गुंतता हृदय हे!! (भाग ७) preeti sawant dalvi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंतता हृदय हे!! (भाग ७)

शेखरने आर्याला त्याच्या केबिनमध्ये बोलविले आणि तिला समीरबद्दल विचारले.

पण आर्याने तिला ह्याबद्दल काहीच माहीत नाही हे सांगितले..

शेखरला आर्याच्या एकंदरीत वागण्यावरून थोडा संशय आला होता की, नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी बिनसलयं म्हणूनचं समीरने नोकरी सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला असेल..

तरी शेखरने आर्याला समीरच्या नोकरी सोडण्याबाबत काहीच कळू दिले नाही..कारण इतक्यात त्याला हे ऑफिसमध्ये कोणालाही कळू द्यायचे नव्हते..

आर्या तिच्या डेस्कजवळ आली आणि विचार करू लागली, "हा समीर नक्की कुठे गेलाय? आणि हा शेखर त्याच्याबद्दल मला का विचारत होता? समीरने शेखरला त्याला माझ्याबद्दल वाटणाऱ्या भावना सांगितल्या असतील का? शीट यार. हा समीर पण ना..देव करो तो ठीक असू देत"

आर्या हे स्वतःशीच बोलत कामाला लागली..लंच टाइम होतच आला होता की, तिथे स्निग्धा आली..

आणि म्हणाली, "काय मॅडम,कशा आहात?"

स्निग्धाला इतक्या दिवसांनी बघून आर्याच्या आनंदाला पारावरच उरला नाही..तिने स्निग्धाला गच्च मिठी मारली..

मग दोघीही लंचसाठी कॅन्टीनमध्ये गेल्या..

"बोल कशी आहेस? अरे हो, तू कसले तरी सरप्राईज देणार होतीस..कसलं सरप्राईज?? मला आताच हवंय..दे बघू पहिलं" स्निग्धा म्हणाली.

"अग हो, सांगते..सगळं सांगते..तर सरप्राईज हे आहे की, माझं लग्न जमलंय" आर्या म्हणाली.

"काय सांगतेयेस!!" स्निग्धा जोरात ओरडली..

आर्याने तिला हळू बोल असं सागितलं...मग स्निग्धा शांतपणे म्हणाली, "काय सांगतेयेस!!कोण हा मुलगा? तो रेडीओवाला अमेय तर नाही ना? की, दुसरा कोणतरी पटवलास? बोल ना यार? आता सस्पेन्स वगैरे नको ठेवू..बोल पटकन"

"त्याचं नाव अनिश आहे आणि गम्मत म्हणजे तो रेडिओ चॅनल वर काम करतो.." आर्या म्हणाली.

"अग, मग त्याला विचारलस का, त्या RJ अमेयबद्दल? त्याला माहीतच असेल ना तो कसा दिसतो..वगैरे.."
स्निग्धा म्हणाली.

"तसा मनात खूप वेळा विचार तर आलेला. पण म्हटलं, अनिशला नाही आवडले तर..सो सोडून दिला विचार" आर्या म्हणाली.

"बघ बाई, नाहीतर तोच RJ अमेय निघायचा." असे म्हणत स्निग्धाने आर्याला डोळा मारला..

मग दोघीही एकमेकांच्या हातावर टाळी देऊन हसू लागल्या..

संध्याकाळी अनिश आर्याबरोबरच घरी आला..त्याने साखरपुड्याच्या हॉलबद्दलची सगळी माहिती आर्याच्या बाबांना दिली..

त्याच्या आईबाबांशी ही त्याने याबद्दल डिसकस केल्याचे त्याने आर्याच्या आईबाबांना सांगितले..

सगळी व्यवस्था आर्या आणि अनिश करणार होते मग काय, आर्याच्या आईबाबांनीही मंजुरी दिली व पुढच्या रविवारची साखरपुड्याची तारीख ठरली.

(दुसऱ्या दिवशी सकाळी)

गुड मॉर्निंग, मुंबई.

तुमच्या सर्वांचे स्वागत आहे गुंतता हृदय हे च्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये.

अर्थात, मी आहे तुमचा लाडका RJ अमेय..

सो, आज मी तुम्हाला कॉन्टेस्टच्या ५ भाग्यवान विजेत्यांची नावे सांगणार आहे ज्यांना मला भेटायची संधी मिळणार आहे..

तसेच ती कुठे आणि किती वाजता वगैरे वगैरे डिटेल्स तुम्हाला मेसेज द्वारे वा ई-मेल द्वारे सांगण्यात येतील.

(मग अमेय त्या ५ विजेत्यांची नावे सांगतो आणि मग टाळ्यांच्या कडकडाटाचा आवाज येतो..)

अमेय पुढे बोलू लागतो..

फ्रेंड्स आता नवरात्री सुरू झाल्या आहेत..पण तरीही हा पाऊस जायचं नावच घेत नाहीये..

ह्याला नक्की झालाय तरी काय? असाच विचार करताय ना सगळे..

पण तुम्ही कधी विचार केलाय की, कदाचित हा पाऊस कोणासाठी तरी यावर्षी खूप गोड तर कोणासाठी कटू अशा आठवणी घेऊन आला असेल..

असो, प्रेमाचं सुद्धा कसं असतं ना..मिळालं तर वेळ पटापट निघून जाते..नाहीतर एक एक क्षण पण एखादं वर्ष असल्यासारखा भासतो.. असे वाटते की....

लगेच गाणं सुरू होतं..

कितीदा नव्याने तुला आठवावे🎶🎶
डोळ्यातले पाणी नव्याने वाहावे...
कितीदा झुरावे तुझ्याचसाठी,
कितीदा म्हणावे तुझे गीत ओठी,🎶🎶
कितीदा सुकून पुन्हा फुलावे...
किती हाक द्यावी तुझ्या मनाला,🎶🎶
किती थांबवावे मी माझ्या दिलाला,
कितीदा रडुनी जीवाने हसावे...🎶🎶

आर्या आणि अनिश, तसेच त्यांच्या घरची मंडळी सगळी जोरदार साखरपुड्याच्या तयारीला लागली..

छोटे इंव्हिटेशन कार्ड अगदी जवळच्या नातेवाईकांसाठी छापले गेले..बाकी सगळ्यांना व्हाट्सएप व मेसेजच्या माध्यमातून इनव्हाइट करायचे ठरले..

आर्याने आणि अनिशने त्यांच्या त्यांच्या ऑफिसमध्ये ठराविक सहकाऱ्यांना आमंत्रण द्यायचे ठरविले.

बाकी सगळी खरेदी ही आर्या आणि अनिश एकमेकांच्या पसंतीने करत होते..

साखरपुड्याचा दिवस जवळ येत होता..आर्याच्या साखरपुड्याची बातमी ऐकताच शेखर जे समजायचं ते समजून गेला..त्याने अनेकदा समीरला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला..पण काहीच फायदा झाला नाही..

कदाचित समीरने त्याचा नंबर बदलला होता..मग शेखरने ही समीरचा विषय तात्पुरता सोडून दिला..

इथे साखरपुड्याचा दिवस उजाडला..

आर्या आज खूपच खुश होती..तिला तिचं पहिलं प्रेम जे मिळत होतं..सगळ्यांना नाही मिळत पण तिला ते मिळत होतं..

अनिश हेच तर तिचं पहिलं प्रेम होतं..हो ना??

ठरल्याप्रमाणे सगळेजण हळूहळू हॉलवर येत होते..आर्या तयार होत होती..

आज ती खूपच सुंदर दिसत होती..इतकी की, जणू स्वर्गातली अप्सरा..

तिने लाइट गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता. त्यावर त्या पेहनाव्याला शोभेल अशी नाजूक आभूषणे घातली होती..चेहऱ्यावर हलकासा लाइट मेकअप केला होता..

तर अनिशने सफेद सदरा पायजमा आणि त्यावर गुलाबी मोदी जॅकेट घातलं होतं..

त्या दोघांचा जोडा आज अगदी लक्ष्मीनारायणासारखा दिसत होता..गोडबोले व जोशी काकू दोघीनी दोघांचीही नजर काढली..

अनिशची नजर आर्याच्या चेहऱ्यावरून हटतच नव्हती..

आर्याची ही परिस्थिती काहीशी तशीच होती..

दोघांनिही एकमेकांकडे बघून स्मित केले..अनिशने खुणेनेच आर्याला छान दिसतेयस असे सांगितले.. आर्या लाजली..तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता..

तिनेही अनिशला खुणेनेच तू ही हॅंडसम दिसतोयस असे सांगितले.

तेवढ्यात गोडबोले काकूंनी अनिशच्या हातात आणि जोशी काकूंनी आर्याच्या हातात साखरपुड्याची अंगठी दिली..

दोघांनीही ती एकमेकांच्या बोटात घातली व त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजविल्या..

मग दोघांचे वेगवेगळ्या पोज मध्ये फोटोग्राफरने फोटो क्लिक केले..

नंतर घरातल्या मंडळींबरोबरही फोटो क्लिक केले..

मग उपस्थित सर्व पाहुणे एक एक करून आर्या आणि अनिशवर शुभेच्छांचा वर्षाव करत होते..

पण का कोणास ठाऊक, सगळं तर व्यवस्थित चाललं होतं..म्हणजे नक्की चाललं होतं ना??

आर्याने अनिशच्या कानात काहीतरी सांगितले आणि मग तिने स्निग्धाला रूमकडे येण्याची खुण केली..

"काय झालं आर्या, मधेच का अशी उतरलीस स्टेजवरून? टचअप वगैरे करायचं आहे का? बोलशील" स्निग्धा म्हणाली..

"हे सगळं नीट होतंय ना स्निग्धा..का कोणास ठाऊक मी काहीतरी खूप मिस् करतेय..सगळं तर अगदी माझ्या मनासारखं होतंय..मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्याशीच माझा साखरपुडा झालाय..मी खूप खूप खुश आहे आज..मी खूपच नशीबवान आहे की, अनिश मला भेटलाय माझा नवरा म्हणून..पण तरीही..."

स्निग्धा आर्याचं बोलणं मध्येच तोडत म्हणाली,"अग ये बये, तू त्या RJ अमेयला मिस् करत नाहीयेस ना..हे बघ आर्या तुला काय वाटतं तू एकटीच मुलगी आहेस का..त्या RJ वर फिदा होणारी..अशा किती असतील..आणि त्या RJ च लग्न पण झालं असेल तर..तू त्याचा विचार फुल डोक्यातून काढून टाक..मी विनंती करते तुला", स्निग्धा म्हणाली..

इतक्यात बाहेर कसला तरी आवाज ऐकू येत होता..दोघी रूममधून बाहेर आल्या आणि पाहतात तर स्टेजवर बायकांचा, मुलींचा घोळका दिसत होता..कोणतरी गर्दीतून म्हणाल, RJ अमेय..

हे ऐकताच आर्या आणि स्निग्धा एकमेकांकडे बघत राहिल्या..आणि दोघीही स्टेजवर गेल्या..आर्या गर्दीमध्ये अमेयला बघण्याचा प्रयत्न करत होती..हे बघताच अनिश म्हणाला, "तू सुद्धा अमेय ची फॅन!!" आणि तो हसू लागला..

अनिशने हाक मारली, "अमेय!!"

अमेय कसाबसा त्या गर्दीतून अनिशजवळ आला..

अनिश अमेयची ओळख आर्याशी करून द्यायला वळला, तर आर्या पुटपुटली, "समीर आणि RJ अमेय!!"

क्रमश:

(माझ्या ह्या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व वाचकांचे खूप खूप आभार..तसेच ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करावी ही विनंती.. धन्यवाद)

@preetisawantdalvi