मैत्र.... Shirish द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मैत्र....

" मैत्र.... "


परिपाठ सुरू होता. शाळेपुढच्या ग्राऊंडवर सगळी मुलं रांगेत शिस्तीत उभी. पहिली रांग पहिलीवाल्यांची, दुसरी, तिसरी. अशा एकामागे एक रांगा. आमचा वर्ग आठवीचा. सर्वात शेवटचा. सर्वात शेवटी. राष्ट्रगीत - प्रतिज्ञा झाली. खाली बसलो. आणि हळू आवाजात आमची चर्चा सुरू.
"नवीन मुख्याध्यापक आलेत.. "
" हो रे खूप स्ट्रिक्ट आहेत म्हणे ते.. "
" मग आपल्याला सांभाळून राहावे लागेल.. "
" हो ना कसले बघतात बघ ना ते चष्म्यातून.. " समोरच्या खुर्चीवर बसलेल्या मुख्याध्यापकांकडे बघत आम्ही आमच्यात धुसफुसत होतो.
इतक्यात मागच्या कुणीतरी माझ्या पाठीवर काहीतरी फेकले. मी वळून बघितले. खडूचा तुकडा होता. मी तो उचलला आणि परत एकाला फेकून मारला. हे आमचं नेहमीचंच. खोड्या - धिंगाणा - दंगामस्ती. परिपाठातही आमची मुलं शांत बसायची नाहीत.
सगळ्यात शेवटी बसलेल्या एकाने खडूचा तो तुकडा अंगठ्याच्या नखावर ठेवला. तर्जनीचा ताण दिला. अन् खडू उसळला. भिर्रर्र उडत तो खडूचा तुकडा सगळ्या रांगा क्रॉस करून थेट गेला अन् मुख्याध्यापकांच्या चष्म्यावर जाऊन धडकला. खटकन् आवाज झाला. ते तटकन् उभे राहिले. एच एम उभे राहिले म्हणून सगळे शिक्षकही उभे राहिले. सुरळीत सुरू असलेला परिपाठ बंद पडला.
रागाने लालबुंद झालेले मुख्याध्यापक सर गरजले, "मागच्या रांगेतील कुणातरी हरामखोराने मला खडू फेकून मारलाय. कोण आहे तो??"
झपाझप पावलं टाकीत आमचे वर्गशिक्षक आमच्यापर्यंत आले. त्यांच्या हातात भली दांडगी छडी होती. ते आमच्यावर वसकले," नालायकांनो, हद्द झाली आज तुमच्या वालंटरपणाची.. थेट मुख्याध्यापक सरांना खडू मारता?? कोणी फेकला तो खडू... सांगा म्हणतोय नाही तर एकेकाला फोडून काढीन. "
आम्ही सर्वजण एकमेकांकडे बघू लागलो. कुणीच काहीच बोलले नाही. सर्वांनी माना खाली घातल्या.
" अरे काय म्हणतोय मी... " सर कडाडले," म्हणजे तुम्ही अपराध्याला पाठीशी घालणार आहात तर.. " आमच्या मौनाचा सरांनी अर्थ लावला. आणि पुढे काहीही न बोलता त्यांनी आमच्या पायांवर सपासप छडीचे वळ उमटवले. त्यांची आणखी एक फेरी येणार इतक्यात मुख्याध्यापक जवळ येऊन त्यांना म्हणाले, "थांबा सर. बाकीच्या सर्व मुलांना वर्गात बसवा. ही मुलं इथेच उभी राहू द्या उन्हात.."
लगेच आदेशाचे पालन झाले. सगळे विद्यार्थी आपापल्या वर्गात गेले. फक्त आमच्या वर्गातील मुले मैदानावर उन्हात उभी राहिली. सर्व शिक्षकही स्टाफ रूममध्ये गेले. ऊन तापलं होतं. उन्हाचे चांगलेच चटके बसायला लागले होते. सर्वजण एकमेकांकडे पाहू लागलो. बोलत कुणीच काहीच नव्हतं. इतक्यात एचएम सरांनी आमच्या मॉनिटरला - राजूला बोलावून घेतले. तो हुशार, अभ्यासू आणि सरांच्या विश्वासातला विद्यार्थी होता. तो नक्कीच सगळं सांगणार याची आम्हाला खात्री होती. जाताना त्याने एकदा वळून आमच्याकडे बघितलं. बोलला तोही नाही. आम्हीही नाही.
राजू आॅफिसात जाऊन बराच वेळ झाला होता. आता आमच्या पायाखालची जमीन सरकली. सर काय शिक्षा देतील याचा काहीच नेम नव्हता. आम्ही मनाची तयारी करू लागलो. राजू परत आला. त्याने आमच्या सगळ्यांकडे एकच कटाक्ष टाकला. 'मी काही बोललो नाही रे दोस्तांनो!' त्याने नजरेनेच सांगितले. आम्ही नजरेनेच समजलो. तो आमच्यामध्ये येऊन उभा राहिला.
मध्यान्ह उलटली. खिचडी खायला मध्यंतराची सुटी झाली. सगळे वर्ग सुटले. आम्ही मैदानातच उभे. सर्व मुलांनी खिचडी खाल्ली. ते खेळायला लागले. आम्ही मैदानातच उभे. शिक्षकांनीही डबे उघडले. ते जेवायला बसले. आमचे वर्गशिक्षक नव्हते त्यात. ते आमच्याकडे आले.समजावू लागले, "अरे का हट्ट करताय पोरांनो? कुणी खडू फेकला ते सांगा आणि मिटवा हा प्रश्न. तिकडे तो हेडमास्तर जिद्दीला पेटलाय. आणि तुम्ही हे असे.. "
" सॉरी सर पण आम्हाला माहितच नाही तर कुणाचे नाव घेणार? " आमच्यापैकी एकजण बोलला.
" खरंच तुम्हाला माहित नाही? तुमच्यापैकी कुणीच नाही? " सरांचा विश्वास बसत नव्हता.
" मी खडू फेकला सर.. " मागच एकजण हात वर करून बोललो. सगळ्यांनी मागे वळून बघितले. सर त्याच्याकडे जाऊ लागले. तोच दुसरा एकजण म्हणाला," नाही सर.. मी फेकला खडू.. "
" नाही सर मी.. "," मी.. "," मी फेकला.. " आणि सर्वच मुलांनी हात वर केले." आम्ही खडू फेकला सर...!" आता सर स्तब्ध उभे राहिले. क्षणभर थांबले. बोलले, "ठीक आहे. आता... ब्रेक घ्या... खिचडी खा.. पाणी प्या.. आणि इथेच येऊन पुन्हा उभे राहा!! मी एचएम सरांशी बोलतो."
आमच्या सरांचा आमच्यावर खूप जीव होता. ते रागवायचे, मारायचे... पण काळजीही करायचे. आताही त्यांचे डोळे आमच्यासाठी पाणावले होते. त्यांनी आज त्यांचा डबा उघडलाही नव्हता.!
आम्ही धावत पळत गेलो. सगळ्यांची पोटं फुगली होती. सैल झालो. उरलीसुरलेली खिचडी खाल्ली. ढसाढसा पाणी प्यालो. पुन्हा मैदानात - उन्हात - आपापल्या जागी उभे राहिलो.
साडेतीन वाजता म्हणजे शाळा सुटण्याच्या अर्धा तास अगोदर मुख्याध्यापक सरांनी आम्हाला आॅफिसात बोलावून घेतले. सर्वजण गेलो. पहिले दहा मिनिट सर काहीच बोलले नाहीत. आमच्याकडे नुसते निरखून बघत राहिले. मग म्हणाले, " मला खडू फेकून मारला हा मुद्दाच नाही. उद्या कुणी माझ्या मस्तकात दगड घातला तरी चालेल मला... प्रश्न शाळेच्या शिस्तीचा आहे.. विद्यार्थी म्हणून तुमच्याकडून होणाऱ्या चुकीच्या- स्वैर वागणूकीचा आहे."
सर बोलायचे थांबले."सर ते चुकून झाले.. मुद्दाम नाही.. " आमच्यापैकी एकजण बोलला.
"कुणाकडून? चूक कुणाची झाली तेच कळलं पाहिजे मला..." सरांनी लगेच प्रश्न केला.
आम्ही पुन्हा माना खाली घातल्या. सगळे मौनात.
" हे बघा अपराध करणाऱ्यापेक्षा अपराध्याला वाचवणारे जास्त गुन्हेगार असतात... " सर कडाडले. आता मला राहावलेच नाही. पुढे आलो. मुख्याध्यापक सरांच्या नजरेला नजर भिडवून उत्तरलो," असा कोणता गुन्हा केलाय सर आम्ही? आमच्यापैकी एकाकडून चूक झाली. त्याच्याकडून चुकून खडू उडाला. तुम्हाला लागला. याला तुम्ही चूक मानणार की गुन्हा सर? "
" त्याने जे केले ती चूक... तुम्ही सर्वजण मिळून हे जे करताय तो गुन्हा.. " सर शांतपणे बोलले," संघटित गुन्हेगारीचे लक्षण आहे हे... मला त्या मुलाचे नाव सांगा. प्रश्न मिटतो. "
" सर, माफ करा पण तिथून पुढे खरा प्रश्न निर्माण होणार आहे. " राजू समोर येऊन बोलला," होय.. आम्हाला माहीत आहे कुणी खडू फेकलाय तो. पण त्याचं नाव सांगायचं नाही असं आम्ही ठरवलंय. "
" होय सर.. " रोहित बोलू लागला," त्याचं नाव कळलं की तुमच्या मनात त्याच्याबद्दल द्वेषभावना निर्माण होणार. सगळ्या शिक्षकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून जाणार. एक अतिशय चांगला विद्यार्थी सर्वांच्या नजरेत व्हिलन ठरणार. वाया गेलेला विद्यार्थी म्हणून त्याच्याकडे सारेजण बघणार.... "
" म्हणून तुम्ही लपवताय का त्याला? "
" नाही सर.... " मी बोललो," या सगळ्या गोष्टी काही दिवसांनी विसरल्याही जातील. पण 'मला गरज असताना माझे मित्र माझ्या सोबत उभे होते' हे तो उद्या अभिमानाने म्हणू शकेल. आम्ही कोणाच्याही चुकीवर पांघरूण घालत नाही आहोत सर... फक्त मैत्री जपतोय... खडू फेकण्याची शिक्षा त्याला मिळालीय.. त्याच्या चुकीत आम्ही सामिल आहोत म्हणून आम्हीही ती भोगतोय... "
सर आमच्या सर्वांकडे बघतच राहिले. डोळ्यावरचा चष्मा काढून पुसत म्हणाले," खूप मोठे झालात रे पोरांनो तुम्ही... जा शाळा सुटलीय.... उद्या परिपाठाच्या वेळेला हजर राहा... नवीन खडू घेऊन..!! "
शाळेची घंटा वाजली. एकमेकांच्या हातात हात देऊन आम्ही आॅफिसबाहेर पडलो. दिवसभराचं ऊन माथ्यात मुरवल्यानंतर आता आमच्या चेहऱ्यांवर थंड सावली पसरली होती..!!

{ 'फरदड' या कथासंग्रहातून....}

© शिरीष पद्माकर देशमुख ®