Mayajaa - 28 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल -- २८

Chapter. 15
मायाजाल २८
इंद्रजीत निघून गेला, तरीही नीनाताई दरवजाकडे बघत राहिल्या होत्या इतक्या वर्षांनी त्यांनी इंद्रजीतला पाहिलं होतं. प्रज्ञाचा संतप्त चेहरा; आणि जास्त काही न बोलता निघून गेलेला इंद्रजीत --- काय झालं असेल; याची कल्पना त्यांना आली होती.
एक सुस्कारा सोडून प्रज्ञाने आईकडे पाहिलं.
"इंद्रजीत इथे कधी आला? तुझ्या मैत्रिणी म्हणाल्या; की डोकं दुखत होतं; म्हणून तू तिथून निघून आलीस! तुझी काळजी वाटली आणि आम्हीही लगेच निघालो! मी त्याला लग्नात पाहिलं पण तो इथं येईल असं वाटलं नव्हतं. तिकडे कसा सुखाचा संसार करतोय, हे सांगायला आला होता का? तू फार मनाला लावून घेऊ नको! मी चहा करते तो घे, आणि स्वस्थ पड थोडा वेळ! जरा बरं वाटेल!" आईच्या डोळ्यात प्रज्ञाविषयी काळजी स्पष्ट दिसत होती.
"मी ठीक आहे! काळजी करू नकोस! इंद्रजीतला कोणीतरी सागितलं की मी घरी आलेय; म्हणून तो इथे आला. त्याने अजून लग्न केलं नाही! झालं-गेलं सगळं विसरून माझ्याबरोबर लंडनला चल; असं म्हणत होता.पण त्याला त्याच्या वागण्याची जराही खंत आहे, असं त्याच्या बोलण्यावरून वाटत नव्हतं. मी चांगलंच सुनावलं त्याला! तो मला त्याच्या तालावर नाचणारी कळसूत्री बाहुली समजतो की काय? सगळे निर्णय तो घेणार; आणि मी फक्त 'मम' म्हणत तो म्हणेल तसं वागायचं!" प्रज्ञाचा राग अजून कमी झाला नव्हता.
अनिरुद्धचा संताप आता अनावर झाला होता,
"मनात आलं तेव्हा तडकाफडकी निघून गेला , आणि मनात आलं, तेव्हा परत नातं जुळवूया म्हणतोय, तू त्याच्याशी बोलायलाच नको होतं. आला तेव्हाच बाहेरचा रस्ता दाखवायला हवा होतास! आणि, नीना! तू मला बोलायला का दिलं नाहीस? त्याला चांगला खडसावायचा होता मला!" मनातला राग त्यांनी नीनाताईंवर काढला.
"आपली प्रज्ञा खंबीर आहे! तुम्ही काही बोलायची गरजच नव्हती! पाहिलंत नं; त्याचा चेहरा कसा पडला होता! आणि तुम्ही दोघं शांत व्हा पाहू! कोणताही निर्णय घेण्याची घाई नको! त्याने अजून लग्न केलं नाही; हे लक्षात घ्या! आपण जरा शांतपणे विचार करूया!" -----
"प्रज्ञाला समजावा" असं इंद्रजीत का म्हणाला, ते आता नीनाताईंच्या आता लक्षात येत होतं. त्यांच्या मनात आशा जागृत झाली होती. मुलीच्या आयुष्याची घडी परत बसू शकेल; ह्या दिशेने त्या आता विचार करू लागल्या होत्या. पण प्रज्ञाचा राग पहाता, या क्षणी काही न बोलणं योग्य; असं त्यांनी ठरवलं!
*******
त्या दिवशी रात्री जेवणं झाल्यावर नीनाताई प्रज्ञाजवळ गेल्या. प्रज्ञाच्या चेह-याकडे पाहिलं; पण प्रज्ञा कसलंतरी मेडिकल मॅगझिनसाठी वाचत होती. तिचा चेहरा प्रसन्न होता. "बहुतेक आज इंद्रजीत भेटल्यामुळे ही खुश दिसतेय. वरवर त्याच्यावर कितीही रागावली तरीही, मनापासून प्रेम करते त्याच्यावर! मागे एकदा ती म्हणाली होती तेच खरं! कितीही राग आला, तरीही प्रज्ञा दुस-या कुठल्या मुलाला इंद्रजीतचं स्थान देऊ शकत नाही! आता ती शांत झाली आहे; तिच्याकडे विषय काढायला काही हरकत नाही! " मघाशी प्रज्ञाचा रूद्रावतार पाहून तिच्याशी बोलायला त्या कचरत होत्या. पण-- "प्रज्ञाला थोडं समजावून सांगायला हवं. तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हातची संधी गमावून चालणार नाही!" स्वतःला समजावत त्या प्रज्ञाशी बोलू लागल्या,
"अजून झोप नाही आली तुला? उद्या सकाळी लवकर हाॅस्पिटलला जायचंय! "
"डाॅक्टरना आपलं ज्ञान अप-टु-डेट ठेवावं लागतं, आई! सतत नवीन शोध लागतात -- नवीन औषधं येतात -- आपल्याला नवीन बदल माहीत असतील तर पेशंन्टच्या ट्रीटमेंटसाठी चांगला उपयोग होतो! हे सगळं पुस्तकं वाचल्याशिवाय कसं कळणार? हे आर्टिकल बघ! ज्यांना गर्भधारणा होते; पण काही करणास्तव दोन- तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाही; अशा स्त्रीयांसाठी नवीन औषध बाजारात आलंय! आॅफिस आणि घर सांभाळत नोकरी करणा-या अनेक स्त्रियांमध्ये शारिरिक आणि मानसिक ताणामुळे आजकाल ही समस्या खुप बघायला मिळते. या औषधाचा अनेकजणीना उपयोग होईल! मी जरा हे आर्टिकल वाचतेय! खूप महत्वाचं आहे! तू काळजी करू नको-- थोड्या वेळाने झोपेन मी! " प्रज्ञा म्हणाली.
"ते पुस्तक जरा बाजूला ठेव! तुझ्याशी बोलायचंय मला! जगाचा विचार करतेस; स्वतःचा कधी करणार? दुपारी इंद्रजीतने तुला लग्नाविषयी विचारलं--त्याचं काय ठरवलंस तू?" त्यानी विचारलं.
"ते तर मी तेव्हाच सांगितलं आई! परत सांगते --- त्याच्या मूड प्रमाणे वागायला मी काही कळसूत्री बाहुली नाही. माझ्या दृष्टीने विषय कधीच संपलाय." प्रज्ञाने स्पष्ट शब्दांत आईला सांगून टाकलं.
"पण प्रज्ञा! मला माहीत आहे; तू अजूनही त्याला विसरली नाहीस.आणि तो जरी चुकीचा वागला असला; तरीही अजुन तुझ्यावरच प्रेम करतो; त्यानेही अजून लग्न केलं नाही! नशिबानं तुम्हाला परत एकत्र येण्याची संधी दिलीय; तू थोडा विचार करून निर्णय घ्यावास असं मला वाटतं! आम्हाला तुला आयुष्यात सुखी झालेलं पहायचं आहे. थोडा विचार करून निर्णय घे!" आई प्रज्ञाला समजावत होती.
"तुला कळणार नाही आई! पण मला काय म्हणायचं आहे; हे बाबांना चांगलंच कळलं आहे! मला एक गोष्ट सांग-- त्यानं जाताना माझं काय होईल; हा विचार केला होता? जिथे माझ्या मनाचा विचार केला जात नाही तिथे मी सुखी कशी होणार? आज त्यानं तुला मला समजावायला सांगितलंय ! लग्न मोडून तडकाफडकी निघून जाताना तुझा सल्ला घेतला होता?" प्रज्ञा जीतने दिलेला मनस्ताप विसरू शकत नव्हती.
"ठीक आहे! पण जर त्याच्याविषयी तुझ्या मनात एवढा राग आहे; तर मी जेव्हा डाॅक्टर संदीपविषयी तुला विचारलं; तेव्हा इंद्रजीतची जागा कोणी घेऊ शकत नाही असं का म्हणालीस? त्यांच्याकडूनही आज ना उद्या विचारणा होणारच आहे! आजच त्यांचा फोन आला होता--- त्यांची आई आठवड्यासाठी मुंबईला आली आहे! ते विचारत होते की; " आईची तुमच्याशी ओळख करून द्यायची आहे--- प्रज्ञाला कधी वेळ आहे?" ----- त्यांना काय उत्तर द्यावं; हेच मला सुचेना!" आई आणखी काही बोलणार होती पण प्रज्ञाने तिला अडवलं. ती हसून म्हणाली,
" त्यांना ओळखच करून द्यायची आहे नं? संध्याकाळी कधीही बोलावून घे!! पण लग्नाचा विषय काढू नका म्हणजे झालं! तसे डाॅक्टर संदीप माझे चांगले मित्र झाले आहेत! नेहमी मला फोनही करत असतात! ते मलाही विचारत होते; की आईला तुमच्याकडे कधी घेऊन येऊ? त्यांना स्वतःला तरी रविवार शिवाय कधी वेळ असतो? तेव्हा रविवारी तिला आमच्याकडे घेऊन या असं म्हणालेय मी!" ती पुढे बोलू लागली,
" आई! इंद्रजीत माझ्याशी वाईट वागला, त्यामुळे त्याचा राग मझ्या मनात आहे; पण त्याने हर्षदच्या कुटुंबासाठी स्वतःलासुद्धा शिक्षा करून घेतली आहे; हे आठवलं, की माणूस म्हणून तो खूप उंच वाटू लागतो! मी त्याला स्वीकारू शकत नाही; आणि माझ्या मनातलं त्याचं स्थान रिक्तही होत नाही! मलाही या गोष्टीचा खुप त्रास होतोय! ही द्विधा मनःस्थिती किती दिवस माझा पाठपुरावा करणार आहे; हे मलाही माहीत नाही! संदीप खूप चांगले आहेत; कदाचित् अनेक बाबतीत जीतपेक्षाही उजवे आहेत; पण जोपर्यंत माझ्या मनात जीतची प्रतिमा आहे; तोपर्यत दुस-या कोणाशी लग्न करणे; हा त्या माणसावर अन्याय नाही का होणार? आपल्याकडे असं म्हणतात; की पहिलं प्रेम माणूस कधी विसरू शकत नाही; पण असं असेल; तर मनात कोणीतरी असताना व्यवहार म्हणून स्वर्थासाठी लग्न करणं; हा जोडीदारावर आयुष्यभरासाठी अन्याय नाही का? मला हे पटत नाही!" तिच्या या युक्तिवादावर काय उत्तर द्यावं हे नीनाताईंना कळत नव्हतं, कारण तिचं म्हणणं चुकीचं नव्हतं
"आई रात्र खूप झालीय! सकाळी लवकर उठायचं आहे! आपण झोपूया का? या विषयावर नंतर बोलू! " आणि जांभई देत प्रज्ञा तिथून उठली. प्रज्ञाला जास्त चर्चा करण्याची इच्छा नाही; हे नीनाताईंनी ओळखलं.
"माझा तुला सल्ला आहे. अहंकार थोडा बाजूला ठेवलास; तर हा सुखाचा दरवाजा नशिबानं तुझ्यासाठी उघडला आहे. मला खात्री आहे; की तुझ्या मनातली इंद्रजीतची जागा अजूनही कोणी घेऊ शकलेला नाही! आयुष्यात प्रत्येक माणूस कधीना कधी चुकतो. तो सुद्धा चुकलाय-- पण एकमेकांशी बोलून गैरसमज दूर करता येतील. परत एकदा सांगते; नीट विचार करून निर्णय घे! तू जे काही ठरवशील त्याला आमचा नेहमीच पाठिंबा असेल; याचीही खात्री असूदे!" त्या तिथून निघताना म्हणाल्या.
प्रज्ञा जरी आता काही ऐकायला तयार नव्हती; तरीही ती आपल्या बोलण्यावर विचार नक्कीच करेल हे त्यांना माहीत होतं.
********* contd.. -- chapter 29.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED