीही त्याच्यावर एवढा विश्वास? आणि मला गृहित धरून तू माझ्या वतीने त्याच्याशी माझ्या लग्नाचा निर्णय परस्पर घेऊन टाकलास! तुम्ही एकीकडून खूप पुरोगामी असल्याचं नाटक करता; पण पुरातन काळापासून चालत आलेला पुरुषी अहंकार तुझ्यासारख्या लोकांच्या रुपाने अजूनही जिवंत आहे! माझ्यासारख्या सुशिक्षित, स्वावलंबी, स्वतंत्र विचारांच्या मुलीशी वागण्याची जर ही पद्धत असेल, तर परावलंबी स्त्रियांना जगात कशी वागणूक मिळत असेल? तू मित्र म्हणून ---कदाचित् माणूस म्हणूनही महान असशील--- पण पती म्हणून -- प्रियकर म्हणून --- सपशेल नापास झालायस." प्रज्ञाचा पारा चढलेला पाहून जीतचा चेहरा पडला. आपण एवढा मोठा त्याग केला, हे कळल्यावर प्रज्ञाच्या मनात आपल्याविषयी काही किंतू असेल; तर दूर होईल असं त्याला वाटलं होतं ; पण प्रज्ञाची ही प्रतिक्रिया त्याला अपेक्षित नव्हती. तो थोडा गडबडला, पण त्याने स्वतःला क्षणात सावरलं. तो प्रज्ञाला समजावू लागला,
"जे काही झालं; ते विसरून जाऊन आपण नव्यानं आयुष्याला सुरूवात करूया. मी अगदी खरं सांगतो ; माझं तुझ्यावर अजूनही तितकंच प्रेम अाहे; म्हणूनच हर्षदच्या लग्नाचं कळताच मी धावत आलो. आता आपल्या प्रेमाच्या आड कुणीही येणार नाही. इतक्या विरहानंतर अापलं प्रेम सफल होण्याची वेळ आलीय. मधे काही झालंच नाही असं समजूया. लंडनमध्ये माझा जम चांगला बसलाय. प्रॅक्टिस चांगली आहे. तुलाही डाॅक्टर म्हणून चांगली संधी मिळेल. " तो तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
" तुला पाहिजे होतं तेव्हा मला चांगुलपणा दाखवून माझं प्रेम मिळवलंस---- तुला मित्रासाठी त्याग करावासा वाटला; तेव्हा लग्न मोडून तडकाफडकी लंडनला निघून गेलास---- आणि आता पुन्हा नातं सुरू करायचा निर्णय तूच घेतलायस ---- या तुझ्या मनाच्या हिंदोळ्यांमध्ये माझं स्थान काय आहे? मला कळू शकेल का? समोरच्या व्यक्तीलाही मन आणि बुद्धी आहे हे लक्षात घ्यायची तुला गरजच वाटत नाही. मी तुझ्या प्रेमात पूर्ण गुरफटलेली असताना अचानक् कायमचा निरोप घेऊन लंडनला निघून गेलास; तेव्हा माझी काय अवस्था झाली असेल; याचा विचार करण्याची तुला गरज वाटली नाही; आज तुझ्याविषयी मला काय वाटतं; याची दखल तुला घ्यावीशी वाटत नाही! स्वतःबरोबर इतरांच्या आयुष्याची गणितं स्वतःच मांडून मोकळा होतोस; पण आयुष्य म्हणजे गणित नाही."
इंद्रजीत यावर काही बोलू शकला नाही. इतक्या रागाने प्रज्ञाला बोलताना त्याने कधीच पाहिलं नव्हतं--- तिचं हे रूप त्याला नवीन होतं. प्रज्ञाच्या प्रश्नांना त्याच्याकडे उत्तर नव्हतं. प्रज्ञाचं बोलणं ऐकून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं,
"हर्षदने निदान मला काय म्हणायचं आहे ते ऐकून घेतलं---त्यावर विचार केला! त्यालाही त्यावेळी खुप मोठा मानसिक धक्का बसला, पण माझे विचार त्याने मान्य केले! तू त्याला नीट पटवून दिलं असतंस, तर कदाचित् तो स्वतःच आपल्या मार्गातून दूर झाला असता! " प्रज्ञा जीतला तो किती चुकीचा वागलाय हे सांगण्याचा प्रयत्न करत होती. पण तिच्या बोलण्याचा रोख त्याच्या लक्षात येत नव्हता.
" प्रज्ञाचा राग साहजिक आहे. पण माझ्यावर तिचं खरं प्रेम होतं. ते प्रेम तिला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी तिला माझ्यावरचा राग विसरायला लावेन." तो स्वतःला समजावत होता. वरकरणी तो प्रज्ञाला लाडी - गोडीने समजावण्याचा प्रयत्न करू लागला,
" मी तुला गृहित धरलं, कारण मी तुला सगळ्यात जवळची व्यक्ती मानत होतो.पण यावेळी मी तुला बरोबर घेऊनच लंडनला परत जाणार आहे. मी आठ दिवसांसाठी इथे आलोय. तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस हे मला चांगलंच माहीत आहे.. तू जरी रागावली असलीस तरी तुझ्या डोळ्यांत मला माझ्यावरचं प्रेम अजूनही दिसतंय. पहिलं प्रेम कोणी सहजासहजी विसरू शकत नाही! माझंच बघ! मी इतके दिवस तुझ्यापसून लांब राहिलो; पण तुझ्या आठवणी सतत माझा पाठपुरावा करत होत्या! माझं अजूनही तुझ्यावर पूर्वी इतकंच प्रेम आहे; त्याच हक्काने मी तुला कायम माझ्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आलोय!" तो प्रज्ञाला जुन्या प्रेमाचा दाखला देत म्हणाला.
"इंद्रजीतची - ' येन केन प्रकारेण--' स्वतःचं म्हणणं समोरच्या माणसाच्या गळी उतरवायची सवय अजून गेली नाही!" प्रज्ञा मनाशी म्हणाली.
इतक्यात निमेश आला. इंद्रजीतला आत बघून त्याच्या चेह-यावर आश्चर्य उमटलं. त्याच्यामागून प्रज्ञाच्या आई बाबांना येताना पाहून वर उठत इंद्रजीत म्हणाला,
"मला लवकरात लवकर तुझं उत्तर हवंय. परत भेटूया." तिच्या बाबांकडे बघण्याची त्यची हिंमत झाली नाही. त्यांच्या मनातला अंगार त्यांच्या लालबुंद झालेल्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. फक्त काही बोललो, तर प्रकरण हमरी तुमरीवर येईल आणि तोंडून अपशब्द जातील म्हणून ते गप्प राहिले होते. त्यांचा हात नीनाताईंनी घट्ट धरून ठेवला होता, जणू त्या अनिरुद्धना काही न बोलण्याची विनंती करत होत्या. पण निघताना "हिला जरा समजावा! " असं तिच्या आईला हलक्या आवाजात सांगायला इंद्रजीत विसरला नाही. पूर्वी नीनाताई नेहमीच त्याच्या बाजूने असत; आताही त्यांची आपल्याला नक्कीच मदत होईल याची इंद्रजीतला खात्री होती.
प्रज्ञाला आश्चर्य वाटत होतं की, आपलं काही चुकलंय याची यत्किंचितही जाणीव इंद्रजीतला आहे; असं दिसत नव्हतं. आजही तो आपण खूप मोठा त्याग केला आहे; अशा अभिनिवेशात बोलत होता. त्याने स्वतःच स्तःला असामान्यत्व बहाल केलं होतं. आपल्यामुळे प्रज्ञाला किती मनस्ताप झाला, हे त्याच्या गावीही नव्हतं.
************ Contd.--- part 28.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED