तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4 Pradnya Narkhede द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझा विरह - एक काव्यसंग्रह - भाग 4

कुणासाठी ग सये..??

उशीची कुशी भिजवताना ती मला पुसते
कुणासाठी ग सये तू रोज आसवं गाळते??

या अश्रूंना सामावताना तिला ही कधीतरी गहिवरते
तरी उगाच दिलासा देण्याचा प्रयत्न ती करते

चंद्राकडे बघताना मन माझे द्वंद्व खेळू पाहे
कुणासाठी ग सये तू इतकी विचलित आहे??

साजनाच्या एका भेटीची आस लागली आहे
सांगतो मला तो ही तुझी ओढ व्यर्थ आहे

गार झुळूक आली आणि मी तिथेच गोठून गेले
कुणासाठी ग सये तुझे मन माझ्यासंगे झेपावले??

सांग माझ्या साजनाला आठवांची ती कसर अजून आहे
अजुनी त्याच स्मृती डोळ्यातून अश्रू बनूनी वाहे

कशी सांगु यांना माझी अविरत अपूर्ण आशा
माझ्या या अबोल अश्रूंची त्यांनाही कळेल का भाषा?!!

----------------------------------------------------------


स्वप्न आणि सत्य

एक किनार सत्याची तर दुजी स्वप्नांची
अशीच आहे बिकट वाट या आयुष्याची।।

स्वप्नांच्या या जगात
गम्मत तुझ्या माझ्या सावलीची
दिसे शांत जरी सांगू पाहते
अवस्था आपल्या भावनांची।।

हुरहूर या मनाला
स्वप्नांच्या वाटेवर रमण्याची
ओढ लागली तुझ्या सोबतीने
हळुवार चालण्याची।।

धडपड सारी त्या मूक सावली अन पावलांच्या
भाषा समजण्याची
सवय झाली मला आता
तुला शोधताना नकळत स्वतः हरवण्याची।।

खाडकन जाग येते जेव्हा
आठवण होते सत्याची
बेसुमार बरसती नयन
चिंब भिजती दरारे माझ्या मनाची।।

हितगुज झाली जरी
त्या संध्याकाळी ओठांशी ओठांची
सरली नाही आस अजुनी
तुला डोळे भरून बघण्याची।।

का ही शिक्षा मला
तुझ्या विना जगण्याची?
बांधते किती संयमाचे बांध तरी
भिती त्यांना विखुरण्याची।।

चेष्टा तुझी माझ्या अवखळ आयुष्याला
तुझ्या संगे वाहवत नेण्याची
सापडलीच होती दिशा मला पण
घाई तुला निघून जाण्याची।।

------------------------------------------------

आज पुन्हा ठेच लागली मनाला..

आज पुन्हा ठेच लागली या मनाला,
दूरवर कुठेतरी असेल तो बसला।।

कसे समजवावे या डोळ्यातील अश्रूला
नको रे गळू विनवणी आहे तुजला

तोही कुठेतरी असेल मनोमनी हसला
बघून डोळ्यांतून पाझरताना तुजला

आज पुन्हा ठेच लागली या मनाला
दूरवर कुठेतरी असेल तो बसला।।

------------------------------------–----------

आठवणींत तुझ्या

आठवणींत तुझ्या

रात्र रात्र गहिवरली
सावरून स्वतःला
मी पुन्हा पुन्हा तुटली

आठवणीत तुझ्या

मी वाहत वहात निघाली
प्रेमाचा करून त्याग
मी कर्तव्याला येऊन भेटली

आठवणीत तुझ्या

किती किती रे मी झुरली
एकदा बघता यावं तुला
मी मर्यादा सोडून चालली

आठवणींत तुझ्या

जीव नुसता तळमळतो
हळवे होते मन क्षणोक्षणी
जसा पांगळे पणा जाणवतो

आठवणीत तुझ्या

---------------------------------------------

सावरू कशी रे पुन्हा?

सावरले होते मी स्वतःला,

आज पुन्हा तुटून विखुरली

मनाचा झरा वाहात होता,

त्याच वाटेत तुझी गाठ पडली||


तुझ्या विना ना उरला श्वास

ना होती मनाची स्पंदनं

तूच माझी प्रीत,

तुझ्याबरोबरच संपेल हे जीवन||


साथ आहे सावलीची

आणि उदार होती दुःखाचे घन

तुटले मी अशी अन

कोलमडून पडलय माझं मन।।


वेळही कसले खेळ

आपल्यासोबत खेळून गेली

माझा नाईलाज होताच

तुझ्याही स्वप्नांची माती झाली||


डगमगती पाऊल माझे

दिशाहीन वाटेवर चालताना

कोण जाणे कुठल्या वळणावर

नेतील ते मला पुन्हा||

-----------------------------------------------------

जीवन प्रवास

का ही ओढ अजुनी सरता सरता नाही
तुझ्या आठवांनी हृदय माझे सारखं हेलावून जाई..

तुझ्याकडे आहेत माझ्या भावना, माझ्या कवितांच्या रुपात
पण मी मात्र रोज एकटी तुझी वाट बघते स्वप्नात...

माझ्या भावना वाचून तू, मनोमनी सुखावत असशील
पण मलाही जगण्याला आधार मिळावा असे मला कधी देशील??

तुझ्या विरहात होणारी माझी तळमळ तुला नक्कीच आनंद देत असावी
पण असे जगणे किती अवघड याची कधी तुला जाणीव व्हावी..

साऱ्या जगापासून लपविते, पण स्वतःपासून कसे लपवू
सांग ना रे मला या आयुष्यभराच्या दुराव्यात मी कसे जगू??

दिवस ढळतो कसाबसा पण रात्री मन तळमळत राही
तुला खरच माझ्या भावनांची आहे का कदर काही??

भळभळणारी ती जखम खपली कधीच धरत नाही
हताश झाले मन पण हा जीवन प्रवास सरत नाही..

------------------------------------------------------------

वादळ आणि मी

हे वादळा !!

बघ ना किती साम्य आहे तुझ्यात आणि माझ्यात..


नभ दाटून येतात,

क्षणात वादळ येते जेव्हा सुटतो वारा

तसच मनीही येती सावट दाटून

पण त्यास ना कुणी सहारा


तो जोराचा वारा जातो तुला स्पर्शून ,

तुझ्यात असलेल्या पाण्याला देतो वाट मोकळी करून

आणि पडतो थेंबांचा पाऊस..

असच कधितरी त्याची एक आठवण

तोडीते बांध भावनांचा अन जाते मनाला कोरून

आणि पडतो अश्रूंचा पाऊस..


रिते झाले तुझे अंग की कसे ते बरसायचे थांबते...

मनाचेही तसेच अश्रूंमधून मोकळे झाले की पुन्हा नवे बांध उभे करते...


कधी कधीं कसं भ्रमित करतो तू सगळ्यांना..

उन्हात तापत असताना ही अचानक सुरू करतो रिमझिम

तसेच मी ही भ्रमात ठेवते मला बघणाऱ्यांना..

लपवुनी वेदना मनातल्या ओठांवरी हास्य तेवते टिमटिम..


हे वादळा!! बघ ना किती साम्य आहे तुझ्यात आणि माझ्यात..


----------------------------------------------------

अबोल प्रीती

ती रात होती मोहिनी, चांदण्यांनी सजलेली
तुझ्या नजरेतली गुपितं अलगद उलगडली

हळुवार तो स्पर्श आणि नजरेत नजर गुंतली
आसक्त डोळे तुझे प्रेमाची देत होते कबुली

अबोल प्रीती तुझी डोळ्यातून व्यक्त झाली
ती रोख नजर तुझी माझ्या काळजाला भिडली

मनाची अवस्था नजर सांगेल म्हणून मी डोळे गच्च मिटली
पण श्वासाने तर केव्हाच माझी चुप्पी होती तोडली..

धडधडणाऱ्या हृदयाने प्रीत मान्य केली
थरथरणाऱ्या ओठांनी ती मधाळ क्षणे चुंबीली

वेचता वेचता क्षण प्रीतीचे रात्र सरून गेली
पुन्हा एकदा नव्याने तीच अनोळखी पहाट झाली

प्रेमाचे ते मनोहारी क्षणे क्षणातच विखुरली गेली
आज पुन्हा एकदा प्रीत माझी अबोल झाली।।

------------------------------------------------------