तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 2 Pradnya Narkhede द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 2

प्रीत ही

सुरांचीही परीक्षा होते स्वररागिनीच्या महाली
प्रीतीची तर वाटच मुळी कसोटीने भरलेली

मला चोरून बघणारी तूझी नजर मला कळली
हृदयात प्रेम असताना का तू प्रीत ही नाकारली?

खुल्या डोळ्यांत प्रेमाची किती मी स्वप्ने रंगविली
जमलेल्या त्या प्रेमरंगांची पाठवणी अश्रूंनी केली

तुझ्या आठवांची कसर अजून नाही सरली
मुक्या त्या प्रत्येक क्षणांनी वाट तुझी धरिली

हवी होती जागा तुझ्या मनाच्या कोपऱ्यातली
पण अमूल्य माझ्या प्रेमाची तू स्वार्थाशी तुला केली?

-----------------------------------------------------

साज केला लोचनी हा आज आसवांनी

झाली नजरा नजर तरी धरिले मौन शब्दांनी
मनीची घालमेल या जाणली का तुझ्या मनानी??

मधाळ गोड क्षण सारे स्मरतात रे अजुनी
स्वप्न हरवली कुठे पण साथ दिली स्मृतींनी

वाट मनाची मंतरलेली मायेच्या मंत्रांनी
हुरहूर ही संपेना जीवही लागला झुरनी

उधळून टाकले डाव सारे प्रीत रंगात रंगुनी
माझ्यावर हसते बघ रात्रीची ती टिपूर चांदाणी

हृदय जड झाले हे तुझ्या आठवांनी
साज केला लोचनी हा आज आसवांनी...

--------------------------------------------------

तू निघून गेल्यावर

शोधी कुणास तुझी ही भिरभिरती नजर
शेवटी येऊन थांबेल का ती माझ्यावर

तुझ्या लोचनी का आज आसवांचा थर
पाहूनी ते निर मज हृदयात रूते खोलवर

नको रे तू भावनांशी माझ्या अशी खेळी कर
कोलमडून जातील स्वप्ने सारी तू निघून गेल्यावर...

----------------------------------------------------------

प्रीत ही

प्रीत ही आपली मीच का रे जपावी
भावनांच्या आघातात का मीच सापडावी
आणि तू खुशाल त्यांची थट्टा उडवावी??

जगते स्मरून त्या नाजूक स्मृतींच्या ठेवी
नसता त्या जणू आयुष्याची नाळ सुटावी
इतक्या मौल्यवान त्यांची तू हेटाळणी करावी??

अडविण्या आसवे पापण्यांची फजिती व्हावी
तुटलेल्या स्वप्नांची चित्रे नजरेत दडावी
तरीही तुला माझी प्रीती मस्करी वाटावी??

कितीदा रे मी बुद्धी भावनांची कोडे सोडवावी
कर्तव्य प्रेमाच्या द्वंद्वात मनाला ठेच लागावी
माझ्या प्रेमाच्या त्यागाला तू लाचारी समजावी??

आयुष्यात एकदा तरी कधी भेट आपली घडावी
गैरसमजाच्या गोतावळ्याची तंद्री क्षणात तुटावी
आणि आपण प्रेमाच्या वळणावरची नवी वाट निवडावी..

---------------------------------------------------------------

नभा सांग ना..

हे कोसळणाऱ्या नभा
तू गरजतो आणि बरसतो
बरसुनी क्षणात शांत होतोस

माझ्या मनीही दाटून आले
तीव्र आठवणींचे सावट आता
गरजुनी हृदयात, बरसती अश्रुधारा

सांग ना या पाझरणाऱ्या अक्षूंना
कसे थांबायचे असते
सावरूनी गत स्मृतींना
स्वप्न नवे रंगवायचे असते

-----------------------------------------

साक्ष तुझ्या माझ्या प्रीतीची

सरता सरूनी गेली वेळ ती सोबतीची
तू मी एकत्र आणि साथ पूणव चंद्राची
तरीही तो साक्ष देतो तुझ्या माझ्या प्रीतीची ।।

रोवली होती स्मृती जिथे आपल्या हितगुजाची
सुन्न अवस्था झाली जरी आज त्या वाटेची
तरीही ती साक्ष देते तुझ्या माझ्या प्रीतीची ।।

भेट दिली आपल्याला जिने एकांताच्या क्षणांची
आजही कुणी उडवत असाव थट्टां त्या बागेची
तरीही ती साक्ष देते तुझ्या माझ्या प्रीतीची ।।

मज्जाच और ती सोबतीने भिजण्याची
आज नको वाटते ती बरसात सरींची
तरीही त्या साक्ष देतात तुझ्या माझ्या प्रीतीची ।।

कोमल स्पर्श तुझा अन संगत त्या झुळूकेची
सर नाही उरली त्यात गुलाबी गारव्याची
तरीही ती साक्ष देते तुझ्या माझ्या प्रीतीची ।।

-------------------------------------------------------

मला फक्त एकदा तुझ्या मिठीत यायचंय

ज्या विरहाच्या आगेत मी जळतेय
त्याची झळ तुझ्यापर्यंत पोहचवायचीय
मला फक्त एकदा तुझ्या मिठीत यायचंय..

माझ्या आजही जिवंत असलेल्या
प्रेमाचा ओलाव्याने तुझे मनही भिजवायचेय.
मला फक्त एकदा तुझ्या मिठीत यायचंय...

शरीराने शरीराच्या नव्हे तर
मनाने मनाच्या मिठीत शिरायचं.
मला फक्त एकदा तुझ्या मिठीत यायचंय..

माझ्याच नव्हे तर तुझ्याही सुप्त भावनांना
वाट मोकळी करून द्यायचीय
मला फक्त एकदा तुझ्या मिठीत यायचंय..

माझ्या लाखो मनांच्या जखमांना
तुझ्या हृदयाचा मलम लावायचाय
मला फक्त एकदा तुझ्या मिठीत यायचंय..

-------------------------------------------------

हीच का ती कातरवेळ??

मनाने चालवलाय आठवणींचा हा नवीनच खेळ
कळेल का मला सख्या हीच का ती कातरवेळ??

अलगद चाळून बघता मनातील पुस्तकाच्या पानांना
तुझीच छवी दिसते रे साजणा माझ्याकडे बघताना

हळूच लपून भेटते मी आपल्या भेटीच्या गोड क्षणांना
डोळे मिटून जगून घेते त्या भावविश्वातील स्वप्नांना

एकांतात मी एकटीच मनाशी द्वंद्व खेळत असते
रीत्या ओंजळीत माझ्या, हळव्या आठवणी वेचत असते

गत स्मृतींत रमताना चोरपावली येते तुझी आठवण
अलगद नजरेत तरळतात गाठीभेटीचे ते सुमधुर क्षण

बरेच काही सांगायचे तुला सख्या भेट ना एकदा तरी
नकळत हरवून बसते मी ही मज, ही वाट आहे कुठवरी?

स्मरते का रे तुला सख्या ती सांज प्रीतीची
हातात होता हात आणि भेट आपल्या नजरेची

अश्याच एका संध्याकाळी वीज निकामी असताना
दिली होतीस कबुली प्रेमाची हलकेच मिठीत घेतांना

मनाचे जणू फुलपाखरू होऊन साधत होतं फुलांशी मेळ
स्वपानांच्या त्या विश्वामधली हीच का ती कातरवेळ।।

------------------------------------------------

हे तर सारं मोहाचं मायाजाळ!!!

चांदण्या रात्रीत निजताना येई आठवणींचे आभाळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

जीव जडला जीवावर अन मनाने मनाशी गुंफली माळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

पाहुनी प्रीतीची ती निर्विकार छबी होते नजरही आशाळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

तुझ्या नयन कटाक्षाने मनात उठले बेभान वादळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

भावनांना बंदिस्त करण्यासाठी मिळतो कुठे मनाचा ताळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

वचनं-शपथा मोडल्या जरी दिलेला शब्द तरी पाळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

प्रेमाला विसरून पुढे जगणं होता तो ही एक कर्दनकाळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

न मिळणारे प्रेम म्हणजे स्वप्नांच्या राखेवर भुरभुरणारी राळ
सावर रे मना तूच तुला, हे सारं मोहाच मायाजाळ।।

-----------------------------------------------------------