जैसे ज्याचे कर्म - 1 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जैसे ज्याचे कर्म - 1

जैसे ज्याचे कर्म! (भाग १)
डॉ. गुंडे यांच्या प्रशस्त, टोलेजंग दवाखान्यातील भव्य वातानुकूलित शस्त्रागारामध्ये एका वीस वर्षीय युवतीवर गर्भपाताची शस्त्रक्रिया आटोपून डॉ. गुंडे यांनी हातमोजे, चेहऱ्यावरील मास्क काढला. कोपऱ्यामध्ये असलेल्या बेसीनमध्ये हात स्वच्छ धुतले. बाजूलाच असलेल्या खुर्चीवर बसून त्यांनी जवळच असलेल्या भिंतीतले कपाट उघडले. कपाटातील एक रजिस्टर काढताना त्यांना जाणवले की, ते त्या शस्त्रक्रियेच्यावेळी नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हते. त्या युवतीजवळ गेल्यापासूनच एक विचित्र जाणीव त्यांच्या शरीरामध्ये पसरली होती. वातानुकुलित दालन असूनही त्यांच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले होते. खिशातील रुमाल काढून त्यांनी घाम टिपला. त्यांच्यासमोर असलेल्या फॉर्ममधील माहिती त्यांनी त्या गुप्त रजिस्टरवर लिहिली. क्रमांक लिहिताना ते मनाशीच म्हणाले,
'बाप रे, हजारावा क्रमांक? म्हणजे आपण या क्षणापर्यंत एक हजार शस्त्रक्रिया केवळ गर्भपाताच्या केल्या आहेत. माय गॉड हा तर एक उच्चांक ठरावा. अगदी ग्रिनीजबुक, लिम्का बुकामध्ये नोंद व्हावी अशीच ही कामगिरी आहे. ही माहिती जगजाहीर करताच येणार नाही, पुरस्कार तर फार पुढची गोष्ट. कारण या हजार शस्त्रक्रियांपैकी फारच झाले तर केवळ सत्तर-ऐंशी गर्भपात हे कायद्याच्या चौकटीत बसू शकतात. बाकीचे सारे? मी एक हजार गोजिऱ्या बाळांचा गळा या- या हातांनी दाबला आणि तरीही रेकॉर्डबुकमध्ये नोंद होण्याची अपेक्षा करणे हणजे 'सौ हे खाकर बिल्ली...' असे होईल. मी हे काय केले? पैशासाठी मी एवढा लाचार आणि निष्ठूर झालो की, मी चक्क हजार खून केले. पण मी तरी काय करणार....?' डॉ. गुंडे तशाच विचारात असताना त्यांच्या भ्रमणध्वनीने विशेष नोंदीचे स्मरण देणारी खास सूचना दिली. डॉक्टरांनी तो संदेश ऑन केला. ती नोंद अशी होती,
'आज स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात निघणाऱ्या रॅलीमध्ये सहभाग आणि नंतर होणाऱ्या सभेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून भाषण...'
'बाप रे! निघायला हवे. भाषणाची तयारीही झाली नाही. काल लक्षात आले असते तर आजची ही केस उद्यावर ढकलली असती. केवढा हा विरोधाभास? स्त्री भ्रूणहत्या विरोधात रॅली आणि नंतर होणाऱ्या सभेचे वक्ते कोण? तर एक हजार गर्भपात करण्याचा विक्रम करणारे डॉ. गुंडे ! वा! क्या बात है! खरे तर माझ्यासारखा हात साफ असणारा दुसरा कुणी डॉक्टर नाहीच. एक हजार कळ्यांचा जीव घेण्यासाठी हवे असलेले जिगर केवळ माझ्याकडेच. खरे तर हा गैरकानुनी विक्रमही साजरा करावयास हवा. कारण शेवटी विक्रम ते विक्रमच! योगायोगाने राज्याचे आरोग्य मंत्री आणि आपले जिवलग मित्र जिवलावे आज शहरात असून आजच्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. आपल्या आगळ्यावेगळ्या विक्रमाचे सेलीेब्रेशन त्यांच्याच अध्यक्षतेखाली सायंकाळी विशेष कार्यक्रम घेऊन केले तर...'
"साहेब... साहेब..." दवाखान्यातील बबन नावाच्या नोकराने दिलेल्या आवाजाने डॉ. गुंडे भानावर आले. त्यांनी समोर पाहिलं. बबन! दवाखान्याच्या पांढऱ्या शुभ्र गणवेशात त्यांच्यासमोर उभा होता. काही वर्षांपूर्वी बबन डॉ. गुंडे यांच्या दवाखान्यात आला होता. तशाही प्रसंगात डॉक्टरांच्या समोर तो प्रसंग जशाला तसा उभा राहिला...
त्यादिवशी डॉ. गुंडे दवाखान्यात आजारी व्यक्तींना तपासत होते, योग्य मार्गदर्शन करीत होते, औषधोपचार लिहून देताना योग्य त्या सूचना करीत असताना साधारण पंचवीस वर्षे वयाचे जोडपे आत आले. दोघेही लाजत, बुजत येत होते. डॉक्टरांनी त्यांचे नेहमीप्रमाणे हसून स्वागत केले. ते जोडपे खुर्चीवर बसेपर्यंत डॉक्टरांनी त्यांचे निरीक्षण केले. जोडपे ग्रामीण भागातील होते. मुलाने पांढरी ट्रॉझर, त्यावर तसाच पांढरा शर्ट, डोक्यावर पांढरी टोपी असा पोशाख केला होता तर तरुणीने लालसर छटा असलेली सुती साडी नेसली होती. दोघांच्याही चेहऱ्यावर ते कष्टकरी असल्याची छटा दिसत होती. डॉ. गुंडे यांनी मुलाकडे पाहून विचारले,
"काय नाव तुझे?"
"जी.. जी.. गणपत..." गणपत चाचरत म्हणाला.
"ही तुझी बायको का?"
"हो.. हो..जी.."
"काय नाव तुझे?" त्या मुलीकडे बघत डॉक्टरांनी विचारले.
"जी रखमा.." रखमा हळूच म्हणाली
"बरे, काय त्रास होतोय?" डॉक्टरांनी विचारले. तशी गणपतकडे बघत मान खाली घालून रखमा गणपतला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली,
"सांगा ना जी तुम्ही..." तसा गणपत खाकरत, डॉक्टरांकडे बघत सांगू की नको, काय सांगू, कशी सुरुवात करू अशा विचारत असताना डॉक्टर म्हणाले,
"हे बघा. काय ते संकोच न करता स्पष्ट सांगा. बरे, मला एक सांगा, लग्नाला किती वर्षे झाली आहेत तुमच्या?"
"जी चार वर्से झाली..." गणपत सांगत असताना त्याला कोपऱ्याने डिवचत रखमा म्हणाली,
"न्हाई व्हो. चार साल व्हायला दोन महिने बाकी हाईत..." रखमा तसे सांगत असताना डॉक्टर मंद हसत कौतुकाने रखमाकडे बघत म्हणाले,
"काही हरकत नाही. रखमा, तुला दिवस गेलेत का?"
"न्हाई.. न्हाई. त्यो गर्भ..."
"गर्भ राहात नाही का?"
"डाक्टरसाब, आम्हाला लेकरू नको हाय..." गणपत म्हणाला
"अरे, आधीच लग्नाला चार वर्षे झाली आहेत अजून किती दिवस लेकरू नको आहे?"
"अं..अं.. नकोच आहे... म्हणजे कधीच नको आहे."
"काय? मुल होऊच द्यायचे नाही.. कधीच नाही? का? तुम्हाला कुणाला कोणता आजार आहे का?"
"तस काही न्हाई. पण..."
"हे बघ. तुम्ही मुल का नको ह्याचे खरे खरे कारण सांगितल्याशिवाय मी काही करू शकणार नाही."
"त्याच काय हाय सायब, आमी दोगबी ऊस तोडणीला जात आसतो. कमी जास्त सात-आठ महिने गावाबाहेर आसतो. बरं तिकडं गेलो तरी बी आमचा काय बी ठावठिकाणा नसतो. एका वावरातली ऊस तोडणी झाली की, दुसऱ्या वावरात जावे लागते. आज एका गावात तर दोन दिसांनी दुसऱ्या गावात. रात न्हाई की दिस न्हाई. तोडणी होवून गाडी भरली की, कारखान्याकडं जावं लागत्ये.."
"हं असे आहे काय? मग बायकोला दिवस गेले की, ती बाळंत होऊन लेकरु वर्षाचे होईपर्यंत बायकोला गावीच ठेवून तू एकटा कामावर जा ना..."
"त्येच तर जमत न्हाई हो. पाचसे रुपये एका दिसाची मजुरी मिळते. तुम्ही म्हणता तस ऊस तोडणीचा येक सीझन रखमीला संग नेल न्हाई तर तुमीच हिसाब करा, किती नुकसान होईल ते. आणि येकदा का ग्याप पडला तर मुकारदम दुसऱ्या सिझनला काम देयाला टाळाटाळ करतो. न्हाई तर आर्धीच मजुरी देतो. "
"तसे का? कामात तर कमी नसते ना?" डॉक्टरांनी विचारले.
"मुकारदमाचं म्हणणं आसत की, लेकरु झालं की, बाई कमजोर होते, तिच्यामधी पैल्यावाणी ताकद ऱ्हात न्हाई. येक प्रकारे बाई लै सुस्त व्हतीया. बाईचं सम्द ध्यान लेकराकडे ऱ्हायते. पैल्यावाणी बाया जीव लावून काम करीत न्हाईत. लेकराला बार बार पदराखाली घेत्यात."
"अरे, पण तुमच्या सोबतचे सगळेच मजूर म्हणजे सगळ्या बायका असेच करीत असतील ना?"
"तेच तर आम्हालाबी करायच हाय. डाक्टरसाब, लेकराची कटकट नको, काम बंद पडू नये म्हणून बाया गर्भ पाडत्यात..."
"गर्भपात करतात? हे बघा, मी असा सल्ला मुळीच देणार नाही आणि गर्भपात तर करणारच नाही."
"तसं न्हाई जी, त्ये काय म्हणत्यात त्ये बाया गर्भाची थैलीच काढून टाकत्यात..."
"का ss य? कमाई करण्यासाठी चक्क गर्भाशय काढून टाकतात. किती भयानक आहे हे? अरे, पण अशाने तुमचा वंश कसा वाढणार?"
"ते वंश बिंश सोडा इथं बायलीचं प्वाट वाढू नये हे सम्दे जणच बघायलेत.."
"रखमा, हा गणपत काय म्हणतोय?" डॉक्टरांनी रखमाकडे बघत विचारले.
"खर हाय त्येंच. हातात पैकाच नसल तर पोरांना वाढवावं कसं? दोगांनी मिळून सात-आठ म्हैने काम केले तर कसबसं सालभर खायला मिळतं. एक सिझन काम केलं न्हाई तर त्या सिझनचं नुसकान तर व्हतेच व्हते पर अगल्या सिझनला बी कमी पैका घिऊन काम करावे लागते. डबल नुसकान सोसावे लागते. काय म्हणून नुसकान सोसावं? ऊसाचा हंगाम आन् लगिनाचा हंगाम येकच आस्तो की न्हाई पर लै जवळचं कुणाचं लगीन आसल तरच मुकारदम कशीबशी दोन दिस सुट्टी देत्यो."
"अग,पण आई होणं हा तुझा हक्क आहे. संतती झाल्याशिवाय बाईला आणि संसाराला पूर्णत्व लाभत नाही. शिवाय मुल होऊ दिले नाही तर भविष्यात म्हातारपणी बाईला त्रास होतो. मुल म्हणजे आईबापाची म्हातारपणाची काठी असते, आधार असतो..."
"सायेब, कशाचा आधार आन् कहाची काठी आलीय. मायबापाचे हातपाय चालना गेले की, पोटचं पोर काठीनं बडवते. त्यापरीस हातपाय चालतील तव्हर काम करायच. न्हाईच चालले तर मग कुठेही.. एखांद्या मंदिरात बसून भिक मागून पोट भरायचं."
"म्हणून म्हटलं ती पोटातली थैली येकदा काडून टाका. समदी किरकिरच मिटल बघा. त्ये काय म्हणत्यात 'साप तर मरल पर काठी बी तुटायची न्हाई' आस कराव म्हणलं..." गणपत बोलत असताना डॉक्टरांनी घंटी वाजवली. तशी एक नर्स आत आली. तिला पाहताच डॉक्टर म्हणाले,
"मला या केसमध्ये जरा जास्त लक्ष घालावे लागणार आहे. परगावचे पेशंट थांबवून ठेव. इतरांना संध्याकाळी यायला सांग. सायंकाळी नवीन पेशंट घेऊ नको."
"ठीक आहे..." असे म्हणत नर्स निघून गेली. डॉक्टर गणपतला म्हणाले,
"गणपत, थोडं बाहेर बसतोस काय? मला रखमाला तपासायचे आहे." तसा गणपत बाहेर निघाला. त्याला वाटले, डॉक्टर रखमीला तपासायल्यात म्हणजे आपलं काम व्हणार. डॉक्टरांनी आपली केस घेतली...
००००