जैसे ज्याचे कर्म - 3 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

जैसे ज्याचे कर्म - 3

जैसे ज्याचे कर्म! (३)
शस्त्रक्रियेच्या दालनातून बाहेर पडलेल्या गणपतला दवाखान्याची स्वच्छता करणारी रखमा दिसली. तो तिच्याजवळ जाऊन म्हणाला,
"रखमा, थोडे नदीपर्यंत जाऊन येतो."
"बरे. जाऊन या. पण जरा सांभाळून हं. आज जरा कसुनकसं होतेय बघा."
"अग, मी काय नवीन आहे का? काळजी करू नकोस. पण आज तुम्हाला झालंय तरी काय? साहेब पण घामाघूम होत आहेत, अस्वस्थ वाटतय असे म्हणत आहेत. तू बी आस बोलती... बरे, मला जास्त वेळ थांबता येणार नाही. कुणी हा माझ्या हातातील आहेर पाहिला तर अवघड व्हयाचे सारे..." असे म्हणत गणपत निघाला आणि मनोमन अस्वस्थ झालेल्या रखमाला ती त्या दवाखान्यात प्रथम आली तो प्रसंग आठवला...
"खर सांगता ताई, कैंसर भी व्हतो व्हय..."रखमाने डॉक्टरकडे बघत नर्सला विचारले.
"होय. कँसरची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. ही शस्त्रक्रिया करताना अनस्थेशिया म्हणजे भूल द्यावी लागते त्यामुळे शस्त्रक्रिया सोपी होते परंतु काही महिलांना यामुळे श्वासासंदर्भात त्रास होतो. त्याचप्रमाणे अन्य काही आजाराचे विषाणू शरीरात प्रवेश करु शकतात. शिवाय हे ऑपरेशन करताना आजूबाजूच्या काही अवयवांना दुखापत होऊ शकते. प्रकृती मूळ पदावर यायला खूप वेळ लागतो. अशक्तपणा खूप दिवस राहू शकतो. यामुळे तुला फडावरल्या कामावर जायला वेळ लागू शकतो."
"याचा अर्थ बाळंतपणच बरे म्हणायचे की."
"अगदी बरोबर आहे. हाडेसुद्धा ठिसूळ, कमजोर होतात. कधी कधी शरीरावर अनावश्यक चरबी वाढल्यामुळे लठ्ठपणा येतो."
"आसं झालं बघा खरच. मझ्या आत्याची पाळी गेली तव्हा ती अशी हत्तीवाणी फुगली. ऊस तोडाय तर यायची पर तिला कामच व्हयाचं न्हाई. सारखी दमायची. मंग मुकारदम तिच्यावर खेकसायचा. पगार कापायचा आन् येकेदिशी त्येन आत्तीला कामावरुन काढून टाकलं."
"अगदी बरोबर आहे. आत्याचे वय झाले होते पण असाच त्रास तुलाही होऊ शकतो. चिडचिड होते, थकवा तर भयंकर येतो. उदासीनता येते. कुणाला बोलावे वाटत नाही. कधी कधी आपला माणुसही नकोसा होतो. हातापायाची आगआग होते. शरीर गरम होते. पिशवी काढताना कुणाला जास्त रक्तस्त्राव झाला तर रक्त द्यावे लागते. कुणाची मान दुखते, कंबरदुखी डोकं वर काढते. गुडघेदुखी मागे लागू शकते. एकटेपणाची जाणीव होते, बेचैन, अस्थिर वाटणे... अशा आजारांची नाही पण तशा लक्षणांची गर्दी होते."
"हां डाक्टरसाब, मझ्या मावशीची पिशवी काढली ना तर तिला हे तर सम्द होऊच लागल. तिच्या पायाच्या टाचा दिवसभर दुखायच्या. पहाटे उठून फायलं तर हात सुजून पाय टंब झालेले असायचे. हात येवढे सुजून यायचे ना की, हातातल्या बांगड्या पार फसून बसायच्या आन् मनगट रक्तबंबाळ व्हायचं... तुम्हाला सांगते बायजी, मझी मावशी खात्यापित्या घरची व्हती. हातात सोन्याच्या बांगड्या व्हत्या. येकदा तर त्या बांगड्या अशा फसल्या म्हण्ता. काय बी केलं तरी निघतच नव्हत्या. अखेरीस तिला लोहाराकडं नेऊन त्या बांगड्या कापून काढल्या. "
"एवढे सारे माहिती असूनही तू गर्भाशयाची पिशवी काढायचा हट्ट धरतेस?" नर्सने विचारले.
"ईलाज न्हाई बायजी..."
"असे का? उपाय आहेत. जोपर्यंत तुला मुल नको तोवर थांबता येते. चार दोन वर्षांनी जेव्हा मुल हवे असेल तेव्हा किंवा आता गणपतची नसबंदी केली तर गरज वाटल्यास पुन्हा त्याची शस्त्रक्रिया करून..."
"नग. नग. येक तर त्येस्नी कोन्ताबी तरास नग. कारण माणसाची नसबंदी लै आवगड आसती म्हणत्यात आन मंग तो गडी माणसात ऱ्हात न्हाई आस बी म्हणत्यात. आन् म्हत्वाचे म्हणजे आता तुमास्नी कसं सांगू.."
"काय ते स्पष्ट सांग. काहीही आडपडदा ठेवू नकोस." नर्स रखमाच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.
"मी अगुदरच सांगलं की, दोन साल झाले म्या कोणाची डाळ शिजू देली न्हाई पर औंदा का कोणास ठाऊक पर मला काय तरी ईपरीत घडल, म्या सोत्ताला न्हाई वाचवू शकणार आसं वाटत हाय. तसं घडलं आन् त्या ईखारी संबंधातून म्या पोटुशी ऱ्हायले तर? तव्हा ह्येंची नसबंदी केलेली आसली तर काय वाटल ह्यांना? लै इस्वास हाय येंचा...मझं शील गेलं तरी चालल पर ह्येंचा इस्वास न्हाई तुटला फायजेत."
"माय गॉड! रखमा, तू किती बारीक विचार करतेस ग?"
"व्हय जी, करावाच लागतो."
"रखमा, गर्भाशयाची पिशवी काढणं म्हणजे काय इंजेक्शन दिल्याप्रमाणे स्वस्त वाटतय का? खूप खर्च येतो ग."
"ठाव हाय.पर थैली काढून टाकायला मुकारदम पैसा लावतो आंन् मंग काटून घेतो... हप्त्यानं!"
"रखमा, हे सगळं खरं असलं तरीही मी तुला असे करायला परवानगी देणार नाही. मी स्वतः आजपर्यंत असे काम केले नाही आणि यापुढेही अशा पापाच्या कामात सहभागी होणार नाही. मला माहिती आहे की, मी नकार दिला तर तुझे अडणार नाही. तुझ्या इच्छेनुसार इलाज करणारे डॉक्टर आहेत. जाता जाता तुला अजून एक सांगतो, गर्भाशयाच्या पिशवीत केवळ मुलंच वाढत नाही तर कात टाकल्यावर नाग जसा पूर्वीपेक्षा अधिक चपळ होतो, सतेज होतो त्याप्रमाणे बाळंतपण झाले की ही पिशवी जणू कात टाकते आणि बाईचे आयुष्य पुन्हा उभारण्यात महत्त्वाचे काम करते. म्हणतात ना, बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्म! यावेळी गर्भाशय महत्त्वाची भूमिका बजावते."
"सायेब, मला सम्दे पटते व्हो पर काय करु काय बी समजत न्हाई बघा..."
"रखमा, शांतपणे विचार करा. घाईघाईने निर्णय घेऊ नका. तुझ्या प्रकृतीचा, तुमच्या म्हातारपणाचा विचार करा. अग, असे लांडगे प्रत्येक क्षेत्रात आहेत पण म्हणून काही कुणी स्वतःचे आयुष्य पणाला लावत नाही. दोन वर्षे तू त्याला टक्कर देऊन जिंकलीस ना मग भविष्यातही तुझा विजयच होईल कारण तू सच्ची, प्रामाणिक आहेस, चारित्र्यवान आहेस. दोन वर्षे तू तुझ्याही एक नकळत एक गोष्ट सिद्ध केलीस की, स्त्रीची इच्छा असल्याशिवाय कुणीही तिच्याकडे डोळा वाकडा करून पाहू शकत नाही. मला एक खर खर सांग, तुला खरेच मनापासून मुल नको आहे का?"
"ताईसाब, अस कोण्या बाईला वाटल व्हो पर परस्थिती माणसाला कशी बनवते..."
"अग, तुला एक उपाय सांगतो बघ, तुम्ही ही नोकरी सोडून द्या. दोघेही हुशार, बलवान आहात. कष्ट करण्याची दोघांचीही तयारी आहे तर मग दुसरीकडे नोकरी बघा..."
"आम्हाला कोण नोकरी देईल? दोघबी ठार आडाणी हावोत. आजकाल शिक्शणाबगर कुणीबी जवळ उभं राहू देत न्हाई की..."
"समजा तुमची नोकरीची समस्या दूर झाली तर तुम्ही ती ऊस तोडणीची नोकरी सोडून द्यायला..."
"एका पायावर तयार होऊ सायेब, त्या नरकातून बाहेर पडायला !..."
"तुम्ही हा थैली काढून टाकायचा विचार मनातून काढून टाकाल?" थैली शब्दावर जोर देत डॉक्टर हसत म्हणाले.
"व्हय. ताई, तसा सबुत देत्ये तुम्हाला." रखमा आनंदाने म्हणाली. तसे डॉ. गुंडे यांनी घंटी वाजवली आणि काही क्षणात गणपत आत आला.
"या. बसा. गणपत. काय मग ऐकले का आमचे बोलणे?" डॉक्टरांनी विचारले. तसे आश्चर्याने रखमाने विचारले,
"म्हंजी? हे सम्द ऐकत होते? ताईसाब, तुम्ही बी ना, मी ह्येंच्याबद्दल कायबाय बोलले असती तर?"
"नाही. मला विश्वास होता. तू नवऱ्याबद्दल काही बोलणार नाही ते. मग गणपत, तयार आहेस का, ऊसाच्या फडातून बाहेर पडायला?"
"का न्हाई सायेब? अव्हो, तिथं राहणं कोणला आवडलं? जीव मुठीत धरून ऱ्हाव लागते. राहायला झोपडी कशाची तर पाचोट्याची! पहाटे पहाटे उठून ऊस तोडणी करायला जाव लागते. कधी कोणतं जनावर कुठून येईल आणि पिंडरीला पकडल याचा नेम न्हाई..."
"माझ्या या दवाखान्यात काम करता काय?"
"डाक्टरसाब, या स्वर्गात राहायला कुणाला आवडणार नाही हो. तुमचे लई लई उपकार होतील बघा.." असे म्हणत रखमा डॉ. गुंडे यांच्या पायाशी वाकली. तिला मध्येच उठवून गुंडे म्हणाले,
"पण एका अटीवर... नोकरीवर आल्यानंतर एका वर्षात याच दवाखान्यात तुझं बाळंतपण झाले पाहिजे..." डॉक्टरांचे बोल ऐकणाऱ्या रखमाने पदराआड चेहरा लपवला तर गणपतने डॉक्टरांकडे बघत आदराने हात जोडले...
रखमा मनाशी पुटपुटली, 'तव्हापासून या देव माणसासंग हावोत. काडीचाबी तरास न्हाई. सम्दं कसं येळशीर... राहायला, जेवायला, झोपायला, औषधी सम्द फ्री तर हायेच आन् वर पगार बी हायेच. पर येक समजत न्हाई मला, असा देव माणूस आसूनबी हे लेकरं पाडायची कामं कामून करीत असेल... जाऊ द्या. मला काय कळते म्हणा. सायेब करतील ते बराबरच आसलं...' असे म्हणत रखमा पुढील कामाला लागली...
००००