इच्छेवर ताबा मिळवा! Ankush Shingade द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इच्छेवर ताबा मिळवा!

17. इच्छेवर ताबा मिळवा!

माणसाला काही इच्छा असतात. त्या इच्छा काही माणसात प्रगल्भ असतात, तर काहींमध्ये कमी प्रमाणात असतात. ज्यांच्या इच्छा जास्त असतात. तो तेवढंच परीश्रम करीत असतो. त्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्या इच्छा पूर्ण न झाल्यास ज्या व्यक्तींकडून त्या इच्छा पुर्ण करायच्या असतात किंवा ज्या व्यक्तींकडून त्या इच्छा पूर्ण होणार असतात. त्याला त्रास देत असतो. त्यातूनच तो आपल्या इच्छा पूर्ण करीत असतो.

माणसाचा जन्म होण्यापुर्वी तो जेव्हा आईच्या गर्भात असतो, तेव्हाही त्याला गर्भातच काही इच्छा प्रगट होतात. पण त्या गर्भात तो कोणाला सांगू शकत नाही. पण त्याची जी नाळ आईच्या गर्भाशी जुळली असते, त्याद्वारे तो आपली इच्छा आईला प्रगट करीत असतो. त्यामुळे गरोदर महिला त्यांना कितीही अडवलं तरी केळी खाणे, खोबरे खाणे, आंबट खाणे, गोड खाणे इत्यादी गोष्टी करीत असतात. कोणी म्हणत असतं आंबट खाल्यानं गर्भार मातेला खोकला होईल. गर्भाचं नुकसान होईल. पण ती आवड त्या भ्रुणाचीच असते. यातच बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे त्या आईच्या खाण्यातूनच तो कशा प्रकारच्या व्यक्तीमत्वाचा घडेल हे दिसून येते. जसे आंबट जास्त खात असेल तर तिचं बाळ तामसी गुनाचं होईल. खोबरं जर जास्त तिला आवडत असेल तर ते बाळ शांत स्वभावाचं होईल.

ज्यावेळी गरोदर मातेचा सातवा महिना असतो. त्यावेळी त्या मातेसमोर काही जिनसा झाकून ठेवलेल्या असतात. म्हटलं जातं की जी जिनस उघडेल, त्यावरुन त्या मातेला मुलगा होणार की मुलगी कळेल. मग अंदाजानं लाडवाचा जिनस उघडला की मुलगा आणि बर्फी जर उचलली तर मुलगी. कारण लाडू तापसी गुणाचं प्रतिक आहे. तर बर्फी सालस गुण दर्शविते. अर्थातच लाडू म्हणजे कडक स्वभावाचा आणि बर्फी म्हणजे नाजूक कोमल स्वभावाचं प्रतिक आहे. यामुळे मुलगी की मुलगा कळायला सोपं जातं.

आईच्या गर्भात बाळ असतांना आईचे हे आंबट पदार्थ खाणे, केळी खाणे किंवा वेगवेगळे पदार्थ खाणे या इच्छा जर पुर्ण झाल्या नाहीत, तर होणा-या बाळात त्यावेळेपासूनच राग, लोभ, द्वेष, मद आणि मत्सर निर्माण होत असतात. तसेच हिंसेची वृत्ती निर्माण होत असते. म्हणूनच कधीकधी मायबाप चांगले जरी असले तरी त्यांच्या पोटी जन्म घेणारी मुलं विचित्र पद्धतीची अर्थात विचित्र स्वभावगुणांची निपजतात.

मुलाचा ज्यावेळी जन्म होतो. तो लहानाचा मोठा होत असतो. त्याचबरोबर त्याच्या इच्छा ह्या अजून वाढत जातात. त्याला जेव्हा बोलता येत नाही, तेव्हा तो आपली इच्छा रडून व्यक्त करतो. पण मुळात जर त्या इच्छा पूर्ण झाल्या नाही तर त्या बाळाच्या मनात असंतोष निर्माण होतो. पुढे मग जी वस्तू मिळत नाही. ती वस्तू हिसकावून घेण्याची वा चोरुन मिळविण्याची भावना मुलात निर्माण होते. अर्थात त्यावर पुढे कितीही संस्कार केले, तरी काही काही मुलात काहीच फरक पडत नाही. काही काही मुलात मात्र नेहमी फरक पडतो.

संस्कार ही विचार गाळण्याची छानणी आहे. संस्काराच्या माध्यमातून विचार गाळले जातात. मुलांवर चांगले संस्कार झाले, तर वाईट विचार गाळले जावून ते गळून पडतात. मग जे वाईट विचार गाळले जातात, त्यानंतर उरणा-या चांगल्या विचारात किताही पुढे जावून वाईट विचार शिरले तरी ते त्या चांगल्या विचारात मिसळत नाहीत. जसं भक्त प्रल्हादाचं झालं. जर त्या चाळणीतून चांगले विचार गळले तर उरणा-या वाईट विचारात चांगले विचार शिरत नाहीत. जसं रावणाचं झालं.

पुढे मुलगा मोठा होतो. त्याची संगत लागते. ती संगत कोणाशी होते. यावरुनही त्या मुलात चांगल्या वाईट विचारांचा भरणा होत असतो. संगत जर चांगल्या मुलाशी असेल तर तो मुलगा चांगल्या पद्धतीचा तयार होतो. पण संगत जर वाईटांशी असेल तर त्या मुलात वाईट विचार जन्म घेत असतात.

तात्पर्य असं की मुळात आईच्या गर्भातपासून झालेल्या वाईट विचारात जर पुढे त्याला संगत जर वाईट विचारांचीच मिळत गेली. तर स्वभावगुण पुर्णच बदलून जावून तो व्यक्ती हा गुन्हेगारी जगताकडे वळतो. तर आईच्या गर्भात झालेल्या संस्कारानंतर जर काही दिवस संगत जर चांगल्या गोष्टीची असलीे तर तो मुलगा चांगल्या संस्काराचा घडतो. म्हणून चांगल्या संस्कारासाठी गरोदर मातेच्या इच्छा पुर्ण करणे महत्वाचे आहे. तितकेच महत्वाचे आहे. त्याच्यावर परीणाम करणारे त्याच्या जन्मानंतरचे घटक.

मुलांच्या चांगल्या स्वभावगुणासाठी मुलांच्या जन्मानंतरच्या घटकात मायबापाचा सर्वात मोठा वाटा असतो. त्यानंतर त्याला मिळणारे शिक्षक व त्यानंतर त्याला असणारी मित्रमंडळी. ह्या तिनही घटकांपैकी जर एखादा घटक वाईट मिळाला की बस मुलांचे पाय आपोआपच वाईट विचाराकडे वळत असतात.

मायबाप सतत भांडत असतील तर मुलांवर परीणाम होतो. मायबाप चोरी करीत असतील तरही मुलांवर परीणाम होतो. तसेच बाप जर घरी दारु पिवून येत असेल तर त्याचाही मुलावर परीणाम होतो. इतकेच नाही तर आई कशी आहे? यावरुनही मुलांचे विचार बदलत असतात. ती जरी व्याभिचारी असेल किंवा तिचे कोणाशी अनैतिक संबंध असेल तर तिच्या त्या वागण्याचा परीणाम बाळावर होत असतो.

सर्वात जास्त मुलांवर संस्कार करते ती आई. कारण लहानपणापासून बाळ आईजवळच जास्त असते. बापाचे तेवढे लेकरु जास्त सानिध्यात येत नाही. पण आताची परीस्थीती पाहिली तर लहान मुले हे आईच्याच प्रेमाला पारखी झालेली दिसतात. कारण मायबाप दोघंही नोकरी करीत असल्यानं मुलांसाठी आया ठेवलेली असते. ती आया जर चांगल्या स्वभावाची असेल तर मुलांवर चांगले संस्कार होतात. जर वाईट असेल, मुलांवर सारखी रागवत असेल तर ती मुले वाईट विचाराची बनतात. ती मुले पुढील काळात त्या आयाला ओळखतात. ती आया जर चांगली असेल तर...... पण मायबापाला ओळखायला तयार नसतात.

मुलांच्या संस्कारात मायबापाची भुमिका खुप मोठी असते. त्याचे वागणे, त्यांचे वर्तन मुले न्याहाळत असतात. जर मायबापानं त्यांच्या मायबापाला जर वृद्धाश्रमात ठेवलं तर त्याचा परीणाम त्या मुलांवर घट्ट होतो. आईचे सासू सास-याप्रति वागणेही मुलांच्या स्वभावाला वेगळे वळण देत असते. आई जर आजी आजोबांशी वाईट वागत असेल तर नातवाला त्यावेळी ती गंमत वाटते. तेही आपल्या आजी आजोबांना त्रास देतात. पण जेव्हा त्यांना समजदारीपणा येतो, तेव्हा मात्र त्यांना ते क्षण आठवतात. आपले मायबाप आजी आजोबांशी वागले कसे?ती मुले मोठी झाल्यावर आपले वर्तन तसेच करतात. तेही मग आपल्या मायबापांना त्रास देतात नव्हे तर वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात टाकत असतात. मुलेही मायबापाच्या आजी आजोबाशी वागण्यावरुन तेव्हापासूनच विचार करीत असतात की आपण आपल्या आईबाबांशी कसं वागावं?ते पुढे तशाच स्वरुपाचं वर्तन ठेवण्याची गाठ मनाशी बांधत असतात.

मुलांच्या इच्छा, त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर त्या इच्छेचं रौद्ररुप माणसाला पाहायला मिळते. राग द्वेष ह्यासारख्या तत्सम गोष्टी माणसाच्या वाढायला लागत असतात. चांगल्या इच्छा माणसाला प्रेरणा देतात. तर वाईट इच्छा माणसाला नेस्तनाबूत करीत असतात.

साधारणतः मोठे झाल्यावर माणसाची इच्छा मोठमोठी घरं बांधण्याची असते. पुष्कळ पैसे कमविण्याची असते. लहानपणी आईच्या गर्भात असतांना ज्या इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, त्या इच्छा पूर्ण करायची असते. पण जेव्हा त्या इच्छा पूर्ण होतांना दिसत नाही. तेव्हा माणूस त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भ्रष्टाचार करीत असतो. दुस-यांकडून त्या इच्छा पुर्ण करण्यासाठी एखाद्या शैतानागत वागत असतो. पण त्याला ते कळत नाही की आपले अशा स्वरुपाचे वागणे बरे नाही. आपण मेल्यानंतर सगळं इथल्या इथंच राहणार आहे. आपण वर घेवून काही जाणार नाही. संपत्ती, मालमत्ता, पैसा, आडका, पशूधन, शेत्या सर्वकाही.

सगळं इथल्या इथंच राहातं. कोणीच मृत्यूनंतर आपल्या सोबत नेत नाहीत. मृत्यू अटळ आहे. तो केव्हा येईल हे सांगता येत नाही. तेव्हा आपण या जगतात जन्माला आलोच तर चांगले कर्म करुन जर मरण पावलो तर मरणोपरांत कोणीही चांगलं नाव तरी घेईल. पण आपण वाईट कृत्य करुन कितीही अमाप पैसा कमवला, तरी कोणीच आपलं नाव घेत नाही, नव्हे तर आपली रवानगी वृद्धावस्थेत वृद्धाश्रमात करतात. स्वतःची आपली मुलं सुद्धा आपल्याला कितीही पैसा आपल्याजवळ असला तरी आपल्याला पोसायला तयार होत नाही. शिवाय आपलं नावंही घेत नाहीत. तेव्हा आपण जी कमाई करतो, जो पैसा कमवतो. तो कोणासाठी कमवतो? हा विचार येतो. का वृद्धापकाळी आपल्या पोटासाठी भाकर म्हणून. नाही...... हा भ्रष्टाचार रुपानं अर्थात वाईट मार्गानं मिळविलेला पैसा आपला होवूच शकत नाही. मग म्हातारपणात जो पैसा म्हातारपणी आपला होवू शकत नाही. आपल्याला चांगलं चांगलं जेवन देवू शकत नाही. तो पैसा कमविण्यासाठी एवढा हव्यास का? त्यापेक्षा अशा इच्छा न केलेल्या ब-या. हं कमवायचेच असेल तर चांगले संस्कार कमवा. चांगले विचार कमवा. चांगल्या इच्छा कमवा. तसेच आपल्या मनातल्या इच्छेवर ताबा ठेवा. ज्या चांगल्या इच्छा तुमचं जीवन घडवू शकतील. तुमची मुलबाळं व येणारी पिढी तुमच्या चांगल्या इच्छेनं विचारानं व संस्कारानं आपली पिढी घडवू शकतील नव्हे तर आदर्श कुटूंबं तयार होतील. असेच आदर्श कुटूंबं तयार झालीत की आदर्श देश बनवायला वेळ लागणार नाही. म्हणून इच्छेवर ताबा ठेवा. चांगल्या वाईट इच्छेचं परीक्षण करा. मगच निर्णय घ्या आणि आदर्श वागण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन तुमचं तुमची भावी पिढीही चांगल्या स्वरुपाचं नाव घेतील.