काकस्पर्श सोनाली देवळेकर द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

काकस्पर्श

नाना ओ नाना !!! हे घ्या केलीच पान, वड्याचा पिट, तांदुल आन मिटाई आजून काय हवा तर सांगा मी हाय येक घंटा हितच...त्या बाजूच्या बंगल्यातल्या काकूंच्या कडेपन असेच हाय उद्या...त्यासनी पन घेऊन यायचा हाय सगला....

बस बस रंग्या तू चहा घे मी टाकतोय माझ्यासाठी... असे म्हणत नाना आणलेल्या पिशव्या माजघरात घेऊन गेले...अरे रंग्या मोगऱ्याच्या गजरा राहिला रे...नंतर आणशील का??

व्हय अंतू अंतू...अन नाना माझ्या बाईला कदी यायचाय उद्या? येउदे रे १२- १२.३० पर्यंत....

नाना वय वर्ष ७१ सडपातळ बांधा, सम्पूर्ण पांढरे केस, गोरेपान अन तपकिरी घारे डोळे...सुभाष त्यांचा एकुलता एक मुलगा आणि अमृता त्यांची सून दोघे नोकरीला गेले की नाना अन त्यांचे राज्य सुरू होई...शुभमला म्हणजे नातवाला शाळे जवळच्या डे-केयर मध्ये ठेवायचे. येताना दोघे घेऊन यायचे...आधी शुभम नानांसोबत असायचा पण नंतर मात्र त्यांना होई ना म्हणून ही सोय केली.

संध्याकाळी अमृता सुभाष अन शुभम आले तसे नाना फेरी मारून येतो म्हणून पटकन बाहेर पडले. यांना काय झाले?? जाऊ दे रे जरा बाहेर; सतत घरीच असतात. आपल्यालाही थोडी मोकळीक. अमृता फ्रेश होऊन किचन मध्ये शिरली तसा तिचा पारा चढलाच

" झालं यावेळी ही नानांनी हा नसता उद्योग केलाच...वाटलं मागल्या वर्षी बडबडले त्याचा काही परिणाम होईल; पण नाही हे आहेच माझ्या पाठीशी.... सुभाष तू सांग नानांना हे मला काही जमणार नाही. मिटिंग आहे माझी उद्या हे करत बसले तर संपलेच सगळे घरी बसायची पाळी येईल.

हो हो तू शांत हो मी समजावतो त्यांना...सुभाषचे अमृता पुढे काही चालणार नव्हते. जेवणं अटपली अन अमृता शुभम ला घेऊन स्टडी रम मध्ये गेली तिच्या डोक्यात मगासचा राग धुसमुसत होताच पण सुभाषनी तीला शांत केलं म्हणून ती गप्प होती.

नाना नी रामस्तोत्र लावलं आणि शांत डोळे मिटून झोपाळ्यावर बसले. घरात काही वेगळे वातावरण निर्माण झाले आहे हे लक्षात आले त्यांच्या. मागल्या वर्षीचे अमृताचे बोल त्यांनाही आठवत होतेच....

नाना ओ नाना जरा येता का आपण बोलू....माहीत आहे रे तू काय बोलणार नाना नाराजीच्या स्वरात बोलले...

अहो तसं नाही पण आता दहा वर्षे लोटली; आणि आमचेही कामाचे व्याप वाढलेत त्यामुळे मागल्या वर्षी आपण ठरवलं ना सगळं मग परत का तुम्ही हट्टाने घाट घातला हा??

तुला नाही कळायचं रे!! तुम्हाला काही त्रास नाही होणार पण मला मात्र समाधान मिळेल...जा तू नको वकिली करुस बाबा जा....

सुभाषला नानांची मनस्थिती समजत असुनही बायको पुढे काही चालणार नाही हे नानांनी पक्के ओळखले होते.

सकाळी नाना या दोघांच्या निघायची वाटच पहात होते. जसे शुभम नी बाय बाय केले तसे झटकन उठले आणि पटापट प्रातविधी आटोपून, स्नान करून तयारीत होते. रंग्यांनी त्याच्या बहिणीला नानांच्या मदतीला आधीच पाठवलं...ये ये सरू; रंग्यांनी सांगितले ना सगळं व्हय जी कुटून सुरू करू बा...हे बघ ही भाजी, आमटी, खीर, पुरी, वडा, भजी अन वरण-भात किती वेळ लागेल तुला. .

बा यो सगला दोन घंटा तर बेस जाईल पन म्या करतो बेगीन तुमि जावा...१२ पर्यंत रंगा बायकोलाही घेऊन आला. ये रे बैस मी आलोच.....

नाना त्यांच्या बेडरूममध्ये गेले....नानीची तसबीर टेबलावर ठेवली स्वच्छ वस्त्राने पुसून त्यांच्या कपाळावर ठसठशीत कुंकू लावले मोगऱ्याचा गजरा घातला. नानांचे डोळे अश्रूंनी भरून गेले; किती सुंदर दिसतेस ग अजून असे म्हणून एक टपोरे गुलाबाचे फुल फोटोवर ठेवले....थांब हो आलोच....आडे म्हणत किचन मध्ये सरूला म्हणाले झाले का ग बाई??? सवाष्णीला असे खोळंबत ठेवायचे नसते....

व्हय जी झाला सगला... हात पुसत सरू आली. चल आता ताट घे आणि मी सांगतो तसे वाढ पानात...नानांनी सरू कढून व्यवस्थित पान वाढून घेतले...आणि स्वतःचं थरथरत्या हातांनी नानीच्या तसबिरी समोर ठेवले.

थांब हो बाई!! आलो हा, रंगाच्या बायकोला वाण देऊन आलोच ग...असे म्हणत नाना गडबडीत बाहेर आले.

सरू ये ग बाई; हे दुसरं ताट घे अन ठेव समोर. रंग्याची बायको पाटावर बसली होती तिथं सरूनी ताट ठेवलं.

हं!! आता तिच्या साठी काढून ठेवलेलं वाण दे ग तिच्या हातांत! नानांनी सौभाग्याचे वाण व्यवस्थित काढले होते. हळद-कुंकू, बांगड्या, वेणी, जोडवी, मंगळसूत्र, साडी-चोळी, ओटीचा नारळ अन ५०१ चे पाकीट. अव नाना ह्यो इतका सगला कसला देताय आमास्नी.. असेच असतं रे! राहू दे, शास्त्र असतात ही; केली की मनाला समाधान मिळते.

जेव हो सावकाश; सरू तुम्ही पण दोघे घ्या घास घास खाऊन अन मलाही वाढ हो...असे म्हणून नाना परत आत आले...डोळ्यातील अश्रूंनी दृष्टी धूसर झाली होती. तरीही नानीच्या तसबिरीला वाहिलेला मोगऱ्याचा गजरा एका बाजूने निखळला होता हे मात्र त्यांना स्पष्ट दिसलं होतं.

अविधवा नवमीची पोचपावती नानीने दिलीच...

समाप्त