जैसे ज्याचे कर्म - 4 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जैसे ज्याचे कर्म - 4

जैसे ज्याचे कर्म! (भाग ४)
डॉ. गुंडे विचारात गुंतलेले असताना टेबलावरील युवतीची स्वच्छता करणारी नर्स म्हणाली,
"डॉक्टर पे..पे..पेशंट..."
"काय झाले?" नर्सचा कंपायमान आवाज ऐकून डॉक्टरांनी विचारले.
"बघा ना, कशी अस्वस्थ वाटतेय, डोके हलवतेय. गळ्यातून वेगळाच आवाज येतोय. हातपाय ताठ करतेय..." नर्स बोलत असताना डॉ. गुंडे टेबलाजवळ आले. त्यांनी मुलीची नाडी पाहिली. ती व्यवस्थित होती. तितक्याच त्यांचे लक्ष मुलीच्या चेहऱ्याकडे गेले. चेहऱ्यावर बांधलेला रुमाल पाहून ते म्हणाले,
"असे का करतीय ही? नाडी तर व्यवस्थित आहे. मग घाबरल्यासारखी का करतीय? आजपर्यंत मी एवढ्या गर्भपाताच्या शस्त्रक्रिया केल्या पण असे कधीच घडले नाही. आजच असे का झाले? चेहऱ्यावर गुंडाळलेल्या रुमालामुळे दम कोंडून तिला घाबरेघुबरे होत असेल. तो रुमाल अगोदर काढा."
"पण डॉक्टर, आपल्या छायाताईंनीच त्यांच्या या मैत्रीणीच्या चेहऱ्यावर रुमाल बांधूनच ठेवा असे सांगितले आहे..."
"ते ठीक आहे.. परंतु आत्ता, यावेळी छाया किंवा तिने सांगितलेले महत्वाचे नाही तर पेशंटचा जीव वाचविणे आवश्यक आहे. काढा तो रुमाल. तिला सलाईन लावावे लागेल. तिच्या सोबत कोण आलंय? बोलव त्यांना लवकर."
"कोणीही नाही आले. एकटीच आलीय. आल्यापासून चेहरा असाच गुंडाळलेला आहे. फॉर्म भरतानासुद्धा चेहरा बांधूनच होती. जास्त बोलतही नव्हती. छायाताईची मैत्रीण म्हणून आम्ही जास्त चौकशी केली नाही."नर्स म्हणाली.
"काय? हे आत्ता सांगताय? अगोदर नाही सांगायचे? सोबत कुणी असल्याशिवाय शस्त्रक्रिया करायची नाही हा आपला रिवाज ठाऊक नाही का? फॉर्म बघा कुणीतरी. घरचा कुणाचा नंबर लिहिला असेल तर..." डॉ. गुंडे बोलत असताना त्यांचा सहकारी म्हणाला,
"साहेब, पेशंट म्हणाला की, घरी काही कळू द्यायचे नाही म्हणून आम्ही जास्त काही बोललो नाही.
शिवाय तुमच्याकडून कधी चूक होत नाही. अशी वेळ प्रथमच येत आहे..."
"ते झाले पण आपण आपले प्रोसिजर पूर्ण करणे आवश्यक आहे. उगाच काही विपरित घडले म्हणजे वेगळेच झंझट मागे लागायचे. बघत काय राहिलीस ? काढ तो रुमाल... " डॉ. गुंडे रागारागाने बोलत असताना नर्सने त्या मुलीच्या चेहऱ्यावर बांधलेला रुमाल वेगळा केला आणि ती दचकून ओरडली,
"स...र, स..र, ही ..."
"काय सर... सर... करतीस..." असे म्हणत मुलीची नाडी बघण्यासाठी हातात घेतलेला हात तसाच सोडून तिचे डोळे बघण्यासाठी डॉ. गुंडेंनी मुलीच्या चेहऱ्याकडे नजर वळवली. मुलीचा चेहरा बघताच डॉक्टरांना चक्कर आली. ती मोठी खोली त्यांना गरगरा फिरत असल्याचे लक्षात येताच ते धडपडत जवळच्या खुर्चीवर बसत म्हणाले,
"क...को..ण? छा...या..तू ? अरे देवा, हे मी काय केलं? माझ्या पोरीचा मीच गर्भपात केला? असे कसे झाले?"
टेबलावरील छायाकडे बघून भयचकित झालेल्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांची स्थिती लक्षात घेऊन आपापसातील नेत्रसंकेताने निर्णय घेऊन छायाला अलगद स्ट्रेचरवर झोपवले. सर्वांनाच फार मोठा धक्का बसला होता. छायावर अशी वेळ यावी हा विचारच कुणी करु शकत नव्हते. एक गुणी मुलगी, हुशार मुलगी म्हणून सर्व जण तिच्याकडे पाहत होते. त्यामुळे ती अशी वागू शकते असे कुणाला स्वप्नातही खरे वाटले नसते. छायाला स्पेशल वॉर्डमध्ये नेले. दोन सहकारी डॉक्टरांनी डॉ. गुंडे यांना हलकेच उठविले आणि दवाखान्याच्या वरील बाजूस असलेल्या त्यांच्या निवासस्थानातील शयनगृहामध्ये नेले. मिसेस गुंडे अजून उठल्या नव्हत्या. दारावर टकटक करणाऱ्या कर्मचाऱ्याला डॉक्टरांनी हाताने 'जा' असा इशारा करून डॉ. गुंडे खोली उघडण्याची वाट बघत होते. काही क्षणांनी त्यांच्या पत्नीने दार उघडले. झोप अर्धवट झाल्यामुळे ती रागारागाने काही बोलणार तितक्यात तिचे लक्ष पतीच्या चेहऱ्याकडे गेले. काही तरी वेगळे घडलेय हे जाणून तिने काही न बोलता नवऱ्याला आत येऊ दिले. डॉ. गुंडे आत शिरत असताना त्यांचा भ्रमणध्वनी खणाणला. त्यावर आरोग्य मंत्री जिवलावे यांचे नाव पाहताच त्यांची तळपायाची आग मस्तकात शिरली. त्यांच्या मनात विचार आला,
'आत्ता हा जिवलावे माझ्या समोर असता तर मी मी ह्याला गोळीच घातली असती. या.. या.. याच जिवलावेंमुळे माझ्यावर आज ही वेळ आली आहे. बास झाले आता! यानंतर ना गर्भलिंगनिदान करायचे ना कुणाचा गर्भपात करायचा. कुणीही सांगितले तरी नाही करायचा. काय होईल? होऊन होऊन नकार दिल्याने पोलीसांचं लचांड मागे लावतील. काय फरक पडणार आहे? पाण्यासारखा पैसा ओतून मोकळे होता येईल परंतु आता नाही... नाही म्हणजे नाही...'
त्यांनी मोठ्या प्रयासाने स्वतःवर नियंत्रण ठेवले. भ्रमणध्वनी उचलून ते म्हणाले,
"नमस्कार साहेब. आजच्या रॅलीचे आणि सभेचे लक्षात आहे. पण सर, जरा तब्येत बरी नाही. तसे विशेष काही नाही. रात्री जागरण झालेय. थोडे पित्त खवळलेय. तेव्हा आज येणे होणार नाही. सॉरी!" म्हणत डॉक्टरांनी आगलावेंना काही बोलू न देता दुसरा क्रमांक जुळविला.
"अरे, आजच्या साऱ्या अपॉईंटमेट्स, ओपीडी रद्द करा. मला कोणत्याही परिस्थितीत डिस्टर्ब करू नका..." म्हणत डॉ. गुंडेंनी मोबाईल स्वीच ऑफ करून पलंगावर फेकून दिला.
पलिकडून फक्त "बरे..." एवढेच शब्द आले. सर्वांना तो प्रकार माहिती झाला होता. त्यामुळे सारे कर्मचारी प्रचंड दबावाखाली होते.
"क...क.. काय झाले हो?" त्यांच्या पत्नीने काळजीने विचारले.
"काही नाही. एसिडीटी वाढलेय. तू जा. मला उठवू नको." असे म्हणत डॉक्टरांनी पत्नीला काहीही न सांगता, तिला काही विचारण्याची संधी न देता बळेच खोलीबाहेर काढले. खोलीचे दार लावून ते पलंगावर कोसळले...
छतावर फिरणाऱ्या पंख्याकडे पाहत ते मनाशीच म्हणाले,
'छ... छ ..छाया बेटी, हे तू काय गेलेस ग? तुझे वय काय? अशा कोवळ्या वयात तू तू गर्भवती? तू अशी वागू शकते यावर... छे.... विश्वासच बसत नाही. क... का असे वागलीस? प्रत्यक्ष पोटच्या पोरीचा गर्भ पाडण्याची वेळ माझ्यावर यावी? माझ्यासारखा कमनशिबी मीच. पैशाच्या मोहात पडून मी एवढे गर्भपात केले आणि हे... हे... माझ्या मुलीचाही... हे कर्मही मीच केले. सराईत खाटकाप्रमाणे मी माझ्याच मुलीच्या अंशाचा खून केला. नकळत घडले परंतु शेवटी खून तो खूनच. हा.. हाच काय परंतु या आधीचे कळतेपणी केलेले सारे गर्भपात खूनच आहेत. मी नऊ हजार नऊशे नव्याण्णव कोवळ्या जीवांचा खातमा केला आणि... आणि म्हणूनच मला माझ्या लेकीच्या गर्भपाताची शिक्षा मिळाली? आज टेबलवर छाया होती... माझी मुलगी होती म्हणून तर माझे हात थरथरत होते का? त्यामुळे का अस्वस्थ वाटत होते का? एवढ्या शस्त्रक्रिया याच हातांनी केल्या पण अशी अस्वस्थता कधीच आली नव्हती. माझी अस्वस्थता, माझी तगमग मला काही सुचवत होते का? ते संकेत मी का ओळखू शकलो नाही? छाया, स्वतःचा चेहरा मला दिसू नये, तुझी ओळख पटू नये म्हणून मैत्रिणीचे नाव सांगून आणि तोंडावर रुमाल बांधण्याचा हट्ट तू धरलास? त्याचवेळी मला शंका का आली नाही? तू असे काही अनैतिक काम करशील हे मला स्वप्नातही खरे वाटले नसते. वास्तविक पाहता तुझे बदललेले वागणे पाहून मी सावध व्हायला हवे होते. तुझे काय चालले आहे? तुझ्या मैत्रिणी आणि त्यातही मित्र कोण आहेत ही माहिती घेऊन त्यांचे चालचलन कसे आहे हेही जाणून घ्यायला हवे होते. छाया, मी बाप म्हणून माझ्या कर्तव्याला नाही जगलो ग. बाहेर मी कितीही यशस्वी, प्रसिद्ध व्यक्ती असेल पण बाप या नात्याने मी कमी पडलो. नेहमीप्रमाणे तुझा आजचा हा आगळावेगळा हट्टही पूर्ण केला....तो ही मी...! क..क...का...झाले असे? मी... मी...खरे तर या मागे तो जिवलावे आहे. आज मारे मोठा आरोग्यमंत्री झालाय. परंतु मी केलेल्या हजार शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या शब्दाखातर किमान दोनशे गर्भपात करावे लागले असतील. प... प ... पहिला गर्भपात करण्याचे पातक मी केले ते ते या...याच जिवलावेने बलात्कार केलेल्या तरुणीचा गर्भपात करून...' म्हणत डॉ. गुंडे भूतकाळात शिरले....
००००