गुंतता हृदय हे!! (भाग ९) preeti sawant dalvi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुंतता हृदय हे!! (भाग ९)

आज सकाळपासून सुमती काकूंची लगबग सुरु होती..त्यांना तर काय करू काय नको असं होत होते..अहो, कारणच तसं होतं ना!!

त्यांची मुलगी गौरी चक्क २ वर्षांनी शिक्षण पूर्ण करून घरी येणार होती..

समीर नेहमीप्रमाणे सकाळचा नाश्ता करायला शास्त्री यांच्या घरीच आला..

तेव्हा त्याला कळले की, पुढच्या महिन्यात येणारी गौरी याच महिन्यात भारतात येत आहे..ते पण आजच..त्यालाही काकूंना काही मदत करावीशी वाटत होती..पण तो काय मदत करणार..ह्याच विचारात असताना..

अचानक प्रमोद शास्त्री यांचा समीरला फोन आला..आज एक महत्वाच्या मीटिंगमुळे ते सकाळी लवकरच ऑफिसला गेले होते व गौरीच्या अचानक येण्याच्या बातमीमुळे ते त्यांची मीटिंग पुढे ढकलू शकले नाही आणि आता त्यांना ऑफिसमधून निघणे ही मुश्किल होते..म्हणून त्यांनी समीरला गौरीला एअरपोर्ट वरून घरी घेऊन यायची विनंती करायाला फोन केला होता..

समीरला ही कोणत्याही प्रकारे का होईना पण शास्त्री कुटूंबाला मदत करायला मिळतेय याचे समाधान वाटले..

त्याप्रमाणे तो वेळेच्या आधीच गौरीची आणायला एअरपोर्टवर पोहोचला..

गौरीला तिचे बाबा तिला ऐअरपोर्टवर न्यायला येतील असे अपेक्षित होते..

पण इथे तर कोणीच दिसत नव्हते..तिने शास्त्रींना फोन लावायचा प्रयत्न केला..पण तो लागत नव्हता..

मग तिने सुमती काकूंना फोन लावला..तर तो व्यस्त येत होता..

"ही आई कोणाशी बोलतेय? ही पण ना" गौरी स्वतःशीच पुटपुटली..

इतक्यात एक तरुण, हँडसम, डॅशिंग, गोरागोमटा मुलगा तिच्या समोर आला आणि म्हणाला,"तुम्ही गौरी शास्त्री का?"

गौरी त्याला बघतच राहिली..त्याच्या चेहऱ्यावरून तिची नजरच हटत नव्हती..यात ती उत्तर द्यायचं ही विसरून गेली..

इतक्यात तिला भानावर आणत त्याने पुन्हा तेच विचारले..तसे तिने हो असे उत्तर दिले..

मग त्याने स्वतःची ओळख गौरीला करून देत तो म्हणाला, "हाय, मी समीर पटवर्धन. मला तुमच्या बाबांनीच तुम्हाला घरी न्यायला पाठवलंय.."

तेवढ्यात सुमती काकूंचा समीरला फोन आला..तसे समीरने गौरीशी भेट झाल्याचे काकूंना सांगितले व गौरीला बोलायला ही दिले..

गौरी गाडीत बसली..अर्धा वेळ तर ती समिरलाच न्याहाळत होती..

समीर शांतपणे गाडी चालवत होता..काहीतरी बोलावं म्हणून गौरीने संभाषण सुरू केले व ती म्हणाली, "तुम्ही बाबांच्या ऑफिसमध्ये नवीनच कामाला लागलात का? कारण मी तुम्हाला याआधी कधी बघितलं नव्हतं..आणि बाबा का नाही आले? "

यावर समीरने तो इथे आल्यापासून ते शास्त्री कुटूंबाशी झालेली ओळख आणि आज शास्त्री काकांना अचानक आलेले महत्वाचं काम..इथपर्यंत सर्व काही सांगितलं..

बोलता बोलता कधी घर आलं कळलंच नाही..

समीरने गाडीतून गौरीचं सामान उतरवलं व गौरी आणि तो शास्त्रींच्या घरी गेले..

सुमती काकू गौरीची फारच आतुरतेने वाट पाहत होत्या..

त्यांनी गौरीला आत घ्यायच्या आधी तिच्या वरून भाकर तुकडा ओवळला आणि तिच्या पायावर पाणी टाकले व तिच्या डोळ्यांना पाणी लावून तिला त्यांनी घरात घेतलं..

समीरने गौरीचं सामान घरात ठेवलं आणि सुमती काकू आणि गौरीचा निरोप घेऊन तो ऑफिसला निघून गेला..

सुमती काकूंची तर नुसती बडबड चालू होती..पण गौरीचं ह्या सगळ्याकडे लक्ष कुठे होतं..ती तर समीरचा विचार करत गालातल्या गालात हसत होती..

जणू हे सगळं एक स्वप्नच असेल!! ती मनातल्या मनात गुणगुणत होती,

🎶कैसी हलचल है
हर पल क्यूं चंचल है।।
🎶ये किसने जादू किया
क्यूं मेरा झूमे जिया।।
🎶क्या मेरा दिल खो गया।।
ये मुझको क्या हो गया।।🎶

"गौरी तुझं लक्ष कुठंय, मी आपली उगाचच एकटी बडबडतेय..माझ्या लक्षातच नाही आलं की, तु प्रवासाने दमली असशील..पहिलं हे खाऊन घे आणि तू आराम कर..मग आपण निवांत बोलू", सुमती काकू म्हणाल्या.

समिरबद्दल सगळं कळूनही मुद्दाम गौरीने त्याचा विषय काढत ती काकूंना म्हणाली, "आई तो मला एअरपोर्टवर न्यायला आलेला मुलगा..." असं बोलत ती मधेच थांबली.

तेव्हा सुमती काकू म्हणाल्या, "अगं, तो समीर, आपल्या शेजारीच राहतो. तुझ्या बाबांच्याच कंपनीमध्ये कामाला आहे..खूप गुणी मुलगा आहे हो!! कालच तुझे बाबा सांगत होते, फार कमी वेळात त्याने ऑफिसमध्ये सर्वांची मने जिंकली म्हणून!! त्याचे आई-वडील मुबंईमध्ये असतात..तो एक वेळेला आपल्याकडेच जेवतो..तसे तर पहिलं पहिलं मी त्याला जेवणाचा डबा पाठवायची..मग हेच म्हणाले, समीरला घरीच बोलवत जा जेवायला..एक वेळचं जेवण तरी व्यवस्थित जेवेल..मग काय रोज रात्री तो इथेच जेवायला लागला..माझ्यासाठी जसा वेदांत तसा तो.."
असं बोलून सुमती काकू त्यांच्या कामात गुंतल्या आणि गौरी बेडरूममध्ये झोपायला गेली..

प्रवासाने ती इतकी दमली होती की, पडल्या पडल्या तिला झोप लागली..

जेव्हा सुमती काकूंनी तिला चहासाठी उठवलं तेव्हा तिला जाग आली..

चहापाणी झाल्यावर गौरीने तिची बॅग खाली करायला घेतली..सगळी आवराआवर करता करता जेवणाची सुद्धा वेळ झाली..

सुमती काकूंनी सगळ्यांना जेवायला बोलविले..पण समीरला अचानक काही काम आल्यामुळे त्याला तातडीने दिल्लीला जावं लागलं..

त्यामुळे २ दिवस तरी समिरचं येणं काही शक्य नव्हतं..त्याने फोन करून संध्याकाळीच काकूंना ह्याची सूचना दिली होती..

सगळे जेवायला बसले..पण समीर अजून आला नव्हता..गौरी त्याचीच वाट बघत होती म्हणून भूक लागूनही जेवायला टंगळमंगळ करत होती..

तिला कुठे माहीत होतं की, समीर २ दिवसांसाठी दिल्लीला गेलाय म्हणून..न राहवून मग तिने समीरचा विषय काढलाच..

"तो समीर नाही आला जेवायला", गौरी म्हणाली.

तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले, "अगं, तो कसा येईल आज जेवायला, तो तर ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलाय..२ दिवसांनी परतेल." हे ऐकून गौरी थोडी उदास झाली..

समीरला बघताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि समीर होता पण तसा की, कोणीही त्याच्या प्रेमात पडेल..

बघता बघता २ दिवस निघून गेले..गौरीने एका IT कंपनीत जॉबसाठी विचारणा केली होती..त्यासंबंधी तिची आज मुलाखत होती.

सकाळपासून तिची नुसती लगबग चालली होती..ती मुलाखतीसाठी पूर्व तयारी करत असताना अचानक समीर घरी आला..त्याला पाहून गौरीला कोण आनंद झाला, विचारूच नका..

सुमती काकुंकडून त्याला कळलं की, गौरीची आज एका IT कंपनीत मुलाखत आहे..

तेव्हा गौरीने समीरला त्याची पूर्वतयारी करून घेण्यास मदत मागितली..मग काय समीरनेच तिची पूर्वतयारी करून घेतली..

खरं म्हणजे गौरी मुलाखतीला एकदम तयार होती. तिला खरं तर समीरच्या मदतीची काहीच गरज नव्हती पण तो तर समिरशी बोलण्याचा एक बहाणा होता..

बोलता बोलता समीरला तिने मुलाखतीच्या ठिकाणी सोडण्यासाठी सुद्धा मनवले..

समीरचे ऑफिस पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये असल्यामुळे तो सुद्धा तिला त्या ठिकाणी सोडायला तयार झाला..काही वेळातच सुमती काकूंचा निरोप घेऊन दोघेही निघाले..

गौरीला गाण्यांची फार हौस होती..तिला हिंदी-मराठी गाणी जास्त आवडत..

ती २ वर्ष परदेशात राहूनही तिचा भारतीय संगीताबद्दलचा आदर यत्किंचितही कमी झाला नव्हता..

तिला एकांतात रोमॅंटिक गाणी ऐकायला फार आवडत असे..आणि आता तर ती गाणी ऐकायला समीर नावाचं कारणही मिळालं होतं..

दोघेही गाडीत बसले..समिरशी आता काय बोलावं हे गौरीला सुचत नव्हतं आणि समीरला ही..म्हणून समीरने गाडीतला म्युजिक प्लेअर चालू केला..आणि एक रँडम गाणं लावलं..

🎶कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में
सभी के लिए किसी ना किसी को है बनाया
हर किसी के लिए
तेरा मिलना है उस रब का इशारा
मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए
कुछ तो है तुझ से राबता 🎶

असं वाटत होतं की, जणू गौरी तिच्या मनातील भावना समीरला सांगत होती...पण समीर पुन्हा आर्याच्या आठवणींमध्ये हरवून गेला..

समीरने गौरीला तिच्या मुलाखतीच्या ठिकाणी सोडले आणि तो त्याच्या ऑफिसला निघून गेला..

एकंदरीत गौरीची मुलाखत छान झाली. तिला काही वेळ बाहेर बसण्यास सांगितले गेले..

थोड्या वेळाने गौरीला पुन्हा केबिनमध्ये बोलावले गेले व सरळ तिच्या हातात तिच्या नियुक्तीचे पत्र दिले गेले..

गौरीला खूप आनंद झाला आणि होणारच ना..तिला कोणाच्याही शिफारशी बिना जी नोकरी मिळत होती..

तिला ही बातमी कधी एकदा घरी सांगतेय असं झालं होतं..

क्रमश:

(ही कथा आवडल्यास ती आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा..धन्यवाद)
©preetisawantdalvi