Tujha Virah - A Collection of Poems - Part 1 books and stories free download online pdf in Marathi

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 1

पाऊस

ओल्या सांजवेळी आला गार वारा
तुझ्या स्मृतींसह मला भेटण्याला ।।

गारवा तो आठवांचा स्पर्शीता मनाला
हृदयात माझ्या पाऊस दाटून आला ।।

मनही माझे त्या पावसात चिंब भिजले
स्मृतींच्या ओझ्याचे गाठोडे रिते झाले ।।

हीच तर खास बात असते ना पावसाची
सोबतीने त्याच्या भिजूनी आसवांना लपविण्याची।।
-----------------------------------

तू सोडून गेलास पण

सोडून तू गेलास मला
ज्या अनोळखी , एकट्या वाटेवर
आजही मी तुला तिथेच उभी दिसेल
तुझ्या परतीच्या मार्गावर..

असेल जरी हा वियोगाचा कर्दनकाळ
काळीज हे माझं फक्त तुझ्यासाठीच झुरणार
हे तुझं माझं नातं अगदी पवित्र ,खंबीर, प्रबळ
तूच सांग इतकं सहज कसं तुटणार??

कुठलाच अडसर ना कधी
आपल्या नात्याला शिवला
पण निष्ठुर नियतीनी अगदी
अचूक घाट घातला..

तू म्हणाला होता ना
श्वास असेल तोवर मी फक्त तुझाच
बघ त्या नियतीने
तो श्वासच आज काढून घेतला..

तू तर मला या भूतळी
एकटीला सोडून गेलास..
हृदय माझ्याकडे सोपवून
त्याची स्पंदनं घेऊन गेलास..

आज जरी तू सोडून गेल्यावर
शरीर माझं जगतंय
आसुसले डोळे फक्त
तुझी वाट बघतेय..

नियतीही का जीवन देऊन
माझ्या दुःखाची परीक्षा घेतेय
तुला परतता येणार नाही
म्हणून मी रोज मरण मागतेय..
-------------------------------------

नाराज का रे मना

नाराज का रे मना
होते असे कधीकधी
तुझ्या भावनांमध्येही
गुंतली कुणाची प्रीती।।

प्रेम व्यक्त करण्यासाठी
शब्द रचले काव्यरूपी..
विचार केला आतातरी
कळेल तुला माझी प्रिती।।

तक्रार काय करावी
तू वाचलेच नाहीत ते कधी
माझ्या भावनांना मात्र
दुसरेच प्रतिसाद देती।।

नाराज का रे मना
होते असे कधी कधी
क्षणभंगुर होते ते क्षण
आणि हळवी तुझी प्रीती।।

----------------------------------------------

अजूनही तू आवडतोस मला

कसे सांगणार होते मी तुला
की अजूनही तू आवडतोस मला

खूप काही घडून गेलं
माझं तुझं सरून गेलं
आपल्या सोबतीच्या त्या वाटेवर
आज विलगीकरण झालं

जो माझ्या मनात तू आहे
तो कसा कुणी हिरावून घेऊ शकेल,
माझ्या मनाचा आरसा तूच
आणखी कुणाला हे कसं कळेल..

मी कुणाची होत असताना
तुझ्या नजरेत ती हळहळ दिसली
आज तू कुणाचा होणार आहे
तरी माझी नजर का नाही वळली..

कालही होता आणि आजही आहेस
तू माझ्यासाठी नेहमीच खास राहशील
माझ्या मनातलं ,माझ्या नजरेतलं
तू कायम एकमेव गुपित असशील..

समाजगर्दीच्या विचारांनी
तेव्हाही वेढले होते या मनाला
कसे सांगणार होते मी तुला
की अजूनही तू आवडतोस मला..

-------------------------------------------------

मनी उदासी पसरली

हृद्यातल्या बंद स्मृतींची
आज पुन्हा भेट झाली
पुन्हा नयनी निर अन
मनी उदासी पसरली ।।

हरवलेल्या त्या क्षणांनी
साथ माझी सोडली
गवसलेल्या त्या वास्तवानी
मनी उदासी पसरली ।।

ही कठोर रीत जगाची
हळव्या दिलाला नाही कळली
दुरावलेल्या त्या प्रेमानी आज
मनी उदासी पसरली ।।

कसे हसावे मनानी
त्याला तर सजा सुनावली
विरहाच्या त्या ठिणगिनी
मनी उदासी पसरली ।।

सुन्या त्या मैफिलींनी
आज कमाल केली
झाली उलगड भावनांची पण
मनी उदासी पसरली ।।

------------------------------------------------

सांज ही बोचरी

प्रीतस्पदनांनी काहूर केला उरी
विरहाच्या यातनांची सांज ही बोचरी

उसळती भावना बंद कप्यातल्या अंतरी
दस्तक देती वारंवार हृदयाच्या भिंतीवरी

आस लावून थिजले डोळे तुझ्या वाटेवरी
नसणे तुझे सोबतीने लागते मना जिव्हारी

विसरावे तुला पण ही कातरवेळ दुष्ट भारी
तुझ्या आठवांनी सजलेली सांज ही बोचरी।।

-----------------------------------------------

बोचतो हा दुरावा।।

मौनाच या तुझ्या बंध कधी सुटावा
असह्य झाले थांबणे बोचतो हा दुरावा।।

नजरेचा हा लपंडाव किती दिवस खेळावा
वाट पाहुनी आता मात्र मनाचा संयम सुटावा।।

अधीर झाले मन माझे, आधार तुझ्या शब्दांचा हवा
तुझ्या एका हाकेने मिळेल रे या मनाला गारवा।।

तुझ्या अबोल प्रीतीचा देशील का मज पुरावा
असह्य झाले वाट बघणे, बोचतो हा दुरावा।।

------------------------------------------------------------

तुझ्या भेटीला..

किती वेड लावले तू माझ्या या मनाला
आतुर झाले ते बघ किती तुझ्या भेटीला

स्वप्नात येऊन किती रे छळशील तू मला
समोर दिसत नाही होई हळहळ या जीवाला

अजूनही आठवते मी त्या नाजूक क्षणाला
नव्हती साथ द्यायची तर आयुष्यात का आला

कुणी साद घालेल माझ्या अस्वस्थ दिलाला
शेवटी मनाची कळ सांगितली लेखणीला

सोबती असताना तू कधी दूर निघून गेला
तुझी छवी बघण्यासही किती काळ सरला

व्याकुळ झाले मन, नजर शोधी तुला,
स्वप्नतल्यासारखं कधीतरी मिठीत घेशील का मला

---------------------------------------------------------

आस ना मावळली

संध्याही सरली परत दिवसा अखेर रात्र झाली
वाट पाहूनी तुझी अजुनीही आस ना मावळली

साथ तुझ्या प्रीतीची जरी मला नाही मिळाली
तुझ्या भासातच तरीही किती क्षण मी जगली

नजरेत तुझ्या आहेत किती गुढ रहस्ये लपलेली
अजूनही त्यांची बंद कोडी मला नाहीत सुटली

कशी सुटावी ती कोडी तर सारी तुझ्यात बुडालेली
ये कधी निदान उलगडण्यासाठी ती उत्तरे लपलेली

हळुवार वाऱ्याची पार वादळे होऊन गेली
दुखवलेली नभं आता साश्रू दाटून आली

तुझी वाट शोधताना मीच रस्ता भरकटली
सरळमार्गी वाटही आता दिशाहीन झाली

तूच मनात माझ्या आपुल्या प्रीतीची कलम रोवली
तुझ्या सोबतीच्या नाजूक क्षणांनी ती ही अंकुरली

असंख्य मधाळ गोड स्वप्नांना मी डोळ्यांत सजविली
निभवावी प्रीत तर समाज भीतीने तू पाठ फिरविली

प्रीतीसाठी तुझ्या मी किती किती झुरली
तरी तूला भेटण्याची वेडी आस ना मावळली।।

----------------------------------------------------

मरणे महाग झाले।।

तुझ्याविना आयुष्य जगता मला न आले,
जीवन संपवावे तर मरणे महाग झाले।।

जगू कसे घेऊन हे काळीज वेदनांनी भरलेले,
मागूनही ना मिळाला मृत्यू जगणेच भाग झाले।।

मिठीत घेऊन मनाला अलगद फुलविले,
भावनांनी हताश मन ते तरी ना बहरले।।

घरात येऊन माझ्या दुःखांनीही घर बनविले
मी न साधू महात्मा तयांना ना ते कळले।।

तुटता कळी मनाची स्वप्नेही बेचिराख झाले,
सोडवू कसे सांगेलं का कुणी हे हृदय गुंतलेले।।

हरवल्यात जीवन वाटा रस्ते विराग झाले,
मागूनही ना मिळाले ते मरणे महाग झाले।।

-----------------------------------------------------

काय चूक सांगावी...

सजविले मी वाळूवर घर मधुर स्वप्नांची
कोलमडून पडलं क्षणात येता सर पावसाची
काय चूक सांगावी त्या बरसणाऱ्या सरींची
वाळूवर घर सजविले ही गोष्टच मुळी चुकीची।।

मधाळ त्या स्मृतींनी बहरली बाग मनाची
तरी ना उमलली एकही कळी माझ्या दारची
काय चूक सांगावी त्या नाजूक कोवळया कळीची
अंकुरली मनात माझ्या हीच चूक त्यांची।।

चकाकणाऱ्या त्या वस्तूला चमक होती सोन्याची
समजले नाही तेव्हा मला धुंद होती नीतिमत्तेची
काय चूक सांगवी त्या चकाकणाऱ्या वस्तूची
लोभ केला मी सोन्याचा ही गोष्टच मुळी चुकीची।।

--------------------------------------------------------------------

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED