कोरोना व्हायरस ऑनलाइन अभ्यासातून कौशल्य विकास! Ankush Shingade द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोरोना व्हायरस ऑनलाइन अभ्यासातून कौशल्य विकास!

23. कोरोना व्हायरस;ऑनलाइन अभ्यासातून कौशल्य विकास!

कोरोनानं जग धास्तावलेले आहे लोकांमध्ये भीती पसरलेली आहे. केव्हा कोणाला कोरोनाचा संसर्ग होईल व केव्हा कोण बाधीत होईल ते काही सांगता येत नाही. अशातच मुलांचं ऑनलाइन शिक्षण. सर्वत्र गोंधळच उडत चालला आहे.

कोरोना व्हायरस जगातून प्रवास करीत करीत भारतात आला. त्यातच पहिली स्टेज, दुसरी स्टेज करीत करीत त्यानं चौथी स्टेज पार केली. औषध काही निघाले नसल्याने शाळा कशा सुरु कराव्यात हा प्रश्न सर्वांना पडला. त्यातच ऑनलाइन शिक्षण सुरु झालं.

ऑनलाइन शिक्षण शिकवीत असतांना कोणी गुगल मीट, कोणी दिक्षा, तर कोणी झुम वापरु लागले. त्यातच लोकांचा कामाचा व्याप लक्षात घेता व वेळेची उपलब्धता लक्षात घेता अॉफलाईनलाही काही शिक्षक पसंती देवू लागले. त्यानुसार ते यु ट्यूब वरुन काही व्हिडीओज डाऊनलोड करुन मुलांना टाकू लागले. काही प्रश्नही टाकू लागले. विशेषतः मुलांचे नुकसान होवू नये म्हणून शिक्षक मेहनत घेवून आपआपल्या पद्धतीनं शिक्षण मोबाइल द्वारे मुलांना पोस्ट करु लागले. त्यातच काहींना असं वाटलं की हे सगळं रेडीमेड आहे. यामुळं विद्यार्थ्यात आत्मीयता वाटत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना आत्मीयता वाटावी यासाठी स्वतःच स्वतःचे व्हिडीओ बनवून पोस्ट करु लागले. पण यातून अध्ययन निष्पत्ती काय निघाली? तर काहीच नाही. शिक्षकांनी मेहनत केली. सडेतोड अगदी जीव लावून मेहनत केली. पण याचं फलित पाहिजे तेवढं रास्त निघालेलं नाही. याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण पचनी पडलं नाही.

ऑनलाइन शिक्षणातून काही मुलांचा फायदा नक्कीच होईल. पण काही मुलांचं अतोनात नुकसान होणार आहे. ते म्हणजे त्यांच्याजवळ मोबाइल नसणे. तसेच ज्यांच्याजवळ मोबाइल आहे. त्यांच्यावर पालकांचे नियंत्रण नसल्याने त्यांचे मोबाइल वर सतत खेळ खेळणे.

आम्ही मुलांच्या शिक्षणाचं नुकसान होवू नये म्हणून ऑनलाइन का असेना, कौशल्यविकास करायला निघालोय. पण मुलं ख-या अर्थानं अभ्यास करतात का?हे मात्र पाहात नाही. खरं तर यासाठी आठवड्यातून कधी चाचणी घेतली आहे काय?तर याचं उत्तर नाही असंच येईल? किती मुलांनी प्रश्नांची उत्तरं सोडविली?त्याचंही उत्तर आपल्याकडे नाहीच. हं, आपण फोन करुन विचारतो की अमुक अमुक तुमचा मुलगा अभ्यास करतो काय? पालकही होय म्हणतात. कारण त्यांना मुलगा मोबाइल वर अभ्यास करतांना दिसतो. मायबाप जवळ आले की मुलगा अभ्यासाचं काढतो आणि ते दूर गेले की खेळ. मायबापांना वाटते की माझा मुलगा किती अभ्यास करतो. अन् मायबापही मुलांजवळ का चोवीस तास बसून राहणार! त्यांना काय तेवढा वेळ असतो का? नाही. तेव्हा शिक्षकांनीच हवा तेवढा कस लावून आपली मुलं अभ्यासाकडे कसे काय वळतील यासाठी प्रयत्न करायला हवेत.

शिक्षक हा कलाकार असायला हवा. त्याला नाटककला जमायलाच हवी. त्याला हसवून शिकविता यायला हवं. तसेच त्याला मुलं खिळवून ठेवता यायला हवी. या ऑनलाइन शिक्षणात त्यानं विदुषकाची भुमिका पार पाडायला हवी. जेणेकरुन विद्यार्थी वर्गाला पाठ समजेल व शिक्षणातून कौशल्यविकास साधता येईल. तसेच हास्यविनोदानं अभ्यासात रुची वाढेल. एवढेच नाही तर मुलांना प्रश्न विचारावेत. त्यांची उत्तरं लिहून पाठवायला लावावीत.

मोबाइल द्वारे शिकवीत असतांना निव्वळ व्हिडीओ बनवून व्हायरल करतांना केवळ पाठ वाचन करुन चालणार नाही तर त्यासाठी चित्रांचाही वापर करावा. चित्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जास्त कळतं. तो अनुभव चिरकाल टिकतो. शिवाय एक अखंड पाठ किती प्रमाणात लघू करुन शिकविता येईल, याचा विचार शिक्षकाला करण्याची गरज आहे. त्यासाठी चित्र काढून शिकविणे व छोटे छोटे प्रश्न तयार करुन शिकविणे चांगले.

ऑनलाइन शिक्षण मोबाइल द्वारे शिकवीत असतांना छोटे छोटे प्रश्न, चित्र व मधामधात हास्यविनोद करुन बनविलेले स्वतःचे छोटे छोटे व्हिडीओ मुलांना पोस्ट केल्याने मुले अभ्यास करतीलच. त्यातच आठवड्यातून एक दिवस शिकवून झालेल्या पाठ्यांशावर एक पाच दहा गुणांची चाचणी घ्यावी. जेणेकरुन ती सोडवली का? किती सोडवली? हे पाहता येईल. नव्हे तर अध्ययन निष्पत्ती मोजता येईल. त्याचबरोबर आपल्याला जे अपेक्षीत आहे. त्याचं फलीत मोजता येईल. यात शंका नाही. अशाप्रकारे शिकविल्या गेल्यास ऑनलाइन अभ्यासातून कौशल्यविकास नक्कीच साधता येवू शकतो. पण हे सर्व तेव्हाच घडू शकते, जेव्हा पालकांचं आपल्या पाल्याच्या मोबाईल हाताळण्यावर पुरेपूर नियंत्रण असेल. पालकांनीही मुलांना फक्त अभ्यासापुरता मोबाइल द्यावा. तसेच जेव्हापर्यंत अभ्यास सुरु असेल. तेव्हापर्यंत बाकीची कामं बंद करुन पालकांनी स्वतः पाल्याजवळ बसावे. जेणेकरुन तो पाल्य निव्वळ अभ्यासच करु शकेल. फालतुच्या गोष्टी करायला वाव मिळणार नाही.