बॅलन्सशीट Mangal Katkar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

बॅलन्सशीट


सातचा गजर वाजला. राजारामने किलकिल्या डोळ्यांनी मोबाईल बघून बंद केला व तो पुन्हा अंथरूणावर आडवा झाला. त्याची पत्नी माधुरी पहाटे साडे चार वाजता उठून, पाणी भरून थोड्या वेळापूर्वीच झोपली होती. गजरच्या आवाजाने तीही जागी झाली. पण उठण्याची घाई नसल्याने तीही तशीच पडून राहिली. पाच-सात मिनिटांत मोबाईल पुन्हा वाजू लागला. राजारामने नाखुशीने फोन उचलला. फोनवर झळकलेले नाव बघून तो ताडकन उठून बसला.
“ हॅलो ! “ करडा आवाज राजारामच्या कानावर पडला.
“ हॅलो, गुड मॉर्निग सर. “ राजाराम दबक्या आवाजात म्हणाला.
“ गुड मॉर्निग. बॅलन्सशीट झाली असेल तर लगेच मला पाठव. मला जरा परत एकदा तपासून बघू दे. “
“ सॉरी सर. बॅलन्सशीट अजून पूर्ण झाली नाही. “ राजाराम थोडा घाबरतचं म्हणाला.
“ काय? गेले चार दिवस तू हेच मला ऐकवतो आहेस. उद्या ती सबमीट करायची आहे आणि अजून तू ती बनवली नाहीस. व्हॉट आर यु डुईंग? “
“ सॉरी सर! मी आजचं...नाही आताचं बनवायला घेतो." राजाराम विनवणी स्वरात बोलत होता. माधुरी मध्येच ओरडली, “ अहो ! बंद करा तो फोन आधी. त्यांना म्हणावं दहानंतर करा फोन.“ राजारामने डोळे मोठे करून खुणेने गप्प रहाण्यास सांगितले. पलिकडून साहेबांचे फायरिंग चालूचं होते. बिचारा राजाराम पडल्या चेह-याने ऐकत होता. शेवटी साहेबांनी धमकी दिली, “ कोणत्याही परिस्थितीत आज दुपारी दोनच्या आत माझ्याकडे बॅलन्सशीट आली पाहिजे, नाहीतर तुझी नोकरी गेलीचं समज. “ फोन बंद झाला.
राजारामची झोप कुठल्या कुठे पळून गेली होती. दहा मिनिटांत तो फ्रेश झाला व लॅपटॉप उघडून कामाला लागला. माधुरीची झोप मोड झाल्याने तीही कुरबुरत कामाला लागली. थोड्या वेळातचं राजारामचा चार वर्षाचा मुलगा सोनू रडत उठून बसला. त्याला समजावण्यासाठी माधुरी मोठमोठ्याने बोलू लागली. ते ऐकून तिची सात वर्षाची मुलगी परीही उठून बसली. तिला समजत नव्हतं आपण काय करावं? एका बाजूला सोनू बाहेर फिरायला जायचे म्हणून भोकाट पसरून रडत होता. आई त्याला वेगवेगळ्या गोष्टी देत होती. बाबा एका बाजूला बसून काम करीत होता. काही केल्या सोनू ऐकत नव्हता. शेवटी वैतागून माधुरी राजारामला म्हणाली, “ अहो, जरा याला घ्या बघू. नंतर करा तुमचे काम.” तिचं बोलणं ऐकून राजाराम रागाने म्हणाला, “ हे बघ, मला हे काम आताचं पूर्ण करायचे आहे. रोजची तुमची नाटकं असतात. मी जरा लॅपटॉप घेऊन बसलो की तुम्ही मुद्दाम गोंधळ घालता. घरात शांतता म्हणून मिळायची नाही !” त्याच्या या ताशे-याने माधुरी भडकली. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. “ तरी मी म्हणत होते आम्हांला गावाला पाठवा. या एवढ्याशा खोलीत जीव गुदमरतो आहे. किती दिवस कोंडून घ्यायचे आम्ही? दोन महिने झाले कोंडून राहतो आहोत. आता मुलंही वैतागली आहेत. मग रडतात. त्यांच्याबरोबर खेळायचे नाही, बोलायचे नाही, नुसता आपला डबा समोर घ्यायचा आणि बसायचे.”
“ डब्बा नाही हा. लॅपटॉप आहे लॅपटॉप. त्याच्यावर काम केले तरचं आता पैसे मिळणार आहेत. या घरात मला शांतता मिळणारचं नाही. बाहेर जातो मी.” असं म्हणत राजारामने लॅपटॉप बखोटीला मारला आणि चप्पल घालून त्याने दरवाजा उघडला. माधुरी सोनूला काखेत घेऊन चटकन पुढे आली व म्हणाली, “ अहो, बाहेर कुठे चाललात? गेल्या महिन्यापासून लॉकडाऊन आहे विसरलात की काय?”
माधुरीच्या आवाजाने समोरच्या खोलीतल्या शिंदे काकांनी दरवाजाच्या फटीतून हळूच डोकावले व मोठ्याने म्हणाले, “ काय रे राजा! कुठे निघालास? खाली फिरायला बंदी आहे विसरलास का?”
राजाराम कसनुसा हसत म्हणाला, “ विसरेन कसा काका. मुलांना बिस्कीट मिळते का बघून येतो.” माधुरीकडे रागाने बघत म्हणाला, “ पिशवी आणि मास्क दे मला.” माधुरीने सोनूला पटकन खाली ठेवले व राजारामला पिशवी, मास्क आणून दिले. राजारामने तोंडाला मास्क लावला व तो सोनूचा गालगुच्च्या घेत म्हणाला, “ बाबू, मी पटकन खाली जाऊन तुझ्यासाठी बिस्कीट, चॉकलेट घेऊन येतो, तोपर्यंत तू आपल्या दिदीबरोबर खेळ हं! “ त्याच्या या उद्गाराने सोनू उड्या मारत दिदीच्या बाजूला जाऊन बसला. राजारामचे लक्ष शिंदे काकांकडे गेले. ते त्याच्या लॅपटॉपकडे पहात होते. आता ते प्रश्नांची सरबत्ती करणार हे ताडून राजाराम म्हणाला, “ दारात वायफायची रेंज चेक करत होतो. बाहेर थोडाचं लॅपटॉप घेऊन जाणारं मी ! काका, दरवाजा लावून घ्या लवकर नाहीतर आजूबाजूवाले दारात गप्पा मारता म्हणून तक्रार करतील.” हे ऐकल्याबरोबर शिंदे काकांनी धाडकन दरवाजा बंद केला. राजाराम गालातल्या गालात हसला व पायाचा आवाज न करता दबक्या पावलांनी मजल्यावरून चालत निघाला. कोणी भेटू नये व आपल्याशी बोलू नये असे राजारामला वाटत होते.
पहिल्या मजल्यावर येताचं त्याला समोरच्या खोलीचे दार उघडे दिसले. राजारामचा मित्र संजू वाणी तिथे रहात असे. एरवी जाता येता हटकून संजूला आवाज देणारा राजाराम आज मात्र गपचूप निघाला होता. पण तेवढ्यात संजूचे लक्ष त्याच्याकडे गेलेचं. “ कुठे निघाली स्वारी मास्क घालून ? लॅपटॉप घेऊन?” नाइलाजाने राजारामने उत्तर दिले, “अरे, एक महत्त्वाचा ई-मेल करायचा आहे. घरात रेंजचा प्रॉब्लेम होतो आहे म्हणून जरा खाली जाऊन बघतो.” असं म्हणत राजाराम जिना उतरून तळमजल्यावर पोहोचला. इमारतीच्या बाहेर येताचं त्याला आजूबाजूला वेगळं जाणवू लागलं. नेहमी लोकांनी गजबजलेला आजूबाजूचा परिसर शांत होता. लोक खिडकीतून त्याच्याकडे बघत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राजाराम म्हसकर उद्यानाजवळ आला. उद्यानाला भले मोठे टाळे महापालिकेने लावले होते. आता बसायचे कुठे व काम करायचे कसे या प्रश्नांचा विचार करत तो रस्त्यावरून सरळ चालत असताना त्याचे लक्ष समोरच्या रेल्वे फाटकाकडे गेले. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा सरकारने कोरोनामुळे रेल्वेसेवा बंद केली होती. समोरच्या फाटकातून सरळ चालत गेले की लोअर परळ स्टेशनवर जाता येत होते. ही गोष्ट लक्षात येताचं तो भरभर चालत फाटकाच्या कठड्या जवळ आला. फाटक लोकांनी ओलांडू नये म्हणून रेल्वेने पाच फुट उंचीचा कठडा बांधला होता. पण लोकांनी शॉर्टकटसाठी तो कठडा काही ठिकाणी फोडला होता. राजारामने फोडलेल्या जागेतून फाटकात प्रवेश केला. आज तो पहिल्यांदा या फाटकात उभा होता. मागे- पुढे लांबचं लांब पसरलेले रूळ बघून त्याला दडपण आले. रेल्वे रूळ ओलांडताना ब-याच माणसांचे या फाटकात जीव गेले होते. चारचं दिवसापूर्वी पायी चालत. जाणा-या परप्रांतीय मजूरांचा रेल्वे रूळावर झोपल्याने झालेल्या अपघाताची बातमी त्याला आठवली. त्याला थोडी भीती वाटली. अंगावर शहारा आला. मनात आले, चुकून एखादी रेल्वेगाडी आली तर...तो थोडा थबकला. एवढ्यात त्याचा मोबाईल वाजायला लागला. आई गावाहून फोन करत होती. तीन वेळा फोन कट केला तरी आईचे फोन करणे चालूच होते. शेवटी त्याने फोन उचलला.
“ अरं राजा, फोन का घेईनासं? असा फोन लागला नायकि जीव घबराघुबरा व्हतो बघं. बरं काय करालासं?”
“ काय नाही. जरा रेल्वेच्या फाटकातनं चालतो आहे.”
“ काय रेल्वेच्या फाटकातनं चालालासं? आरं काय ही अवदसा आठवली तुला! अगुदर बाहिर पड बघू. “
राजारामला परिस्थितीचा अंदाज आला. तो समजुतीच्या स्वरात म्हणाला, “अगं आई, गेल्या महिन्यापासून रेल्वे बंद आहे. मी असाचं पाय मोकळे करायला आलेलो. आता परत निघालो. नको काळजी करू.” मग हळू आवाजात म्हणाला, “ आई, बाजूला पोलीस उभा आहे. बोलू नका असं सांगतो आहे. मी नंतर फोन करतो.” असं म्हणत त्याने फोन बंद केला. वेळ पुढे पुढे चालला होता. राजारामने हातातल्या घड्याळात पाहिले व तो भरभर चालत प्लॅटफॉर्मवर आला. एरवी गजबजलेला प्लॅटफॉर्म आज पूर्ण मोकळा होता. राजारामला हायसे वाटले. त्याने एक बाकडे पकडले व तो शांतपणे बॅलन्सशीट बनवू लागला. तो कामात इतका बुडाला की काळ-वेळ विसरला. आता शेवटचा ताळेबंद करायचा राहिला होता. राजारामने अवघडलेली मान वर केली व इकडेतिकडे पाहिले. दोन इसम त्याच्याकडे हातवारे करून आपापसात बोलत होते. सुरूवातीला राजारामला वाटले की ते आपल्यासारखेचं शांततेच्या शोधात काम करण्यासाठी आले असतील. पण त्याने जेव्हा त्यांना निरखून पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की ते गर्दुले आहेत. कदाचित ते दोघे आपल्यावर हल्ला करायच्या तयारीत असतील असे त्याला वाटले. आसपास वाचवण्यासाठी कोणी नाही हे लक्षात घेऊन राजाराम हळूच उठला व जीवाच्या आकांताने लॅपटॉप कवटाळून पळू लागला. हातची शिकार जाते आहे हे दिसताचं गर्दुलेही त्याच्या मागून पळू लागले. तोंडाला मास्क लावून लॅपटॉप छातीशी कवटाळत रेल्वे फाटकातून राजाराम पळत होता व त्याच्यामागून दोन गर्दुले त्याला पकडण्याचा प्रयत्न करीत होते. एखाद्या चित्रपटात शोभावे असे दृश्य होते. राजाराम धापा टाकत फाटकाच्या बाहेर आला, तर समोरचं एक पोलीस उभा होता. त्याने राजारामचा अवतार पाहिला. अंगात एक टी शर्ट व बर्मुडा घातलेला, तोंडाला काळा मास्क लावलेला, छातीशी कवटाळलेला लॅपटॉप, असं राजारामचं रूप बघून पोलीसाला तो भुरटा चोर वाटला. त्याने दरडावत विचारले, “ काय रे, चोरी करून पळत होतास ना? बरा सापडलास. आता चल पोलीस स्टेशनला.”
“ नाही हो साहेब. मी काही चोर नाही. माझ्याचं मागे दोन गर्दुले लागले म्हणून मी पळत आलो. बघा बघा...” असं म्हणत राजारामने फाटकाकडे हात दाखवला, पण तिथे कोणी नव्हते. ते दोघे गर्दुले पोलीसाला बघून पसार झाले होते. पोलीसाने राजारामच्या हातातला लॅपटॉप हिसकावून घेतला व म्हणाला, “ चल मोठ्या साहेबांकडे. लॉक डाऊनमुळे चो-या वाढल्या आहेत. बरा सापडलास!”
राजाराम पाया पडू लागला, गयावया करू लागला. पोलीस कडाडला, “ ए हात नाही हा लावायचा मला सांगून ठेवतो! सोशल डिस्टन्स ठेव. जे काय सांगायचे ते पोलीस स्टेशनमध्ये साहेबांसमोर.”
राजारामजवळ पर्याय नसल्याने तो त्या पोलीसाबरोबर पोलीस स्टेशनजवळ आला. पोलीस तडक आत गेला व साहेबांना हकीकत सांगू लागला.
“ पवार, चोर कुठे आहे? तुम्ही नुसता लॅपटॉप आणला आहे.”
“ नाही साहेब, चोर आला आहे ना! बाहेर उभा असेल.”
“ पवार, तुमची वाट बघत तो थांबेल का? अहो, तो पळाला असेल!”
हे ऐकून पोलीस पळतचं बाहेर गेला व राजारामला म्हणाला, “ काय रे, तुला माझ्या मागोमाग येता नाही आले? साहेब ओरडता आहेत. चल लवकर.”
इतके वर्ष लांबून पाहिलेले पोलीस स्टेशन आज तो पहिल्यांदा आतून बघत होता. घाबरतचं तो आत आला व इनस्पेक्टर साहेबांच्या समोर उभा राहिला. साहेबांनी त्याला वर-खाली न्याहाळले. मास्क काढण्यास सांगितला. चेहरा गुन्हेगारी पठडीतला वाटत नव्हता.
“ नाव काय तुझं? कुठे राहतोस?”
“ मी... मी राजाराम सखाराम पाटील. बी.डी.डी.चाळ नं. १२ मध्ये दुस-या माळ्यावर राहतो.”
“ चांगल्या घरचा दिसतोसं. मग चोरी का करतोसं? ”
हात जोडून राजाराम म्हणाला, “ नाही साहेब, मी चोर नाही. मी मेहेंदळे ग्रुपमध्ये अकाऊटंट आहे. लॉक डाऊनमध्ये घरी काम करता यावे म्हणून कंपनीने लॅपटॉप दिला आहे.”
“ विश्वास कसा ठेवणार?”
“ आमच्या मॅनेजर साहेबांना फोन लावून खात्री करून घ्या.”
राजारामने दिलेल्या नंबरवर फोन करून इनस्पेक्टर साहेबांनी राजारामची चौकशी केली. त्याच्या खरेपणाची खात्री पटल्यावर त्यांनी त्याला फाटकात जाण्याचे कारण विचारले. राजारामने एक सुस्कारा सोडला व सकाळपासून घडलेली कहानी साहेबांना ऐकवली. दुपारी दोनच्या आत आपल्याला बॅलन्सशीट देणे कसे आवश्यक आहे ते सांगितले.
“ साहेब, दोन मुलं आणि बायको घरात असल्याने शांतता जरा कमीच वाट्याला येते. कंपनीसाठी बॅलन्सशीट किती महत्त्वाची असते तुम्हांला माहित आहेचं. खूप काळजीपूर्वक ती बनवावी लागते. छोटीशी चूकही कंपनीला महागात पडते. गेले पाच दिवस मला शांतपणे कामचं करता येत नव्हते. आमच्या मजल्यावर कोणाच्या घरी मोठ्याने गाणी लागतात, कोण भांडत राहते, मुलांचा दंगा तर चालूच राहतो. शांतताचं कमी वाट्याला येते. साहेब कोठडीत इंटरनेटची रेंज असेल तर प्लीज मला एका तासासाठी त्या कैद्यांच्या कोठडीत ठेवता का? मी शांतपणे बसून राहिलेली बॅलन्सशीट पूर्ण करतो. आज जर हे काम झाले नाही तर मला खरचं जगण्यासाठी चोरी करावी लागेल. प्लीज साहेब नाही म्हणू नका!” राजाराम गयावया करत इनस्पेक्टर साहेबांच्या पायाला हात लावू लागला. त्याला थांबवत ते म्हणाले, “हे बघ पाटील, फक्त गुन्हेगारांनाच या कोठडीत ठेवले जाते. मी तुला नाही ठेवू शकत.”
हिरमुसल्या चेह-याने राजारामने घड्याळात पाहिले. साडे बारा वाजत आले होते. एक तास त्याच्या हातात होता. आता परत कामासाठी नवीन शांत जागा त्याला शोधावी लागणार होती. इनस्पेक्टर साहेबांनी लॅपटॉप त्याच्या हवाली केला व म्हणाले, “पाटील, तुला जर पाहिजे असेल तर बाहेर जे बाकडे ठेवले आहे त्यावर एक तासभर बसून तुझे काम पूर्ण करू शकतोस. फक्त आजचा दिवसचं ही सवलत. रोज यायचं नाही हं!”
पोलीसांमधली माणुसकी बघून राजारामचे डोळे भरून आले. त्याने लांबूनचं हात जोडून आभार मानले व बाकड्यावर बसून शांतपणे कंपनीची बॅलन्सशीट बनवू लागला.
- मंगल कातकर