साज केला आसवांनी आज पापण्यांवर...
भावनांचा हा गोंधळ कसा मांडू कळेना
प्रेमाच्या या गुलाबी नावेत डोलु लागले सखी साजना
समीप तुझ्या असताना मन बहरून जाते
विरहात तुझ्या हा क्षण जणू युगाचा भासे
क्षणाक्षणाला का असे मौन पाळतात हे शब्द
मौनातूनच मनाचे भाव खुलवतात हे शब्द
नभ ओथंबून येता नयनी ही सावट आले
मिलनाचा या वाटेचे चित्र धूसर झाले
आठवणींच्या या हिंदोळ्यात दिवसेंदिवस रंगत चालले
पसरलेल्या या गुलाबी रंगात मन नकळत दंगत चालले
उत्सुक आतुर हृदयाची ओढ प्रेमाची ती आर्त हाक
मनाने मनाला वरले आता यास कोणाचा धाक
आठवणींच्या गोतावळ्यात मना मुक्त सैर कर
येतील तेही दिस परतुनी मना जरा धीर धर
हळव्या मृदू भावनांना घोळवू नको रे मनात
नयनाच्या निरा मार्गे ओसंडून वाहू दे क्षणात
या विरहात आता बरेच दिवस सरलेत
पापण्यांच्या पदरावर अलगद दवं तरळलेत
एकांताचे क्षण आणि मनाचे झुलणे झाले फार
मनाला तु माझ्या दे हळुवार फुंकरेचा आधार
-----------------------------------------------------
आस तुझ्या प्रेमाची
अथांग पसरलेला सगळीकडे
तरी तहान सागराला नदीच्या पाण्याची।।
आहे गर्भात साठलेलं जल
तरी वाट धरणीला पावसाची।।
शीतल मोहक शांत रूप
तरी ओढ चंद्राला नक्षत्राची।।
आकर्षक रंगछटा अंगावरती
तरी हाव फुलपाखराला फुलांच्या रंगांची।।
प्रेमाची संदुक सोबतीने
तरी अजुनी आस तुझ्या प्रेमाची।।
--------------------------------------------
तू फक्त माझाच...
काजळामागे लपवलेला डोळ्यात साठलेला
......... तू फक्त माझा।।
स्वप्नांच्या जगात सोबतीने पडणाऱ्या मूक पावलांमधला
........ तू फक्त माझा।।
उजेडात पसरणाऱ्या माझ्या शांत सावलीमधला
........ तू फक्त माझा।।
नटताना मला स्मित करत बघणारा माझ्या भासातला
.......... तू फक्त माझा।।
तुझ्या आभासात मोहरणाऱ्या प्रत्येक क्षणांतला
.......... तू फक्त माझा।।
रात्रीचं चांदणं डोळ्यात साठवताना चंद्रातून उजळून दिसणारा
........... तू फक्त माझा।।
होळीच्या दिवशी लागणाऱ्या रंगाच्या प्रत्येक कणांत दडलेला
........... तू फक्त माझा।।
तुझ्या आठवांचा पूर येता डोळ्यातून बरसणाऱ्या प्रत्येक थेंबातला
.......... तू फक्त माझा।।
तुझ्या विरहात होणाऱ्या मनाच्या अविरत यातणांतला
.......... तू फक्त माझा।।
तुझ्या स्मृतींसह जगताना होणाऱ्या प्रत्येक वेदनेतला
........... तू फक्त माझा।।
तुला हृदयातून लेखणीत उतरविताना माझ्या शब्दांशब्दातला
........... तू फक्त माझा।।
नसेल तू माझा जरी तरी हृदयात दडून बसलेल्या असंख्य माझ्या आठवणींतला तू
......... फक्त आणि फक्त माझाच।।
-----------------------------------------------------
सांग ना..
किती क्षण आठवणीत माझ्या
हृदयात कोरलेले डोळ्यांसमोर येती
विसरू तरी कसं या सर्वांना .......सांग ना
काय समजावू या मनाला ........सांग ना
का असा अर्ध्यावर डाव मोडून निघून गेला
कधी एवढा दुरावा आपल्यात आला .......सांग ना
दोन्ही मनांत लपलेली ही अविरत हळहळ
जीवनात मिळालेले हे एकटेपणाचे वळ
पुसून टाकता येतील का कधीं .......सांग ना
मला साथ मिळेल का तुझी ........सांग ना
मनातल्या सवालांचं उठलेलं हे उधाण
होऊ शकेल का यांचं समाधान ........सांग ना
किती गुजगोष्टी करायच्या राहिल्यात
ज्या ओठांच्या कडांवर येऊन थांबल्यात
कधी तरी या ऐकशील का ........सांग ना
असा का रुसलास माझ्यावर .........सांग ना
किती रुक्ष हा वारा कुठे हरवला गारवा
येईल का तो ऋतू परतूनी प्रेमाचा .......सांग ना
बघता तुला समोर मज स्मरल्यात त्या भेटी
गहिवरले मन पाहुनी तुझ्या नयनांतील मोती
प्रेमाच्या खेळात असे का होते ........सांग ना
का सारखे भासांत मन रमते ........सांग ना
ओलावतात पापण्या जेव्हा ढासळतो मनाचा तोल
कळेल का रे तुला कधी माझ्या प्रीतीचं मोल .......सांग ना
बघून तुझ्या डोळ्यातील प्रेमाच्या सरी
वाटत मिळेल मनाला आता एक नवी उभारी
आस लागली जीवा होईल का पुरी .......सांग ना
रुसलेलले ते क्षण हसतील का परतुनी .......सांग ना
ऐक हृदयाची स्पंदने अन साद काळजाने दिलेली
सावरशील का रे स्वप्ने ती विखुरलेली .......सांग ना
-------------------------------------------------------------------
साद घालत मन माझे
साद घालते मन माझे
तू कधी ऐकशील का?
कधीची भेट नाही आपली नाही कुठला संवाद
तरी पण का नेहमी तूच असतो मनात
तुला विसरण्याची प्रयत्नेही सारी खचलीत
कसा ढळतो ताबा आणि तू समोर दिसतो क्षणात
एकांतात कसा काय प्रतिमा होऊन समोर येतो
आणि मला तुझा हवा असलेला सहवास मिळून जातो
मीही बेभान होऊन त्या प्रतिमेला तूच आहे असं समजते
वेड लागल्या सारख एकटीच स्वतःशी बोलत बसते.
वाटलं होतं आपण दूर होऊन खोटं पाडू जगाला
होईल जरी त्रास पण मी सावरून घेईल स्वतःला
संपर्क नसताना आपला मी विसरून जाईल तुला
पण तू मनातून जात नाहीस जरी इतका काळ लोटला
मी लपविते हे माझं प्रेम साऱ्या जगापासून
पण भीती वाटते येईल का पुढे ते कधी तुला समोर पाहून
भेट आपली झालीच कधी तरी नाही दाखवता येणार उघडपणे बोलून
घेशील का माझ्या मनातल्या भावना तू माझ्या डोळ्यातून वाचून
समाजाची बंधने आणि तुझा भावना लपविण्याचा स्वभाव
पण तुझ्या डोळ्यात दिसतात मला प्रेमाच्या सरींची भाव
तू लपवित असला तरी तुझे बोलके डोळे मला सगळं सांगून जातात
माझ्यासारखाच तुही भटकतोय ना या आठवणींच्या रानावनात
--------------------------------------------------------------
प्रीत हृदयी दाटे
मनाला भेदून जाणारी नजर तुझी
जाणून घेईल कोंडलेली भावना माझी
नजरेतलं ते प्रेम नजरेतच शोभते
वास्तवात जगणे तर औरच असते
वाटते यावे तुझ्याकडे मर्यादा साऱ्या ओलांडुनी
पुन्हा पाऊल अडते साऱ्या वचनांना स्मरूनी
मनात तुझी तस्वीर साठवूनी सुख वाटे
साद घालती भावना अन प्रीत हृदयी दाटे।।
----------------------------------------------------