Butpolish books and stories free download online pdf in Marathi

बुटपॉलिश

शामूसाठी आजची सकाळ विशेष होती. तीन महिन्यांनंतर तो आज आपल्या धंद्यावर निघाला होता. बुटपॉलिशचा खोका, वेगवेगळ्या पॉलिशच्या डब्या, ब्रश , जुनी फडकी असे साहित्य गोळाकरून तो जायला तयार झाला. त्याची बायको शांती हे सगळ कौतुकाने बघत होती. तिने घाई घाईने काळसर चहा कपात ओतला व रात्रीची एक शिळी चपाती त्याला खायला दिली. शामूने पांचट-काळ्या चहासोबत घाईत चपाती खाल्ली व तो आपल्या झोपड्याच्या बाहेर पडला. तेवढ्यात शांतीने आवाज दिला, “ अवं बंटीचं बाबा ! ऐका की! “
शांतीच्या आवाजाने शामू थांबला. तिने एक जुना साडीचा कपडा शामूला दिला व म्हणाली, “ अवं ये तोंडाला बांधा नायतर हवालदार रट्ट दिलं. “
शामू बायकोच्या मस्करीने हसला. हातातले सामान खाली ठेवले. तोंडाला फडका बांधला व घाई घाईने निघाला. थोडं पुढे गेल्यावर त्याला रामूचाचा हातात टमरेल घेऊन जाताना दिसले. स्वत :च्या घाईतही रामूचाचा थांबला व म्हणाला , “ सुबह सुबह कहॉं जा रहे हो बेटे ? “
शामू उत्साहाने म्हणाला , “ चाचा , धंदेपे जा रहा हूँ . “
रामूचाचा म्हणाले , “ बेटा ,लाक डाऊन है ना ? “
शामू म्हणाला , लॉक डाऊन थोडा थोडा खुला है | एक भाजीवालेने बताया की लोग धंदा लगा रहे है | मैं भी जा के देखता हूँ |”
रामूचाचा टमरेल हलवत जाता जाता म्हणाले , “ खुद का ध्यान रखना | “
शामू, “ हा “ म्हणेपर्यंत रामूचाचा पुढे गेले. शामू आपल्या वाटेला लागला. चालत चालत तो बांद्रा स्टेशनजवळ आला. खूप दिवसांनी स्टेशन परिसर बघून तो सुखावला.
नेहमी गजबजलेला स्टेशनचा परिसर आज शांत होता. चुकून एखादा माणूस दिसत होता. शामूने आपली नेहमीची जागा जरा साफ केली. आपलं बुटपॉलिशचे सामान ठेवले व तो
उत्साहाने ग्राहकांची वाट पाहू लागला. चुकून एखादी बस रस्त्याने जात होती. बाईक, कार यांची वर्दळही कमी होती. गजबजाटामध्ये काम करण्याची सवय असणारा शामू आजूबाजूच्या शांतेने जरा नाराज झाला. पण काय करणार ? कोरोनाने परिस्थितीच विचित्र निर्माण झाली होती. तो गि-हाईकाची वाट बघू लागला.

दुपार झाली. एकही माणूस बुटपॉलिश करायला आला नाही. खरतर लॉक डाऊनच्या आधी शामूला एवढे काम असायचे की कधी कधी दुपारी जेवायला त्याला वेळ मिळायचा नाही आणि आज ही परिस्थिती . बसून बसून तो तापला होता. इतक्या दिवसांनी आज धंदा सुरू केला आणि एका रूपयाची कमाई नाही. हा विचार करुन शामू दु:खी झाला. रस्त्याने जाणा-या एका माणसाला शामूने आवाज दिला, “ अवं दादा ! तुमची बुटं पॉलिश करायची का ? “ तो व्यकती भांबावून बघायला लागला. त्याने पायात स्लिपर घातली होती. शामूच्या हे लक्षात आले. तो लगेच म्हणाला,” साँरी बर का! पायाकडं बघितलं नायी . किती वाजले साहेब ? “ तो माणूस म्हणाला , “ चार वाजत आले. “
शामूने लांबून हात जोडून आभार मानले. त्याच्या मनात आले,” मुंबईत जेव्हांपासून आपण काम करतो आहोत, तेव्हांपासून एकही दिवस आपण पैशाशिवाय घरी गेलो नाही. पण आज मात्र आपल्याला रिकाम्या हाताने जावे लागणार !” त्याने आपले सामान आवरायला सुरुवात केली. एवढ्यात एक पोलिसांची गाडी त्याच्यासमोर येऊन थांबली. आता आपल्याला पकडून नेतात की काय ? असेच त्याला वाटले. तो गडबडीने आपले सामान घेऊन पळू लागला. एवढ्यात इनस्पेक्टर साहेबांनी हाक मारली, “ ए थांब! “ बिचारा शामू थांबला.
इनस्पेक्टर साहेब म्हणाले , “ धंदा झाला काय रे ? “
शामू म्हणाला ,” नाय साहेब! कोणभी आलं नाय. धंदा झाला की काही तरी देतो तुम्हाला!“
इनस्पेक्टर साहेब मोठ्याने हसले व म्हणाले , “ अरे तू काय देणार मला ? “ मग विचार केल्यासारखे करुन म्हणाले, “ माझे बुट पॉलिश करतोस का ? “
शामू लगेच म्हणाला,” करतो की. लय भारी पॉलिश करतो मी ! नुसतं उभं राव्हा तुम्ही आणि बघा या हाताची कमाल ! “
इनस्पेक्टर साहेब म्हणाले,” शिंदे सँनिटायझर द्या याच्या हातावर.”
शिंदेनी शामूच्या हातावर सँनिटायझर दिले. हात स्वच्छ करून शामू बुटांना मनलावून पॉलिश करू लागला. चकाकणारे बुट बघून इनस्पेक्टर साहेब खुष झाले. त्यांनी १००रुपयाची नोट शामूसमोर धरली व म्हणाले,” छान काम करतोस! हे पैसे घे. “
शामूचे डोळे पाण्याने भरले. तो म्हणाला, “ साहेब लय उपकार झाले. आज तीन महिन्यानंतर ही पयली कमाई हाय.”
इनस्पेक्टर साहेब बाजूला उभ्या असणा-या पोलिसांना म्हणाले, “ एकेकाने आपले बुट पॉलिश करुन घ्या. बिचा-याला चार पैसे मिळतील. “

साहेबांची ऑर्डर आल्यावर मग काय . सगळ्यांनी आपापले बुट पॉलिश करुन घेतले व पन्नास पन्नास रुपये शामूला दिले.
जाता जाता इनस्पेक्टर साहेब म्हणाले ,” आठवड्यातून दोन वेळा येत जा. आम्ही करुन घेऊ बुटपॉलिश. ” साहेब शिंदेला म्हणाले, “ शिंदे, याला सँनिटायझरची बाटली देऊन टाका.” शिंदेंनी सँनिटायझरची बाटली शामूसमोर ठेवली. शामूने बाटली उचलून आपल्या खोक्यात टाकली व तो आभार मानून जाणार एवढ्यात इनस्पेक्टर साहेब म्हणाले, “ तुझ्यासाठी ग्लोज म्हणजे हातमोजे आणून ठेवतो. पुढच्या खेपेला भेटलास की देतो. “ साहेब हात करून गाडीत जाऊन बसले. शामू भारावून, भरल्या डोळ्यांनी जाणा-या पोलिसांच्या गाडीकडे पहात राहिला. त्याच्या मनात आले, “ देव मानसात असतो हे आज आपल्याला पहायलाभी मिळालं आणि अनुभवायलाभी मिळालं.”

- - मंगल उमेश कातकर

इतर रसदार पर्याय