mayajaal - 29 books and stories free download online pdf in Marathi

मायाजाल -- २९

मायाजाल २९
रात्री नीट झोप न झाल्यामुळे दुस-या दिवशी प्रज्ञाचं लक्ष कामात लागत नव्हतं. उलट- सुलट विचारांचं काहूर उठल्यामुळे मन अशांत झालं होतं! मन आणि बुद्धी तिला विरुद्ध दिशांना ओढत होते. त्यातही बुद्धी प्रत्येक वेळी वरचढ ढरत होती; आणि तिला सल्ला देत होती; की " एकदा ज्याने विश्वासघात केला, त्याच्यावर परत विश्वास ठेवायची चूक करू नकोस!"
दुस-याच क्षणी मन आईच्या सल्ल्याची आठवण करून देत होतं! आई म्हणाली होती, "तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस; खोट्या अभिमानाच्या आहारी जावून आलेली संधी दवडू नकोस!"
तिचं स्वाभिमानी मन तिला सांगत होतं;
"तू इंद्रजीतला झिडकारलंस; ही तुझी चूक होती असं आईला वाटत असलं, तरीही तू जे केलंस; ते बरोबरच केलंस! स्वभिमानशून्य जीवनाला काय अर्थ आहे? तू तुझ्या निर्णयाशी ठाम रहा! हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे!"
रात्रीची अपूरी झोप--- आणि त्यात मनाची उलघाल इतकी वाढली; की प्रज्ञाला अस्वस्थ वाटू लागलं. ती ड्यूटीवरच्या डाॅक्टरना सांगून घरी जायला निघाली.
प्रज्ञा घरी आली; आणि दारातच थबकली. दिवाणखान्यात इंद्रजीतचे आई-वडील वडील बसले होते. दोघेही खूप आनंदात दिसत होते.
"बरं झालं तू आलीस! तुलाच भेटायला आम्ही आलो होतो.काल इंद्रजीत भारतात परत आलाय. आम्ही मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो!" स्नेहलताई म्हणाल्या. त्यांच्या चेह-यावरून आनंद ओसंडून चालला होता.
"हो! माहीत आहे! तो कालच इथे येऊन गेला! आईने सांगितलं असेलच तुम्हाला!" इंद्रजीतचा विषय आला, अाणि प्रज्ञाने तुटक उत्तर दिलं. तिला काय बोलावं; हे सुचत नव्हतं. स्नेहलताई बोलत होत्या,
" हर्षदचं काल लग्न होतं नं? त्याने मुद्दाम फोन करून जीतला बोलावून घेतलं होतं! दोघे शाळेपासूनचे जिवाभावाचे मित्र आहेत! अगदी भावांसारखे---! त्यामुळे हर्षदने आमंत्रण दिल्यावर त्याला यावंच लागलं!" त्यांच्या या बोलण्यावर अविनाश सरांच्या चेह-यावर उमटलेलं छद्मी हास्य प्रज्ञाच्या नजरेतून सुटलं नाही! बहुतेक हर्षदने इंद्रजीतला कसा त्रास दिला, हे त्यांना अाठवलं असावं. पण स्नेहलताईंना त्यांनी काही सांगितलेलं दिसत नव्हतं. कदाचित् इंद्रजीत अचानक् लंडनला निघून गेल्यामुळे त्यांची प्रकृती इतकी ढासळली होती;; की या गोष्टी सांगून त्यांना अधिक ताण देणं त्यांनी टाळलं असावं; असा अंदाज प्रज्ञाने बांधला.
स्नेहलताईं पुढे बोलत होत्या,
"त्याची चूक त्याला उमगलीय! खूप पश्चात्ताप होतोय त्याला! तुटलेलं नातं त्याला परत जोडायचं आहे. याच दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पहात होतो! त्याचा तुझ्यावर एवढा जीव असताना तो तेव्हा असा का वागला; हे आम्हालाही कळत नव्हतं. आता देवानेच त्याला चांगली बुद्धी दिलीय! आता लवकरच तुझी लक्ष्मीची पावलं आमच्या घरात पडतील! सगळं आपल्या मनासारखं होईल!" इंद्रजीतची आई तिचा होकार गृहित धरून बोलत होती. जणू मधली चार वर्षे काही घडलंच नव्हतं.
त्यांच्या आनंदावर विरजण घालणं प्रज्ञाला बरं वाटेना. जीतच्या अचानक् लंडनला जाण्याच्या निर्णयामुळे त्याच्या आई -वडीलांना कमी मनस्ताप झाला नव्हता! जे काही घडलं त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. प्रज्ञाने - 'आपण आधीच इंद्रजीतला नकार सांगितला आहे;' हे सागितलं असतं; तर त्यांना अपमानास्पद वाटलं असतं.
"या क्षणी यांना काही सांगणं योग्य होणार नाही! त्यांना इंद्रजीतकडूनच कळू दे!" ती मनात म्हणाली,
"आणि बरं का नीनाताई! तुम्हाला भेटून या; असं तोच त्याच्या बाबांना म्हणाला! मधल्या काळात जे काही झालं; ते आपण विसरून जाऊया! आमचा इंद्रजीत मनाने वाईट नाही! आणि प्रज्ञावर त्याचं मनापासून प्रेम आहे! " स्नेहलताईच आज बोलत होत्या.
अविनाश जरा गप्पच होते. कदाचित् इंद्रजीतचं प्रज्ञाचा जराही विचार न करता अचानक् निघून जाणं; त्याच्यासाठी खूप गंभीर गोष्ट होती,------ सहजासहजी न विसरण्यासारखी. इंद्रजीतच्या या वागण्यावर पांघरूण घालणं त्यांच्यासारख्या शिस्तप्रीय माणसासाठी कठीण होतं!
अनिरुद्धसुद्धा गप्प होते. तसं घरातलं वातावरण तंग होतं.
" आई ! यांचा चहा वगैरे झाला नं?" प्रज्ञाने विषय बदलण्यासाठी नीनाताईंना विचारलं.
"आणि तुमची दोघाची तब्येत कशी आहे?" तिने स्नेहलताईंकडे पहात विचारलं.
"आम्ही ठीक आहोत! आम्हाला येऊन बराच वेळ झाला! आता निघालो होतो; इतक्यात तू आलीस! इंद्रजीत लंडनला जाण्यापूर्वी एक मोठी पार्टी करूया! आणि सगळ्यांना लग्न ठरल्याचं सांगूया! कधी ते तुम्ही दोघं ठरवा! " जीतचे वडील म्हणाले. त्यांना जरी जीतचं वागणं पटलं नव्हतं, तरीही प्रज्ञा आपल्या घरी सून म्हणून यावी, ही सूप्त इच्छा मनात होतीच!
"इतकी घाई नको! अजून प्रज्ञाचं शिक्षण पूर्ण झालं नाही. आणि लंडन कुठे फार दूर आहे---- इंद्रजीत परत गेला, तरी मनात असेल, तेव्हा परत येऊ शकतो. मधल्या काळात मनं दुरावली आहेत; त्या दोघांना थोडा वेळ द्यायला हवा!" अनिरुद्ध म्हणाले. त्यांच्या मनातून इंद्रजीत पूर्णपणे उतरलेला आहे; हे प्रज्ञाला माहीत होतं. फक्त त्यांना अविनाश आणि स्नेहलताईंचं मन दुखवायचं नव्हतं.
प्रज्ञाचा स्वाभिमान दुखावला गेला आहे आणि ती आपलं काही ऐकून घेणार नाही, हे इंद्रजीतला कळून चुकलं होतं. कालच्या तिच्या बोलण्यावरून ती तिच्या मतांशी किती ठाम अाहे; हे सुद्धा तो ओळखून चुकला होता! म्हणून तो इतरांकडून तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होता; हे प्रज्ञाच्या लक्षात आलं होतं.
काॅलेजमध्ये असताना तिचं प्रेम मिळवण्यासाठी इंद्रजीतने किती प्रयत्न केले होते; हे प्रज्ञा विसरली नव्हती. आणि एकदा एखादी गोष्ट मिळवायची ठरवली; की हरप्रयत्नाने ती मिळवायचीच; हा त्याचा स्वभाव ती जाणून होती. तसेच त्याचे प्रयत्न आताही चालले होते! पण त्याच्या आई-वडीलांविषयी तिच्या मनात सहानुभूती होती; त्या दोघांकडून तिला नेहमीच प्रेम मिळालं होतं, त्यामुळे त्यांचा अपमान होईल किंवा दुःख होईल असं काही ती बोलली नाही.
***********
हे कमी होतं म्हणून की काय; त्या दिवशी रात्री हर्षदचा फोन आला.
" हॅलो हर्षद! घरात तुझ्या लग्नाची गडबड अजूनही चालू असेल! मला फोन करायला वेळ कसा मिळाला? मृदुला रागावेल हं तुझ्यावर!" प्रज्ञा हसत म्हणाली.
"तू अगोदर मला सांग; कसं वाटलं माझं सरप्राइझ? माझ्यामुळे तुमचं लग्न मोडलं याचा सल माझ्या मनातून काही केल्या जात नव्हता.मला तुमच्यातला गैसमज दूर करायचा होता. म्हणून मी मुद्दाम फोन करून जीतला लग्नाला बोलावलं! " तो हसत म्हणाला.
"" तू जीत येणार आहे; हे मला अगोदर सांगितलं का नाहीस? त्याला तिथे पाहून मला किती आॅकवर्ड झालं; तुला नाही कळणार! अाजू- बाजूला रहाणा-या सगळ्यांना -अगदी शेजा-यांनासुद्धा आमच्या लग्नाचा त्यानं काय तमाशा केला; हे माहीत आहे. सगळ्यांच्या विचित्र नजरांचा सामना मला करावा लागला! शेवटी सगळं असह्य होऊन मी निघून आले ! तुझं लग्न एन्जाॅय करायचं ठरवलं होतं. पण सगळ्यावर पाणी पडलं!" प्रज्ञा वैतागून बोलत होती.
"मला तुझा खोटा रूसवा कळत नाही असं तुला वाटतंय का? खरं सांग! जीतला बघून तुला आनंद नाही झाला? एक गोष्ट सांगू? आता तुमचं लग्न झालं की माझ्या चुकांचं परिमार्जन झालं; असं मला वाटेल. जीत अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. त्या दिवशी तू दिसली नाहीस; तेव्हा किती नाराज झाला होता! आता झालं- गेलं विसरून नवीन आयुष्याची सुरुवात कर! माझ्या चुकांची शिक्षा स्वतःला करून घेऊ नकोस! " त्याला तिच्याकडून काहीतरी चांगलं ऐकण्याची अपेक्षा होती.
" कधी कधी एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडते, तेव्हा खूप मनस्ताप होतो; पण नंतर लक्षात येतं; की जे घडलं ते आपल्या चांगल्यासाठीच होतं! तसंच ह्या बाबतीतही आहे! त्यावेळचं तुझं वागणं चुकीचं होतं हे जितकं खरं आहे; तितकंच, त्यामुळे इंद्रजीतची खरी ओळख मला योग्य वेळी पटली हे सुद्धा नाकारता येणार नाही! तुला खंत बाळगायची गरज नाही! आणि तुझं आताच लग्न झालंय; ह्या जुन्या गोष्टींचा विचार का करतोयस? "
"प्रज्ञा! सगळं विसरून आता इंद्रजीत बरोबर परत नातं जोडशील अशी अपेक्षा होती माझी! मी काही वेळापुर्वी त्यालाही फोन केला होता! तू त्याच्याशी काय बोललीस हे त्याने मला फोनवर सांगितलं नाही; पण "प्रज्ञा मला समजू शकली नाही; ती माझ्याशी बोलायलाही तयार नाही-- तुला जमलं तर तिला माझी बाजू समजावून सांग!" असं म्हणाला! तू त्याची बाजू ऐकून घ्यायला हवी होतीस!" हर्षद प्रज्ञाला समजावण्याचा प्रयत्न करत होता.
"मी तुम्हाला भेटायला एकदा तुझ्या घरी येणार आहे; तेव्हा याविषयी बोलू आपण! तुमच्या लग्नाचे फोटो मोबाइलवर पाठवून दे.! खरं म्हणजे तुझं लग्न लागताना बघायची खूप इच्छा होती; पण मला लवकर निघावं लागलं, त्यामुळे लग्न पूर्ण बघता आलं नाही; निदान फोटॊ पहायचे आहेत." प्रज्ञाने विषय बदलला अाणि फोन खाली ठेवला. तिचा चेहरा गंभीर झाला होता.
"किती जणांचा वापर इंद्रजीत मला समजावण्यासाठी करणार आहे? हे आता थांबायला हवं." प्रत्येकाकडून होणा-या सततच्या ब्रेनवाॅशला ती आता कंटाळली होती. इंद्रजीतला स्पष्ट नकार कळवणं गरजेचं झालं होतं!
******** contd---- part 30.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED