kharanch samajseva hich ishwari seva aahe books and stories free download online pdf in Marathi

खरंच समाजसेवा हीच इश्वरी सेवा आहे!

22. खरंच समाजसेवा हीच इश्वरी सेवा आहे!

आज सामाजिक क्षेत्रात वावरतांना आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. तो सामना करीत असतांना आपल्याला अनेक समस्या येत असतात. कुणी नावंही ठेवत असतात. त्यावेळी जर अशी समस्या आलीच, तर आपण निराश होतो व तोडगा न काढता ते काम सोडून देतो.

समाजात अशी माणसे भरपूर असतात. जी एकमेकांचे पाय खेचत असतात. त्यांना आपणही पुढे गेलेले आवडत नाही. तसेच दुसराही पुढे जात असेल तर तेही आवडत नाही. नव्हे तर जो अशी समाजसेवा करतो. त्याचंही मन तोडण्याचं काम करीत असतात. पण काही माणसं निश्चीतच चांगली असतात. ती अशा होतकरु माणसांनी पुढं जावं म्हणून मार्गदर्शनाचं बळ देतात.

देश विदेशात अशीच काही माणसं आहेत की जी प्रसिद्धीचा हव्यास करीत नाहीत. तर आपलं कार्य करीत असतात. ते लोकांच्या कोणत्याच चांगल्या वाईट प्रतिक्रियेवर खचत नाहीत वा फुलून जात नाहीत. वाटल्यास त्यांना संत म्हणून गौरविता येईल. पण काही ढोंगी नक्कीच असतात की जे बगळ्यासारखे निपचीत डोळे लावून असतात. मग जसा मासा जवळ आलाच, तर तेच डोळे उघडून जसा बगळा आपले भक्ष टिपतो. तसेच समाजातील हे लोकंही स्वार्थ दिसलाच तर ढोंगीपणा बाजूला ठेवून तुटून पडतात.

समाजात अनेक प्रकारची माणसं राहतात. काही समाजातील मंडळी ही मुळातच धनवान असतात. अब्जोनं पैसा असतो. पण सेवा करायला जो पिंड लागतो. तो त्यांच्यात नसतो. ते समाजसेवा तर सोडा. साधी सेवाही करीत नाहीत. काही मंडळी ही गरीब असतात. ते समाजसेवा करतांना गरीबीचं कारण समोर आणत असतात. तर काही गरीबीतून धनवान बनलेले असतात. पण त्यांच्यात स्वार्थ शिरलेला असतो. त्यामुळं ती मंडळी सेवा करायला पुढे येत नाहीत.

सेवेच्या दृष्टीकोणातून विचार केल्यास काही मंडळी ही मुळात श्रीमंत असली तरी ती सेवा करतात. त्यात मागे पडत नाहीत. तर काही मंडळी ही गरीबीतून वर आलेली असतात. त्यांनी गरीबीच्या कळा शोषलेल्या असतात. त्यांना वाटते की मी जशा दारीद्रयात असतांना कळा शोषल्या, त्या इतरांना शोषाव्या लागू नये. म्हणून ते मदत करीत असतात. आपल्यासारख्याच इतरही गरीबांना वर उचलण्याचं काम ही मंडळी करीत असतात. तर काही मंडळी जी गरीब असतात. ती गरीब असली तरी सेवेच्या दृष्टिकोणातून उदार असतात. उदाहरण द्यायचं झाल्यास नल दमयंतीचं देता येईल.

नल दमयंतीची कथा सर्वांनी ऐकली असेलच. पोटात अन्नाचा कण नसतांना कुठूनतरी रस्त्यावर त्यांना अर्धी पोळी मिळते. ते समप्रमाणात वाटून ती पोळी खाणार, तोच एक श्वान येतो. शेपूट हालवीत असतो. त्यावेळी पोटात तीव्र भूक असतांनाही नल दमयंती ती पोळी त्या श्वानाला देतात. महत्वाचं म्हणजे समाजसेवा ही अशी स्वतः उपाशी राहून करु नये. पण समाजसेवेसाठी हे उदाहरण नक्कीच बोध म्हणून घेता येईल. हे झालं गरीब नलराजाचं उदाहरण. तसेच कर्णाचंही उदाहरण देतो की ज्याने दानात स्वतःला आवश्यकता असतांना स्वतःची कवचकुंडलं दान दिलीत. आता श्रीमंतांचं उदाहरण देतो.

श्रीमंतांमध्ये छत्रपती शाहू महाराज किंवा सयाजी गायकवाड यांनी जी लोकांना मदत केली, ती वाखाणण्याजोगी होती. तसेच म. गांधी व पंडीत जवाहरलाल नेहरुंजवळ काय कमी होतं की त्यांनी देशाची सेवा करण्यासाठी प्राण न्योछावर केले. पंडीत नेहरुंचे कपडे धुवायला पँरीसला जायचे. एवढी संपत्ती होती. तर म. गांधीचे वडील पोरबंदरचे दिवाण होते. तरीही त्यांनी पंचा धारण केला.

मुळातच सेवा करण्यासाठी गरीब श्रीमंत हा भागच लागत नाही. तर सेवेसाठी मुळात सेवेचा पिंड असावा लागतो. जो लहानपणापासून प्राप्त होत असतो. आपले मायबाप, आजी आजोबा जर आपल्यासमोर कोणाची मदत करीत असतील तर ते गुण आपल्यात बरोबर येतात. ही समाजसेवा शिकवायची गरज नाही.

जर कोणी इश्वर आहे असं मानत असेल तर त्याचेसाठी सेवा ही इश्वरी सेवा आहे. मग ती कोणतीही सेवा असो आणि सेवा करायलाच हवी. समाजातील दीन दुबळ्या, लाचार, अंगू पंगू, म्हाता-या माणसांची.

समाजात काही मंडळी ही निःस्वार्थ सेवा करतात. काही काही संस्थाही. एक नागपूरचं उदाहरण देतो. नागपूरमध्ये अशीच एक नागरीक सेवा समिती आहे.

या समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर असून त्यांच्या दवाखान्यात काही लोकं आजारी पडल्यास जायची. त्यांना आपल्या आजारपणाबद्दल तर सांगायचीच. त्यासोबत घरच्या समस्याही सांगायची. कुणाचा पती मृत पावलेला असायचा. त्यातच मुली उपवर असायच्या. विवाहाचा प्रश्नही असायचा. कोणाजवळ औषधी घ्यायला पैसे नसायचे. कोणाजवळ मुलांना वह्या पुस्तकाला पैसे नसायचे. तर कुणाचं क्रिटीकल ऑपरेशन करायचं असायचं. बहुतःश समस्यांनी ग्रासलेली मंडळी. ते ऐकलं वेदना होत. मग यावर डॉक्टर साहेब आपल्यापरीनं जी जमेल ती मदत करायचे. हे वस्तीतील लोकांना माहित झालं.

एकदा वस्तीत अशीच एका राजकीय नेत्यांच्या सहवासात बैठक झाली. त्या बैठकीत त्या राजकीय नेत्याला डॉक्टराच्या कार्याची माहिती दिली. तेव्हा त्या नेत्यानं म्हटलं,

"ही अशी सेवा करुन काही उपयोग नाही. तुम्ही काही लोकं जमवा. एक समिती स्थापन करा. तिला रजिस्टर्ड करा. मग अशाप्रकारचं कार्य करा. तुमचं कार्य निव्वळ वस्तीपुरतं मर्यादित राहू देवू नका. त्या कार्याला सार्वजनिक करा. जेणेकरुन इतरांना प्रेरणा मिळेल. तुमच्यासारखी मंडळी अशी भरपूर आहेत. पण त्यांना मार्ग सापडत नाही. त्यांना तुमच्या रुपानं मार्गही मिळेल. "

तो राजकीय नेता आज मरण पावला. पण त्याच्या त्या बोलण्यातून डॉक्टर साहेबांनी काही लोकं गोळा केले. एक समिती बनवली. सर्वांना पदवाटप केले. ती समिती रजिस्टर्ड केली व त्या अंतर्गत त्यांनी आपलं कार्य नव्या जोमानं सुरु केलं. या समीतीत काही पत्रकार आहेत. काही पोलिस आहेत. काही औषधी विकणारे आहेत. काही डॉक्टर आहेत. काही वकील तर काही इंजिनियरही. आजही ही समिती गोरगरीबांना मदत करते. विवाह लावून देते. गुणवंतांचा सत्कार करते. क्रिटीकल ऑपरेशनही करते. आणखी ती काय काय करते ते न सांगीतलेलं बरं.

समाजात अशाच काही समित्या आहेत. ज्या समित्या दीन, दुबळ्या, गोरगरीबांना मदत करतात. पण त्यांच्या कार्याची कोणी दखल घेत नाहीत. ह्या समित्याही आपलं कार्य निःशुल्क, निःस्वार्थ करतात. कोणी त्यांचा उदोउदो न केला तरी चालेल. ही नागरीक सेवा समिती त्यातीलच आहे. या समितीला प्रसिद्धीची गरज वाटतांना दिसत नाही. पण समाजात अशीही काही मंडळी असतात की त्यांचं काही कार्य नसतं. तरीही ते पैशाच्या जोरावर स्वतःला पुरस्कार लावून घेतात. व्हाट्सअप अाणि फेसबूक तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपले तशा कार्यक्रमाचे फोटो काढून अपलोड केले जातात. नाहकच स्वतःचा उदोउदो असतो. पण खोटं जास्त काळ टिकत नाही. त्याप्रमाणे अशा संस्था टिकत नाहीत.

समाजसेवा ही एक सेवाच आहे. सेवा करायला हवी. त्याचा कोणी उदोउदो केलाच पाहिजे या उद्देशाने समाजसेवा करु नये. तसेच समाजसेवेला गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव चालत नाही. श्रीमंतापेक्षा गरीबच लोकं जास्त समाजसेवा करतात. कारण त्यांच्यात माणूसकी असते. ती माणूसकी श्रीमंत मंडळीत पाहिजे त्या प्रमाणात नसते. काहींमध्ये नक्कीच असते. ते तशी मदत करतातही. पण उदोउदो करण्यासाठी नाही तर आपण समाजाचा एक घटक आहोत. आपलेही समाजाप्रती एक कर्तव्य आहे, हा उद्देश गृहीत धरुन.

माणसाला जन्म एकदाच मिळतो. त्या जन्माचं काहीतरी सार्थक करावे असं आपल्याला वाटायला हवं. माणूस जन्मतो आणि मरतो. त्याला काही अर्थ नाही. समाजसेवा करायला हवी. आपल्या जन्माचं सार्थक करायला हवं. पण हा मानवाला एकदाचा मिळालेला जन्म केव्हा सार्थक होईल. जेव्हा आपण ही सेवा करु. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना आपण आपले समजू. तेव्हाच खरी सेवा घडेल. हीच खरी समाजसेवा असेल. तसेच हीच इश्वरी सेवा असेल यात काही दुमत नाही.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED