चंदू Shirish द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चंदू

"चंदू"


आज रविवार. शाळेला सुट्टी. चंदू सातवीत होता. त्याने गृहपाठाच्या दोन वह्या आणि पुस्तकं थैलीत टाकली अन् बैलगाडीच्या खुटल्याला थैली लटकवली. आईचंही काम आटोपत आलं होतं. तिनं दुपारच्या भाकरी टोपल्यात टाकल्या. वावरात निघायला तयार झाली. बाबा आले. बैलगाडी जुंपली. चंदूने कासरा स्वतःच्या हातात घेतला. अन् गाडी दामटायला सुरूवात केली. बैलांच्या शेपटीला हात लागताच ती घोड्यासारखी पळू लागली. धाडधाड आदळत पळणाऱ्या बैलगाडीचा प्रवास अनुभवताना चंदू खळखळून हसत होता.
प्रत्येक सुट्टीला चंदूचा हा नित्यनेम ठरलेला. आईबाबा शेतात निघाले की मागे लागणे. बैलगाडी पळवणे. शेतात खेळणे अन् थोडासा अभ्यास करणे. आजच्या दिवशीही ठरल्याप्रमाणे सगळं चाललं होतं.
बाबांनी गाडी सोडली. बैल मेखीला बांधले. लाईट आली होती. मोटार चालू केली. तुरीचे दारे धरण्यासाठी वरच्या ढेल्यात गेले. आईने गाडीतलं चवाळं काढलं. सोबत आणलेल्या धुडक्याची वटी केली. अन् ती विहीरीवाल्या ढेल्यातला कापूस वेचण्यासाठी पाट्याला लागली.
आता आखाड्यावर चंदू एकटाच होता. तिथल्या लिंबाच्या झाडाच्या फांदीला त्यानं भाकरीचा पालव बांधला. आखाडा राखण्यासाठी दोन कुत्रे पाळलेले होते. मालक आले की ते गोंडा घोळायचे. चंदूच्याही मागे पुढे करू लागले. त्याने कुत्र्यांसाठी मुद्दाम आणलेल्या जाड भाकरी त्यांच्यापुढे टाकल्या. बोरीच्या झाडाखाली एक चक्कर मारली. अजून बोर पिकली नव्हती. दोन चार कच्चे बोरं तोंडात टाकले. लगेच थुंकलेही. आईच्या मागे कापसातही चक्कर मारली. पण आईने 'उन्हात येऊ नको' असे म्हणून धुनकावले. मग येऊन बसला लिंबाखाली. थैली काढली. सरांनी सांगितलेला गृहपाठ लिहायला सुरुवात केली.
धड्याचे नावही पूर्ण टाकले नव्हते, इतक्यात दोन्ही कुत्रे धावत भुंकत खालच्या ढेल्याकडे गेले. कुत्रे कसले वाघच ते. डुक्कर, हरीण, वानर अशा कोणत्याच उपद्रवी प्राण्याला ते रानात पाय ठेवू देत नव्हते. काय आलंय ते बघण्यासाठी चंदू उठून उभा राहिला. खालच्या ढेल्याच्या बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडावर वानरांचं टोळकं दिसू लागलं. वानर हुसकावण्यात चंदूला भला इंटरेस्ट. त्यानं आखाड्यावरचं एक दांडकं आणि गाडीतली गलूर घेतली. पळतच खाली निघाला.
जवळ जाऊन बघतो तर काय... वानराचं एक इवलुसं पिल्लू झाडाखाली पडलेलं होतं. दोन बाजूला असणारे दोन्ही कुत्रे त्याच्यावर झेपावण्याच्या बेतात गुरगुरत होते. झाडावर असलेली त्या पिलाची माय पिसाळल्यागत या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत होती. कर्कश्श आवाजात विव्हळत होती. पिल्लू फार तर तीन चार दिवसांचं असावं. त्याला झाडावर चढणे शक्य नव्हते. आणि कुत्र्यांच्या तावडीत सापडली तर शिकारच होईल या जीवाच्या भितीने वानरीही खाली येत नव्हते. वरच्या वर अस्वस्थपणे फांद्या तुडवताना तिची अगतिकता मात्र जाणवत होती.
हे सगळं दृश्य लक्षात यायला चंदूला क्षणही लागला नाही. कुत्र्यांनी पिल्यावर हल्ला करायच्या आधी चंदूने काठी भिरकावली ती सपकन् एका कुत्र्याच्या पाठीत बसली. तसे ते मागे सरले. पण हटले नाही. चंदू पिल्याच्या जवळ पोचला. त्याने त्याला उचलून घेतले. भेदरलेले पिल्लू थरथरत होते. चंदूने त्याला उचलताच वानरीचा कर्कश आवाज वाढला. ती आणखीच अस्वस्थ झाली. 'आता काय करावे' याचा विचार चंदू करू लागला. कुत्रे झाडापासून दूर गेल्याशिवाय वानरी खाली येणे शक्य नव्हते. अन् झाडावर वानर असताना तिथून हलायचंच नाही असं कुत्र्यांना जणू ट्रेनिंगच दिलेलं होतं. चंदूने काठी मारली, दगड फेकून मारले,भाकरीचा तुकडा दाखवला तरीही कुत्रे तिथून जायला तयार नव्हते. त्यांचं सगळं लक्ष चंदूच्या छातीशी बिलगलेल्या त्या वानरीच्या कोवळ्या पिल्लावर होतं.
चंदूने थोडा विचार केला अन् एक धाडसी निर्णय घेतला. आई कापूस वेचण्यासाठी धुडक्याची झोळी करून कमरेला कशी बांधते हे त्याने बघितलेले होते. त्याने स्वतःचा शर्ट काढला.शर्टाच्या बाह्या गळ्याभोवती बांधल्या. झोळी तयार केली. इवलुशा पिल्लाला त्यात बसवले आणि चंदू स्वतः झाडावर चढू लागला. चिंचा काढण्यासाठी तो कितीदातरी हे झाड रेंगला होता. अगदी वानरलाही लाज वाटेल अशा गतीने सरसरत तो झाडावर चढला. खाली उभे असलेले कुत्रे टक लावून त्याच्याकडे बघत होते. चंदू कमी उंचीच्या एका फांदीवर बसला. गडबडीने त्याने गळ्याभोवतीची गाठ सोडली. पिल्लाला झोळीतून बाहेर काढून फांदीवर ठेवले. इतक्यात वरच्या फांदीवरची वानरी खाली आली. तिने पिल्लाला उचलून पोटाशी कवटाळले अन् संतापलेली ती वानरी चंदूच्या अंगावर धावून आली. त्याला काही कळायच्या आत तिने चंदूच्या गालात दोन थप्पड लगावल्या. धक्का दिला. फांदीवर तोल सावरणारा चंदू 'आई गंऽऽऽ' असे किंचाळत धापकन झाडावरून खाली कोसळला.
चंदूचा आवाज ऐकताच गळ्यातली कापसाची झोळी बाजूला फेकून आई धावतच चिंचेच्या झाडाजवळ आली. झाडाखाली चंदू बेशुद्ध पडलेला होता. त्याला बघताच आई जोर्रात किंचाळली. तिचा आवाज ऐकून बाबाही धावतच आले. आईने चंदूला उचलून मांडीवर घेतले रडवेल्या, घाबरल्या आवाजात ती म्हणू लागली, "ऐ वाघा.. उठ ना रे काय झालं तुला... चंदू.."
बाबांनी त्याला हलवले. गालांना हात लावला. धावतच विहिरीवर गेले. पाण्याची बाटली भरून घेतली अन् धापा टाकत चंदू जवळ आले. त्याच्या तोंडावर दोन तीन पाण्याचे शिपकारे मारले. तेव्हा कुठे तो जरासे डोळे थरथरवू लागला. बाबांनी पाण्याची बाटली त्याच्या तोंडाला लावली. दोन घोट पाणी पिल्यानंतर चंदू जरा भानावर आला. त्याने डोळे उघडले. समोर आई होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. चंदूने मान जरासी तिरकी केली. तो झाडाकडे बघू लागला. तो काय शोधतोय आईबाबांना कळत नव्हतं. झाडाच्या सगळ्यात वरच्या फांदीवर ती वानरी जाऊन बसली होती. तिच्या पोटाशी घट्ट मिठी मारलेलं तिचं इवलं पिल्लू होतं. ते दृश्य बघितलं अन् चंदूचा चेहरा खुलला. स्मितहास्याची एक स्पष्ट रेषा त्याच्या चेहर्‍यावर उमटली.
"ऐ येडोबा, " बाबा त्याच्याकडे बघत म्हणाले," आरं झाडावून पडल्यावर लोकं रडत आसतेत.. आन् तू हासतुस व्हय रं चाभऱ्या... काय झालं? "
बाबांचे बोलणे ऐकून चंदूला अधिकच हसायला आलं. तो काहीच बोलला नाही. फक्त आईच्या पोटाशी घट्ट मिठी मारली त्यानं. आणखी काय सांगणार ना तो कुणाला काही..?!!


शिरीष पद्माकर देशमुख
मो. 7588703716