तुझा स्पर्श... Priyanka Kumbhar-Wagh द्वारा कविता मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

तुझा स्पर्श...

सगळ्यांची नजर चुकवून तुझे माझ्याकडे पाहणे
अन् मी ही तुझ्याकडे हळूच चोरून बघणे
मग नकळत आपली नजर भिडणे
अन् लाजेने माझ्या काळजाचं पाणी पाणी होणे
असा तुझ्या नजरेचा स्पर्श...

तू माझ्यासोबत अगदी पहिल्यांदाच बोलणे
काय बोलावे हे दोघांनाही न सुचणे
मग बोलता बोलता आपल्या दोघांचेही निःशब्द होणे
अन् हळूच एकमेकांच्या डोळ्यांत स्वतःची प्रतिमा पाहणे
असा तुझ्या अबोल भावनांचा स्पर्श

सकाळी डोळे उघडताच फक्त तुझा विचार मनात येणे
मग मोबाईल हाती घेऊन पहिला मेसेज तुला करणे
तुझ्या रिप्लायची वाट बघता बघता आधीचे सर्व मेसेज वाचणे
अन् गालातल्या गालात माझे सुंदर हसणे
असा तुझ्या शब्दांचा स्पर्श...

तुझ्या फोनची मी सतत वाट पाहणे
मग तासंतास तुझा गोड आवाज ऐकणे
जणू कानामध्ये तू गुदगुल्या करणे
अन् तुझ्या शब्दांत मी स्वतःस हरवून जाणे
असा तुझ्या आवाजाचा स्पर्श...

तू कामात व्यस्त असताना मी सतत तुझा फोटो पाहणे
अन् अगदी वेड्यासारखं तुझ्या फोटोशी माझे बोलणे
माझी सारी सुख - दुःखे तुझ्याजवळ मांडणे
मग रात्री उशिरापर्यंत फक्त तुलाच आठवणे
अन् स्वप्नांतही फक्त तुलाच शोधणे
असा तुझ्या आठवणींचा स्पर्श...

तू मला तुझी सारी स्वप्नं सांगणे
नकळत मी ते सारे माझे मानणे
तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
मी फक्त तुझे स्वप्न पाहणे
असा तुझ्या स्वप्नांचा स्पर्श...

तुझे दुःख तू माझ्यासमोर व्यक्त करणे
तुझा त्रास पाहून माझे मन दुखणे
तुझ्या आनंदासाठी तुझ्यापासून दूर जाणे
आणि तुला बंधनातून मुक्त करणे
असा तुझ्या स्वातंत्र्याचा स्पर्श...

प्रत्येक दिवस आणि रात्र केवळ तुझीच वाट पाहणे
तुझ्या फक्त एका कॉल ची मला रोज आस असणे
तुझा एकतरी मेसेज येईल या आशेने मोबाईल हातात घेणे
अन् कधीतरी तुला ऑनलाईन पाहून
मैलो दूर असूनही तू सुखरूप असल्याची मला जाणीव होणे
असा तुझ्यावरच्या माझ्या नितांत प्रेमाचा स्पर्श...

आजपर्यंत माझ्या देहाला तू साधा स्पर्श ही न करणे
मुळात त्याची कधी गरजच न भासणे
तरीही रोमरोमात फक्त तुझाच गंध पसरणे
कारण तुझ्या मनाने माझ्या मनाला असा अलगद स्पर्श करणे
अन् तुझ्या नकळत तू माझ्यात सामावणे
असा तुझ्या मनाचा स्पर्श....
तुझा स्पर्श....

-प्रियांका कुंभार.


(स्पर्श!!! काय जादू आहे ना या शब्दात... साधा उच्चार जरी केला, तरी आपोआप आपल्याला हवी असलेली व्यक्ती नकळत आपल्या डोळ्यांसमोर तरळते. फक्त दोन अक्षरी शब्द पण भावना मात्र असंख्य!

काहींना स्पर्श म्हटलं की आपल्या प्रियकराची आठवण येते, तर काहींना नकळत किंवा जाणूनबुजून झालेल्या किळसवाण्या स्पर्शाची आठवण होते. पण दोघांमध्ये फरक मात्र एकच... अंगावरील शहारा!!!

या पलीकडे जर स्पर्श या शब्दाचा आपण विचार केला, तर स्पर्श हा केवळ शारीरिक संबंधांपुरता मर्यादित नसून अनुभवता येणारी एक मानसिक भावना आहे. फक्त आपला दृष्टीकोन त्या भावनेला समजून घेणारा हवा. बस इतकंच!

एखाद्याच्या प्रत्येक हालचालीमुळे जेव्हा आपल्या मनातील भावना उचंबळून येतात, तेव्हा नकळतपणे आपल्या मनाला स्पर्श झालेला असतो. शारीरिक स्पर्श हा क्षणिक असतो. पण एका मनाने दुसऱ्या मनाला केलेला स्पर्श हा परमानंद असतो. हा परमानंद ज्याने कोणीही अनुभवला असेल, त्याला नक्कीच स्पर्श या शब्दाचा अर्थ कळला असेल.

कधीतरी क्षणिक सुखाच्या पलीकडे जाऊन विचार करा. आपल्या प्रिय व्यक्तीच्या सहवासातील प्रत्येक हालचाल तुम्हाला एका नवीन स्पर्शाची नक्कीच आठवण करून देईल.असा स्पर्श जो फक्त त्याच्या समवेत तर तुम्ही नक्कीच अनुभवला असेल. पण जेव्हा ती व्यक्ती तुमच्या पासून दूर असेल अगदी तेव्हाही तुम्हाला ती तुमच्या जवळ असल्याचा भास होईल.

असा स्पर्श प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. अर्थातच मीसुद्धा अनुभवला आहे बरं का! मला खात्री आहे तुम्ही सुद्धा नक्कीच अनुभवला असेल. हो ना???

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती... त्याचप्रमाणे तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीने स्पर्श या शब्दाच्या अनेक वेगवेगळ्या संज्ञा असतील कारण प्रत्येकजण ते आपापल्या परीने परिभाषित करण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर मग तुमच्या दृष्टीनेही विचार करूया. तुमच्यासाठी स्पर्श या शब्दाचा अर्थ काय आहे, हे नक्की प्रतिकियांद्वारे कळवा.)


(टिप : या कवितेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कवितेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कविता ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )