भाग १
कोणतीही व्यक्ती जीवनात काहीही सोसल्याशिवाय मोठा माणूस बनत नाही.ती मोठी बनते तर तिच्या चांगल्या विचारांनी आणि तिच्या अनुभवी प्रसगांनी.लेखकांचेच उदाहरण बघा, आपले अनुभव ते लोकांसमोर मांडतात आणि आयुष्याचा ध्येय गाठतात.असे काही प्रसंग आपल्या आयुष्यात घडुन जातात आणि जीवनाचा कायापालटच करतात, किती भितीदायक असतात ते.तसंच काहीसं माझ्या जीवनातही घडले.आजपर्यंत मी ते विसरुही शकले नाही.तो प्रसंग मला एकदम धीट बनवून गेला.लोकांसमोर सामोरे जाण्याची ताकद मला दिली.परिस्थिती माणसाला सामोरे जायला शिकवते,ते खरंच आहे.जीवनात जगायला कोणीतरी सोबत असावं लागतं,तशी माझ्यासाठी माझी आई होती.माझ्या प्रत्येक सुखदुःखात तीच माझ्या सोबत होती.
आई, या शब्दातच सर्व काही दडलेले आहे.आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर.तिचे महत्त्व फार कमी लोकच समजु शकतात.माझे तर कोणतेही काम तिच्याशिवाय होत नाही.तेव्हा तिचे महत्त्व मला समजलेच नाही आणि कधी जाणुनही घेतले नाही.पण आता काय करणार,ती या जगातच नाही, तिचे अस्तित्व माझ्या जीवनातुन फार लवकर संपले.ती आता माझ्या जीवनात नाही.देवाने तिला आपल्याजवळ बोलावून घेतले.किती भयानक प्रसंग होता तो, जेव्हा तिचा काहीही हालचाल न करणारा देह माझ्या डोळ्यांसमोर होता.काही सुचेनासे झाले होते तेव्हा.कुठेही मन रमत नव्हते.तेव्हा एक गोष्ट समजली,आई हा एक मौल्यवान हिरा असतो,जो मी कायमचा गमावला आहे.दुसऱ्यांजवळ आई आहे,पण माझ्या जवळ नाही,या गोष्टीची खंत वाटु लागली.आजही तिची आठवण आल्यावर मनातील भावना उफाळून येतात.
माझे मन रमवण्यासाठी मी लिखाण करू लागले.माझी आईसाठी लिहिलेली सर्वांत पहिली कविता....
ते क्षण...
एका लेकीसाठी तिच्या आयुष्यातील सर्वात सुंदर
क्षण म्हणजे,आपल्या आईच्या कुशीत बागळणे.
ते क्षण खरच किती छान होते
जेव्हा गोंडस रितीने माझं नाव घेवुन मला हाक मारायची.
ते क्षण खरच किती छान होते
मला बक्षिसे जिंकलेले बघुन,गोड चुंबन देऊन
मला कौतुकाची थाप द्यायची.
ते क्षण खरच किती छान होते
जेव्हा प्रत्येक सुख दुखात माझ्या सोबत होतीस आणि
माझ्या खांद्यावरच ओझं,तुझ्या खांद्यावर पेलून घेत होती.
ते क्षण खरच किती छान होते
जेव्हा मला राग आलेला असतांनाही,निर्मळ मनाने
मला प्रेमाने घास भरवायची.
ते क्षण खरच किती छान होते
माझा पराभव झेलण्यास मी असमर्थ होती,
त्याक्षणीच माझ्या डोळ्यांतील अश्रु बघुन तुझ्याही डोळ्यांत अश्रु यायचे.
कळले नव्हते तेव्हा तु किती मोल्यवान आहेस.
पण खरच सांगते,माझ्या आयुष्यातील तो सर्वात वाईट क्षण होता
जेव्हा तुझा जळता देह माझ्या डोळ्यांसमोर होता.
जेव्हा जेव्हा तिची आठवण आली, तेव्हा तेव्हा या कवितेच्या माध्यमातून तिला अनुभवले.काय करायचे, दुसरा कोणता पर्यायच नव्हता.एका गोष्टीने ती माझ्यापासुन कायमची दुर झाली.देवावर राग येऊ लागला,पण एक प्रार्थना केली माझ्यासोबत तर हे घडले,पण दुसऱ्यांसोबत न घडो.कारण आई नसली तर काय काय सोसावं लागतं,हे ज्यांना आई नसते,त्यांनाच समजते.या गोष्टीची भिती वाटु लागली,की पुर्ण जीवन मी तिच्याशिवाय कशी काढणार?
तु नाहीस तर,हे जगही माझ्यासाठी अपूर्ण आहे.कोणीही कितीही तुझ्यासोबत वाईट लागले, तरिही तु त्यांच्यासोबत प्रामाणिक राहायची.हाच तुझा स्वभाव मन स्पर्शुन घ्यायचा.आजही मला आठवते,मी लहानपणी एकदा सर्वांच्या नकळत पैसे घेतले, तेव्हा सर्वांनी मला दोष दिला, मला मारले.त्यादिवशी मी काहीच खाल्ले नव्हते,तेव्हा मला प्रेमाने समजावून मला खाऊ घालणारी तुच होतीस.देवाला मी कधी बघितले नव्हते, पण आईसारखे दैवत साऱ्या जगातात नाही, हे मला तु नसतांना समजले.तुझा हात जोपर्यंत माझ्यावर होता, तोपर्यंत माझ्या आयुष्यात सर्व होते,पण तु गेल्यावर सर्वच माझ्याकडून दुरावले,नाती दुरावली, पहिल्यांदा अपयश माझ्या पदरात पडले.पण तुला आता हे कसं सांगू,हे अपयश तुझ्याशिवाय झेलण्यास मी असमर्थ होती.अशी नकळत तु माझ्यापासुन का दुर निघुन गेलीस?
माझ्या आजोबांना, माझ्या वडिलांना मुलगा हवा होता,पण आम्ही तिघे मुलीचं तुझ्या पदरात पडली.त्यासाठी तुला किती सोसावे लागले,तुझा किती छळ झाला,हे जेव्हा मी मोठे झाले तेव्हा आजीकडुन मला कळले, तेव्हा डोळ्यांत भदाभदा अश्रु वाहु लागले.तुला आणि बाबांना त्याच कारणामुळे छत्रीने मारून मारून घराबाहेर काढले होते आणि त्यांच्या तोंडी फक्त एकच शब्द होता, मुलगाच वंशाचा दिवा असतो.तेव्हा तुझ्याकडे आणि बाबांकडे एकही पैसा नव्हता.बरिशची वर्ष फक्त एका छोट्या खोलीत काढली होती.तेव्हा बाबांकडे काहीच नव्हते,पण बाबांना सोबतीला तुझ्यासारखी लक्ष्मी होती.पाऊलावर पाऊल टाकुन बाबांनीही स्वतःचे साम्राज्य उभारले.
तेव्हापासून ठरवले होते मी एकदिवस इतके मोठे बनवून दाखवणार की,त्या लोकांना या मुलीलाच वंशाचा दिवा मानावा लागेल.त्या परिस्थितीत माझ्या आईचे काय हाल झाले असणार,यांचा आजही विचार करून अंगात थरथराट सुटते.त्या बिचारीने खरंच काय काय सहन केले असणार? माझ्या आईचे नाव ज्योती, तिच्या नावाप्रमाणेच तिही रोज आमच्या घरात ज्योत पेटवायची.घरातील वातावरण शुद्ध होऊन जायचे.मनाने आणि चेहऱ्यानेही अतिशय सुंदर.म्हणून की काय तिच्यावर सर्व जळायचे.
तरिही ती सर्वांसोबत प्रेमळ असायची.कोणालाही कधीही वाईट बोललेले मी तिला बघितले नव्हते.माहित नाही अशा चांगल्या लोकांना देव का लवकर घेऊन जातो.आजही आकाशात असलेल्या अनेक चांदण्यांत मी तुला शोधते.
हे खरंच किती सुंदर म्हटले आहे,
जगी माऊली सारखे कोण आहे
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे..
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविन जीवनास साज नाही,
जिच्यासारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोंड नाही..
तिचे नाव जगात आई..
आई एवढे कशालाच मोल नाही.
आजही मला आठवते,मी तुला मम्मी म्हणून हाक मारायची पण तुला आई म्हटलेले आवडायचे.आज आई म्हणावेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेसे वाटते तर ते ऐकायला तु या जगातच नाही,याची खंत वाटते.माझ्यासाठी मरणयातना सहन करुन जीवनयात्रा
सुरु करुन देणारी अशी माझी
आई.